विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जडवाद - सर्व विश्वाची जडप्रकृति व गति यांनी खुलासा करण्याची पद्धति. सर्व मानसिक क्रियांचा खुलासा आधिभौतिक व रासायनिक फरकांनी होतो असें हें मत म्हणतें. या मतांत मुख्य पांच प्रकार आहेत. (१) निर्व्याज जडैक्यवाद; हा ज्या कारणांनी उत्पन्न झाला तीं कारणें अद्यापि अस्तित्वांत आहेत. याची सुरूवात सामान्य लोकांस आत्मिक ज्ञानवेत्त्यांच्या गोष्टी समजण्यास जड जातात या जाणिवेंत आहे. पूर्वसाक्रेटिक जडवादी या वर्गात येतात. ते जडजीवबादी असत. हक्स्ले व हेकेल यांस विचाराचा इतिहास, विचाराची सद्यस्थिति समजली नव्हती असें दिसतें. (२) विश्वोत्पत्ति जडवाद; एकदंर जगाविषयीं सर्वव्यापक अशी विचारसरणी पुढें मांडण्याचा स्टोईक व एपिक्युरियन्सचा प्रयत्न या मतांत येतो. (३) आध्यात्मिक जडवाद, ख्रिस्तीमतास विरोध करणारें मत. (४) वैद्यकीय जडवाद; हें मत मानसिक आजाराचा शारीरिक आजारानें खुलासा करण्याच्या प्रवृत्तीनें उत्पन्न झालें. (५) सर्वात महत्वाचा शास्त्रीय जडवाद; पदार्थविज्ञान शास्त्रज्त्र, प्राणिशास्त्रज्त्र व जीवनशास्त्रज्त्र हें मत प्रतिपादन करतात. सृष्टीशास्त्रज्त्र सर्व गोष्टी भौतिक कारणांनीं समजावून देण्याचा प्रयत्न करतात. ते आध्यात्मिक कारणें अजिबात टाळतात. १९व्या शतकांतील जर्मन जडवादाचें कारण हीगलचा अध्यात्मवादच आहे. हें मत हॉब्सच्या वेळेपासून इंग्लंडांत प्रचलित झालें आहे.