विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जयपाल - हा काबूलच्या शाही राजघराण्यांतील भीमपाल याचा मुलगा; याचें राज्य पंजाब व अफगाणिस्तानांत पसरलें होतें. याची राजधानी भटिंडा येथें होती. याच्या व सबक्तेगीन आणि गझनीकर महमूद यांच्या अनेकदां लढाया झाल्या होत्या. याचा दोन वेळा पराभव झाल्यानें व दोन वेळा पराभव ज्याचा झाला असेल तो सिंहासनावर बसण्यास अनधिकारी होय अशी त्यावेळीं समजूत असल्यानें यानें आपल्या आनंदपाल (रा. वैद्यांच्या मतें त्रिलोचनपाल) नांवाच्या मुलास गादीवर बसवून आपण अग्निकाष्टें भक्षण केलीं.याची बाकीची माहिती ज्ञा.को. च्या बाराव्या विभागांत गझनी घराणें या नांवाखालीं पहावी. (स्मिथ-अर्लि हिस्ट्री ऑफ इंडिया)