विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जठरदाह, (तीव्र) कारणें.- पोटाचा दाह कांहीं तरी तीव्र आग उत्पन्न करणारा पदार्थ गेल्यानें होतो. तसेंच तीव्र अम्लें (तेजाब) अगर सोमल, रसकापूर या सारखा दाहक पदार्थ पोटांत जाऊन झालेल्या विषाराचें हें एक लक्षण आहे. हें कारण नसल्यास पचण्यास जड असें खेंकडें, कालवें वगैरे जलचर प्राणी आहारांत येणें, अपक्व फळें, कुजण्यास आरंभ झालेलें मांस, मासे, फळे, भाज्या अगर दूध, श्रीखंड इत्यादि लवकर नासणारें अन्न पोटांत जाणें हीं अथवा उन्हाळा व त्यामुळें पोटांत बरेंच पाणी जाणें हा कारणें संभवतात. बालकांनां हा रोग होतो. तो अंगावरील अगर वरचे दुध बिघडल्यामुळें होतो. पोटास हात लावला म्हणजे व आपोआप फार वेदना होऊन चिकट व रक्तमिश्रित वांति होते व नंतर एकदम शक्तिपात होऊन मृत्यूहि येतो (विषबाधा हा लेख पहावा.). विषाव्यतिरिक्त रोगामध्यें पोटांत जड वाटून अन्न टोंचित आहे असा भास होतो व वेदना सुरू होतात. हात लावल्यानें अगर खाल्ल्यानें त्या जास्त होतात. नंतर मळमळ व कोरड्या ओकार्या सुरू होतात व कांहीं थोडें खाल्ले कीं तें लागलेंच उलटून पडतें. या बाबतींत अन्नाचे कण व तुकडे प्रथम पडतात; नंतर पाण्यासारखी अगर चिकट किंवा पित्तमिश्रित वांति होते. प्रथम ती आंबट नसते परंतु मागाहून दांत आंबतात इतका आंबटपणा तींत येतो. रोगी सुस्त व बेभान पडून असतो. डोकें दुखणें, अरूचि, बद्धकोष्ट, तहान, तोंडाची चव पार बदलणें जिभेवर दाट बुरशी व मुखास दुर्गंधि, थोडा ताप व नाडी जलद हीं लक्षणें असतात. पोटाच्या शिंपीजवळचा भाग दडस लागतो व दुखतो. नासलेलें अन्न कारण असल्यास अतिसाराचें लक्षण जोरांचें असतें. अर्भकास हा रोग झाला म्हणजे पोट दुखून तें ताठ होतें. त्यांतील दुःख रहाण्यासाठीं पाय वर करून तें एकसारखें रडत व हातपाय नाचवीत असतें. त्यास दूध अगर अन्न घातलें तें मान फिरवितें अगर अधाशाप्रमाणें फार दूध पितें व तें दूध लागलीच उलटून पडतें. मूल लागलीच रोडावून खंगतें व त्याचा प्राणहि जातो. मोठ्या माणसांचें दुखणें एक दोन आठवड्यांत बरें होतें. पण वरचेवर दुखणें उलटल्यास अंतस्त्वचेवर पुटकुळ्या, लाली, बारीक व्रण, दिसतात, व जठररसाची उत्पत्ति कमी होऊन चिकट स्त्राव फार उत्पन्न होतो.
रोगनिदान - या रोगाचीं लक्षणें आरंभीं विषमज्वरासारखीं वाटण्याचा संभव आहे. परंतु त्या ज्वरांत पुढें इतर लक्षणें व अंगावर लाल गुलाबी डाग व गळ्यावर पुरळ दिसतो. अंत्रपुच्छदाहरोग आहे काय अशी शंका येते. पण तें दुःख उजव्या जांघाडाच्या वरील बाजूस असतें.
