प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जंजिरा संस्थान - यासच हबसाण (आफ्रिकनचा प्रदेश) असें म्हणतात. मुंबई इलाख्यामधील कोंकण प्रांतांतील कुलाब्याच्या पोलिटिकल एजन्सीतील हें एक संस्थान आहे. हा प्रांत उत्तर अक्षांश १८० ते १८० ३१ 'व' पूर्व रेखांश ५३० ते ७३० १७ असून याच्या उत्तरेस कुलाबा जिल्ह्यातील कुंडलिका पूर्वेस त्याच जिल्ह्याचें रोहें आणि माणगांव हे तालुके; पश्चिमेस अरबी समुद्र आहे. याचें क्षेत्रफळ ३७७ चौरस मैल असून, यांत लोकसंख्या (१९२१) ९८५७३ व गावें २३६ आहेत. यांत काठेवाड संस्थानांतील जाफराबादहि धरलें आहे. हेंहि याच संस्थानात आहे. संस्थानाचे आठ तपे अथवा महाल आहेत. एका तप्यांत साधारण २८ खेडी व ४० चौ. मैल प्रदेशाचा समावेश होतो. 'जंजिरा' हे नांव जझीराड् (म्हणजे बेट) या अरबी शब्दाचा (मराठी) अपभ्रंश आहे. प्रदेश डोंगराळ असून डोंगर समुद्रकिनार्‍यास समांतर आहेत. हबसाणांतील सर्वोत उंच पहाड मदगड नांवाच्या किल्ल्याचा आहे (१३०० फूट). डोंगराच्या उतारावर दाट रानें आहेत. लहान लहान खाड्यांच्या बाजूस व किनार्‍यावर नारळीपोफळीचीं झाडें आहेत. याच्या मागें थोडी दलदलीची जमीन लागत असून त्याच्या पलिकडे भातशेतीची जमीन आहे. सावित्री नदीच्या मुखाजवळ कुंजरीचें खोरें हें देखाव्याच्या दृष्टीनें कोंकणातील एक प्रख्यात ठिकाण आहेत. येथील खेड्यांतील लोक खाऊन पिऊन सुखी आहेत. डोंगरांत कातकरी रहातात. पूर्वी पावसळ्यांत या भागांत प्रवास करणें जवळ जवळ अशक्य होतें. परंतु इ.स. १८८३ सालापासून नवीन रस्ते तयार होऊन पावसाळ्यांत प्रवास करण्याची सोय झाली आहे. किनार्‍यावर राजपुरी खेरीज प्रत्येक खाडीच्या मुखाशी पुळण असल्यामुळें गलबतें आंत जात नाहीत येथील वाहणारे ओढे पावसाळ्यांत भरपूर वाहतात. परंतु इतर वेळीं कोरडे असतात. सर्वांची लांबी ५-६ मैलांच्या आंतच असते. कोणत्याहि खाडीच्या मुखाच्या आंत शिरतांना प्रथम खडक लागतात. परंतु एकदां आंत गेले म्हणजे मुळींच भय नसतें. राजपुरी खाडीचें मुख मुंबईच्या दक्षिणेस ४५ मैल आहे. ही खाडी जंजिर्‍याच्या आग्नेयीस १४ मैलांवर म्हशेळे गांवापर्यंत आहे; तींत सुमारें १२ फूटपर्यंत (भरतीच्या वेळीं) पाणी चढतें. या संस्थानांत सांपडणारा दगड काळा आहे. इमारती लाकडांत सागवान पुष्कळ आहे. रानांत वाघ, चित्ते, डुकरें, रानमांजरें वगैरे सांपडतात. विषारी सर्प इकडे फार आहेत.

हवा थोडीशी दमट असली तरी निरोगी आहे. समुद्रावरील वार्‍याने किनार्‍याजवळील भाग थंड असतो. पाऊस सरासरी १०७ इंच पडतो. जंगलचे उत्पन्न बरेचसें होतें. १९२२ सालीं १७८५०० पर्यंत उत्पन्न झालें. साग, ऐन, काजू, माड, आंबे वगैरेपासून उत्पन्न मिळतें. संस्थानांत इंग्रजी हायस्कूल एक, इंग्लिश मिडल स्कूल एक, मराठी शाळा २६ व हिंदुस्थानी शाळा ३६ (एकंदर ५२ मुलांच्या व १२ मुलींच्या) असून एकंदर विद्यार्थी ३२६६ आहेत. एकंदर लोकसंख्येच्या २५.६ शेकडा विद्यार्थी आहेत. संस्थानिक शिद्दी वंशाचा असून सुनी पंथाचा मुसलमान आहे व त्यास नबाब ही पदवी आहे.

