विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जटामांसि - जटामांसि या वनस्पतीस लॅटिनमध्यें नार्डोस्टॅकिस जटामांसी, इंग्रजीत स्पाइकनार्ड, संस्कृतमध्यें बटिला, जटमान्सि इत्यादि नांवें आहेत. ही बहुवर्षजीवी वनस्पति हिमालयांत गढवालापासून पूर्वेकडील प्रदेशांत व सिकीममध्यें १७००० फुटांच्या उंचीवर होते. ह्या वनस्पतीच्या तीन जाती आहेत. साधीं, सुगंधि व सूक्ष्म जटामांसी यांपैकीं सुगंधी जटामांसीच जास्त उपयोगीं अशी मानली जाते. याचें कुडें करांगुलीं एवढें जाडें असून त्याच्यावर लालसर तपकिरी रंगाच्या तंतूंचें वेष्टण असतें. हें सुवासिक असून कडू असतें व ऊर्ध्वपातनक्रियेनें याचें फार उपयोगीं असे तेल निघतें. हिंदुस्थानांत जीं औषधीं व सुगंधीं तेलें तयार करतात त्यांत हें सुवासाकरितां टाकतात. यानें केंस वाढून काळें होतात असा समज आहे. ह्या वनस्पतीचा खप उदबत्या वगैरे सुगंधी पदार्थ तयार करण्यांत अतिशय मोठा खप आहे.