उपचार.- जठरास अगदीं श्रम पडूं नयेत म्हणून तीव्र रोगांत तर पोटांत अन्न जाऊं देणें अगदींच बंद करावें; व लक्षणें सौम्य झाल्यावर अन्न फार अल्प प्रमाणांत द्यावें. एका दिवसांत उतार न पडल्यास गुदद्वारावाटें पोषणासाठीं दुधाचा बस्ती द्यावा. सौम्य रोगांत पोटांत थोडें दूध व सोडावाटर द्यावें. अगर पेपसीननें पचविलेलें दूधा द्यावे. तहानेसाठीं बर्फाचे तुकदे चघळावे अगर बर्फमिश्रित सोडावाटर द्यावें. पोटांतील वेदना शेकल्यानें थांबेल; अगर त्या फार असल्यास तेथें जळवा लावाव्या. या वेदना शमविण्यासाठीं सूक्ष्म प्रमाणांत अफूमिश्रित औषध द्यावे; व हेंच औषध वांतीचेंहि शमन करणारें आहे. बिसमथ कार्बोनेट व फसफसणारें अमोनियम सैट्रेटे अगर पोट्याश सैट्रेटे त्यांत १।२ थेंब आयोडीन टिंकचर घालून वांती शमण्यासाठीं देतात. मलशुद्वीसाठीं एनीमा द्यावा अगर सीडलिट्झ चूर्ण द्यावे; परंतु विषमज्वरादीचा संशय असल्यास रेचल् देऊं नये. दाह, पीडा व अपचन करणारें अमुक प्रकारचें दुष्ट अन्न पोटांत आहे असें नक्की माहीत असल्यास वांतिकारक औषध द्यावें. अगर जठर पिचकारीनें धुवून काढावें. हळुहळु सुधारणा होईल तर तसें प्रथम हलकें अन्न देऊन तें वाढवीत जावें. या जठरदहामुळें विद्रधि झाल्याची क्वचित उदाहरणे इतर ज्वरांत आगांतुक दोष म्हणून घडतात; व ती प्रायः कष्टसाध्य अगर असाध्यच असतात.
दीर्घकालीन जठरदाह, कारणें - वरील प्रकारें रोगास आरंभ होऊन तीच व्याधि कायम रहाणें हें एक कारण आहे परंतु अति चहाकाफीपान, अपरिमित मद्यपान, फार फळें, मिठाई व तळकट पदार्थ खाणें, पचनास जड प्रकारचीं डुकराचीं वगैरे मांसें, नेहमीं जडान्न अगर मसालेदार व चमचमीत भोजन या कारणांमुळें पोटांत दाहक्रिया टिकून कायम होते. तसेंच यकृत व हृदयरोग जठरव्रण व जठरांतील दुष्ट क्यान्सरादि ग्रंथि या रोगांमुळें जठरांतील भाग अगोदरच दूषित रक्तपूर्ण वाहिन्यांनीं विकृत झाल्यामुळें ह्या रोगास डोकें वर काढण्यास फावतें. तसेंच चर्वण नीट न करणें, भराभर व मोठाले घांस घेऊन जेवणें, सदा अनियमितपणें व अवेळीं जेवण, मानसिक चिंता, श्रमातिरेक, मोठ्या दुखण्यानंतर व ज्वरानंतर तसेंच क्षय व मूत्रपिंड रोगामुळे आलेली अशक्तता या सर्व कारणामुंळें रोजचेंच अपचन होऊन प्रथम अग्निमांद्य रोग जडून त्याचें या रोगांत रूपांतर होण्यास सर्वथैव अनुकूल स्थिति प्राप्त होते.
शारीर विकृतिः- मृत रोग्याचें जठर पाहिल्यानंतर जठराचा अंतर्भाग कमी अधिक लाल व तें बरेंच जाड झालेलें दिसतें. पूर्वी रक्तस्त्राव झालेला असेल त्या जागीं काळसर अगर स्लेट पाटीच्या रंगाच्या दिसतात. त्वचा खुरपल्याप्रमाणें, कुरतडलेल्या जागा व बारीक व्रणरूधिरमय असलेलेहि दिसतात. अगर जठर सुकल्यावाळल्याप्रमाणें कृश झालेलें व आंतील जठर रसोत्पादक पिंड नष्ट व विकृत होऊन मांसल भागीं तंतुमय रचना बनलेली दिसते. यामुळें जठराच्या अधःछिद्रामध्यें खरबरीतपणा व सुरकुत्या दिसतात.
