विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जमाखर्च - (बुककीपिंग) व्यक्ती किंवा संस्था यांनी चालविलेला किंवा इतर उद्योगधंदा यासंबंधीं होणार्या देवघेवीची व्यव्सथित पद्धतीनें ठेवलेली नोंद याला जमाखर्च म्हणतात. याचा उद्देश, (१) देवघेवीच्या सर्व बाबी थोडक्या त्रासानें व उद्योगधंद्याला कोणताहि व्यत्यय न येतां समजाव्या, आणि (२) धंद्याची प्रगति व धंद्याची सांपत्तिक स्थिति यांचा एकमेकांवर काय परिणाम होत आहे तो समजावा हा असतो. जमाखर्च या विषयाला कांहीं शास्त्रीय व कांहीं कलेचें स्वरुप आहे. या विषयांत अळीकडे कांहीं मोठाले नवे शोध लागले आहेत असें नाहीं, तर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतींत सुधारणा झाली असून उत्तरोत्तर व्यवहारांतल्या गुंतागुंतीबरोबर सुधारणाहि होत रहाणार. जमाखर्चाची अत्युत्तम पद्धति म्हटली म्हणजे कमींत कमी श्रमांत जास्तीत जास्त माहिती ठेवतां येणें ही होय. शिवाय लिहिलेले हिशोष वाटेलं तेव्हां सहज तपासतां आले पाहिजेत. हल्ली सार्वजनिक संस्थांचे हिशोब तपासण्याकरितां हिशोबाच्या कामांत वाकबगार असलेले स्वतंत्र तपासनीस (ऑडिटर्स) नेमलेले असतात. शिवाय जेथें जमाखर्ची काम करणारे नोकर पुष्कळ असतात तेथें एकमेकांची एकमेकांवर देखरेख राहील अशी ''स्टाफ ऑडिट'' किंवा ''इन्टर्नल चेक'' ची व्यवस्था असते.
''जमाखर्च'' ही ''हिशेब पद्धति'' (अकौंन्टन्सी) या विषयाची एक शाखा असून पेढ्या (बँकिंग) व तपासणी (ऑडिटिंग) अशा त्या विषयाच्या आणखी दोन शाखा आहेत. जमाखर्चाच्या रोखीचा व्यवहार (कॅश सिस्टिम) व पतीचा व्यवहार (क्रेडिट सिस्टिम) अशा दोन पद्धती असून व्यापारी लोक गिर्हाईकांनां पतीवर उधार माल देतात. त्यामुळें ''पतीच्या व्यवहारानें'' हिशेब लिहावे लागतात. शिवाय धंद्यामध्यें मालमत्तेची नासधूस फूटतूट होत असल्यामुळें त्यापासून होणारा तोटा धंद्याची स्थिति ठरवितांना विचारांत घ्यावा लागतो.
इतिहास - जमाखर्चपद्धतीचा आरंभ केव्हा झाला हें अज्ञात आहे. पण अलीकडील संशोधनावरुन हें सिद्ध होतें कीं अगदीं प्राचीन राष्ट्रांत जमाखर्चपद्धती अस्तित्वांत होत्या. ख्रि.पू. २६०० च्या सुमाराच्या बाबीलोनी विटांवरील लेखांत, तसेंच इजिप्तमधील पापीरसवरील लेखांत व इतर पुराव्यावरुन जमाखर्चलेखनाचा पुरावा मिळतो. तथापि या प्राचीन पद्धतींत जमाखर्चलेखन म्हणजे घडलेल्या व्यवहाराचें इतिहासवजा टिपण ठेवणें, असें स्वरुप दिसतें. पैसा किंवा नाणें हें विनिमयाचें साधन प्रचारांत येईपर्यंत जमाखर्चाची व्यवस्थित पद्धति सुरु होणें शक्य नव्हतें.
आधुनिक काळांतील प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे एडिंवरो येथील अँडव्होकेटांच्या लायब्ररींतील १६९७ साल असलेली एक जमाखर्चाची खतावणी (लेजर) हा होय. दुहेरी नोंदीची डबलएन्ट्री ची जमाखर्चपद्धति त्यापूर्वी अस्तित्वात होती. व्हेनिस येथें ल्युकापसिओलोनें १४९४ मध्यें छापून प्रसिद्ध केलेलें ''एव्हरीयिंग अबाऊट अँरिथमेटिक, जिऑमिट्री अँड प्रपोर्शन'' नांवाचें पुस्तक आहे. त्यांत ''बुक कीपिंग'' (जमाखर्च) बद्दलची माहिती आहे. त्यानंतर १७६९ मध्यें ब्रिस्टल (इंग्लंड) येथें प्रसिद्ध झालेलें जोन्सचें ''इंग्लिश सिस्टिम ऑफ बुक कीपिंग बाय सिंगल ऑर डबल एन्ट्री'', ( एकेरी किंवा दुहेरी नोंदीची जमाखर्चाची इंग्रजी पद्धति) या नांवाचें पुस्तक आहे.