यांत मुरूड व श्रीवर्धन हीं दोन गांवे मुख्य आहेत. सुमारें शेंकडा ८२ हिंदू व १७ मुसलमान लोक येथें आहेत. येथें राहणार्‍या प्रमुख जाती आगरी, कोळी, कुणबी, महार, ब्राह्मण, प्रभू, मुसलमान, शिद्दी या होत. येथें बेने इस्त्रालय लोकांचीही थोडीशी वस्ती असून ते मराठी भाषा बोलतात. हे धर्माने ज्यू आहेत. मुंबई बंदरांतील होड्यांवरचे खलाशी तसेंच किनार्‍यावर व्यापार करणार्‍या आगबोटी यावरील खलाशी बहुतेक याच बाजूचे असतात. इ.स. १९०३-०४ सालीं ४१ चौरस मैल जमीन लागवडीखाली होती. मुख्य पिकें म्हटलीं म्हणजे भात, नागली, वरी, सुपारी आणि नारळ हीं होत. मीठ पिकविणें फक्त सरकाराच्या हातीं आहे. समुद्रांतील मासे धरणें हा येथें पुष्कळांचा धंदा आहे. संस्थानांत व्यापार धंदे म्हणण्यासारखे नाहींत. साग, चामडीं, हाडें, मासळी, ताग, नारळ वगैरे माल निर्गत होतो. खुद्द जंजिरा येथें कागद तयार होतो. सन १९२२ साली ११४९५५५ रूपयांची आयात व ५३०९५३ रूपयांची निर्गत झाली. कारभार नबाबच्या हुकमानें कारभारी सर्व कारभार करतो. त्यावर पोलिटिकल एजंटची देखरेख असते. संस्थानचें उत्पन्न ६ लाख ७० हजार (यांतच जाफराबादचे ७०००० रूपये आले आहेत. व इंग्रजसरकारचे अबकारी बद्दलचे १३ हजार रूपयेहि यांतच आहेत) रूपये आहे. मुरूड आणि श्रीवर्धन येथें म्युनसिपालिट्या आहेत. तिहीचें उत्पन्न १५२४० रूपये व खर्च १०१९३ झाला (१९२२). एक जमीनदारसभाहि सध्यां स्थापन झाली आहे. संस्थानाकडून इंग्रजसरकारला खंडणी मिळत नाहीं. संस्थानिकास मुसलमानी कायद्याप्रमाणें दत्तक घेण्याची कायमची सनद मिळालेली आहे. जो मुलगा सर्व मुलांत राज्य चालविण्यास लायक आहे असें संस्थानच्या मुख्य मुख्य अधिकार्‍यांनां व पुरूषांना वाटेल तो गादीवर बसूं शकतो. ही चाल जंजिर्‍याच्या बाबतींत पूर्वीपासून प्रचारांत आहे. नबाबास स्वतःचें नाणें पाडण्याचा अधिकार आहे पण सध्या संस्थानांत एकहि टाकसाळ नाहीं. (नबाबानें दिलेल्या मतदीमुळें) वाढवून १३ ची केली आहे. या संस्थानांत, अरावी, दंडाराजपुरी, हरेश्वर उर्फ देवगड. जंजिरा (राजधानी), खोकरी, मदगड, म्हसळे, मुरूड, नांदगांव, पद्मदुर्ग उर्फ कांसाकिल्ला, पंचायतन बोरळी, श्रीवर्धन व वेळास हीं मुख्य व पाहण्यासारखीं ठिकाणें आहेत.

