विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
जावजी दादाजी चौधरी स. (१८३९-१८९२) :- एम महाराष्ट्रीय छापखानदार. जातीनें मराठे. जन्म मुंबईत (१८३९). हें छापखान्याच्या धंद्यांत केवळ स्वपराक्रमानें उदयास आलें. आरंभी हे तीन रूपयांवर नोकर होते. तेच पुढें स्वत: मालक होऊन दरमहा चार हजार रूपये लोकांस पगार वाटू लागले. १८६४ सालांत यानीं स्वतंत्रपणें टाईप पाडून विकण्याचा धंदा आरंभिला. १८६९ त स्वत:चा छापखाना घातला. याच सुप्रसिद्ध छापखान्याचे नांव “निर्णय सागर” होय. नवीन सुंदर अनेक प्रकारचे टाईप करण्यांत आणि पुस्तकें सुबक छापण्यांत यानीं मोठी कीर्ति मिळविली. गुणी ग्रंथकारांनां यानीं यथाशक्ति सहाय्य केलें. संस्कृत मराठी, हिंदी, गुजराथी व इंग्रजी भाशेंत महत्त्वांचीं षेंकडों पुस्तकें प्रसिद्ध करून वाड्:मयांत अमूल्य भर घातली; व ग्रंथकारांस चांगलें उत्तेजन दिलें. यांच्या निर्णयसागर छापखान्याचा लौकिक अद्यापि कायम आहे मृत्यू ५ एप्रिल १८९२.