विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

जळगांव :- व-हाड. हा तालुका बुलाढाणें जिल्हयांत उत्तरअक्षांश २९ ३' आणि पूर्वरेखांश ७६'' ३५' च्या दरम्यान आहे. तालुक्याचें मुख्य ठिकाण याच नांवाचें असून तें नांदूरा स्टेशनपासून १६ मैलांवर आहे. उत्तरेस ८ मैलांवर सातपुडा डोंगर लागतो. खानदेशांतहि एक जळगांव आहे. त्यासाठीं यास जळगांव -जामोह असें म्हणतात. ऐने ई-अकबरीमध्यें हया गांवाचा नरनाळाच्या सरकारांतील   (जिल्हयांतील)  परगण्याचा गांव म्हणून उल्लेख केला आहे. येथील लो. स. दहा हजारापर्यंत आहे.

हें कापसाच्या व्यापाराचें मुख्य ठिकाण असून येथें सरकी काढण्याचे व कापूस दाबण्याचे कारखाने आहेत. येथें कापसाची उतारपेठ आहे. विडयाच्या पानांचा व्यापार येथें बराच चालतो. गांवाच्या वायव्येस राजा भर्तुहरीचें देऊळ असून त्याप्रीत्यर्थ नागपंचमीस जत्रा भरते. येथें एक लहानशी मशीद असून तांवर एक फारसी शिलालेख आहे. व-हाडंतील सर्वांत लहान तालुका हा  (जळगांव)  असून यांत ८ इनाम गांवें व २१७ खालसा; गांवें आहेत. या तालुक्यांतील जमीन सुपीक असून कापसाकरितां प्रसिद्ध आहे. बोगबागाईतहि बरीच आहे; त्यामुळें या तालुक्यास पश्र्चिम व-हाडची बाग असें म्हणतात. या तालुक्यातील सभावार पूर्णानदी आहे.   (बुलढाणें ग्याझे.)


जळगांव :- हें मुंबई इलाख्यांतील पूर्व खानदेश जिल्हयाचें व जळगांव तालुक्याचें मुख्य ठिकाण. जी. आय. पी. रेलवेचें एक स्टेशन असून येथील लो. सं. पंचवीस हजारांपर्यंत आहे. या जिल्हयांत व गांवाच्या आसपास कापुस फार पिकतो. म्हणून हा गांव कापसाच्या व्यापाराची एक मोठी उतार पेठ असून यास व्यापारी महत्त्व फार आलें आहे. १८६२-६५ सालीं ज्यावेळीं अमेरिकेंत लढाई चालू होती त्यावेळीं सर्व खानदेशांतील कापसाचा बाजार येथें भरत होता. या जिल्हयांतील मुख्य पिकें, कापूस, ज्वारी, भुईमूग, तीळ हीं आहेत. येथील म्युनिसिपालिटी १८६४ सालीं अस्तित्वांत आली.

येथें जिल्हयाच्या कचे-या, दवाखाने, शाळा, हायस्कूल वगैरे आहेत. मुळजीजेठा व भगीरथ या नांवाच्या दोन कापड तयार करणा-या गिरण्या असून इतर १५।१७ कारखाने (कापूस दाबण्याचे व सरकी काढण्याचे ) आहेत. येथें एक हायस्कूल आहे. पेशवाईअखेर हा गांव तीन कोसांवरील नशिराबाद गांवाच्या परगण्या खालीं होता. येथून तापीव्हाली रेलवेचा फांटा फुटला आहे. व-हाडांत एक जळगांव असल्यानें याला जळगांव मेहरूण असें  म्हणतात. मेहरूण हें खेडें जवळ दीड कोसावर असून तेथें एक मोठा तलाव असून त्याचेंच पाणी जळगांवला नेण्यांत आलें आहे. तालुक्याचें क्षेत्रफळ ३२० चौरस मैल असून त्यांत ९० गांवें आहेत; उत्पन्न पाऊण लाखावर आहे. उत्तरेकडील जमीन काळी व सुपीक असून हवापाणी उत्तम निरोगी आहे. (इं. ग्याझे; खानदेश ग्याझे.)