विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जनाबाई - ही शूद्र जातीची स्त्री नामदेवाच्या घरी दळण, कांडण वैगेरे सेवा करण्याकरितां त्याची दासी होती. ही चंद्रभागेच्या वाळवंटांत नामदेवाला सांपडली. नामदेवाच्या कुटुंबांतील मंडळींबरोबर हीहि भक्तिमार्गांत शिरली व अभंग करूं लागली. हिनें भक्तिभावानें देव आपला इतका ॠणी केला होता म्हणून सांगतात कीं, तो हिला दळूं व कांडूं लागे, हिच्या घरीं भोजनहि करी.
हिनें लग्न मुळींच केलें नव्हतें. नामदेवानें स्वतः आपण व घरचीं तेरा माणसें मिळून जे अभंग लिहिले, त्या १४ माणसांशिवाय ही एक पंधरावी त्यांत होती. हिनें १२॥ कोटी अभंग रचिले असें तुकाराम म्हणतो. हिचें ''द्रौपदीवस्त्रहरण'' प्रसिद्ध आहे. मुक्ताबाईप्रर्माणेंच हिचे अभंग फारच प्रेमळ आहेत. हिनें देवास खंडोबा कल्पून त्यास नवस केल्याचा एक अभंग केला आहे. त्यांत हिनें मागितलेल्या गोष्टींचा पारमर्थिक अर्थ आहे.
या अभंगावरून हिला विषयसुख तुच्छ झालें होतें. परंतु देव एक व आपण एक एवढें द्वैतभान राहिलें होतें असें स्पष्ट दिसून येतें. जनाबाईंच्या अभंगांचें थोडक्यांत परीक्षण व त्यांचा नमुना ''अभंग'' या लेखांत (विभाग ६, पृ. २९९) पहावयास मिळेल. (अ.कोशः महाराष्ट्र सारस्वत.).