विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जडावाचें क़ाम - एका धातूवर दुसरी धातु जडविणें किंवा तीवर थर देणें. या कामाच्या अनेक जाती आहेत. त्या सर्व हिंदुस्थानांत योजिल्या जात आहेत. पुष्कळ वेळां एकाच कलाकुसरांच्या कामांत या सर्व जातीचा समावेश होऊं शकतों. साधी व स्वस्त पद्धत म्हणजे लोखंडाच्या किंवा पोलादाच्या पृष्ठभागावर उत्तम नक्षी खोदावयाची व त्यांत सोन्याची किंवा चांदीची तार पाहिजे त्याप्रमाणें दाबून बसवावयाची व हातोडीनें वरून ठाकठोकी करावयाची अशा तर्हेचे सुंदर काम पंजाबमध्ये सियालकोट येथे व त्रावणकोरांत करीत असतात. तसेंच धातूच्या पृष्ठभागावर खोल खांचण्या करून त्यांत तार घालतात. वरून ठोकालें असता ती तार खांचण्यांच्या कडांनां घट्ट धरते; नंतर कानसून तो भाग सफाईदार करितात. पोलदावर सोनें किंवा चांदी आणि तांब्यावर चांदी किंवा पितळ, असें सामान्य संयोगीकरण असतें दुसर्या तर्हेच्या कामांत थर देण्याच्या धातूचे लहान लहान पत्रे पृष्ठधातूवरील खोदलेल्या भागांत बसवून त्या भागांच्या कडा हातोडीनें आंत बसविलेले पत्रे धरून ठेवतील अशा बेतानें ठोकतात. धातूवर चपटे थर दिल्याचें व आंत तार बसविल्याचें परिचित उदाहरण म्हणजे बेदरी भांडी होत. हीं भांडी जस्त, शिसें आणि कथील या मिश्रधातूंपासून केलेलीं असतात. ही प्राचीन भारतीय कला असून दक्षिणेंतील बेदर शहराचें नांव हिला दिलें आहे. दुसरें महत्त्वाचें ठिकाण म्हणजे बंगालमधील पूर्णीया गांव होय. त्या ठिकाणीं तांब्यावर चांदी जडविण्याची विशिष्ट कला उदयास आली. चांदी जडविल्यानंतर बेदरी भांड्यांचा पृष्टभाग रासायनिकरीत्या काळा करीत.
थर दिलेल्या भांड्यांत कांहीं जातींत नक्षी उठून दिसण्याकरितां खोदलेला भाग नक्षीदार करून त्यांत दुसर्या धातूचा थर ठोकून बसविला असतां तो थर नक्षीदार दिसतो. अशा तर्हेचें काम हल्ली तंजावरामध्यें होतों. लखनौच्या कांहीं बेदरी भांड्यांत याची छटा आढळून येते. तेथील भांड्यांत चांदीचा थर उठावदार नक्षीसारखा दिसतो. जुन्या कामांतून सुद्धा पितळेवर फक्त तांबें जडविलें असतें. हल्लीं त्याऐवजी जीं चांदी चढवितात ती कांहीं अशीं दिखाऊपणाकरितां असते.
जडावाच्या दागिन्यांबद्दल हिंदु लोकांइतकी आवड दुसर्या कोण्त्याही लोकांत आढळणार नाहीं. प्राचीन काळापासून जडावाचे अलंकार वापरण्याची आपल्या लोकांत चाल आहे. भारतीय जडावाच्या दागिन्याचा नमुना सिंहलद्वीपांतील जाफना शहरीं सांपडतो. एक सोन्याचा पत्रा घेऊन त्यावर मेण घालून त्यांत बारीक सोन्याच्या तारांच्या चौकटींत पातळ रत्नें, विशेषतः माणकें बसवितात; मधील रिकामी जागा मऊ सोन्यानें भरतात व हत्यारांच्या साहाय्यानें हळू हळू त्यांचें घट्ट व अरूंद कोंदणांत रूपांतर करतात. फक्त हीच रत्नें बसविण्याची तर्हा शोभेच्या बाबतींत मिन्याच्या कामाशीं टक्कर मारते; दुसरा एक सुंदर नमूना म्हणजे मेणाच्या बैठकीवर सोनें जडवून केलेला द्राविडीं जडावाच्या कामाचा होय. या कामांत भरीवपणा व झगझगीतपणा यांचा लहानच पण खर्या मोलाशीं आणि हलक्या वजनाशीं संयोग