रोग लक्षणें - पोटाच्या शिंपीच्या जागीं दाबलें असतां दुःख खास होतें पण तें असह्य नसतें. पण भोजनानंतर मात्र त्या ठिकाणीं अगर पाठींत दोन्ही खांद्यांच्यामध्यें फार दुखूं लागतें व पोटांत व घशांत फार जळजळ सुरू होते; यांसच परिणाम शूल म्हणतात. मळमळ सदा असते व कधीं कधीं वांति होते. जेव्हां मद्यपान हें कारण असतें तेव्हां मात्र वांति हें लक्षण प्रमुख असून रोगी अंथरूणांतून उठल्याबरोबर तीस आरंभ होतो. वांतींत चिकटपणा फारच असतो पण रक्त फारसें नसतें. दांत कधीं कधीं आंबतात परंतु वांतींत हैड्रोक्लोरिक आसिड कमीच असतें. ढेंकरा व पोटांत वायु धरणें, तहान वरचेवर लागणें, भूक अनिमितपणें व थोडी लागणें, तोंड बेचव व दुर्गंधि येत असलेलें होणें, हीं लक्षणें आणकी असतात. जिभेस बुरशी असून तिचा शेंडा व कडा फार लाल असतात. ती निमुळती व चिंचोळीं तरी होते. हिरड्या लाल व स्पर्श होतांच रक्त स्त्रवणार्या होतात; ओठांस चिरा पडतात. मलशुद्धि बहुधा चांगली होत नाहीं. अगर एकाद्या रोग्यास जुलाब होतात किंवा कधीं बद्धकोष्टता तर केव्हां अतिसार असा अनियमित प्रकारहि आढळतो. थोडथोडी व अति आम्ल व लाल रंगाची युरेटक्षार जाणारी लघवी होते अगर कधीं फिकी, कमी आम्लतादर्शक व खर जाणारीहि लघवी असते. ज्वर थोडा येऊन अंग मोडून येतें. झोप शांत येत नाहीं, रोगी मंद, उदास, घाबरट व उचकणारा होतो. कांहीं दिवसांनंतर रोगी कृश होत जातो.
रोगनिदानः- (१) या रोगाचा अग्निमांद्य रोगाशीं घोंटाळा होण्याचा संभव आहे. पण यांत दाहाची तीव्र लक्षणें प्रमुख असतात. तीं अग्निमाद्यामध्यें मुळींच नसून त्या ऐवजीं अशक्तता, औदासीन्य, पंडुता यांचें प्राबल्य असतें व ज्वर अगदीं नसते. या रोगांत ज्वर व विशिष्ट प्रकारची जीभ, वांति, पोटांत वेदना हीं मुख्य लक्षणें होत. (२) व्रण अगर क्यान्सरग्रंथीचीं अन्य लक्षणें नसलीं म्हणजे हाच रोग आहे असें समजावें. परिक्षेसाठीं रोग्यास भोजन घालून कांहीं ठरीव वेळानें तें ओकून पाडून पाहतां त्यांत बिनपचलेलें अन्न, अतिचिकट स्त्राव, कमी आम्लता व हैड्रोक्लोरिक असिडाचा अभाव या व अन्य गोष्टी पचनाशी अशक्तता सिद्ध करतात. (३) रोग्याच्या अन्ननलिकेंत अवरोध अगर वक्रता उत्पन्न होऊन जेवल्याबरोबर त्यामुळें वांति होते व हें खरें कारण न समजून हा जठरदाह रोग आहे असा भास होतो. (४) अजीर्ण होऊन हृदयाच्या ठायीं भोजनोत्तर वेदना व पीडा हें लक्षण असणें व तेंच लक्षण रोग्यानें अंमळ श्रम केल्याने होणें हें अंजिना पेक्टोरिस या रोगाचें सूचक आहे.
साध्यासाध्य विचारः- हा रोग बरा होण्यास काल बराच लागतो. परंतु बरेच दिवस उपचार चालू ठेविल्यानें तो बरा होतो.
