विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जबलपुर, जिल्हा - मध्यप्रांत, जबलपुर भागांतील जिल्हा. उत्तर अक्षांत २२० ४९'' ते २४० ८'' व पूर्व रेखांश ७९०२१'' ते ८०० ५८''. क्षेत्रफळ ३९१२ चौरस मैल. पूर्वेस उत्तरेस मैहर, पन्ना आणि रेवा हीं संस्थानें; पश्चिमेंस दमो जिल्हा आणि दक्षिणेस नरसिंगपूर, शिवणी आणि मंडला. नर्मदा नदी या जिल्ह्यांतून वहाते. नर्मदेच्या उत्तरेस सापट प्रदेश असून पलीकडे वायव्येस विंध्यादि पर्वत आहे; व दक्षिणेस देखील तसाच सपाट प्रदेश असून पलीकडे सातपुडा पर्वत आहे. वायव्येकडील सपाट प्रदेशास हवेली असें नांव असून हा मध्यप्रांतांत फार सुपीक आहे. हवेलीच्या उत्तरेस विंध्याद्रि व सातपुडा हे जवळ जवळ येत असून मुरवार तहसिलींत तर ते एकमेकाशीं जोडले गेले आहेत. या जिल्ह्यांत झाडी पुष्कळ असून डोंगरांत जंगलहि विपुल आहे. वाघ, चित्ते, सांबर वगैरे वन्य प्राणी साधारणपणें आढळतात. पावसाची वर्षिक सरासरी ५९ इंच असून हवा चांगली आहे. उन्हाळ्यांत १०६ अंशांच्यावर पारा कधीं जात नाहीं.
इतिहास - जबलपुराहून थोड्या मैलांवर असलेलें तेवर नांवाचें खेडें म्हणजे त्रिपुर अथवा करणवेल नांवाचें प्राचीन शहर होय हें सिद्ध झालें आहे. हें पूर्वी कळचुरी राज्याच्या राजधानीचें शहर होतें. कळचुरी चेदी राज्याचा इतिहास जबलपुर, छत्तिसगड व बनारस येथें सांपडलेल्या शिलालेखांवरून तयार करण्यांत आला आहे. छत्तिसगडावर राज्य केलेल्या रतनपुर घराण्याच्या एका शाखेपैकी हे असून हैहय रजपूत होतें. ख्रिस्ती शकाच्या आरंभीं हे उदयास आले. यांचा वेदि संवत प्रसिद्ध असून तो इ.स. २४९ मध्यें सुरु झाला. त्यांच्या पहिल्या पांच सहा शतकांतील इतिहासासंबंधीं फार थोडी माहिती आहे. परंतु ख्रिस्ती शकाच्या नवव्या ते बाराव्या शतकापर्यंत म्हणजे सुमारें तीनशें वर्षांतील यांचा इतिहास बराच सांपडतो. या काळांतील झालेल्या अठरा राजांचीं नांवें, त्यांनी केलेल्या लढाया व त्यावेळचीं आसपास असलेलीं राज्यें-कनोजचे राठोड, महोबाचे चंदेल आणि माळव्याचे परभार यांविषयीं कांहीं माहिती सांपडते. त्यांचें राज्य नर्मदेच्या वरील खोर्यांत पसरलें होतें. बाराव्या शतकापासून यांचा इतिहास मिळत नाहीं. बहुधां त्यावेळीं तें राज्य नाश पावलें असावें. पंधराव्या शतकाच्या सुमारास गोंड गढा-मांडला राज्याच्या प्रदेशांत जबलपुरचा समावेश होत होता; आणि त्यावेळीं गढा ही राजधानी होती. इ.स. १७८१ मध्यें मराठ्यांनीं गोंड राज्याचा नाश केल्यावर जबलपूर पेशव्यांच्या सागर मुलुखांत समाविष्ट झालें. इ.स. १७९८ सालीं हा मुलूख नागपूरच्या भोसल्यांकडे देण्यांत आला; व इ.स. १८१८ सालीं येथें ब्रिटिश राज्य स्थापित झालें. इ.स. १८५७ सालच्या बंडांत येथें थोडी गडबड झाली होती. या जिल्ह्याचा बिजेराघोगड नांवाचा एक उत्तरेकडील परगणा पूर्वी एक संस्थान होतें. परंतु संस्थानिक बंडांत सामील झाला असल्या कारणामुळें त्यास पदच्यूत करण्यांत आलें; व तो परगणा इ.स. १८६५ मध्यें जबलपूर जिल्ह्यांत समाविष्ट करण्यांत आला. निरनिराळ्या वंशाच्या व धर्माच्या लोकांनीं या भागांत वास्तव्य केलें असल्यामुळें त्या त्या लोकांनीं करुन ठेवलेली जुनीं कामें येथें पहाण्यास मिळतात.
लोकसंख्या (१९२१) ७४५६८५. या जिल्ह्यांत शेंकडा ८७.५ हिंदु, ५.५ वन्यधर्मीय, ५.५ मुसुलमानी व सु. ७००० जैन लोक आहेत. पूर्वेकडील हिंदीच्या उपभाषेपैंकीं बाधेली नामक उपभाषा या जिल्ह्यांतील लोक बोलतात. गहूं, भात, हरभरा, तिळ वगैरे. येथील मुख्य पिकें होत. या जिल्ह्यांत पुष्कळ ठिकाणीं, मुख्यत्वेंकरून सिरोहा तहसिलींत लोखंडाच्या खाणी आहेत. गोसळपूर, सिरोहा, खितोळा वगैरे गांवीं मँगेनीज धातूच्या खाणी आहेत. स्लीमनाबाद येथें तांबें सांपडतें. चुनखडीचा दगड या जिल्ह्यांत विपुल आहे. संगमरवरी दगड येथून बाहेर जातो. हातमागाचा धंदा हल्ली पूर्वीप्रमाणें चालत नाहीं. गोकुळदास स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल्स, कौलें विटा, दारू वगैरे करण्याचे कारखाने, जबलपुर जिल्ह्यांत आहेत. गहूं, गळिताचीं धान्यें, कातडीं, शिंगें बाहेर जातात. मुंबई ते कलकत्ता जाणारा आगगाडीचा रस्ता या जिल्ह्यांतुन जातो. जिल्ह्यांत निरनिराळे आगगाडीचे कांटे आहेत.
