विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जम्मू - काश्मीर संस्थानचा एक मोठा प्रांत. हा हिंदुस्थानालगत असून सर्व बाबतींत बहुतेक पंजाबसारखा आहे. याचें जहागिरी धरून क्षेत्रफळ १२४३९ चौ.मै. आहे व लो.सं. (१९११) १५९७८६५ आहे. पैकीं मुसुलमान सुमारें ९॥ लाख आहेत. प्रांताचें मुख्य ठिकाण जम्मू आहे. येथील हवा पंजाबप्रमाणें उष्ण आहे. पावसाची सरासरी ४१ इंच आंहे. या प्रांताची जास्त माहिती ''काश्मीर'' या लेखांत सांपडेल.
शहर - ही जम्मू प्रांताची राजधानी असून महाराज येथें हिवाळ्यांत रहाण्यास येतात. पेशावरकडे जाणार्या आगगाडीच्या रस्त्यावर वजीराबाद स्टेशन आहे. त्यापासून जम्मूला एक फांटा जातो. वजीराबादहून जम्मू ५५ मैल आहे. उ.अ. ३२०४४'' व पू.रे. ७४०५५''. हें समुद्रसपाटीपासून १२०० फूट उंच असून येथें ३१७२६ लोकसंख्या (इ.स. १९११) आहे. तावी नदीच्या तीरीं हा गांव असून गांवाचें क्षेत्रफळ सुमारें एक चौ.मैल आहे. येथें रघुनाथजीचें देऊळ आहे. रेल्वेची सोय आहे तरी गांव कांहीं म्हणण्यासारखा भरभराटीस आला नाहीं. अठराव्या शतकाच्या उत्तर भागांत राजा रणजितदेव राज्य करीत असतांना या गांवाची लोकसंख्या दीड लाख होती असें म्हणतात. हें खरोखरी काश्मीरच्या व्यापाराचें मुख्य ठिकाण व्हावयास पाहिजे. परंतु कोहाल ते श्रीनगरपर्यंत गाडीरस्ता झाल्यामुळें सर्व व्यापार त्या मार्गानें होऊं लागला आहे. कदाचित जम्मू ते श्रीनगरपर्यंत रेल्वे झाली तर येथील व्यापार सुधारेल असें दिसतें. काश्मीरचे महाराज रणवीरसिंग यांच्या वेळेस येथें पुष्कळ व्यापार चालत होता. परंतु हल्ली फक्त हिवाळ्यांत राजघराण्यांतील मंडळी व संस्थानांतील मुख्य कचेर्या येथें असतात.