लोकांचे वैशिष्टय - जपानी लोकांत आणि चिनी कोरियन लोकांत उंचीशिवाय करुन बरेंच साम्य आहे. साधारण जपानी पुरुष व बायको यांची उंची अनुक्रमें ५ फूट साडेतीन इंच व ४ फूट साडेदहा इंच असते. डॉ. बाएल्झ याच्या मतें जपानी बेटांत मंचूकोरियन, मॉगोल, व मलायी या तीन वर्गांचे लोग आढळतात. यांपैकीं पहिल्या जातीचे लोक समाजांतील उच्च वर्गांत आढळतात. हे लोक उंच असून यांचा बांधा सडपातळ असतो व एकंदर शरीररचना सुबक असते. यांचा चेहरा लांबट असून डोळे थोडे तिरकस असतात. यांचें नाक गरुडासारखें वर्तुळाकार असून आणकुचिदार असतें. यांच्या हनुवटीचा कल किंचित् गळ्याकडे झुकता असून वरचे दांत मोठे असतात व मान लांब असते. यांची छाती अरुंद असून (गळ्याखालचा भाग) धड लांब असतें व हात नाजूक व आंखूड असून त्यांचीं बोटें बारीक व लांब असतात. दुसर्या जातींतील लोकांचा चेहरा रुंद असून त्यांचीं गालांची हाडें ठळक व डोळे तिरकस असतात. त्यांचें नाक थोडेंफार बसकट असून तोंड रुंद असतें. यांचा एकंदर बांधा बळकट व समावयवक असतो. वर निर्दिष्ट केलेलें शेवटचें वैशिष्टय जपानी लोकांत क्वचितच सांपडतें. तिसर्या जातींतील लोक ठेंगणे असून त्यांची शरीररचना नीट असते व गालांचीं हाडें वर आलेली असून चेहरा साधारण वाटोळा असतो. त्यांचें नाक व मान आंखूड असून जबडे पुढें आलेले असतात. यांची छाती रुंद व विकासित असून धड लांब असतें व हात लहान व नाजूक असतात. हे तिसर्या जातीचे लोक साम्राज्याच्या आशिया खंडाकडील सर्व बेटांतून सांपडतात. हे वर सांगितलेल्या जातीचे लोक या साम्राज्यांतील मूळचे रहिवाशी नाहींत. येथील मूळचे रहिवाशी अइनु नांवाचे आहेत. हे आतां येझो बेटांत रहातात. हे देखील मंगोल व मॅले (मलायी) लोकांसारखे ठेंगणे व समावयवक आहेत. परंतु भिवया ठळक असून यांनां दाट व झुपकेदार केस असतात. यांचे डोळे वाटोळे असून खोल असतात. व त्यांच्या पापण्या फांकलेल्या असून लांब असतात. यांचें नाक सरळ असून त्यांच्या तोंडावर व शरीराच्या इतर भागांवर लव असते. सद्यःकालीन जपानी लोकांत खालील वैचित्र्य दिसून येतें. त्याच्या डोक्यांची लांबी शरीराच्या मानानें अधिक असते. त्यांच्या धडाच्या लांबीपेक्षां पायांची लांबी अदिक असते. त्यांच्या डोळ्यांचा खळगा (नेत्रस्थान) लहान व उथळ असल्यामुळें व भुवयावरील हाड विशेष ठळक असल्यामुळें त्यांचे डोळे यूरोपियन लोकांपेक्षा अधिक बटबटीत असतात. जपानी लोकांच्या तोंडावर लव असून त्यांचे केस सरळ असतात. हे लोक मोठे बळकट व काटक असतात. त्यांचें हस्तकौशल्य व अंगचलाखी ही वाखाणण्यासारखीं आहेत.
