विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जमालखान - सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत लष्करीपेशानें वागणारी व लष्करी कवाईत वगैरे जाणणारी एक युरोपियन बाई आली होती. ती फ्लारेन्स येथील मूळची रहाणारी असून तिनें मिस्टर जेम्स हॉल नांवाच्या एका मद्रास येथील यूरोपियन बॅरिस्टराबरोबर लग्न केलें होतें. तिचें व तिच्या नवर्याचें पुढें पटेना; तेव्हां तिनें शिपाईगिरीचा धंदा स्वीकारुन ती हिंदुस्थानांतील निरनिराळ्या संस्थानिकांजवळ राहून त्यांच्या दरबारांत स्त्रियांची पलटणें तयार करीत असे. तिचें खरें नांव मिसेस जेम्स हॉल होतें. परंतु पुढें तिच्या लष्करी पेशावरुन तिचें नांव ''जमालखान'' उर्फ ''जमाल सरदार'' असें पडलें.
ही बाई इ.स. १७७८ च्या सुमारास पुण्यास आली. पेशव्यांच्या दरबारांत स्त्रीसैन्य तयार करण्याचा तिचा विचार होता. पण तिच्या तैनातींतील एका ब्राह्मण नोकरानें तिचा कांहीं अपराध केल्यामुळें तिनें त्यास मरेमरेपर्यंत चोप दिला. या अपराधाबद्दल नाना फडणीसानें तिला कैद करुन लोहगड किल्ल्यात ठेविलें. तेथें ती ७ वर्षें होती. पुढें फ्रेंच सेनापति मुसा पेरू ह्यानें मध्यस्थी करुन तिला सोडविलें. ती पुण्याहून मुंबईस गेली व तेथें १७९८ सालीं मरण पावली. पुण्यामध्यें ''जमालखान'' या नांवानें तिची प्रसिद्धी होती. (इ.सं. जुन्या ऐतिहासिक गोष्टी. पृ.१९)