विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जंतुजन्य रोग - शरीरांत प्राणिज अगर उभ्दिज सूक्ष्म रोगजंतूचा प्रवेश होऊन निरनिराळे रोग होतात हें पुष्कळ दिवसांपासून माहित आहे खरें. परंतु त्यांची व्यवस्थित माहिती, या जंतूंच्या निरनिराळ्या जाती व त्यांपासून होणारे रोग यांचें निश्चित ज्ञान अलीकडील शोधकांस उपलब्ध झालें आहे. रोगोत्पत्तिविषयीं निदान बर्याच समजुती ज्या पूर्वीपासून चालत आल्या त्या या शोधांमुळें बदलाव्या लागून या शोधामुळें त्या त्या रोगांची चिकित्साहि भिन्ना तर्हेनें हल्ली करावी लागत आहे. तसेंच या रोगांचा प्रसार शहरांत थोड्या प्रमाणांत असो किंवा साथीच्या रूपानें मोठ्या प्रमाणांत असो; त्याचा प्रतिकार करण्याच्या साधनामध्यें व मार्गामध्यें जरूर तो बदल वरील शोधामुळें करावा लागत आहे. यापैंकीं मुख्य बहुतेक रोगांचें समप्रवर्णन या ग्रंथांत वर्णानुक्रमे दिलें आहेच; परंतु या ठिकाणीं या सर्व रोगांचीं बिजें जे वरील सांगितलेलें जंतू त्यांपासून होणार्या रोगांचा समुच्चय द्दष्टीनें विचार किंवा नुसता नामनिर्देश केला आहे. त्यावरून सामान्य वाचकांसहि विहंगम द्दष्टीनें त्यांचे प्रकार, महत्व व भय किती आहे याची कल्पना व्हावी एतदर्थ खालील माहिती दिली आहे.
अ-उभ्दिज्ज जंतूंपासून होणारे रोग |
जंतुनाशक औषधें.- प्राणिज अथवा उभ्दिज पदार्थात जीं द्रव्यें अथवा पदार्थ घातलें असतां जंतूंची वाढ न होतो ते पदार्थ नासणें अगर कुजणें बंद होतें त्या द्रव्यांस जंतुनाशक औषध म्हणतात. यांपैकीं कांहीं तर जंतूंस एकदम निर्जीव करून टाकितात व कांहीं औषधें जंतु एकदम मारून न टाकितां त्यांची वाढच फक्त बंद करतात. कोणताहि पदार्थ कुजूं लागला म्हणजे काय घडत असतें, याविषयीं पाश्चूरनें शोध लावून जंतूंची प्रथम कल्पना जगापुढें आणिली आणि त्याच आधारावर लॉर्ड लिस्टर या इंग्रज विद्वान शोधकानें जंतुनाशक औषधांचा जखमा बर्या करण्यांत उपयोग किती होतो हें सिद्ध केलें. (शस्त्रवैद्यकावरील लेख पहा). जंतूंची वाढ होण्यास अनुकूल स्थिति म्हणजे जंतूंचे पोषण होईल असा पदार्थ, थोडासा ओलावा, बेताचें उष्णमान आणि बहुशः प्राणवायु ही होय. ह्या शोधाच्या अनुरोधानें व अभ्यासानें नाना प्रकारचीं खाद्यें डब्यांत घालून टिकवितां कशीं येतील हे शोधून काढिलें व व्यवहारांत त्याचा फार उपयोग झाला. प्राचीन काळीं मृत माणसांच्या शरीरांत जंतुनाशक पदार्थ घालून तीं शरीरें रक्षण करण्याचा प्रघात होता व हें शक्य होण्यास कारण जंतुशास्त्राचें सत्यत्व हें होय. पूर्वीचें शोधक लोक कसें तरी करून सडणें व कुजणें ही क्रिया कशी थांबवावी येवढ्यासाठीं खटपट करीत व त्यासाठीं अमुक एका पदार्थात चुकूनमाकून असलेल्या एखाददुसर्या जंतूची वाढ होऊं नये म्हणून किती जंतुनाशक औषधे त्या पदार्थात घालावें येवढेंच पहात असत; परंतु पुढें असें आढळून आलें कीं, जंतुघ्न औषधाची शक्ति अजमावण्यासाठीं हे प्रयोग बिनचुक नाहींत. हल्लीं कोणत्याहि या प्रकारच्या औषधाची शक्ति अजमावणें असल्यास विविक्षित व मोजक्या रोगजंतूचा व त्याच्या अंड्यांच्या त्यांत बुजबुजाट झालेला आहे असें मुद्दाम केलेलें मिश्रण घेऊन त्यांत तें जंतुघ्न औषध घालून त्याची सत्त्वपरिक्षा करतात. व अशा रीतीनें प्रचारांत असलेल्या बहुतेक जंतुघ्न पदार्थाची शक्ति अजमावून ठेविलेली आहे; व ज्या जंतुघ्न औषधाशीं इतर जुन्या व नव्या जंतुघ्न औषधाची येणेप्रमाणें तुलना करावयाची तें मूलाधार जंतुघ्न औषध अमुक पाण्यांत विरघळवलेलें अमुक थेंब कार्बालिक आसिडबरोबर असतें असें प्रमाण सांगतां येतें.