उपचारः- रोगानें कारण कोणतें असावें, तें शोधून काढून त्याचें निर्मूल न करण्याचा अगोदर प्रयत्न करून नंतर रोग्याची आरोग्यनियमानुसार राहणी, हवा, पाणी, स्वच्छता, व्यायाम, कामधंदा, संवयी, यांत बारकाईनें सुधारणा करून भोजनकालामध्यें नियमितपणा राखला पाहिजे. निरूपद्रवी सौम्यपण, पौष्टिक अन्नसेवन करावें. चहा, काफी व मद्यपान वर्ज करून शिवाय न पचण्यासारखे पदार्थ अगदीं खाऊं नयेत. रोग तीव्र असल्यास आरंभीं रोग्यास फक्त दुधावर राहण्यास सांगावें; नंतर दूध व स्टार्चमिश्रित साबूदाणा अगर तवकील या प्रकारचें हलकें अन्न त्यास द्यावें. यानंतर रोगाचीं तीव्र व त्रासदायक लक्षणें जसजशीं कमी होतील तसतसे यापेक्षां अधिक पौष्टिक परंतु पचनास हलकें असें तांदुळ व नंतर इतर धान्याचें प्रकार आहारांत समाविष्ट व्हावेत. मांसाहार्यांनां जातिधर्माप्रमाणें मासे, कोंबडांचें पिलूं, मेंढराचें मांस व गोमांस हाी पचनास हलकीं व पौष्टिक अन्ने आहेत. बटाटें, कालीफ्लावर व ज्या फार चोथट नाहींत अशा पाले व फळभाज्या खाण्यास प्रशस्त आहेत. पुढें सांगितलेले पदार्थ वर्ज्य करावे. तेलातुपांत तळलेले पदार्थ, मिठाई, मुळे, गाजरें, नानाप्रकारचीं पचनासजड अशीं डुकराची वगैरे मांसें हे पदार्थ. मलशुद्धि होण्यासाठीं सोडा, सल्फेट, त्रिफळा अथवा दुसरें कोणतेंहि रोग्यास रूचेल व मानवेल तें सौम्य रेचक मधून मधून सुरू असावें. पचनसेंद्रिय व पचनक्रिया सुधारण्यासाठीं विसमथचे नाना प्रकारचे क्षार, सोडा बैकार्बनेंट व जेनशियन अगर क्काशिया अर्काशीं मिश्रित करून रोज दिल्यानें इष्ट कार्य घडतें. हीं आलकाली औषधें जेवणापूर्वी द्यावीत. पाणी घालून हीनवीर्य केलेले हैड्रोक्लोरीक अगर नैट्रोहेड्रोक्लोरीक अँसिडहि दिल्यानें पचनक्रिया वाढते, परंतु हीं औषधें भाजनोत्तर घ्यावयाचीं असतात. यांतहि कुचलाअर्क, अगर स्ट्रिकनीया अर्क आणि वरील जेनशियन अथवा क्वारिया अर्क हीं चांगलीं औषधें आहेत. वांतिशमन होण्यासाठीं एक औषधे आलकाली जातीचे (सोडा बायकार्बनेट वगैरे) व दुसरे स्टारीक आसिड अगर सैट्रिकआसिड हीं मिश्र करून फसफसणार्या स्वरूपांत पोटांत घेतल्यानें आराम वाटतो. व नंतर कांहीं दिवस त्यासाठीं हीनवीर्य हैड्रोसायानिक अँसिड, सेरियम आक्सेलेट, टिंकचर आयोडीन (१/३ - ३ थेंब अर्धा औंस पाण्यांत घेणें) ही औषधें चांगलीं आहेत. पोटांत वायू धरत असल्यास जेवणापूर्वी एखादा मानवेल तो विसमथ क्षार घ्यावा. अगर पेपरमिंटच पाणी, अर्क, किंवा कार्बालिक अँसिड, क्रियासोट हीं सृक्ष्म प्रमाणांत (॥-१ थेंब) घ्यावींत. काळेशाच्या भुकटींचें चूर्ण हेंहि उत्तम वायुहारक आहे. पोटांतील शूलासाठीं शेकणें अगर पलिस्तर मारून फोड आणणें हे उपाय तीव्रतेप्रमाणें योजावे जरूर पडल्यास पोटांत अफू अगर मार्फिया हीं औषधें द्यावीत.