इतिहास. - बहामनी राज्य हें दिल्लीच्या राज्यांतून फुटून निघाल्यानंतर, (१४३७) तेथील राजांनी अबिसिनीयन लोकांचा भरणा आपल्या राज्यांत करण्याचा क्रम आरंभला. ईशान्य आफ्रिकेच्या एका प्रांतात हशिब असें नांव असे; तेथील अरबांना हबशी असें नांव मिळालें व तेथीलच सैद जातीच्या अरबांनां तिद्दी म्हणूं लागले. हे हबशी प्रथम गुलाम म्हणून हिंदुस्थानात येत; परंतु पुढें अंगच्या गुणांवर त्यांनां ब्राह्मणी राज्यांत मोठमोठ्या जागा मिळूं लागल्या. हे लोक दर्यावर्दीपणा व चांचेपणाहि करीत. स.१४९३ च्या सुमारास एका याकुत नांवाच्या शिद्दयानें, गाहीमचा किल्ला गुजराथच्या सुलतानापासून घेतला होता. गुजराथच्या राज्यांतील २५ सरकारां (जिल्हा) पैकीं दंडाराजपुरी हा एक सरकार होता. अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहंमद यानें १४९० त गुजराथकरापा दंडाराजपुरीचा किल्ला हिसकून घेतला, त्यावेळी अहंमदनें ६ महिने किल्ल्यास वेढा दिला होता. एका दंतकथेवरून समजतें कीं, पेरिमखान नांवाच्या शिद्दी सरदारानें, किल्लेदार रामजी पाटील कोळी यास आपल्या गलवतावरील मालाच्या पेट्या किनार्‍यावर उतरण्यास परवानगी मागितली व ती मिळाल्यावर, किल्ल्यावरील शिवंदीस दारू पाजून, पेट्यांत बसविलेल्या हत्यारबंद शिपायांकडून किल्ला दगाबाजी करून काबीज केला. वर सांगितल्याप्रमाणें अहंमदशहानें जंजिरा घेतला, तरी अकबरानें गुजराथ काबीज करीपर्यंत (१५७८), जंजिरा हा गुजराथच्या शहाच्याच ताब्यांत गणला जाई. पुढें अकबरानें तो निजामशाहास पुन्हां दिला. येथें १५८४ त सलावत म्हणून निजामशाही वजीरास कांही दिवस कैदेंत ठेविलें होते. अकबराने निजामशाही घेतली, तेव्हां व मलिकंबरने ती पुन्हा स्थापिली तरीहि, सन १६१८ मध्यें, मोंगलांकडूनच जंजिर्‍यास सिद्दी सिरूलखान नांवाचा गव्हर्नर नेमला गेला. त्याच्या नंतर सिद्दी याकूत (१६२०) व सिद्दी अंबर (१६२१) हें नेमले गेले. पुढें निजामशाही नष्ट झाल्यानंतर जंजिरा किल्ला विजापुरकरांकडे गेला व त्यांनी आपल्या सर्व आरमाराचा मुख्याधिकार येथील सुभेदारास दिला. व जंजिरा हें आरमारी मुख्य ठिकाण करून त्याबद्दल जंजिरेकरास बाणकोट ते नागोठाणेपर्यंतचा प्रांत सरंजाम दिला. अंबर हा १६३२ त मेल्यानंतर युसूफ (हा १६५५ त मेला) व फत्तेखान हे सुभेदार झाले. शिवछत्रपतींनी प्रथम १६४८ त जंजिर्‍यावर हल्ले करून शिद्दयापासून तळे, घोसाळें, रायरी हे किल्ले घेतले.  