हिंदुस्थानांत जमाखर्च या विषयावर स्वतंत्र पुस्तकें पूर्वी नव्हतीं; तथापि महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, स्मृतिग्रंथ, चिटणीसकृत ''राजनीति, वगैरे ग्रंथांत राजाच आयव्यय'' (जमाखर्च) याविषयीं लिहिलेलें आहे. आणि हिशेबलेखकांनां ''गणकलेखक'' असा शब्द महाभारतांत आढळतो. पण, निष्क, वगैरे सोन्याचांदीचीं नाणींहि त्या काळीं होतीं; त्यावरुन जमाखर्चाची व्यवस्थित पद्धति अगदीं प्राचीन काळींहि येथें असावी असें दिसते. शिवाय जमाखर्चाची देशी पद्दति येथें रुढ असून तिच्यांतील तेरीज, कीर्द, खतावणी, रोजखर्डा, पेस्तर, गुदस्त, वगैरे शब्द मुसुलमानी रियासतीपासून रुढ झालेले दिसतात.
जमाखर्चाविषयीं करणग्रंथ मराठेशाहींत होते एवढेंच नव्हे तर जाधवांच्या कारकीर्दीतहि होते. मुसुलमानी जमाबंदीचें काम बरेंचसें हिंदूच्याच हातीं ठेवलें होतें ही गोष्ट लक्षांत घेण्याजोगी आहे. अशी कल्पना होते की, जाधवांची पद्धत मुसुलमानांनीं मुसुलमानी नांवें करुन कायम ठेवली; आणि तींच पुढें थोडासा बदल करुन शिवाजीनें घेतलीं. याविषयींचा करणग्रंथ मेस्तक होय. मेस्तकांत सांगितलेली हिशेबपद्धति म्हणजे खातीं वगैरे आणि मोडी लिपी ही ब्राह्मणमहत्वास कारण झाली असें मेस्तकावरील एक भाष्य सुचवितें. ''अप्रसिद्ध जगामाजी पिशाच लिपी हे योजी जेणें प्रतिष्ठा समाजीं विप्र पावती.'' सर्वच विप्र जमाखर्चाचें काम ठेवण्यास सारखेच योग्य नाहींत तर गोदावरी कांठचे नेमावेत म्हणून मेस्तक भाष्यकार सांगतात. (मेस्तक पहा).
देशापद्धत - देशी हिशेबपद्धतींत जमाखर्च व पेढी किंवा अडत व्यवहार (बँकिंग) ह्या दोन शाखा आहेत; पण हिशेबतपासणी (ऑडिटिंग) ही शाखा दिसत नाहीं. जमाखर्च या विषयासंबंधीं मुख्य वह्या दोन, एक कीर्द व दुसरी खतावणी. ज्या चोपडींत जमेच्या व खर्चाच्या रकमा तपशीलवार लिहून शिल्लक काढतात तिला कीर्द; आणि कीर्दीमध्यें उल्लेखिलेला प्रत्येक इसम किंवा बाब यासंबंधीं प्रत्येकी येणें देणें किती झालें त्याचा एके ठिकाणी वेगळा जमाखर्च ठेवतात तिला खतावणी म्हणतात. शिवाय रोजच्या रोज तपशीलवार जमाखर्च कच्या वहींत लिहून शिल्लक काढतात त्यास रोजखर्डा म्हणतात. रोजखडर्यावरुन कीर्दीमध्यें पक्कें लिहिणें लिहितात. कीर्दीचे रोजकीर्द व बैठीकीर्द असे दोन प्रकार आहेत. मितावांर रोजचा जमाखर्च लिहून शिल्लक काढतात, तिला रोजकीर्द म्हणतात. आणि जीत कांहीं मुद्दतीचा जमाखर्च लिहून एकदम शिल्लक काढतात, तिला बैठीकीर्द असें म्हणतात. व्यापार लहान असल्यामुळें रोजच्यारोज देवघेव होत नसली तर बैठीकीर्द ठेवतात. कीर्दीच्या वहींत आठ रकाने असून त्यांपैकीं ''जमा'' व ''नांवें'' (खर्च) यांना प्रत्येकी चार चार रकाने देतात. ''जमे'' च्या व ''नांवे'' च्या सदरांत प्रथम रक्कमेचा आंकडा लिहून नंतर तपशील लिहितात; व प्रत्येक ठिकाणी खातेंपान (ती बाब खातेवहींत ज्या पानावर लिहिली असेल तो पानाचा आंकडा) लिहितात. देशी पद्धतींत जमाखर्च लिहिण्याचा वर्षांरंभ कर्तिक शु॥ १ किंवा चैत्र शु॥ १ पासून करतात.
