विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जत - मुंबई, विजापुर जिल्हा जत संस्थान हें हल्ली विजापुर एजन्सीमध्यें असून त्याच्या उत्तरेस सोलापुर जिल्हा, पूर्वेस विजापूर जिल्हा, दक्षिणेस बेळगांव जिल्हा आणि पश्चिमेस सांगली संस्थान आहे संस्थानचें एकंदर क्षेत्रफळ ९८०.८ चौरस मैल असून लोकसंख्या (स.१९२१) ८२६४९ व एकंदर वसूल ३,३६,९३२ आणि ११९ गांवें आहेत. राजधानीचें गांव जत हेंच असून विद्यमान संस्थानिक श्रीमंत रामराव अमृतराव ऊर्फ आबासाहेब डफळे हे आहेत. संस्थानिकांनां राज्यांतील मुलकी व फौजदारी बाबतींतील सर्व अधिकार आहेत. इंग्रजसरकारास संस्थानाकडून सालिना ६४०० रू. (तैनाती फौजेसाठीं) व ४८४७ रू. (सरदेशमुखीबद्दल) मिळून एकंदर ११२४७ रू. खंडणी मिळते.
संस्थानिक हे उच्चवर्गीय मराठे (क्षत्रिय) असून त्यांचें मूळचें आडनांव चव्हाण होतें; परंतु जतची जहागीर मिळाल्यानंतर त्यांनां (व त्यांच्या भाऊबंदांनां) डफळे हें नांव मिळालें. याचें कारण त्यांचें पूर्वज हे मूळचे (जत संस्थांनांतील) डफळापुर या गांवचें पाटील होत. सांप्रतहि डफळापुरची पाटिलकी संस्थानिकांचीच आहे.
संस्थानचें निशाण पांढर्या कापडाचें, त्रिकोणाकार व वरील भाग काळा असलेलें असें आहे. या घराण्यांतील पूर्वज सटवाजीराव हे विजापुरी जात अ त एका चिंगीसाहेब नांवाच्या मुसुलमान अवलियानें त्यांनां जहागीर मिळेल असा आशिर्वाद देऊन आपला पांढरा फेटा त्यांनां बांधावयास दिला. त्याची खूण म्हणून डफळ्यांचें निशाण पांढरें असतें. पुढें औरंगझेबानें डफळ्यांनां, संस्थान पुन्हां जहागीर दिल्यानें, वरील निशाणावर हिरव्या रंगाचा एक चांद काढूं लागले व संस्थानांतील खूण म्हणून (सर्व सरकारी वस्तूंवर) तो चांद वापरूं लागले.
संस्थानिकांचा मूळ पुरूष सटवोजीराव डफळापुरचा पाटील होता. त्याच्या शौर्यानें तो विजापुरच्या अल्लि आदिलशहाच्या नजरेस आल्यानें, त्यानें त्याला नौकरींत घेऊन, जत, करजगी, बारडोल व हानवाड या चार परगण्यांचें देशमुखीवतन वंशपरंपरा जहागीर म्हणून दिलें; व त्याबद्दल सालिना ३ हजार मोहरा खंडणी ठरविली (१६७२). आदिलशाही नष्ट झाल्यानंतर सटवोजीनें आपली जहागीर वाढविण्याचा उपक्रम केला, तेव्हां औरंगझेबानें त्याला धरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रथम सांपडला नाहीं. मात्र त्याचा भाऊ धोंडजीराव सांपडला. तेव्हां भावाच्या प्रमानें सटवोजी आपण होऊन औरंगझेबास भेटला व त्यानें त्याची नौकरी करण्याचें कबूल केलें. त्याचा मुलगा बाबाजी यास औरंगझेबानें आपल्या सैन्यांत नोकर नेमिलें. पुढें औरंगझेबानें सातारच्या किल्ल्यास वेढा दिला असतां व मंगळाईच्या बुरूजास सुरूंग लावून ते उडला असतां, तटावर चढून याच बाबाजीनें किल्ल्यावर औरंगझेबाचें निशाण लाविलें व त्यामुळें बुरूजास अद्यापिहि डफळेबुरूज म्हणतात अशी एक दंतकथा आहे (१७००). या लढाईतील जखमांमुळें डफळापुरास परत जात असतां बाबाजी हा वाटेंतच मरण पावला. या कृत्यामुळें औरंगझेबाने खूष होऊन सटवोजीस जत व करजगी या महालांची जहागीर व पंचहजारी मनसब दिली (१७०४). सटवोजीनें जत ही आपली राजधानी केली. याच सुमारास त्याचा दुसरा पुत्र कान्होजी हा वारला. त्यामुळें पुत्रशोकानें सटवोजी हा १७०६ त मृत्यु पावला. यावेळीं कान्होजीची मुलें अज्ञान असल्यानें बाबाजीची बायको येसूबाई ऊर्फ आऊसाहेब ही कारभार पाहूं लागली.