जपानी लोकांची नीतिमत्ता - जपानी मनुष्य नेहमी आनंदी असतो. तो सांसारिक अडचणीस फाजिल महत्त्व देऊन, त्याकरितां झुरणीस लागत नाहीं. त्यांचा स्वभाव चिडखोर नसून फार शांत असतो. जपानी शिपाई समरांगणीं विजयश्रीच्या आराधनेंत इतका गढून जातो कीं त्याला ऐहिक सुखदुःखाचें मुळी भानच रहात नाहीं. आपले मनोविकार दुसर्याच्या उघडकीस न आणणें हें आपलें ब्रीदच आहे अशी त्याची समजूत असते. देशाकरितां, धन्याकरितां व आपली इभ्रत कायम राखण्याकरितां, धारातीर्थी आपल्या देहाची आहुती देण्यास तो एका पायावर तयार असतो. जपानी स्त्रिया निःस्वार्थी, विनयशील व धुर्त असतात. त्या संकंटसमयीं धीर न सोडतां कोणतेंहि दुःख सहन करतात. त्या पतिव्रता, मायाळू माता व गुणवान् कन्या असून शौर्यांत प्रसंगीं पुरुषांवर ताण करितात. जपानांत बायकोच्या वाईट चालीमुळें नवराबायकोंत वितुष्ट आल्याची उदाहरणें फारशी ऐकिवांत नाहींत. जपानी लोक साधारणतः सत्यवादी असतात. हे लोक विशेषतः अल्पव्ययी, काटक, आज्ञाधारक व दुसर्यावर प्रीति करणारे असतात. यांच्यांत प्रत्येक गोष्टीच्या मुळाशीं जाऊन अतिसूक्ष्म विवेचन करण्याचें बौद्धिक सामर्थ्य आहे.
जपानी कला कौशल्य - (चित्रकला जपानी पहा).
शिल्प - धातूवर व दगडावर नकशी करण्याची कला जपानी लोकांस प्राचीन काळापासून माहीत आहे. अलीकडे जपानांतील नकशी काम व्यापारी धोरणावर करण्यांत येतें. १८७६ त जपानांत तरवारी कमरेस लटकाविण्याचें बंद झाल्यापासून अलिकडील कारागीर, पुतळे, पेट्या, भांडीं वगैरे जिनसांवर नकशी करूं लागले आहेत.
जरतार व कलाबतू - जपानांत कित्येक शतकांपासून उत्तम जरतारी कापड निघतें. हल्ली देखील किओटो येथें उत्तम नकशी काढलेले व चित्रविचित्र रंगाचे भिंतीचे पडदे तयार होतात. या कलेंत कावाशिमा याची बरीच प्रसिद्धि आहे. जरतारीप्रमाणें जपानांत कलाबतूचेंहि काम फार उत्तम करतात. पूर्वी याचा रंगकामांत व विणकामांत समावेश होत होता. परंतु हल्ली यास स्वतंत्र कलेचें महत्व प्राप्त झालें आहे. अलीकडे जपानांत या कलेची इतकी प्रगति झाली आहे की जपानी कारागीर कपड्यांवर कागदासारखीं चित्रें काढूं शकतात.
