विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जरतार - सोनें हें जसें फार प्राचीन काळापासून लोकांस माहीत होतें त्याच प्रमाणे कलाबतूची कलाही लोकांस माहिती असावी. निदान ती प्राचीन आर्यांस तरी माहीत असावी याबद्दल शंका रहात नाहीं. ॠग्वेदांत (१०.१५५,६) ''हिरण्मयानत्कान्'' असा सोनेरी वस्त्रासंबंधीं उल्लेख आहे. तसेंच व ''पेशस्कारी'' म्हणजे जरीची वेलबुट्टी काढणारी स्त्री असा यजुर्वेदांत उल्लेख आढळून येतो. सायण मतानें मरुत् म्हणजे सोनेरी वेलबुट्टी काढलेलें वस्त्र वापरीत. ॠग्वेदांत पेशस्, पेशन या जरतारी वस्त्रांचा उल्लेख आढळतो हे (ॠ २.३, ६ १०.१, ६). शुक्रनीतिकारांनीं कलाबतूची कला ही चौसष्ट कलेंत गणली आहे. अर्थांत् ही त्या वेळीं फारच प्रचारांत होती. त्यांतील कला या शब्दाचा अर्थ त्याप्रमाणेंच केला आहे व त्यावरून कलावतु हा शब्द संस्कृतोद्भव असावी याबद्दल संशय रहात नाहीं. कारण कला म्हणजे ''कृत्रिम स्वर्णरजतक्रिया लेपादि सत्क्रियः'' (शुक्रनीति) सोनें रूपें तयार करणें अगर खरें सोनें रूपें हलक्या धातूवर चढविणें अगर त्याचा थर देणें या क्रियेस कला असें म्हणतात.
यानंतर रुद्रयामल तन्त्रांत धातुकल्पामध्यें या कलेचें सविस्तर वर्णन आलें आहे. या ग्रंथाच्या कालनिर्णयासंबंधीं निश्चित मत सांगतां येत नाहीं. महाभारत काळीहि कला पूर्ण अवगत असावी. कारण राजसूय यज्ञाच्या वेळीं युधिष्ठिराला चहूकडून करभार आले त्यांत काम्बोजाच्या राजानें अनेक दासी युधिष्ठिराला नजर केल्या आहेत. त्या दासी जरीचीं वस्त्रे नेसलेल्या होत्या असा स्पष्ट उल्लेख आहे.
और्णाम्बैलान्वार्षदन्तात्र्जातरुपपरिष्कृतान् ।
प्रावाराजिन मुख्यांच कंबोजः प्रददौ महान् ॥
महाभारताचा रचनाकाल चिंतामणराव वैद्यांच्या मतानें इ.स.पू.२०० वर्षांचा आहे. व प्रत्यक्ष राजसूय यज्ञाचा काळ ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपर्यंत जातो तरी ऐतिहासिकरीत्या या कलेच्या उगमाचा काल निदान ख्रि.पू. २००० वर्ष म्हणतां येईल.
संस्कृतेतर वाङ्मयांत इतका जुना उल्लेख कोठेंहि असलेला ऐकिवांत नाहीं. व म्हणूनच पुष्कळ पाश्चात्य विद्वानांच्या मतें ही कला हिंदुस्थानांत उगम पावली व पश्चिम मार्गानुवतीं होऊन बाबीलोन, टायर, बगदाद, दमास्कस, सैप्रस सिसली, कान्स्टांटिनोपल, व्हेनिस वगैरे शहरांतून क्रमाक्रमानें जाऊन फ्रान्समध्यें लियान्स व जर्मनीमध्यें न्यूरेनवर्गपावेतों पसरली.