शाहूमहाराज सुटून गादीवर बसल्यानंतर येसूबाई ही त्यांच्या आश्रयास राहिली. ही बाई फार सच्छील असून (बेळगांव जिल्ह्यांतील) रामतीर्थ येथील रामेश्वराची उपासक होती. लोकांची तिच्यावर भक्ती असून ते तिला पूज्य मानीत. हल्लीं सुद्धां तिकडील भागांत तिला दुसरी अहिल्याबाई होळकर म्हणतात. तिला मूलबाळ नसल्यानें तिच्या विनंतीवरून शाहूनें तिचा वडील पुतण्या यशवंत राव यास गादीचा वारस कायम केलें (१७४४). येसू बाईनें बाकीच्या तिघां (रामराव, भगवंत, मुकुंद) पुतण्यांस तनखा तोडून दिला व यशवंतरावाच्या हातीं कारभार सोंपवून (१७५४) थोड्याच दिवसांत ती उमराणी येथें वारली (१७५७).
बाई वारल्यानंतर धोंडजीरावाची सुन बहिणाबाई हिनें जहागिरींत गडबड सुरू केली, तेव्हां यशवंतरावानें पेशव्यांकडें तक्रार केली. त्यावेळीं पेशव्यांनीं बहिणाबाईस तिच्या हयातीपर्यंत सहा खेडी (२ खेडीं खासगी खर्चासाठी व ४ खेडीं कर्जफेडीसाठीं) नेमून दिलीं. याच सुमारास रामरावानें सिद्धी अबदुल कादत खवासखान याच्यापासून कांहीं देशमुखी वतनें १५१२५ रूपयांस विकत घेतलीं; या वतनांस खवासखानीवतन असें अद्यापि म्हणतात. याचा उपभोग फक्त राजकुटुंबासच घेतां येतो.
यशवंतरावाच्या मागें त्याचा पुत्र अमृतराव गादीवर आला. त्याला पेशव्यांनीं देशमुखी वतन व जहागीर कायम केल्याची सनद दिली होती. तो १७९० त वारल्यावर त्याचा मुलगा कान्होजीराव गादीवर बसला. हा खडर्याच्या लढाईत व इतर बर्याचशा लढायांत पेशव्यांच्या हाताखालीं हजर असे. हा सन १८९० त मरण पावला. याच्या वेळीं रावबाजी यांनीं मध्यंतरी जतची देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळ्याकडें सोंपविली होती.
कान्होजींच्या पाठीमागें त्याची वडील बायको रेणुकाबाई ही कारभार पहात होती. तिच्यांत व ईस्ट इंडिया कंपनींत (जेम्स ग्रॅंट डफच्या विद्यमानें) ता. २२ एप्रिल १८२० रोजीं एक तह झाला. त्यामुळें जतसंस्थान हें सातारकर छत्रपतीच्या अधिराज्याखालून निघून कंपनीच्या देखरेखीखालीं आलें; कंपनीनें संस्थान वंशपरंपरागत चालविण्याचें कबूल केले व संस्थानावर नांवाची हुकमत मात्र सातारकराची राहिली. अशाच अर्थाचा तह छत्रपती व रेणुकाबाई यांच्यातहि याच वेळी झाला. यानंतर बाई १८२२ त वारली. तिच्या नंतर तिची सवत साळूबाई ही कारभार करूं लागली; परंतु ती थोड्याच महिन्यांत मरण पावली (१८२३). दोघी बायांनां मुलें नसल्यानें यशवंत कान्होजीचा वंश खुंटला, तेव्हां यशवंतरावाचा नातु रामराव नारायण यास सातारकर छत्रपतींनीं वारसदार म्हणून संमती दिली; आणि त्याप्रमाणें रामराव हा गादीवर बसला. त्यानें १८३५ पर्यंत राज्य केलें व शेवटीं तो संततीविहरति वारला.
