विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जयमल्ल - अकबरानें चितोडवर १५६७ त स्वारी केली असतां चितोडचा किल्ला लढविण्याचें काम या जयमल्लकडे राणा उदयसिंगानें सोंपविलें होतें. हा बेदनोर येथील ठाकोर असून राठोड वंशांतील मैर्त्स शाखेचा होता. ही शाखा मारवाडांत सर्वांत शूर गणली जाई. जयमल्ल हा स्वारींत चितोडचा सेनापती होता. त्याच्या हाताखाली हजार लोक होते; परंतु अकबराचें सैन्य अफाट व त्याच्याजवळ तोफखाना असल्यानें शेवटीं त्याचा जय झाला. चैत्र शुद्ध ११ संवत १६२४ (मे. १५६८) या दिवशीं घनघोर संग्राम झाला. जयमल्लानें आपल्या लढण्याची शिकस्त केली. अखेरीस अखबरानें स्वतः आपल्या संग्राम नांवाच्या बंदुकीनें नेम धरुन जयमल्लास गोळीनें ठारं केले. चितोड येथें जोहार झाला व मग भग्न किल्ला अकबराच्या हातीं पडला. यावेळीं झालेल्या युद्धाचें व जयमल्ल आणि पुत्त (दुसरा सेनापति) यांनीं केलेल्या शौर्यांचें वर्णन भाटांच्या काव्यांत आढळतें. सार्या राजपुतान्यांत या दोघांचीं नावें माहीत नाहीं असा एकहि रजपूत आढळावयाचा नाहीं. खास अकबरानेंहि जयमल्लची स्तुति केली होती. त्यानें दिल्लीस आपल्या राजवाड्याच्या महाद्वाराजवळ दोन हत्तीवर जयमल्ल व पुत्त यांचेपुतळे करुन बसविले होते; ते बर्निअर याच्या वेळेपर्यंत होते. त्यानें त्याबद्दलचें वर्णन आपल्या १६६३ च्या जुलैच्या एका पत्रांत केलें आहे. चितोड येथें जयमल्ल जेथें पडला ती जागा अद्यापि दाखविण्यांत येते. टॉडनें त्या जागेवर फुलें वाहिलीं होतीं असें तो म्हणतो. टॉड- राजस्थान वु. १; मुसुलमानी रियासत; बील-ओरि बायाग्रा. डिक्शनरी)