विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जडभरत - प्रियव्रत वंशोत्पन्न जो प्रसिद्ध ॠषभदेव राजर्षि त्याच्या शतपुत्रांतील ज्येष्ठ भरत राजा. तो राज्य सोडून अरण्यांत तप करीत असतां, हरिण बालकाच्या ममतेनें अंतःकाळी त्यास तोच ध्यास लागून, हरिण जन्म प्राप्त झाला. नंतर त्या योनीतून सुटल्यावर, आंगिरस गोत्री कोणी ब्राह्मणाच्या कनिष्ट स्त्रीच्या उदरीं तो जन्मास आला असतां, त्यास पूर्वपुण्यानें मागचें स्मरण होतें म्हणून आसक्तीस भिऊन त्यानें तेथे जडचर्या अवलंबिली. त्या कारणानें जडभरत असें नांव पडलें.
वागण्यांत हा फार जड असल्यानें याला मजुरीची कामें करावीं लागत.एकदां तर त्याला देवीला बळी देऊं केलें होतें. पुढे हा मोठा तत्वज्ञानी बनला (भा.५ स्कं.अ.९.). कालांतरें करून प्रसंगवशात् रहूगण राजाची व याची गांठ पडून त्यास यानें आत्मतत्वबोधानें कृतार्थ केलें प्रा.को.).