विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जयद्रथ - सिंधुदेशचा राजा वृद्धक्षत्र याचा पुत्र व धृतराष्ट्रकन्या दुःशला हिचा पति. पांडव वनवासांत असतां एकदां यानें द्रौपदीस हरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन पांडवांनीं त्याचे पांच पाट काढून जिवंत सोडून दिलें. पुढें यानें उग्र तप करुन शंकरापासून ''अर्जुनेतर पांडवांचा युध्दांत पराभव करशील'' असा वर मिळविला. याच वरामुळें यानें चक्रव्यूहांत अभिमन्यूचा वध करुन इतर पांडवांचा पराभव केला. तेव्हां अर्जुनानें ''उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथास मारीन'' अशी घोर प्रतिज्ञा करून कृष्णाच्या सहाय्यानें तडीस नेली. (महाभारत, वन व द्रोणपर्व)