विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जनीजनार्दन - एक महाराष्ट्र कवि. याचें खरें नांव जनार्दन व उपनांव गोसावी होतें. हा जनार्दनस्वामींचा शिष्य व जातीचा वासजनी ब्राह्मण मूळचा बीड येथील रहाणारा असे. हा विजापुरकर बादशहाच्या नोकरींत होता. पण दुष्काळांत दामाजीपंताप्रमाणेंच गोरगरीबांनां सरकारी कोठार लुटूं दिल्यामुळें यास नोकरीस मुकावें लागलें. यानें रामकृष्ण चरित्रपर बरींच पदें केलीं आहेत. ''निर्विकार कल्प ग्रंथ'' अध्यात्मपर असून उद्धवकृष्णसंवादरुपानें लिहिला आहे. मृत्यु शके १५२३. याची समाधि भूम (मोगलाईंत) येथें आहे. नाना फडणवीस यांच्या बेलबागेंतील विष्णूपुढें गाण्याची जी गवयाची नेमणूक आहे त्या जाग्यावर जे मार्तंड नांवाचे पूर्वी गवई होते, ते याचेच वंशज होते असें अ कोशकार सांगतात. (अ. कोश; महा. सारस्वत; महा. कविचरित्र).