विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जनार्दनस्वामी - एक महाराष्ट्र संतकवि. हा देशस्थ आश्वलयन ब्राह्मण खानदेशांतील चाळीसगांवचा देशपांडे होता. जन्म चाळीसगांवीं शके १४२६ झाला. हा शांकरमतानुयायी असे. याची गणना साधुंमंडळांत आहे. यास देवगडच्या किल्ल्यावर यवन किल्ल्येदाराच्या कारभारीपणाचें काम असे. गाणगापुर येथें जे नृसिंहसरस्वती होते, (ज्यांस लोक दत्तात्रेयाचा अवतार समजत) त्यांचा हा शिष्य होता. नृसिंहसरस्वतीवर यांनीं रचलेली आरती चमत्कारिक चालीची आहे. ती हल्ली नृसिंहवाडीस प्रत्यहीं म्हणण्याचा पाठ आहे. जनार्दन स्वामीचे अभंग व पदें उपलब्ध आहेत. यांचा काल शके १४१७ च्या सुमारास झाला. याचें नांव पुढें चालविणारे तिघे शिष्य परम गुरुभक्त निपजले. त्यांत पहिला एका जनार्दन (एकनाथस्वामी), दूसरा रामाजनार्दन आणि तिसरा जनीजनार्दन याप्रमाणें होते. (अ. कोश; महा; सारस्वत; सं.क.का.सू.).