झालेला असतो. हिंदू जडावाच्या कामाबद्दल सर जार्ज बर्डवुड नांवाच्या इंग्रज गृहस्थ असें म्हणतो कीं, '' आपल्या सर्वोत्कृष्ट कौशल्यानें आणि पूर्ण ज्ञानानें व पृष्ठभागास व्यावहारिक शोभा आणण्याचें मर्म कळल्यानें हे लोक अतिशय हलक्या वजनाच्या धातूला आणि रत्नाला - त्याची व्यापारी किंमत मुळीच नसली तरी - अतिशय मोठी अशी कारागिरीची किंमत आणतात. ह्या कारागिरींत आणि सांप्रतच्या यूरोपीयन कारागिरींत महत्त्वाचा फेर आहे. यूरोपीय कारागीर पुष्कळशा वजनाच्या धातूवर थोडीशी कारागिरी करितात.'' हिंदी जडावाच्या कामाची सफाई आणि तेजस्विता बहिर्गोल रत्नास पृष्ठभागावर पैलू पाडून सर्व रंग उठावानें दाखविण्यांत आहे. हल्लींची पाश्चात्य चाल म्हणजे एकच पातळ पैलू पाडावयाचा. ह्यांत पहिल्या खेपेस पहाणारास भपका वाटतो. कांहीं थोड्या सुशिक्षित हिंदी लोकांत अशा तर्हेचे जडावाचे जिन्नस वापरण्याची चटक दिसून येते. हे जिन्नस दुसर्या खेपेस नजर फेकण्याच्या योग्यतेचे मुळींच नसतात. कारण हल्लींचें सर्व काम म्हणजे यूरोपीय व्यापारी चोपड्यांतून नक्कल करून उठविलेलें असतें. अतूलनीय असें पूर्वीचें सुंदर काम निष्ठुरपणें वितळविण्यांत येतें व त्याचेंच हल्लीचें सुधारलेलें म्हणून समजलें जाणारें जडावाचें काम तयार करतात. लंकेतील कॅंडि शहरचे जडावाचें काम द्राविडी पद्धतीशीं विशेषेकरून निगडित आहे; कारण तेथील जडे व सोनार हिंदी वंशांतीलच आहेत. परंतु दक्षिण हिंदुस्थानी कारागिरींत कधी कधी आढळून येणारी दानवी कल्पना तेथील कामांत आढळून येत नाही. शिवाय तेथील स्थानिक असे काहीं विशिष्ट नमुने आहेतच; जसें मिरींच्या मंजरीच्या माळा, कांहीं विशिष्ट आंगठ्या आणि कानांतील लोलक कॅंडीच्या बड्या लोकांच्या आंगठ्या त्यांच्या मोठ्या आकाराच्या दृष्टीनें प्रेक्षणीय असतात.
अशा कलांची मूळ भूमी इराण म्हणतां येईल; कारण बहुतेक ललितकला व नक्षीकामें इराण-तुर्कस्थानांतून बाह्य देशांत पसरलीं आहेत. धातुपृष्ठावर नक्षी खोंदून तींत दुसर्या धातूच्या तारा बसविण्याची पद्धत 'दमास्कीनिंग' म्हणून प्रसिद्ध आहे. धातूंवर नक्षीदार जडावाचें काम अत्युत्कृट व सुबक करण्यांत आज जपानचा हात धरणार कोणी नाहीं असें म्हटल्यास चालेल. सुंदर ब्राँझमूर्तिकर्मोत फक्त सोन्याचांदीच्या जडाव ते करितात; एरवीं मोठ्या वस्तूंनां व ओतीव भांड्यांनां हिणकस धातूच वापरतात. ब्राँझ पुतळ्यांवर जडाव करतांना मुळ नक्षी जास्त खोंदून तींत चांदीसोन्याची तार भरून वर ठोकतात. पुष्कळदां लाखेच्या वस्तूंवरहि शिंपांसारख्या पदार्थाचा जडाव करतात. दमास्क-जडावाच्या कामांतील बहुतेक प्रकार जपान्यांनां माहीत आहेत. भिंतीत किंवा जमीनीत संगमरवरी दगडाचे किंवा कांचेचे तुकडे बसवून करण्यांत येणारें 'मोझॅइक' काम हें एक प्रकारचें जडावयाचें कामच होय. याचा नमुना आग्रयाचा ताजमहल होय. ही कला फ्रेंच कारागिरांनी दिल्लीला नेऊन तेथील एतद्देशीय कारागिरांनां शिकविली. कांहीं जातींचे मिनाकामहि जडावांत येऊं शकेल. (कुमारस्वामी - आर्टम अँड क्रॅफ्टस इन् इंडिया अँड सीलोन; ब्रिटानिका.)