विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जरदाळू - या फळास लॅटिनमध्ये प्रूनस आर्मेनिआका, इंग्रजींत अप्रिकट, मराठींत व हिंदींत जरदाळू इत्यादि नांवे आहेत हें एक साधारण उंचीचें झाड असून याची पश्चिम हिमालयांत लागवड करितात. हें मूळचें चीनदेशांतील असावें असें कांही विद्वानांचें मत आहे. प्राचीन खोतानमध्यें ऐतिहासिक शोधार्थ जमीन खणीत असतांना या झाडाचें लांकूड सांपडलें. यावरून आठव्या शतकाच्या अखेरच्या दशकाच्या अगोदर या झाडाची तेथें लागवड होत असावी असें दिसतें.
उत्पन्न वगैरे - बदामासारखा या झाडापासून डिंक निघतो. त्याला बाजारांत ''चेरीगम'' म्हणतात. बियांपासून काढलेल्या स्वच्छ तेलाचा जाळण्याकरितां व खाण्याकरितां उपयोग होतो. ज्या मानाने झाड उंच स्थळीं असेल त्या मानानें मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत जरदाळू पिकतो. वायव्य हिमालयांत वाळलेल्या जरदाळूंचा लोक खाण्याकडे उपयोग करतात व ताजीं फळेंहि खातात. यूरोपियन लोक ताज्या जरदाळूंचा मोरंबा करतात व सुके जरदाळू स्वयपाकांत उपयोगास आणतात. अफगाणिस्तान व आसपासच्या डोंगरांतून पुष्कळसा जरदाळू हिंदुस्थानांत येतो. लेह हें जरदाळूच्या व्यापाराचें केंद्र असून तेथून बाल्टीस्तान व लहान तिबेटमधून दरसाल ३०० मण जरदाळू बाहेर जातो. अफगाणिस्तानांतील खुबनीसमधला व्यापार काबुली लोकांच्या हातांत आहे. या झाडाचें लांकूड दिसण्यांत सुंदर असून तें निरनिराळें सामान करण्याकडे लावितात.