विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून
जस्त :- ( परमाणु भारांक ६५.३७ ) हें एक धातुरूप् मूलद्रव्य आहे. त्याचा रंग निळसर पिवळा असून नवीन कापलेला तुकडा चकचकीत असतो. जस्त ४१५० सें. ला वितळतें व १०४०० सें. उष्णमान झाल्यावर उकळूं लागतें. शुद्ध जस्ताची ओढून तार काढतां येते. बाजारी जस्तावर घाणाचे घाव घातले असतां त्यांचे तुकडे होतात; परंतु १००० किंवा १५०० सें. पर्यंत तापविल्यानंतर त्याचे पातळ पत्रे तयार करतां येतात; आणि थंड झाल्यावर ते पत्रे सहज वाकूं शकतात. २००० सें. उष्णमान असतां ही धातु इतकी ठिसूळ होते कीं, खलबत्त्यांत घालून तिची भुकटी करतां येते. जस्ताचें विशिष्टगुरूत्व ६.९१५ तें ७.१९१ पर्यंत असतें. याचा लेवप्रसारगुणक ०.००२९०५ आहे. हवेंत जस्तावर गंज चढत नाहीं. तें उकळूं लागेपर्यंत तापविल्यास पेट घेऊन जळूं लागतें. व त्याचें प्राणिद तयार होतें. अगदीं शुद्ध जस्ताची कांडी पातळ गंधकाम्लांत ठेवली असतां तिजवर फारच थोडा परिणाम होतो. परंतु त्याच्या जवळ प्लाटिनम. तांबें किंवा दुसरी एखादी जास्त धन वैद्युतिक धातु आणल्यास तें ताबडतोब द्रवतें व उज्ज वायु निघून जातो. सामान्य अशुद्ध धातु ताबडतोब द्रवते थंड व पातळ नत्राम्लांतहि जस्त द्रवतें आणि नत्रस प्राणिद निघून जातो. उष्णमान जास्त असल्यास किंवा अम्ल तीव्र असल्यास नत्रप्राणिद तयार होतें.
सांपडण्याचें ठिकाण :- निसर्गांत जस्त हें स्वतंत्र रीतीनें आढळत नाहीं. परंतु संयोगीस्थितींत पुष्कळ ठिकाणीं सापडतें. जस्ताची मुख्य अशेधित धातू म्हणजे त्याचें गंधकिद होय. कलखापरी हा खनिज पदार्थ जस्ताचा एक अशाधित धातु आहे. जस्त विशेष त: जर्मनी, आस्ट्रिया हंगेरी, बेल्जम, संयुक्तसंस्थानें व इंग्लंड या देशांत गंधकिदरूपात आढळतें. जस्ताचें कर्बित स्पेन, सायलेशिया व संयुक्तसंस्थानें हयांत सांपडतें. हिंदुस्थानांत मदुरा, पंजाब व बलुचिस्तान या ठिकाणीं जस्ताचे दगड सांपडतात.
पैंदास :- १८३३ पर्यंत जस्ताचा सर्व पुरवठा जमिनींतून होत असें. त्यानंतर रशिया, बेलजम, इंग्लंड व संयुक्तसंस्थानें या देशांतहि क्रमाक्रमानें जस्ताची पैदास होऊं लागली.
धातुविद्या :- अशोधित धातूपासून जस्त तयार करण्याचर रीति थोडक्यांत येणेंप्रमाणें देतां येईल. ( १ ) पहिल्यानें अशोधित धातूचें प्राणिद बनविणें; ( २ ) नंतर प्राणिदाबरोबर कर्ब मिसळून त्या मिश्रणाचें उर्ध्वपातन करणें जस्ताचें प्राणिद कोळशाबरोबर (कर्बनाबरोबर) तापविलें असतां इतर जड धातूंच्या प्राणिदाप्रमाणें याचेंहि संस्करण होऊन जस्त मिळतें. जस्त हें निकेलपेक्षांहि जास्त धन वेद्युतिक असल्यामुळें वैद्युतिक रीतीनें त्याचें पृथक्करण करण्यापूर्वी अशोधित धातूंत असणा-या इतर सर्व जड धातू प्रथम निराळया करणें जरूर असतें व त्यामुळें या रीतीनें शुद्ध धातु तयार करण्याचें काम बरेच कठीण आहे. जस्ताचे रासायनिक संयुक्तपदार्थ बरेच होतात. जस्ताच्या संयुक्तपदार्थांपैकीं प्राणिद अम्लजित, हरिद, गंधकिद, गंधकित, व कर्बित हीं मुख्य आहेत.
पृथक्करण :- जस्ताच्या लवणांच्या शिथिल द्रावणांतून गंधकीकृत उज्जवायूच्या योगानें तें गंधकिदाच्या रूपानें खाली पडतें. गंधकिदाच्या साक्याचा रंग पांढरा असून तें खनिज अम्लांत द्रवतें. परंतु सिरकाम्लांत द्रवत नाहीं. हा साका तापविला असतां त्याचें प्राणिद बनतें. तापलेलें असतां प्राणिदाचा रंग पिवळा असून तें थंड झाल्यावर रंग पांढरा होतो. व तें कोबाल्ट नत्रिताच्या द्रावणानें अेलें करून पुन्हां तापविल्यास थंड झाल्यानंतर त्याचा रंग हिरवा होतो.
उपयोग :- लोखंडी पत्रयांनां गंज चढूं नये म्हणून ते पत्रे जस्ताच्या रसांत बुडवून काढितात. पितळ, पिंचबेक नांवाचें खोटें सोनें, टोंबॅक वगैरे मिश्रधातू करण्याकरितां जस्ताचा उपयोग होतो. रोजच्या व्यवहारांतील पत्रे, नळ, पिंपें व भांडींहि जस्ताचीं तयार करितात. नकाशे, चित्रें वगैरेंचे ब्लॉक जस्ताचे करण्याचा प्रघात आहे.
औषधीविज्ञान व भेषज प्रकरण :- जस्ताचें हरिद फार दाहक आहे हें वीष पोटांत गेलें असल्यास वांतिकारक औषध देऊन पोट मोकळें केल्यावर कोंबडीच्या आंतील बलक किंवा दुसरा एखादा डिंकासारखा चिकटपदार्थ खावयास द्यावा. जस्ताचें गंधकित, प्राणिद, कर्बित, ओलिएट आणि सिरकित या लवणांच्या योगानें जखम बरी होण्यास मदत होतें.