विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जरासंध - पुरुकुलोत्पन्न अजमीढ राजच्या वंशांतील उपरिचर वसु राजाचा पौत्र व बृहद्रथ राजाच्या दोन पुत्रांतला एक याचा जन्म दोन मातांपासून दो शकलानें होऊन तीं शकलें जरा राक्षसीनें सांधिलीं म्हणूस यास असें नांव पडलें. हा मगध देशाचा अधिपति असून याच्या राजधानीचें नांव गिरिव्रज होतें. याच्या दोन कन्या अस्ति व प्राप्ति कंसास दिल्या होत्या. कंसास कृष्णानें मारल्यामुळें यानें सतरा वेळां कृष्णाशीं युद्ध केलें. परंतु तितक्या वेळां याचा पराभवच झाला. यानें शतावधि राजे युध्दांत जिंकून पशुवत् बद्ध करून तुरुंगांत ठेवले होते. शतवर्ष पूर्ण झाल्यावर त्यांस हा रुद्रयोग करुन बळी येणार होता. राजांस बद्ध होऊन ८६ वर्षें झालीं असतां त्यांनीं गुप्त रुपानें आपणांस सोडविण्याविषयीं कृष्णाकडे संदेश पाठविला. त्यावरून कृष्ण, भीम व अर्जुन घेऊन मगध देशास गेला. आम्हां तिघांतून ज्याच्याशीं युद्ध करणें असेल त्याशीं कर असें त्यानें तेथें जरासंघाला आव्हान केलें. भीमाशीं बाहुयुद्ध करण्यास जरासंध तयार झाला. १४ दिवस सतत युद्ध झाल्यावर भीमानें जरासंधास पाडलें. तथापि तो पुन्हां सांधला जाऊन युद्धास सज्ज झाला. याप्रमाणें बरेच वेळां झाल्यावर कृष्णानें सुचविल्याप्रमाणें भीमानें उजवा भाग डावीकडे व डावा उजवीकडे टाकून देतांच जरासंध मृत्यु पावला. (भारत, सभा.अ. १७-२४; भा. दशम. अ. ७२-७३)