खतावणींत, (१) खुद्द खातें (स्वतःच्या जमीनीचें उत्पन्न किंवा पगार आणि चाकर माणसांचा पगार वगैरे खासगी खर्चासंबंधीं), (२) भांडवलखातें, (३) ठेवखातें, (४) अनामतखातें (रक्कम काय कारणाकरितां आली तें कळलें नसल्यास), (५) रवानगी खातें (कोणास पैसा पोचतां होण्यासाठी किंवा मालाच्या खरेदींसाठीं पाठविलेल्या रकमेकरितां), (६) तसलमातखातें (एखाद्या कामासाठीं रक्कम दिली तिचा हिशेब मागाहून समजणें असल्यास), (७) खरेदीविक्रीखातें (अनेक जिनसा असल्यास जिन्नसवार खातीं घालतात), (८) नफातोटा खातें, वगैरें खातीं असतात. शिवाय पक्कीं खातीं (पुढील सालीं उतरावीं लागतात तीं विशेषतः इसमवारखातीं) आणि कच्चीं खातीं (रवानगी, तसलमात, व्याज, नफा तोटा वगैरें वर्षाअखेर पुरीं होणारीं) असें दोन प्रकार पडतात. खातेवही अकारविल्हेप्रमाणें लिहितात.
शिवाय जमाखर्चाचा ताळा पहाण्याकरितां पत्रक तयार करतात त्याला '' तेरीज'' म्हणतात. तेरीज महिनाअखेर, किंवा सालअखेल करतात. तसेंच सालअखेर किंवा व्यवहार पुरा झाल्यावर येणें व देणें किती तें समजण्याकरितां पक्क्या कात्यांचें बाकी येणें व देणें ह्यांचें टांचण करतात त्यास ''अखेर आढावा'' म्हणतात. आणि सालाच्या आरंभीं गुदस्त सालचें येणें देणें समजण्याकरितां टांचण लिहितात त्यास ''अवल आढावा'' म्हणतात. कीर्दीवरुन महिन्याचा किंवा वर्षाचा जो एकंदर हिशेब (दुबेरजी रकमा गाळून) लिहितात त्यास ताळेबंद म्हणतात.
याशिवाय जमाखर्च लिहिण्याची एक पद्धति आहे, तिच्यांत कीर्द व खतावणी या दोन वह्यांऐवजीं एकाच चोपडींत इसमांची व बाबींची खातीं घालून त्यांत त्या त्या खात्याचा जमाखर्च तपशीलवार लिहिलेला असतो. अशा वहीस ''पठाण वही'' व या पद्धतीस ''पठाणी पद्धति'' म्हणतात. पोकळ जमाखर्चाला ''अनागोंदी'' जमाखर्च म्हणतात (अनागोंदी पहा).
पाश्चात्य पद्धति - या पद्धतींतहि जमाखर्चाची ''डे बुक'' अथवा ''बुक ऑफ फर्स्ट एन्ट्री'' (कीर्द) व ''लेजर'' (खतावणी) हीं दोन बुकें ऊर्फ वह्या असतात. पण वह्या लिहिण्याच्या पद्धतींत दोन महत्वाचे भेद आहेत. देशी पद्धतींतील ''जमा'' व नावें हीं सदरें पाश्चात्य पद्धतींत नांवें व जमा अशीं उलटीं म्हणजे वहीच्या पानावर डाव्या बाजूस खर्च व उजव्या बाजूस जमा लिहितात. व त्यांच्या दर्शक ''ड़ीआर'' डेटर (नांवें) आणि ''सीआर'' (क्रेडिटर जमा) अशीं अक्षरें लिहितात. दुसरा फरक कॉलम ऊर्फ रकान्यांचा. नावें व जमा या प्रत्येक सदराखालीं तीन तीन स्वतंत्र रकाने (कॉलम) असून त्यांपैकीं पहिल्यांत मिती, दुसर्यांत तपशील व तिसर्यात रकमेचा आंकडा याप्रमाणें लिहितात. उदाहरणार्थ -
नावें (डीआर) | जमा (सीआर) | ||||
मिती | तपशील | रक्कम | मिती | तपशील | रक्कम |
तथापि वरील फरक विशेष महत्वाचे नसून वास्तविक देशी व पाश्चात्य पद्धतींत साम्यच आहे असें दिसेल. तथापि अलीकडे पाश्चात्य पद्धतींत दोन महत्वाच्या सुधारणा झाल्या आहेत; त्या (१) डबल एन्ट्री (दुहेरी नोंद) ची पद्धति; आणि (२) कांहीं महत्त्वाच्या व्यवहारांचीं स्वतंत्र वही ठेवणें.