आपल्याकडे पुराणकालानंतरचा इतिहास चांगलासा उपलब्ध नाहीं व या कलेची प्रगति कसकशी होत गेली याबद्दल सविस्तर माहिती सांपडणें फारच कठिण होऊन गेलें आहे. तरी पण सुमारें ८ व्या अगर ९ व्या शतकापासून अगर त्यापूर्वीपासून उत्तरेंत बनारस व दक्षिणेंत पैठण हीं शहरें या धंद्याच्या कारागिरीबद्दल प्रसिद्ध आहेत. हीं शहरें त्यावेळीं चोहोंबाजूनें पुढें असत.व्यापार म्हणा अगर विद्वत्ता म्हणा या दोहोंमध्यें या शहारांचा हात धरण्यास संबंध हिंदुस्थानांत एकहि शहर नव्हतें.
मुसुलमानी रियासतींत या शहरांनां बरेंच गौणत्व प्राप्त झालें; तरी पण मुसुलमानी पातशहा हे विलासी व ऐषआरामी असल्यामुळें या कलेस उत्तेजनच मिळालें; व निरनिराळ्या जास्त पेठा बसूं लागल्या. उत्तरेस दिल्ली, लखनौ, कानपूर, बर्हाणपूर इत्यादि व दक्षिणेस बीड, जालना, बैठण, येवला व खालीं सालेम, मदुरा व मद्रास वगैरे.
पाश्चात्य ग्रंथकारांच्या मतें सर्वांत जुना असा कलावतू संबंधीं निर्देश त्यांच्या ''जुना करार'' नामक धर्मिक ग्रंथांत आढळून येतो. अरान नांवाच्या धर्मोपदेशकाच्या झग्याला जरतार होती. ती अशी कीं त्यांनीं सोन्याच्या तारा ठोकून तयार केल्या आणि नंतर चपट्या केल्या. अशा त्या तार निळ्या व अस्मानी धाग्यावरती फारच कुशलतेनें वळल्या होत्या. ग्रीक लोकांच्या ईलीयड व ओडेसी नांवाच्या पुराणग्रंथांत जरतारीच्या कपड्याचा उल्लेख वरचेवर येतो. त्यांच्या पौराणिक युगांत हातोड्यांनीं अगर मठारीनें सोनें ठोकून तार चपट्या करीत असावेत; व त्या मग रेशीम अगर सूत यावर गुंडाळीत असावेत.
असीरीया अगर असुर राष्ट्रांतील मोठमोठ्या राजांपैकी असुर नझिरपाल (ख्रि.पू. ८८४) याच्या झग्यास कलाबतूचें फारच सुंदर काम केलें होतें. यावरून त्यावेळच्या असुरी राष्ट्रांत अगर बाबिलोनिया राष्ट्रांत ही कला बरीच ऊर्जितावस्थेत आली होती असें दिसतें. असुरी राष्ट्राचा बीमोड झाल्यावर त्यांच्या जेत्याकडे म्हणजे इराणी राष्ट्राकडे या कलेचें पुरस्कर्तुत्व आलें. त्यांनीं या कारागिरीचा फारच उत्कृष्ट रीतीनें समाचार घेतला. व त्या कलेस पुढें आणलें. इराणचा प्रख्यात बादशहा डरायस हा नेहमीं भरजरीचा झगा घालीत असे. या झग्यावर जीरचें भरतकाम केलें होतें व दोन पक्षी एकमेकांशीं झुंजत आहेत असें दाखविलें होतें. महाप्रतापी सिकंदर बादशहा हिंदुस्थानांत आला त्यावेळीं त्यास सर्व पौरस्त्य राजे भरजरीच्या झब्यामध्यें आढळले असें वर्णन आहे. आलेक्झांडरनंतर दोन शतकांनीं परगाममचा राजा तिसरा अल्बुन्स यानें सोनेरी कलाबतूनें विणण्याच्या कलेला फारच उत्तेजन दिलें; असें प्लीनीनें लिहिलें आहे. व हेंच तें इतिहासप्रसिद्ध आटालिक कापड. रोमन लोकांच्या ग्रंथांतरीहि याचा बराच उल्लेख सांपडतो. आग्रिपिनाचीं विख्यात वस्त्रें सर्वस्वी भरगच्चीची होती. आणि हायड्रिअन बादशहाच्या संग्रहित वस्तूमध्यें मार्कस आरकेस यास पुष्कळ झगे जरीचेच दिसून आले.