तहसील - मध्यप्रांत, जबलपूर जिल्ह्यांतील एक तहसील. उत्तर अक्षांश २२०४९'' ते २३० ३२'' व पूर्वरेखांश ७९०२१'' ते ८००३६''. क्षेत्रफल १११७ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १६१२०६. या तहसिलींत १ गांव व ७३५ खेडीं आहेत. इ.स. १९०३-०४ सालीं जमीनमहसूल ४५४००० व इतर कर ५१००० रुपये होता. पश्चिमेकडे जबलपूर हवेली म्हणून जो भाग आहे तो फार सुपीक आहे.
शहर - मध्यप्रांत. जबलपूर भाग, जिल्हा व तहसिलीचें मुख्य ठिकाण असून जी.आय.पी. रेल्वेनें मुंबईहून ६१६ मैल लांब आहे. उ.अ. २३०१०'' व पू.रे. ७९०५७''. शहरापासून सुमारें सहा मैलांवरुन नर्मदा नदी वहात गेली आहे. संगमरवरी दगडाच्या खडकांमधून ज्या ठिकाणीं नर्मदा नदीचा प्रवाह वहात चालला आहे तें भेडघांट ठिकाण येथून १३ मैलांवर आहे. जबलपूर शहर व्यवस्थित बसलें असून रस्ते रुंद आहेत व आसपास तळीं व बागा पुष्कळ आहेत. याची समुद्रसपाटीपासून उंची १३६० फूट आहे. त्यामुळें येथील हवा मध्यप्रांतांतील इतर ठिकाणांशीं तुलना केल्यास थोडी थंडच आहे. या शहराचें उत्तरोत्तर महत्त्व वाढत आहे. लोकसंख्या (१९२१) १०८७९३.
पूर्वीच्या गढमांडलानामक गोंड राज्याची गढ नांवाची राजधानी या शहराच्या पश्चिमेस चार मैलांवर असून तिचा समावेश येथील म्युनसिपालिटींतच केलेला आहे. या ठिकाणीं ११०० सालीं मदनसिंगानें बांधलेला मदनमहाल हल्ली पडक्या स्थितींत पहावयास मिळतो. सोळाव्या शतकांत मांडला राजधानी झाल्यामुळें गढचें महत्त्व कमी झालें. खुद्द जबलपुरचा इतिहास फारसा माहीत नाहीं. इ.स. १७८१ मध्यें मराठ्यांनीं मांडलाचें राज्य खालसा केल्यावर त्यांनीं जबलपुर हें त्या भागाचें मुख्य ठिकाण केलें. नागपूर म्युझिअममध्यें संगृहीत केलेल्या एका शिलेलेखांत याचें नांव जावळीपाटणा असें दिलेलें आहे. नंतर हें शहर सागर व नर्मदाकांठचा प्रदेश यावरील कमिशनरचें मुख्य ठिकाण करण्यांत आलें. पुढें हा भाग इसवी सन १८६१ मध्यें मध्यप्रांतांत समाविष्ट करण्यांत आला. पुढें १८६४ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. इ.स. १८८३ सालीं गांवांत नळाच्या पाण्याची सोय करण्यांत आली.
हा गांव व्यापारी दृष्टीनें बराच महत्त्वाचा आहे. शिवणी, मांडला व जबलपुर या तिन्ही जिल्ह्यांतील उत्पन्न होणारा बहुतेक माल येथें येतो. येथें कापडाची गिरणी, कौलाविटांचें कारखानें, दारुची भट्टी, बर्फाचा कारखाना, तेलाच्या व पिठाच्या गिरण्या, जी.आय.पी. रेल्वेचीं वर्कशॉप्स वैगेरे आहेत. याशिवाय हातमाग, पितळकाम, संगमरवरी दगडाच्या मूर्ती बनविणें, आणि अगेट नांवाच्या दगडाची बटणें व इतर दागिनें तयार करणें वगैरे धंदे चालतात. अगदीं अलीकडे ठग, कैदी व त्यांचे वंशज येथें तंबू तयार करीत असत. परंतु हल्ली हा धंदा बंद झाला आहे.
येथें कमिशनर रहातो व जिल्ह्याच्या सर्व कचेर्या येथें आहेत. येथील तुरुंगांत बरेच लहान लहान धंदे शिकविण्याची सोय आहे. उच शिक्षणाचें येथें एक कॉलेज आहे. तरुण गुन्हेगारांस सुधारण्याकरितां एक रेफमेंटरी असून त्या गुन्हेगारांस छोटे छोटे धंदे शिकविण्याची तींत सोय केली आहे. सात आठ हायस्कूलें असून त्यांपैकी दोन मुलींचींच आहेत. रॉबर्टसन इंडस्ट्रियल स्कूल नांवाचा एक धंदेशिक्षणाची शाला आहे. पांच सहा वर्तमानपत्रें व नियतकालिकें निघतात. केवळ स्त्रियांकरितां लेडी एल्जिन हॉस्पिटल आहे.