विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जमेका - हें ब्रिटिश वेस्ट इंडीज बेटांपैकीं सर्वांत मोठें बेट असून क्यूबाच्या दक्षिणेस ८० मैलांवर आहे. हें बेट उत्तर अक्षांस १७० ४३'' व १८० ३२'' आणि पश्चिम रेखांश ७५०१०'' व ७८०२०'' यांमध्यें आहे. ह्या बेठाची लांबी १४४ मैल व रुंदी ५० मैल व क्षेत्रफळ ४२०७ चौ.मै. आहे. पूर्वेकडून पश्चिमेस जाणारी ब्ल्यू (नील) पर्वताची ओळ आहे. याचें नीलगिरि (ब्ल्यू) नांवाचें शिखर ७३६० फूट उंच आहे. रिओग्रँड, फँटेनगार्डन, ब्लॉक, साल्ट, वगैरे नद्या जमेका बेटांत आहेत. ह्या बेटांत कित्येक ठिकाणीं मधून मधून ज्वालामुंखींचीं चिन्हें दृष्टीस पडतात शिवाय कांहीं ऊन पाण्याचे झरे देखील आहेत. पोर्टमॉरन्ट किंग्स्टन ओल्डहार्वर (जुनें बंदर) मांटेगोवे, फालमाऊथ, सेंट अँन्सबे, पोर्टमराया आणि पोर्टअँटोनिओ हीं मुख्य बंदरें आहेत.
समुद्रकांठची हवा उष्ण व सर्द आहे. परंतु अंतःर्भागांतील हवा थंड आहे. पाऊस एकंदरींत ६६.३ इंच पडतो. ह्या बेटांत नाना तर्हेच्या वनस्पतींची वाढ चांगली होते. जमेका बेटाची लोकसंख्या (१९११) ८३१३८३ आहे. मूळच्या अरॅवाक नांवाच्या लोकांचे पुष्कळ अवशेष सांपडले आहेत. लोकसंख्येंत मॅरुन, नीग्रो, हिंदी मजूर, व बरेच मिश्र लोक आहेत. हिंदी (ईस्टरइंडियन) लोक सुमारें १७ हजार आहेत.
राजधानी किंग्स्टन आग्नेयकिनार्यावर आहे. जवळच पोर्ट रॉयल शहर आहे. याशिवाय जुनें राजधानीचें शहर स्पॅनिश टाऊन, मांटेगोबे, पोर्ट अँटिनिओ वगैरे शहरें आहेत. शेतकी व जनावरें पाळणें असे मुख्य धंदे आहेत. केळीं, संत्रें, कॉफी, साखर, रमदारू, पिमेंटोचें लांकूड, कोको, कंकोळ, आलें, नारळ, लिंबें, जायफळ, अननस, तंबाखू, द्राक्षें व आंबे उत्पन्न होतात. जमेकांत एक कृषिसभा व एक कृषिमंडळ अशा दोन संस्था आहेत फळें, साखर व रम यांची निर्गत होते. १९१७-१८ सालची आयात ३२९७६६५ पौंड असून निर्गत २४७७८९१७ पौंड होती.
ह्या बेटांत चांगल्या सडका व रस्ते आहेत. किंग्स्टन, मांटेओबे, पोर्टनिओ व एकार्टन हीं शहरें रेल्वेनें जोडलेलीं आहेत १९१८ च्या मार्च अखेरीस १९७ मैलांची रेल्वे जमेकांत सुरु झाली होती.
जमेका बेटाचे सरे, मिडल सेक्स, व कॉर्नवाल असे तीन प्रांत असून प्रत्येक प्रांताचे पांच पोटविभाग आहेत. मुख्य अधिकारी गव्हर्नर असतो. पांच अधिकारी सभासद, दहा सरकार नियुक्त व १४ निवडलेले अशा सभासदांचें एक कायदेकौन्सिल असतें. याशिवाय एक प्रिव्ही कौन्सिलहि असतें. १९१७-१८ सालची जमाबंदी १०५२४८५ पौंड असून खर्च १०९८४०९ पौंड होता व कर्ज ३७९७२७३ पौंड होतें. निरनिराळ्या धर्मिक संस्थांनी स्थापिलेलीं विद्यालयें व शाळा आहेत; प्राथमिक शिक्षण मोफत पण सक्तीचें नसून सरकारी मदतीनें खासगी रीतीनें चालतें. उच्च शिक्षणाची सोय आहे. १९१७-१८ सालीं जमेकांत ६९६ सरकारी प्राथमिक शाळा, बायकांकरिता तीन पुरुषांकरितां एक अध्यापन शाला व दोन दुय्यम शिक्षणसंस्था होत्या.
कोलंबसानें जमेका बेट इ.स. १४९४ मध्यें शोधून काढिलें. स्पॅनिश लोकांनीं १५०९ सालीं येथें कायमचीं वस्ती केली. स्पॅनिश अंमलांतील चिरस्मरणीय गोष्ट म्हणजे बेटाचे मूळचे रहिवाशी अरॅवाक इंडियन यांचें निर्मूलन होय. क्रॉमवेलनें १६५५ त अँडमिरल पेन व व्हेनेबल्स यांनां पाठवून हें बेट ताब्यांत घेतलें. प्रथम ह्या बेटावर लष्करी अंमल होता. नंतर कार्यकारी कौन्सिल, इंग्लंडसारखी संघटित राज्यपद्धति व कायदेकौन्सिल या सुधारणा करण्यांत आल्या. १६७० सालच्या मॅड्रिच्या तहान्वयें ब्रिटिश हक्क वसूल करण्यांत आले. ह्या बेटांशीं गुलामांचा व्यापार १६७२ पासून सुरू झाला. गुलामांनां १८३३ मध्यें स्वातंत्र्य देण्यांत आलें. त्यामुळें मळेवाल्याचें फार नुकसान झालें. ह्याच्या नंतर निग्रो लोकांनीं बंड केले; परंतु गव्हर्नर आयार यानें तें बंड मोडलें. राज्यपद्धति १८८४ त सुरु करण्यांत आली. व १८९५ मध्यें तींत आणखी फरक करण्यांत आले. १९०७ मध्यें फार मोठा भूकंप झाला. यामुळें राजधानी पोर्ट रॉयल अँड्रयूज या शहरांतील इमारतींचें फार नुकसान झालें, (कुंडाल-स्टडीज इन् जमेका हिस्टरी; जमेका इन् १९१२ व हिस्टरी ऑफ जमेका; गार्डनर-हिस्टरी ऑफ जमेका; हेंडरसन-जमेका; हिल-दि जिऑलॉजी अँड फिजिकल जिऑग्राफी ऑफ जमेका; लिसर-टेवन्टिएथ सेंचरी जमेका.)