विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जलपैगुरी, जिल्हा. – बंगल, राजशाही विभाग, उ. अ. २६० ते २७० व पू. रे. ८८० २०’ ते ८९० ५३’. क्षेत्रफळ २९६२ चौरस मैल. या जिल्ह्याचे दोन भाग करता येतात. तिस्ताच्या पश्चिमेस असलेल्या भागातील राज्यव्यवस्था बंगालप्रमाणे चालते. हा भाग फार सुपीक आहे. तिस्ताच्या पूर्वेकडील भाग १८६५ साली भूतानपासून घेण्यात आला. बहुतेक भाग सपाट आहे. फक्त ईशान्येस सिंकुला डोंगर असून त्याची उंची ४००० फूट ते ६००० फूट आहे. यापैकी एका डोंगर वर बक्सा नावाचे लष्करी ठाणे ब्रिटिशांनी बांधले असून त्याने भूतानमध्ये जाणार्या मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता रोखला आहे. या बक्सा नावाच्या डोंगराखेरीज बहुतेक सर्व भागांत मळीची जमीन आहे. बक्साच्या पश्र्चिमेस सुमारें अर्ध्यां मैलावर तांब्याची खाण आहे. त्याचप्रमाणें शानसिंग नांवाच्या चहाच्या मळयाच्या उत्तरेस चार मैलांवर तांब्याच्या खाणी आहेत.
तिस्ताच्या पश्र्चिमेकडील भागांत जंगल कमी आहे. शेवरी, शिसवी, आंबा, फणस, पिंपळ, चिंच यांचीं झाडें सांपडतात. सुपारी व बांबूंचीं झाडें पुष्कळ उगवतात. दुआरच्या उत्तरेस जंगल पुष्कळ असून त्यापैकीं बराच भाग सुरक्षित आहे. येथील उष्णमान कधींही फार नसतें. साधारणपणें उन्हाळयांत ( एप्रिलमध्यें ) ९०˚ अंशावर पारा असतो. पाऊस पुष्कळ पडतो. जलपैगुरी येथें १२२ इंच व वक्सा २०९ इंच पर्यंत पडतो. इ.स. १९०२ च्या सप्टेंबर महिन्यांत येथें मोठा पूर आला होता त्यावेळीं बरेंच नुकसान झालें.
इतिहास :- प्राचीन काळीं या भागांत प्राग्ज्योतिष अथवा कामरूप नांवाचें राज्य होतें. कोणी जल्पेश्वर नांवाच्या राजानें ज्या ठिकाणीं जल्पे नांवाचें देवालय आहे, तेथें पूर्वी एक देऊळ बांधलें होतें व जल्पें लिंग त्याच वेळी जमिनींतून वर आलें. भितारगड नांवाचा शूद्र राजा पिरथु याची पूर्वीची राजधानी या भागांत होती. त्या ठिकाणीं प्राचीनत्व दाखविणारे पुष्कळ अवशेष सांपडतात. पुढें बंगालमधील पाल राजांनीं हा भाग घेतला. पुढें खेन राजांच्या ताब्यांत हा भाग गेला. नीलध्वज नांवाच्या खेन राजानें कुचविहार संस्थानांत असलेंलें कामातापूर वसविलें पुढें हा भाग विश्र्वसिंगनें स्थापन केलेल्या कोच राज्याचा भाग झाला. या राज्याचा नाश झाल्यावर पश्र्चिमेकडील प्रदेश मोंगल राज्यांत सामील झाला. इ.स. १७६५ मध्यें ईस्ट इंडियाकंपनीकडे या भागाचा दिवाणीचा कारभार आला. याच्या अंतर्भागांत व्यवस्था ठेवणें मुष्किलीचें झाल्यामुळें फार चो-यावगैरे होऊं लागल्या; परंतु इ.स. १७८९ मध्यें तेथील कलेक्टरनें त्याचा बंदोबस्त केला.
दुआर भाग भोतियांच्या हातांत पडला होता व ते कुचविहारच्या संस्थानास फार त्रास देत असत. या ठिकाणीं दंगेधोपे नेहमीं होत असत. १८६५ सालीं भूतान युद्ध झाल्यानंतर हा भाग ब्रिटीश राज्यास जोडण्यांत आला. लोकसंख्या ( १९२१ ) ९३६२६९. पश्र्चिम दुआर भागांत वस्ती झपाटयानें वाढत आहे.