ईजिप्त व बाबिलोनियाच्या भागांत सध्यां जें उत्खनन चालू आहे त्यांत कांही कांहीं ठिकाणी जरीच्या पोषाखांतील अवशिष्ट अशा चांदी सोन्याच्या तारा सांपडल्या आहेत. होनोरियसच्या बायकोचें थडगें उकरलें त्यावेळी जरतारीचे अवशेष अशा तारा सापडल्या व त्या सर्व आटवून त्यांतून ३६ पौंड सोनें निघालें.
यूरोपांतील मध्ययुगांत कान्स्टांटिनोपल व पार्लेमो येथील विणकर जरतारीचें काम करीत असत; त्यानंतर स्पेनमधील मूर लोकांनीं ही कला उचलली. १२ व्या शतकांत या लोकांत जरीचा फारच प्रसार झाला होता. त्यानंतर सायप्रसमध्यें फारच मोठ्या प्रमाणांत जरतार तयार होऊं लागली. बहुतेक व्यापारी सायप्रसमधील जर पसंत करूं लागले व सायप्रसचा व्यापार फारच जोरानें वाढूं लागला. त्यानंतर हळू हळू इटालींतहि कारखाने निघूं लागले व १४ व्या शतकांत व पुढें इटालीच्या या क्षेत्रांत फारच प्राबल्य वाढलें.
याच सुमारास जर्मनीमध्यें न्युरेनबर्ग शहरी कलावतूचे कारखाने निघूं लागले व जत्रांतून तार ओढणें वगैरे गोष्टीत त्यांनीं बरीच प्रगति केली. पश्चिमेकडील या कलेंत स्थित्यंतरें घडवून आणण्यांत न्युरेनबर्ग व लिआन्स ही दोन शहरें फारच विख्यात आहेत. मंत्र म्हणजे अस्सल पोलादी पट्टीत छेद करुन त्यांतून तार ओढून बारीक करण्याच्या कृतीचा शोध न्यूरेन्बर्गनिवासी कारागिराकडून १४ व्या शतकांत लावला गेला असें कांहीं विद्वानांचे मत आहे.
कृति व प्रकार - जरतार म्हणजे काय, ती कशाची करतात यासंबधानें आपणांस आतां विचार करणें आहे शुक्रनीतिकारानें सांगितल्याप्रमाणें हलक्या धातूंवर सोनें अगर रुपें अगर चांदी यांचे थर बसवून ती तार रेशीम अगर सूत यावर गुंडाळणें. अशा रीतीनें गुंडाळलेली तार ती जरतार होय. आतां यांत दोन प्रकार करतां येतील. एक खरी व एक खोटी.
खरी - जिच्यामध्यें चांदीवर सोनें चढविलेलें असतें ती. ही चांदीवर सोनें चढविलेली तार रेशमावर अगर सुतावर गुंडळलेली असते. हिचा उपयोग व्यवहारांत जास्त होतो. ही बहुधा काळी पडत नाहीं. ही तार जाळल्यावर पांढरी पडते. ही तिची कसोटी आहे. स्लेटपाटीवर घासल्यास कस पांढरा दिसतो.
खोटी - तांबें, लोखंड, जर्मनसिल्व्हर,पितळ, इत्यादि धातूंच्या तारेवर चांदी अगर सोनें चढवून तयार केलें असतें ती सर्व खोटी होय. ही फार लवकरच काळी पडते. जाळली असतांनां ही तार काळी पडते. स्लेटपाटीवर घासली असतां या जातीच्या जरतारीचा कस लाल दिसतो व खर्याचा पांढरा दिसतो.
