विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जयदेव - हा प्रसिद्ध संस्कृत कवी जगन्नाथपुरी प्रांतांत उत्कल देशामध्यें, बिंदु बिल्व या गांवीं जन्मला. याच्या बापाचें नांव श्रीभोजदेव व आईचें नांव राधादेवी अगर रमादेवी होतें. याच्या बायकोचें नांव पद्मावती होतें. इच्या अलौकिक पातिव्रत्यासंबंधींच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. जयदेवासंबंधीची माहिती विश्वसनीय अशी मिळत नाहीं. हा परमकृष्णभक्त व महासाधु होता. याची माहिती चंद्रदत्त कृत भक्तमाला ग्रंथाच्या ३९ ते ४१ सर्गांमध्यें आलेली आहे. पण ऐतिहासिकदृष्ट्या ती कितपत ग्राह्य आहे याबद्दल शंका वाटते. जयदेवाचा काल ११ व्या शतकांत ठरविण्यांत आला आहे. तत्कालीन वंग देशाचा राजा लक्ष्मणसेन याच्या सभाद्वारावर एक शिलालेख आहे. त्यांत लक्ष्मणसेनाच्या पदरीं जयदेव कवि होता असें वर्णन आलें आहे व त्यावरून हा लक्ष्मणसेनाच्या काळीं होता असें उघड होतें.
जयदेवाचा गीतगोविंद हा एकच ग्रंथ प्रसिद्ध आहे. याच्या नांवाचे दुसरे पुष्कळ कवी होऊन गेले व त्यामुळें कदाचित् घोटाळा होण्याचा संभव आहे. परंतु जयदेवाचा या ग्रंथाशिवाय दुसरा ग्रंथ उपलब्ध नाहीं गीतगोविंद हें एकच काव्य जयदेवाचें नांव अजरामर करण्याला पुरें आहे. गीत-गोविंद हें कृष्णाच्या बालपणच्या चरित्रावर रचलेलें काव्य आहे. राधाकृष्णाच्या व कृष्ण व इतर गोपगोपींच्या लीला यांत बहारींनें वर्णन केलेल्या आहेत. या काव्यांत सकृतदर्शनीं केवळ शृंगाराचींच वर्णनें आढळतात; तथापि त्यांत गूढ अर्थ भरलेला आहे. आत्म्याची परमात्मस्वरूपीं विलीन होण्याची धडपड हें गीतगोविंदांत गूढ तर्हेनें शृंगाराच्या बुरख्याच्या द्वारें दाखविलें आहे. काव्यांतील भाषा फार रसाळ व प्रसन्न आहे. याच्या कवनांत मोठमोठे समास आले आहेत. हा गौडी भाषापद्धतीचा भोक्ता होता असें दिसतें. कांहीं कांहीं काव्यांत, यमक, प्रास इत्यादि भाषेचे नमुने सांपडतात. शिवाय यांतील कांहीं अष्टपदीं गातां येतात हा याच्या काव्याचा मुख्य गूण आहे. रागबद्ध संस्कृत कविता आपल्या संस्कृत वाङ्मयांत फार थोड्या आढळतात; पण जयदेवाच्या काव्यानें ती उणीव भरून काढली आहे. या कविता गातांना फारच कर्णमधुर लागतात.
गीतगोविंदावर, कुम्भराजाची ''रसिकप्रिया'' व शंकर मिश्राची ''रसिक मंजरी'' या टीका आहेत. गीतगोविंदाचीं हिंदी अर्थासकट आवृत्ति निघाली आहे. मराठींत मराठी गाण्यांच्या रुपानें गीतगोविंद ग्रंथाचें भाषांतर झालें आहे. जोन्स नांवाच्या प्राच्य पंडीतानें याच्या काव्याचा कांहीं भाग भाषांतरला आहे. एडविन आर्नोल्डनें या काव्याच्या भाषांतराचा एक खंड प्रसिद्ध केला आहे. या काव्याची एक प्रत लॅटिन भाषेंत टीकांसह लॉसेननें प्रसिद्ध केली आहे. इतर पाश्चात्य भाषांतहि याचीं भाषांतरें झालीं आहेत. (संदर्भ ग्रंथ - मोबेलडफ, डौसन अर्वाचीन व प्राचीन कोश; आफ्रेक्ट; काव्यमाला, निर्णयसागर ग्रंथमाला.)