नंतर स. १६५९ त  शामराजंपत पेशवे यानी जंजिर्‍यावर स्वारी केली, परंतु तींत त्याना यश आलें नाहीं; तसेंच १६६० त रघुनाथपंत यानें केलेली स्वारीहि निर्फळ झाली. त्यामुळें खास शिवाजीनें १६६१ त भर पावसाळ्यांत स्वारी करून, फक्त जंजिरा किल्ल्याशिवाय बाकीचा सर्व प्रांत व दंडाराजपुरी ठाणेंहि काबीज करून फत्तेखानाचा पार धुव्वा उडविला. त्यानें विजापुरास मदत मागितली. मुंबईच्या वखारवाल्यांनां जंजिर्‍याचें इतकें महत्व वाटलें कीं, त्यांनी सुरतेच्या गव्हर्नरास, मुंबई बंदर शिद्दयास देऊन त्याऐवजी जंजिरा घ्यावा, म्हणून आग्रह चालविला होता. सन १६६१-७० पर्यंत शिवाजीच्या स्वार्‍या नेहमीं जंजिर्‍यावर होत, पण तो किल्ला हातीं येईना; स.१६७० तील मोहीम जोराची असल्यानें व आदिलशहा मदतहि पाठवीना, तेव्हां फत्तेखान हा शिवाजीस शरण गेला व त्याच्या हवालीं जंजिरा देण्यास कबूल झाला. परंतु किल्यांतीला अधिकारी संबळ, कासीम व खैर्यत हे तीन शिद्दी नाकबूल होते. त्यांनी फत्तेखानाच्या विरूद्ध सैन्य चिथवून त्याला कैद केलें व संबळ यास सुभेदार नेमून, मोंगलांकडे मदत मागितली. त्यावेळी औरंगझेबाच्या सांगण्यावरून दख्खनचा सुभेदार खानजहान यानें जंजिर्‍यास मदत पाठविली व त्याबद्दल शिद्दयानें अदिलशाहीचा ताबा सोडून तो मोगलांचा नौकर बनला. इतके दिवस जंजिरेकरास वझीर हा किताब असे; तो औरंगझेबानें काढून याकूतखान हा किताब व तीन लाखांचा सरंजाम त्याला नेमून दिला व सर्व मोंगली आरमार त्याच्या ताब्यांत देऊन मक्केच्या यात्रेकरूंची सोय करणें व कोंकणांतील दर्यावरील मोंगली व्यापाराचें रक्षण करणें हें काम त्यावर सोपविलें. संबळ हा मोंगली आरमाराधिपती झाल्यानें जंजिर्‍याची किल्लेदारी कासीम यास मिळाली. त्यानें १६७१ च्या होळीच्या सणांत दंडराजपुरी ही मराठ्यांच्या हातून सोडविली. त्याबद्दल त्यास व त्याचा भाऊ खैर्यत यास औरंगझेबानें बक्षिसी दिली. यावेळी कासीमनें मराठे लोकांतील मुलें व बायका बाटवून म्हातार्‍याकोतार्‍यांची कत्तल केली. पुढें १६७२-७५ पर्यंत मधून मधून शिद्दयानें मुंबईजवळ किनार्‍यावर उतरून, इंग्रजांच्या धमकीस व तटस्थपणास न जुमानतां मराठी मुलखांत लुटालूट केली. तेव्हां शिवछत्रपतीनें इंग्रजास तंबी दिली. त्यामुळें त्यांनी शिद्दयास हांकून दिलें. तिकडे मराठ्यांच्या आरमारानें गोव्यापर्यंतचा सर्व प्रदेश लुटून बेचिराख केला. तेव्हां शिद्दयानें औरंगझेबाकडून जास्त मदत घेऊन वेंगुर्ल्यावर हल्ला चढविला; पण शिवाजीनें जंजिर्‍यासच वेढा घातल्यानें वेंगुर्ल्याचा वेढा उडवून शिद्दी परतला (१६७५). पुढें १६७७ त मोरोपंत पेशव्यानीं जंजिर्‍यास पुन्हां मोहीम केली. पण ती निष्फळ झाली. त्याच वेळीं संबळनें जैतापुरावर हल्ला केला, पण तेथें त्याचा सपाटून पराभव झाला. कासमनें यावेळीं मुंबईवर येऊन तेथील मराठ्यांच्या हद्दींतील चार ब्राह्मणांना पकडलें व त्यांनां त्रास दिला. तेव्हां चौलच्या मराठी अधिकार्‍यानें मुंबईच्या अधिकार्‍यास दपटशा दिल्यांमुळें, त्यानें कासमला सांगून ब्राह्मण सोडवून त्यांनां त्रास देणार्‍या अधिकार्‍यांस शिक्षा करविली. या सुमारास कासम व संबळ यांच्यांत भांडण झालें (१६७७). पुढें १६७८-७९ मध्यें शिद्दयानें मुंबईकडील मराठ्यांच्या मुलुखांत लुटालुटीचा व प्रजेस गुलाम करण्याचा प्रयत्‍न चालविल्यानें, शिवाजीनें खांदेरी (कान्हेरी) बेट काबीज करून व फिरंगी, इंग्रज आणि शिद्दी या तिघांच्या अडथळ्यांनां न जुमानतां एकीकडे लढाई चालू ठेवून तेथें एक बळकट किल्ला बांधला (१६८०).