कुंभारकाम - जपानांत पूर्वीपासून कुंभारकाम होत असे. १० व्या शतकांत मातीची भांडीं तयार करण्याच्या भट्या होत्या असा पुरावा सांपडतो. परंतु या काळांत तयार केलेली मातीचीं भांडी ओबड धोबड असून त्यांचा धार्मिक विधींकडे व स्वयंपाकाकडे व अशाच इतर किरकोळ कामाकडे उपयोग होत असे. १३ व्या शतकांत जपानांत चहाचा प्रसार झाल्यावर तो तयार करण्यास व पिण्यास लागणारी भांडीं तयार होऊं लागली. हीं भांडीं पूर्वीच्या भांड्यांपेक्षां चांगल्या प्रतीची असत. इ.स. १२२३ मध्यें जपानांतून केटो शिरोझेज नांवाचा मनुष्य कुंभारकाम शिकण्याकरितां चीनमध्यें गेला होता. तेथून शिकून आल्यावर यानें चहा तयार करण्याची व पिण्याचीं मातीचीं भांडीं तयार करण्याकरितां ओवारी प्रांतांतील सेटो शहरीं आवे लाविले. ही भांडीं देखील नकशीदार नसून साधींच असत. पुढें १५२० मध्यें गोरोंडाय् गोशोसुई या नांवाच्या मनुष्यानें फुचौ व किंगटेचेन या शहरीं पांच वर्षें कुंभारकाम शिकल्यावर जपानांत चिनीमातीचीं भांडीं तयार करण्याचा कारखाना काढला. या कारखान्यांत तयार होणार्या भांड्यांस निळ्या रंगाची झिलई असून त्यांवर थोडी बेलबुट्टी काढलेली असे. यानंतर १६०५ मध्यें जपानांत चिनीमाती सांपडली व तेव्हांपासून त्या देशात ही कला विशेष भरभराटीस आली.
लाखेचें काम - जपानी लोक लाखेचें काम चीनी लोकांपासून सुमारें ६ व्या शतकांत शिकले. पहिल्यानें त्यांचें काम साधें असून काळ्या लाखेवर होत असे; परंतु पुढें ८ व्या शतकांत त्यावर सोनेरी झांक येऊन तें विशेष शोभायमान होऊं लागलें. ९ व १२ या शतकांच्या दरम्यान जपानांत लाखेवर चित्रें काढूं लागले. हीं सर्व चित्रें वनस्पती व इतर असल्यास किरकोळ वस्तूंची असून तीं खोदीव नसत. १४४९-१४९० च्या दरम्यान योशीमासा यानें उठावदार खोदीव चित्रें काढण्याची नवीन युक्ति शोधून काढली. १६ व्या शतकांत या कलेचें महत्व वाढून १७ व्या शतकांत तर तिच्या भरभराटीचा कळस झाला.
मुलामा देण्याचें काम - अलीकडे जपानांत भांडीं वैगरे वर मुलामा देण्याचें काम चांगलें होऊं लागलें आहे. पूर्वीपासून जपानी लोकांत हें काम अवगत असे परंतु तें आतांसारखें उत्कृष्ट नसे.
जपानची सांपत्तिक स्थिति व दळण वळण - इ.स. १८७५ सालीं जपानांत स्थानिक सरकारी अधिकार्यांची सभा भरून तींत साम्राज्यांतील रस्ते दुरुस्ती व देखरेख करण्याचें ठरलें. सडकांचे तीन मुख्य वर्ग करण्यांत येऊन प्रत्येक वर्गांत कांहीं पोटभेद करण्यांत आले. १८६९ सालीं साम्राज्यांतील किऊशिऊ बंदरांत तांदुळाचा दुष्काळ पडला व उत्तर भागांत तांदुळ मुबलक असूनहि स्वरुप व जलद दळणवळणाच्या अभावानें दुष्काळ पडलेल्या प्रदेशास तांदुळ पुरवितां न आल्यामुळें पुष्कळ प्राणहानी झाली. ही संधी साधून सर हेन्री पार्कस या इंग्रज वकीलानें आगगाड्या सुरु करण्याचें अगत्य प्रतिपादन केले. ओटू व ओकुमा या सरकारी सभासदांनीं ही गोष्ट मनावर घेऊन १८७२ सालीं जपानांत पहिल्यानें आगगाडी चालू केली. जपानी लोक पहिल्यापासून जलपर्यटन करीत असत. परंतु १६ व्या व १७ व्या शतकांत जपानी सरकारानें राष्ट्र संरक्षणार्थ एकलकोंडेपणाचें धोरण स्वीकारल्यामुळें जलपर्यटणाच्या प्रगतीस बरीच शिथिलता प्राप्त झाली. पुढें १९ व्या शतकांत टूकोगावा याच्या कारकीर्दीत जपानी सरकारानें जलपर्यटनासंबंधीं केलेले कायदे रद्द करुन पुन्हां परराष्ट्रांशीं जलमार्गानें दळवळण सुरु केलें. १९१७ सालीं १४१७८५५२ टनांचीं जपानी जहाजें होतीं. जपानांत नौकानयन शिकविणार्या पुष्कळ संस्था आहेत. त्यांपैकीं १८७५ त टोकिओंतील नौकानयनाचें विश्वविद्यालय मुख्य होय. जपान सरकारनें नौकानयनावर देखरेख करणारें एक खातें काढलें आहे. या खात्याचे तीन भाग असून त्यांपैकीं एकेकाकडे अनुक्रमें खलाशांची परिक्षा घेणें दर्यावर्दी व्यापारावर देखरेख ठेवणें व जहाजें तपासणें ही कामें सोंपविलीं आहेत. जपानी किनार्यावर परराष्ट्रीय आगबोटी नांगरतां येतील अशीं ३३ बंदरें आहे.