तेव्हां सातारकर छत्रपतीनीं परवानगी दिल्यावरून, रामरावाच्या भागीरथीबाई नावाच्या बायकोनें राज्याचा कारभार स्वतःच्या हातीं (१ जुलै १८४१ त) घेऊन व उमराणी येथील भगवंत बाबाजी डफळे याचा मुलगा भिमराव यास दत्तक घेऊन त्याचें नांव अमृतराव ठेविलें (१८४२); व त्याच्या लहानपणीं स्वतःच सारा कारभार पाहिला. ती १८४६ त वारली तेव्हां अमृतराव हे लहान असल्यानें सातारकारांनीं रेसिडेंटाच्या अनुमतीनें जतेस एक कारभारी नेमून संस्थानाचा कारभार चालविला. पुढें सातारचें राज्य खालसा झाल्यामुळें जत हें सर्व बाजूंनीं इंग्रजांच्या अंमलाखालीं आलें (१२ मे १८४९).
अमृतराव रावसाहेब हे वयांत आल्यावर त्यांना राज्याचा सर्व अधिकार १३ मे १८५५ त मिळाला पुढें १८६२ त लॉर्ड क्यानिंग यानें त्यांनां व त्यांच्या वंशजांनां दत्तकाची सनद दिली. मध्यंतरीं जत संस्थानानें एक गांव निपाणीच्या देसायास इनाम दिलें होतें; तेथील देसाई अमृतराव यांच्या वेळीं निपुत्रिक वारला असतां इंग्रजसरकारनें तें गांव स्वतःच खालसा केलें; परंतु अमृतराव यानीं योग्य तक्रार करून शेवटीं गांव आपल्या ताब्यांत घेतला (१८६२). अमृतराव हे १८९२ (जानेवारी) त निपुत्रिक वारले. याची दोन कुटुंबे व एक कन्या मागें राहिलीं. थोरल्या कुटुंबाचें नांव लक्ष्मीबाईसाहेब व धाकट्या कुटुंबाच नांव आनंदीबाईसाहेब असून मुलीचें नांव यशोदाबाई उर्फ अक्कासाहेब होय.
यानंतर उमराणी शाखेतींल परशुरामराव माधव डफळे यांचें चवथे चिरंजीव बोवाजीराव यांना लक्ष्मीबाईसाहेब यांनीं १८९२ मध्यें दत्तक घेतलें. इंग्रजसरकारनें दत्तक कबूल करून जत येथें दरबार भरवून बोवाजीराव यांनां गादीवर बसविलें (१३ जानेवारी १८९३). दत्तविधान २१ फेब्रुवारी रोजीं होऊन बोवाजीराव याचें नांव रामराव ठेवण्यांत आलें. हेच सध्याचे जतचे अधिपति आहेत.
श्रीमंत रामराव आबासाहेब यांचा जन्म ११ जानेवारी १८८६ त झाला. कोल्हापुरास त्यांचें प्राथमिक शिक्षण झाल्यावर, त्यानीं राजकोट येथें राजकुमार कॉलेजांत पुढील शिक्षण घेतलें व तेथील शेवटची परीक्षा उत्तम रीतीनें उत्तीर्ण होऊन ते जत येथें १९०६ त परत आले; आणि १ वर्ष संस्थानचा कारभार पाहूं लागले. पुढें ११ जुलै १९०७ मध्यें इंग्रजसरकारनें त्यांच्या हातीं अखत्यारीनें संस्थानचा सर्व कारभार सोंपविला.
श्रीमंतांच्या भगिनी सौ. अक्कासाहेब यांचा विवाह सातारचे विद्यमान छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्याशीं झाला आहे. श्रीमंतांचा विवाह अक्कलकोटच्या राजकन्येशीं होऊन, राणीसाहेबांचें इकडील नांव सौ. भागीरथीबाईसाहेब असें ठेवण्यांत आलें आहे. त्यांचें लक्ष स्त्रीसुधारणेकडे विशेष असून, त्यांनीं स्त्रियांनां शिक्षण देण्यासाठीं एक गृहशिक्षणाचा वर्ग काढला आहे. श्रीमंतांनां युवराज विजयसिंह, अजितसिंह व उदयसिंह आणि प्रेमळाराजे व कमळाराजे अशीं पांच अपत्य आहेत. श्रीमंतांनीं आपल्या राज्यांत बर्याच सुधारणा केल्या असून, त्यांत सर्व संस्थानांत मोफत व सक्तीचें प्राथमिक शिक्षण व मोफत दुय्यम शिक्षण सुरू केलें, ही मुख्य आहे. जत येथें एक इंग्रजी शिक्षणाचें हायस्कूलहि आहे. (जत संस्थानाकडून आलेल्या माहितीच्या आधारें; ग्रँट डफ; कैफियति - यादि).