यावेळी मराठ्यांनीं आपलें आरमारहि वाढविलें होतें. कासमनें १६८० मध्यें मुंबईस इंग्रजांशीं लढाई देऊन त्यांचा पराभव केला; आणि मुंबई बेटांतील त्यांच्या गलबतांनां व प्रजेलाहि लुटण्यास त्यानें सोडलें नाहीं. इंग्रजांनीं त्याबद्दल सुरतेच्या मोंगल सुभेदाराकडे तक्रार केली, पण त्यानें शिद्दीस जास्तच फूस दिली (१६८१). त्यानंतर कासमनें चेउलकडे स्वारी केली, पण मराठ्यांनी त्याला पिटाळून लावले.  कासीम हा मुंबईस उतरून मराठ्यांच्या मुलखांत धुमाकूळ घालून माणसें पकडून नेई, गोवध करी व प्रजेस छळी,(औरंगझेबाच्या भीतीनें इंग्रज त्याच्या वाटेस जात नसत) त्यामुळें शिद्दयाच्या व मराठ्यांच्या नेहमीं चकमकी होत. दादाजी रघुनाथ देशपांड्यानें जंजिर्‍यास वेढा दिला होता व संभाजीनें मोहिम करून किल्ल्याचे तट उडवून किल्ला बहुतेक हस्तगत केला होता. परंतु तितक्यांत मोंगलांचें सैन्य देशांत चालून आल्यानें संभाजीस वेढा उठवावा लागला (१६८२). यावेळी संबळचा मुलगा मिसरी हा मराठ्यांनां मिळाला होता. पुढें कासम (हा यावेळीं मोंगली आरमाराचा अधिपति होता. व खैर्यत हा जंजिर्‍याचा किल्लेदार होता). यानें १६८३ व १६८९ याच्या दरम्यान इंग्रजांवर अनेक हल्ले करून सर्व मुंबई बेट काबीज केलें व पुष्कळ लूट जमविली. अखेर इंग्रजी वकील औरंगझेबाकडे गेला व पातशहाने सांगितलेल्या सर्व अटी निमूटपणें त्यानें कबूल केल्यावर कासमनें १६९० मध्यें मुंबई बेट इंग्रजांस परत दिलें. खैर्यत हा १६९६ त कासम हा १७०७ त मेला. मराठ्यांपासून रायगड घेण्याच्या वेळीं कासमनें यतिकदखानास मदत केली होती. कासमनंतर कासा (पद्मदुर्ग) किल्ल्याचा किल्लेदार सिरूलखान हा जंजिर्‍याचा अधिकारी झाला. यानें  १७१३ त मराठ्यांस शरण येऊन त्यांनीं सांगितल्याप्रमाणे तह केला, हा तह १७३२ पर्यत टिकला होता. पुढें १७३२-३३ त याकूबखान (पूर्वीचा हिंदू कोळी, नंतर बाटलेला) याला फितवून मराठ्यांनीं जंजिरा घेण्याचा प्रयत्‍न केला, परंतु तो फसला. मात्र यापुढें शिद्दींचें आरमारी बळ कमी कमी होत चाललें व मराठ्यांचें (आंग्र्‍यांचें) वाढलें. दिल्लीचे पातशहाहि आरमाराकडे दुर्लक्ष करूं लागले. सुरतेचा मोंगल सुभेदार तेगबख्तखान हा शिद्दीच्या आरमारास ठराविक नेमणूक पोहोचविनासा झाला व आपणच स्वतः ती रक्कम दाबून बसला. त्याच वेळीं शिद्दीचें व इंग्रजांचें बिनसल्यामुळें सुतरकर गव्हर्नरानें तेगबख्त यास सर्व मोंगली आरमाराचें आधिपत्य आपल्यास देण्यास विनंती केली व धाकदपटशाहि दिला. परंतु त्याचा उपयोग झाला नाहीं. तेव्हा इंग्रजांनीं तो नाद सोडला (१७३३). पुढें शिद्दी व तेगबख्त यांत भांडण जुंपून अखेर तेगबख्तानें ९ लक्ष रू.