परदेशगमन - जपानी लोक धाडसी असून परदेशी जाण्यास त्यांनां मुळीच भीति वाटत नाही. पुष्कळ जपानी लोक कोरिया, मांचूरिया व दक्षिण अमेरिका, यूरोप, हिंदुस्थान, कानडा, मेक्सीको, आस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स वगैरे देशांत जाऊन राहिले आहेत. जपानी साम्राज्यांत देखील अमेरिका, चीन कोरिया, इंग्लंड, जर्मनी, रशिया, फ्रान्स वगैरे देशांतील लोक पुष्कळ आहेत.
पोस्ट व तारा यंत्र - या साम्राज्यांत पोस्टखातें १८७१ पूर्वीच स्थापन झालें होतें. पुढें लवकरच त्यामार्फत, वर्तमानपत्रें, पुस्तकें व्यापारी नमुने वगैरेचा व्यवहार होईल इतकें मोठें करण्यांत आलें व त्याची मर्यादा वाढवून प्रत्येक मोठमोठ्या ठिकाणीं पोस्ट ऑफिसें उघडण्यांत आलीं. सन १८९२ मध्यें त्याचा विस्तार इतका झाला की, त्याच्या मार्फत परदेशांशीं व्यवहार होऊं लागला. आणखी कांही दिवसांनीं याच खात्यास एक सेव्हिंग बँक जोडण्यांत आली. जपानांत १८७७ च्या बंडानंतर तारायंत्राचा व टेलिफोनचा प्रसार झाला. स. १८८६ त पोस्टखात्यास तारखातें जोडण्यांत आलें. स. १८८० पर्यंत टेलिफोनचा फक्त सरकारी कामाकडे उपयोग केला जात असे; परंतु पुढें याचा खासगी कामाकडेहि उपयोग होऊं लागला. १९१९ सालीं जपानमध्यें ७७६४ पोस्ट ऑफिसें होतीं. व ५६५१ तारऑफिसें होतीं. हल्ली ९ बीनतीरी संदेशगृहें स्थापण्यांत आलीं आहेत.
रेल्वे व ट्रॅम - सन १९०६ च्या मार्चमध्यें रेल्वे सरकारी मालकीची करण्याचा कायदा झाल्यानंतर जपाननें सर्व रेल्वे आपल्या ताब्यांत घेण्यास सुरुवात केली व इसवी सन १९१७ मध्यें जपानच्या ताब्यात सर्व रेल्वे आल्या. १९२० मध्यें जपानमध्यें ६०७३ मैलभर रेल्वेचें जाळें पसरलें होतें. त्याचप्रमाणें जपानमध्यें ट्रॅमवेच्या कंपन्यांची संख्या ७४ असून १०५९ मैलभर ट्रॅमरस्ते पसरले आहेत.
- Prev
- Next >>