विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जर्मन सिल्व्हर - ३ भाग तांब्यांत १ भाग निकेल धातु मिश्र केली म्हणजे रुप्यासारखा पांढर्या रंगाची मिश्र धातु बनते व त्यास निकेलचें रुपें असें म्हणतात. यांत थोडें जस्त मिळवून जस्त मिळवून जर्मन सिल्व्हर करतात. जस्ताच्या योगानें याच्या अंगीं काहीं दिवसांनीं पिंवळटपणा येतो; तथापि त्यामुळें त्याचा आकार वाढतो व स्वस्त विकतां येतो. वस्तुतः पितळ्यांतच थोडें निकेल मिळवून त्याला पांढरेपणा आणलेला असतो. यास कोपर ब्रास असें म्हणतात. चमचे वगैरे करण्याकरितां दोन भाग तांबें, १ भाग जस्त व १ भाग निकेल मिश्र करितात. चाकूच्या मुठी वगैरे करण्याकरितां ५ भाग तांब्यांत २ भाग निकेल आणि २ भाग जस्त मिसळतात आणि पातळ पत्रे करण्याकरितां ३ भाग तांब्यांत १ भाग निकेल व १ भाग जस्त मिळवितात. या धातूंचें ओतींव काम करणें असेल तर १०० भाग मिश्र धातूंत ३ भाग तांबें मिसळतात. (पदार्थ वर्णन)