कृति - ५० भार चांदी घेऊन (कांहीं कांहीं ठिकाणीं ज्यास्तहि घेतात) तिच्या साधारण अर्धा इंची जाड व फूटभर लांब गोल लगढ्या पाडतात; त्या गोल करुन कानस मारुन अतिशय स्वच्छ करतात व त्यांवर ज्या प्रमाणांत आपणास जरतार हलकी अगर भारी करावयाचा असेल त्या प्रमाणांत सोन्याचा पातळ फत्रा गुंडाळतात. हा पत्रा वेष्टिल्यानंतर त्यास ताव देतात नंतर त्या लगड्या हातोडीनें ठोकून एकजीव करतात व पुन्हां निवाल्यावर पुना तापवितात व पुन्हां हातोड्यानें लांबवितात. अशा रीतीनें दोनदा अगर तीनदां तापवून एकजीव झाल्यानंतर लोखंडी वेजांतून ओढून लांबवितात. प्रथम जाड मग बारीक मग त्याच्या पेक्षां बारीक असें क्रमाक्रमानें साधारण बारीक करतात हें सर्व काम पावटेकरी आपल्या दुकानांत करतात. पावटा म्हणजे एक भरीव लांकडाचा रहाट असतो. यास चार हात अगर मोठाले दांडे असतात. यापैकीं एका हातास लोखंडी साखळदंड अडकविलेला असतो. या साखळदंडास एक मोठा चिमटा बसविलेला असतो. या चिमट्यानें वरील लगड्या धरून त्या लोखंडी वेजांतून ओढून काढतात. अशा रीतीनें बारीक सुतळीइतकी तार बारीक झाल्यावर या ५० भार तारेचे भाग करितात या ५० भारास पास (सं. पाशास्) म्हणतात. या पाशाचे दोन भाग करतात. प्रत्येकास वाकळें असें म्हणतात.
हीं वाकळीं यापुढे दुसर्या जातीच्या कारागिराच्या हातांत जातात. या कारागीरांनां तानीये (सं. तन् ताणणें) असें म्हणतात. या तानीयांचीं हत्यारें म्हणजे एक धडवंची (खोडसे अगर पाड) त्यावर दोन बाजूस दोन खिळे असतात व दोन खिळ्यांत दोन वाटोळीं परडीं असतात या दोहोंच्या मध्यंतरी दोन लोखंडी पट्या असून त्या पट्यांस बारीक बारीक भोंके पाडलेली असतात. या भोंकांतून तार ओढून बारीक करितात. हीं भोंकें असणारी पट्टी अस्सल पोलादी असते. अलीकडे जंत्राच्या ऐवजीं माणकाचे खडे बसविलेले वेध, अगर पैशाप्रमाणें वाटोळ्या पितळी तुकड्यांत माणिकाचे खडे बसविलेले असतात. क्वचितप्रसंगीं हिर्याचे तुकडेहि उपयोगांत आणतात. या माणीक अगर हिरा यांच्या वेधातून तार लवकर बारीक होते. ती फारच बारीक म्हणजे केसाइतकीहि बारीक होते. ही तार वेधातून ओवून ओढून बारीक करतात म्हणूनच त्यास स्यूत (सं.) अगर सूत असें म्हणतात.
हें सूत तयार झाल्यानंतर तें चपटें करितात. पूर्वीच्या काळीं ऐरणीवर मठारीनें हें चपटें करीत असत आतां दोन रुळांतून ती तार चपटी केली जाते व अशा या तारेस बादला असें म्हणतात.
हे बादेल तयार झाल्यानंतर वळाई (सं. वलय) सुरु होते. वळाई म्हणजे हे बादले अगर चपटी केलेली सोन्यानें वेष्टीलेली चांदींची तार रेशमावर गुंडाळणें. ही वळाई पूर्वीच्या पद्धतीनें फारच थोडें काम देत असे. एका मातीच्या कोळंब्यांत बादले नुसते टाकून देत असत; व एक रेशमाची वाती हातांत घेऊन वर आढ्यास टांगलेल्या हुकांतून ओवून घेऊन त्याला मांडीवर अगर पायावर चाती फिरवून पीळ देत असत. असा पीळ दिला गेला म्हणजे जरतार अगर बादले लपेटले जाई. असा रीतीनें पूर्ण जरतार तयार होई. आतां नवीन पद्धतीची यंत्रें निघालीं आहेत. त्यास संचा म्हणतात. या संचांत जितके तराक अगर चात्या काम करितात, तितकीच माणसे पूर्वी कामास लागत असत. तात्पर्य हल्लीच्या काळांत दोन माणसे जितकें यंत्रांच्या साहाय्यानें काम करितात तेवढेंच काम पूर्वी हातानें करण्यास ३६ पासून चाळीस माणसे लागत असत.