वर दिलेल्या जमाखर्चाच्या सामान्य पद्धतीला ''सिंगल एन्ट्री'' (एकेरी नोंद) ची पद्धति म्हणतां येईल. या पद्धतीनें लिहिण्यांत कांहीं चुका वगैरे असल्यास त्या उघडकीस येण्यास साधन नसतें. ही उणीव दूर करण्याकरितां ''डबल एन्ट्री'' ची पद्धति अलीकडे अवलंबिली जाते. या पद्धतीचा अर्थ हा कीं प्रत्येक व्यवहार जमा व नांवें या दोन्ही सदराखालीं नोंदणें. असें केल्यानें जमेच्या व नावेच्या रकमांची बेरीज नेहमीं जमते व ती तशी न जमल्यास जमाखर्चांत चूक आहे असें निःसंशय समजतें. तथापि या पद्धतीनेंहि सर्व साधतें असें नाहीं. कारण एखादा व्यवहार मुळींच नोंदला नाहीं, किंवा तो भलत्याच जागी नोंदला किंवा मालाच्या किंमतीं चुकीच्या लावल्या किंवा खोटाच व्यवहार नोंदला, वगैरे प्रकारच्या गोष्टी उघडकीस येणें शक्य नाहीं. विशेषतः व्यापार्यामध्यें मालाच्या किंमतीवर चेवर कमजास्ती होत असतात. याकरितां खातेवहींत ''नफा तोटा'' असें एक खातें स्वतंत्र ठेवतात. या खात्यावरुन धंद्याची विशिष्ट वेळेची स्थिति ताबडतोब कळते. या खात्यांतील-जमा नावें रकमांच्या तक्क्याला ''बॅलन्स-शीट'' म्हणतात.
जमाखर्चाचे दररोजचे सर्व व्यवहार किंवा बाबी एकाच वहींत (कीर्दीत) लिहितात. अशा वहीस '' जर्नल '' म्हणतात. परंतु अलीकडील व्यापारी युगांत व्यवहार फार मोठाले होत असल्यामुळें एका वहीऐवजीं कीर्दीच्या अनेक वह्या करण्याची पद्धत सुरु झाली आहे. उदा. उधार विक्रीचे सर्व व्यवहार ''सेल्स जर्नल'' अथवा ''सेल्स डेबुक'' नांवाच्या स्वतंत्र वहींत नोंदतात उधार खरेदीचे सर्व व्यवहार ''वॉट जर्मल'' अथवा ''इनव्हॉइस'' बुक किंवा ''परचेसेस बुक'' नांवाच्या निराळ्या वहींत नोंदतात; त्याच्याप्रमाणें विकलेल्या पण गिर्हाईकाकडून परत आलेल्या मालासंबंधीं हिशेबाचे ''रिटर्नस इनवर्डस् बुक, दुकानाकरितां विकत घेऊन मागाहून परत पाठविलेल्या मालासंबंधीं ''रिटर्नस् आऊटवर्डस बुक'', ॠणकोकडून आलेल्या बिल्स ऑफ एक्सचेंज संबंधाचें ''विल्स रिसीव्हेबल बुक,'' धनकोंनां दिलेल्या बिल्स ऑफ एक्सचेंजसंबंधीं ''विल्स पेएवल बुक,'' वगैरे अनेक वह्या असतात. (कीर्द) डेबुकाप्रमाणें लेजरच्या (खतावणी) ''कॅश बुक,'' ''सेल्स लेजर्स;'' ''परचेसेस लेजर्स''. वगैरे नांवाच्या निरनिराळ्या खातेवह्या असतात.