विशेष प्रचारांत असलेली जंतुघ्न औषधें - कार्बालिक आसिड, रसकापूर, बायनायोडाइड ऑफ मर्क्युरी, फार्मालीन सालिसीलिक आसिड, इ. कार्बालिक आसिडमध्यें थोडें पाणी घातलें असतां तें जंतू मारून टाकितें. तेंच पाण्याचें प्रमाण वाढविलें कीं तें फक्त वाढ खुंतवितें. पाणी न घालतां तसेच कार्बालिक आसिड क्षयजंतूंनीं व्यापिलेलीं अगर तशाच इतर रोगजंतूनीं ग्रस्त अशीं कापलेलीं गळवें अगर नासूर इत्यादिकांनां शास्त्रक्रियेच्या वेळीं तें मांस खरडून त्यावर लावलें असतां तो भाग रोगजंतूसह भाजल्यासारखीं होऊन रोग थांबतो. १ भाग आसिड व २० भाग पाणी घालून केलेले औषध शस्त्रक्रियेपूर्वी शस्त्रे, लिंटचे तुकडे व फडकीं जंतुरहित करण्यासाठीं उपयोगांत आणतात. शस्त्रक्रियेच्या वेळीं मात्र हें औषध अशा बेतानें लावावयाचें कीं तें शरीरांत पचून जाऊन त्याची विषबाधा होऊं नये.
रसकापूर अथवा बायनाइड आफ मर्क्युरी हें एक जलाल जंतुघ्न आहे व हीं औषधे १ भाग पाणी २००० भाग, १००० भाग आणि ५०० भाग, अशीं तीन प्रकारचीं पातळ जंतुघ्न औषधें तयार ठेवितात. शस्त्रक्रियेस सुरूवात करण्यापूर्वी शस्त्रवैद्य व त्याचे मदतनीस या औषधांत आपआपलीं बोटें व हात धुवून जंतुरहित करितात. या औषधांत शस्त्रें बिघडतील म्हणून तीं त्यांत बुडवून ठेवीत नाहींत. अगर शरीरांत बराचसा भाग कापला असतां त्यांवर हें औषध लावीत नाहींत, याचें कारण तें अति विषारी असल्यामुळें विषबाधा व्हावयाची. कापलेला भाग थोडाच असेल तर लावण्यास हरकत नाहीं. बोरॅसिक असिड यास जंतुनाशक असें लोक चुकीनें मानीत असत. पण त्यांत जंतू असलेलें मिश्रण थोडें टाकिलें असतां जंतूंस कांहीं एक पीडा होत नाहीं. त्याचा गुण एवढाच आहे कीं तें जखमेस न झोंबणारें व तिचा दाह शांत करणारें औषध आहे. चूर्णमय जंतुनाशक औषधांपैकीं आयोडोफार्म हा प्रसिध्दच आहे व त्याचा उपयोग हरएक रोगांत व जखमेंत करितात. शिवाय क्षयविकाराच्या जंतूंनीं नासलेल्या शरीराच्या कापलेल्या भागांत हें औषध लाविलें असतां त्या रोगाची वाढ हें औषध चांगल्या रीतीनें थांबवू शकतें. याचें कारण त्य मांसांत तो पदार्थ मिळून जाऊन त्यांतील आयोडीन मोकळें होतें व हें ताजें आयोडिन तो रोग बरा करितें. या प्रकारचीं अलीकडे निघालेलीं अन्य औषधें - १ चिनोसॅलही एक पिवळा पदार्थ आहे व २ लाय सॉल. हे दोन्ही पाण्यांत विरघळतात व दोन्ही जळलेल्या दगडी कोळशाच्या अवशिष्ट भागापासून तयार करितात व याचा उपयोगहि फार होतो. परंतु जंतुघ्न औषध किती जरी उत्तम असलें तरी लावल्यापासून कापलेल्या भागास थोडा तरी दाह व विषबाधा होतेच. म्हणून हें टाळण्याकरितां शस्त्रक्रियेमध्यें शस्त्रवैद्यांचा नवीन संप्रदाय निघाला व त्याचा उद्देश जंतुघ्न (विषारी) औषधें न वापरतां ज्या भागावर शस्त्रक्रिया करावयाची तो भागच शुद्ध व कढ आणलेलें पाणी अगर बोरसिक आसिड, इ. सौम्य व शीतल पदार्थांनीं घासून पुसून पूर्णपणें जंतुरहित करावयाचा व शस्त्रक्रिया आटोपल्या वर जखमेवर जंतुघ्न औषधविरहित पट्टया व कापसाच्या घड्या ठेवावयाच्या, याचा हेतु असा असतो कीं महत्प्रयासानें शुद्ध केलेल्या जखमेमध्यें बाहेरून पुनः जंतूंची वाढ होण्यास संधि सापडूं नये. जंतुघ्न औषधाच्या योगानें जंतू मारून टाकावे व कडक जंतुघ्न औषधें वापरून रोग्यास विषबाधा होऊं द्यावी हें त्यांच्या मताविरूद्ध आहे.