येथील शेंकडा ७७ लोक बंगालीची पोटभापा रंगपुरी अथवा राजवंशी बोलतात. चहाच्या मळयावर बाहेरील लोक फार येत असल्यामुळें हिंदी, मेक, खास, मुंडारी, संताळी वगैरे भाषाहि प्रचलित आहेत.
इ.स. १८७२ पासून मुसुलमानांच्या वस्तीचें प्रमाण कमी होत चाललें आहे. येथील हिंदुमुसुलमान आपसांत न भांडता रहातात. एकाच घरांत हिंदु व मुसुलमान कुटुंबें राहिलेली येथें दृष्टिस पडतात.
शेतकी :-मळीची जमीन फार सुपीक असून भात, गळिताचीं धान्यें, बटाटे, एरंडी, सुपारी वगैरें येथें पिकें होतात. तिस्ताच्या पश्र्चिमेस ताग, गहूं, तांदुळ हें आहे. चहाची लागवड इ. स. १८७४ मध्यें सुरू झाली. इ. स. १९०३ मध्यें २०७ चहाचे मळे होते. येथें मळयासाठीं मजूर मिळविण्याकरितां कांहीं एक कायदा करावा लागलेला नाहीं. कारण येथें मजूर पुष्कळ मिळतात. चहाच्या मळयांत नेपाळी मजूर पुष्कळ येत असून ते छोटा नागपुरांतील मजुरांची जागा घेत आहेत. कांहींनीं आपलीं घरें याच भागांत केलीं आहेत. तागाची लागवड देखील बरीच वाढत चाललेली आहे. गुरांची अवलाद खुजी व अशक्त आहे. त्यांत सुधारणा करण्याचा प्रयत्न कोणी करीत नाहीं. गुरचरण पुष्कळ आहे.
जंगल :- येथें संरक्षित जंगलें आहेत. इ. स. १९०३-०४ मध्यें जंगलापासून झालेलें उत्पन्न ११८००० रूपये होतें. येथें चुनखडीचा दगड व तांबें सांपडतें. वक्सापासून दोन मैलांवर असलेली तांब्याची खाण पूर्वी कांहीं नेपाळी लोक चालवीत होते. बागरकोट येथें दगडी कोळसा सांपडतो.
व्यापार व रस्ते वगैरे :- येथें तरट तयार होतें. चहाच्या व्यापारामुळें इतर व्यापारहि फार वाढला आहे. धान्यास भाव चांगला येतो. भूतानशीं देखील थोडा फार व्यापार चालतो. कापड, यंत्रें, लोखंडी पत्रे या भागांत येतात. तांदूळ, ताग, चहा, तंबाखु वगैरे बाहेर जातात. या भागांतून ईस्टर्न बंगाल स्टेट रेलवे जाते. इतर रस्तेहि चांगले आहेत. या जिल्हयाचे दोन विभाग आहेत. जलपैगुरी आणि अलीपुर. जिल्हयांत कचे-या वगैरे सर्व सोयी आहेत.
विभाग :- जलपैगुरी जिल्हयाचा एक विभाग उ. अ. २६˚ २७' व पू. रे. ८८˚ २०' ते ८९˚ ७'. क्षेत्रफळ १८६८ चौ. मै. व लो. सं. (१९११) ६९९९५९. यांत एक गांव व २०३९ खेडीं आहेत. हा भाग सपाट मैदान असून यांत जंगल पुष्कळ आहे. भित्तरगड व जल्पे येथें पुष्कळ प्राचीन अवशेष सांपडतात. या विभागांत जलपैगुरी, टिटाळया, बारडा आणि मैनागुरी हीं व्यापारी ठिकाणें आहेत.
गांव :- जलपैगुरी विभागाचें मुख्य ठिकाण. उ.अ. २६˚३३' व पु. रे. ८८˚४३, लोकसंख्या ( १९११ ) १४६९०. गांव जरी लहानसाच आहे तरी तो भरभराटीस येत आहे. ईस्टर्न बंगाल स्टेट रेलवे येथून जाते. इ. स. १८८५ मध्यें येथें म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. येथें सर्व कचे-या, तुरूंग, दवाखाने, शाळा वगैरे आहेत.