आतां एक नवीन पद्धत अमलांत आली आहे. ही बहुधां फ्रान्समध्यें प्रथम रुढ झाली असावी. या पद्धतीस विद्युत्साहाय्य लागतें. पासे करितांना निव्वळ चांदीचे करावयाचे व जरतार निव्वळ चांदीचीच करावयाची. व संपूर्ण तयार झाल्यावर त्यास सोन्याचें पाणी द्यावयाचें. या पद्धतीनें निम्या सोन्याची बचत होते व मालहि उठावदार होतो. शिवाय अतिशय बारीक सोनेरी जरतार अल्पायासानें व सोन्याची विशेषशी नासधूस न होतां तयार होते.
खोटी जरतारहि बहुधां याच पद्धतीनें तयार होते व तीस जरुरीप्रमाणें चांदीचें अगर सोन्याचें गिलीट अगर मुलामा देतात. हा मुलामा देण्यासाठी यंत्रें आहेत व तीं प्रत्येक कारखानदार आपल्या विशिष्ट पद्धतीनें तयार करतो.
तार अगर सूत तयार झाल्यानंतर त्याचे पुष्कळ प्रकार होतात. ते म्हणजे सलमा, झीग, गोटा वगैरे; परंतु त्यास जरतार असें म्हणता येत नाहीं. म्हणून त्याचा येथें नुसता उल्लेखच केला आहे.
व्यापार - आतां कलावतू कोणकोणत्या देशांतून येते हें पाहूं. फ्रान्स, जर्मनी, इटली, आस्ट्रियाहंगेरी, चेकोस्लाव्हेकिया, तुर्कस्तान, जपान, युनायटेड, किंगडम, सीलोन वगैरे हिंदुस्थानांत खर्या जरीचे कारखाने खालील शहरीं आहेत. बनारस, सुरत, पुणें, येवले, अहमदाबाद, पैठण, औरंगाबाद, वर्हाणपुर, मद्रास मुंबई.
खोट्या जरीचे कारखाने - दिल्ली, लखनौ, कानपूर, अमृतसर, सुरत, मुंबई वगैरे.
सरासरी दहा लाख रुपयांचें जरतार दरवर्षी मुंबई बंदरांत उतरते. पैकीं मद्रास १२ लाख, कलकत्ता अर्धालाख, कराची १ लाख, व ब्रह्मदेश दहा हजार.
विदेशी मालावर ३० टक्के जकात आहे. देशी मालावर अप्रत्यक्ष रीतीनें १५ टक्के बसते. कारण चांदी, सोनें इत्यादी वर १५ टक्के जकात आहेच.
या धंद्यांत सुधारणा होणें अगदी जरुर आहे. येथील माल विलायतीपेक्षां जरा नीरस निघतो तो सरस निघण्यासाठीं थोडी सुधारणा झाली पाहिजे; व ती उत्तरोत्तर होत जाईल अशी आशा धरण्यास बळकट जागा आहे. ती सुधारणा होणें व विलायती माल हिंदुस्थानांत न उतरूं देणें हें पुष्कळसें सुशिक्षित व कर्तुत्ववान कारखानदारांच्या हातांत आहे. जर भरण्याची कला व तिचे नमुने यासंबधी ''भरतकाम'' (एम्ब्रायडरी) लेख पहा.
(रा. श्रीधर बाळकृष्ण अंतरकर हे पुण्यांतले जरतारीचें सुशिक्षित कारखानदार आहेत. त्यांनी पुरविलेल्या माहितीचा येथें उपयोग केला आहे.)