विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जडान्नाविषबाधा - कुजण्यास अगर आंबण्यास नुकतांच आरंभ झालेलें अन्न खाण्यांत येऊन त्यामुळें पटकीप्रमाणें मोठाले जुलाब होतात त्या व्याधीस हें नाव आहे. या रोगांत तीन चार प्रकारचे जंतू मळांत व आंतड्यांत सापडतात.
कारणें. - वरील प्रकारें बिघडलेलें अन्न, जुनी शिळी बासुंदी, श्रीखंड, अगर आटीव दूध नवीन मालांत हलवायानें भेसळ केलेलें खाण्यांत येणें, नासके खेकडे व मासे खाणें, डब्यांत ठेवलेलें मांस, उघडे असलेलें नासकें खाणें, नासका खवा, बटाटे, आइसक्रीम मलाई वगैरे खाणें, रोगट जनावरांचें मांस खाल्यानें अगर निरोगी जनावराचे परंतु नासण्यास आरंभ झालेलें मांस खाण्यानें हा रोग होतो व चुकीनें अज्त्र लोक यास पटकी म्हणतात.
लक्षणें. - वरील प्रकारच्या आहारानंतर थोड्या तासानीं ते पदार्थ खाल्ले असणारांपैकी बहुतेक माणसांनां वांति, जुलाब, पोटदुखी, हातपाय गारठणें व शक्तिपात हीं लक्षणें होऊं लागून शिवाय आलब्युमिनमेह, फुप्फुसदाह, जर उतणें, अंग लाल होणें, अंगावर पित्त उठणें व अंग फुटल्याप्रमाणें होणें ही लक्षणें होतात. कधीं लक्षणें याहून अमळ सावकाशपणें प्रगट होतात. रोग नंतर बहुधां बरा होतो. परंतु कधीं कधीं रोगी दगावितो.
उपचार. - जठर धुवून काढावें व फार शक्तिपात नसल्यास सौम्य ढाळकामुळें कुजणें थांबून कोठा शुद्ध होतो. ब्रांडी, ईथर, अमोनिया ही उत्तेजक औषधें द्यावीत. रेच फारच होऊन न थांबल्यास ४-१० थेंब अफूचा अर्क द्यावा. शक्तिपातासाठीं अमृतक्षारजल त्वचेखाली टोंचून घालावें. कांहीं तर्हेची मांसान्नें (डुकराचें वगैरे), कालवे व मासे जात्याच विषारी असतात, तीं आहारांतून वर्जावी.