एवढ्या सुधारणा पाश्चात्य पद्धतींत झाल्या. पण त्यामुळें लिहिण्याचें काम फार वाढलें. म्हणून लिहिणें कमी करण्याची युक्ति निघाली. ती अशी की, एका कीर्दवहींत किंवा खातेवहींत अनेक कॉलम पाडून अनेक प्रकारचे व्यवहार एकाच पुस्तकांत लिहिण्याची सोय करतात. याला ''टॅब्युलर बुक कीपींग'' म्हणतात. या पद्धतीमुळें एखाद्या दुकानांत विक्रीच्या ज्या अनेक शाखा असतात त्या सर्व शाखांतील विक्रीचा हिशेब एकत्र ठेवण्याची सोय होते.
यापेक्षांहि लिहिण्याचें काम कमी व्हावें म्हणून ''स्लिपसिस्टिम'' (चिठ्यांची पद्धत) निघाली आहे; तीत मोठाल्या वह्या न बांधता एकेक कागद सुटा ठेवतात, व कार्बनपेपरच्या साह्यानें प्रत्येक नोंदीच्या दोन प्रती करुन नंतर हे सुटे कागद खातेवहींतील नोंदीकरितां एका अनुक्रमानें लावतात. नंतर तेज कागद दुकानांतील प्रत्येक शाखेच्या विक्रीची एकूण बेरीज काढण्याकरितां निराळ्या अनुक्रमानें लावतात; आणि शेवटीं वाटेल तेव्हां पहाण्यास सोयीचे पडतील त्या अनुक्रमानें एका फाईलीमध्यें बांधून ठेवितात. या पद्धतींत आंखलेले व कॉलम पाडलेले जाडे कार्डबोर्ड (सुटे तक्के) वापरतात, किंवा लूज-लीफ लेजर (पानें सोडवतां येण्यासारख्या वह्या) वापरतात.
इतर पाश्चात्य देशांत जमाखर्चाचीं मुख्य तत्त्वें हींच आहेत. पण कांहीं देशांत सरकारी कायद्यांनीं विशिष्ट गोष्टी आवश्यक ठरविलेल्या आहेत. फ्रान्समध्यें जर्नल, इनव्हेंटरी व लेटरबुक अशीं तीन बुकें ठेवावीं लागतात. जर्मनींत बहुतेक अशीच पद्धति आहे. बेल्जममध्यें प्रत्येक व्यापार्याला जर्नलमध्यें रोजमितीवार लिहिणें लिहून त्यावर नेमलेल्या अधिकार्याची सही घ्यावी लागते. शिवाय सर्व पत्रें व तारा यांचें आवकजावक दहा वर्षांचें ठेवावें लागतें. स्पेनमध्यें इव्हेंटरी, जर्नल, लेजर, लेटरबुक व इनव्हाईस बुक इतके पांच प्रकार लागतात. युनैटेडस्टेट्समध्यें कांहीं प्रकारच्या कंपन्यांनां ऑडिटरास हिशेब दाखविणें भाग पडतें.
शिक्षणसंस्था - प्रथम युनैटेडस्टेट्सच्या युनिव्हर्सिट्यांनीं हा विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट केला. ग्रेटब्रिटनमध्यें लंडन स्कूल ऑफ एकॉनमिक्स, बर्मिगहॅमची युनिव्हर्सिटी व मँचेस्टरची व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी यांनीं या विषयाच्या शिक्षणाची सोय केली. जपान व इतर देशांतहि या विषयाकडे लक्ष देण्यांत आलें आहे. इंग्लंडमध्यें सोसायटी ऑफ आर्टस्, लंडन चेंबर ऑफ कॉमर्स, ओवेन्स कॉलेज (मँचेस्टर) वगैरे संस्थाहि परीक्षा घेऊन डिप्लोमा देतात.
हिंदुस्थानांत मराठी सातवीच्या (व्हर्नाक्युलर फायनल) परीक्षेस जमाखर्च हा अवश्य विषय असून देशी जमाखर्च पद्धतीचें शिक्षण मराठी शाळांतून दिलें जातें. हायस्कुलांत स्कूल फायनल परीक्षेसाठीं हिशेब व जमाखर्च हा एक ऐच्छिक विषय आहे. व्यापारी कॉलेजांतून हा विषय असतोच. शिवाय इंग्लंड-अमेरिकेतील संस्थांनां जोडलेल्या कांहीं व्यापारी शिक्षणाच्या संस्था या विषयाचें शिक्षण देऊन परीक्षा घेतात. देशी जमाखर्चाची पद्धति व्यापार्यांनीं आपल्या मुलांकरितां काढलेल्या लहान लहान शाळांतून शिकविण्यांत येते. तथापि या विषयाचें शिक्षण घेणारे विद्यार्थी थोडे निघतात. बहुतेकांनां जमाखर्चाची अजीबात माहिती नसते असें आढळेल.