विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जंबुद्वीप - पृथ्वीच्या सप्महाद्वीपांतील पहिलें. हें मेरूच्या आसमंताद्भागीं वर्तुलाकार असून याच्या मध्यभागीं मेरू आहे. याचा व्यास एक लक्ष योजनें आहे व यास इतक्याच रुंदीच्या क्षारसमुद्राचें वेष्टन आहे. येथील अधिपति कल्पारंभीं यवत राजाचा पुत्र अग्रीध्र होता. त्यास नऊ पुत्र होते म्हणून त्यानें त्याचे वर्षसंज्त्रक नऊ भाग करुन एकेक वर्षाचें आधिपत्य एकेकास दिलें. त्या भागांची नांवें अशीं अजनाभवर्ष, किंपुरुषवर्ष, हरिवर्ष, भद्राश्ववर्ष, रम्यकवर्ष, हिरम्मयवर्ष, कुरुवर्ष, केतुमालवर्ष आणि या सर्वांच्या मध्यभागीं इलावृत्तवर्ष. या द्वीपांतशत योजनें लांबीच्या व तितक्याच रुंदीच्या म्हणजे दशसहस्त्र योजनें क्षेत्रफळाच्या प्रमाणाचे सत्तावन सहस्त्र देश असून यास भारतांत सुदर्शनद्वीप असें म्हटलेलें आहे (भीष्म. अ. ५).