ची रक्कम शिद्दीस देऊन तंटा मिटविला (१७३५-३६). सिरूल हा १७३४ त मेला. तेव्हां त्यांच्या अबदुल्ला नांवाच्या वडील मुलाचा खुन करून संबळ नांवाचा (सिरूलचा) एक गुलाम हा जंजिर्‍याचा अधिकारी झाला. परंतु त्याचा खुन करून सिरूलचा दुसरा मुलगा रहमान हा गादिवर आला. मागे सांगितलेला याकूब (बाटगा कोळी) यानें रहमानच्या तर्फे यावेळी शाहूकडे मदत मागितली होती व शाहूनें मानाजी आंग्रे यास मदतीस पाठविलें होतें. त्यानेंच संबळचा पराभव करून रहमान यास गादीवर बसविलें. त्याबद्दल रहमाननें रायगड, तळें, घोसाळें, अवचितगड व बिरवाडी हीं ठाणीं मराठ्यांनां दिली व आपल्या राज्याचा अर्धा वसूल खंडणी दाखल त्यांना लावून दिला. रहमान हा १७३९ त मेल्यावर त्याचा भाऊ हसन हा गादीवर आला. पुढें आंग्र्‍यांच्या त्रासानें हसननें मदगडचा किल्ला पेशव्यांच्या हवालीं केला.(१७४४) व आंग्र्‍याविरूद्ध पेशव्यांशीं सख्य केलें. हसन हा १७४५ त मेल्यावर अल्लान नांवाच्या एका शिद्दयानें गादी बळकाविली, परंतु पुढल्याच वर्षी इब्राहिम हा खरा वारस गादीवर आला (१७४६).

सुरतचा सुभेदार तेगबख्त हा १७४६ त मेल्यावर, मिया अचन (हा इंग्रजांचा दोस्त) तेथील सुभेदार बनला; परंतु १७५१ त सफदरखान यानें जंजिर्‍याचा सिद्दी मसूद, डच व दमाजी गायकवाड यांच्या साह्यानें अचनला हांकलून किल्ला घेतला. या वेळीं इंग्रजांचें (सुरतेस) पुष्कळ नुकसान झालें. मसूदच्या दपटशामुळें त्यांनीं सुरतेची आपली सर्व (युरोपियन व देशी) शिबंदी काढून टाकली; त्यांच्या वखारींतील अधिकार्‍यांनां मसूदनें कैदेंत टाकिलें व मसूद हाच सुरतेचा मुख्य अधिकारी बनला. तो १७५६ त मेल्यावर सुरतेच्या किल्लाच्या व आरमाराच्या अधिकाराबद्दल अहमद (मसूदचा मुलगा), नवाझ (सफदरचा पुत्र) व फारिझ या शिद्दयांमध्यें तंटे माजून, अखेर मिया अचनाच्या सांगण्यावरून इंग्रज हे भानगडीत पडले. त्यांनीं मराट्यांची समजूत घालून, सुरतेवर हल्ला करून शिद्दयापासून सुरत घेतली व अचनला. सुभेदार नेमून आपल्या ताब्यांत किल्ला घेतला व मोंगल आरमार ठेवण्याबद्दलची (अचनकडून) सरकारी तैनात स्वतःकडे करून घेतली. तैनातीचे तीन भाग करून एक इंग्रज, एक पेशवे व तिसरा सुरतकर नबाब यांनीं वाटून घ्यावें असें ठरले (१५५९) याप्रमाणे सुरतेहून शिद्दयाचें उच्चाटन झालें.

याच सुमारास (१७५९) जाफराबाद (काठेवाडच्या किनार्‍यावरील) बंदर जंजिरेकरास मिळालें. स.१७३१ त जाफराबादच्या तुकीं पाटलानें सुरतेजवळ चांचेगिरी केली असतां, त्यावेळच्या शिद्दी हिलोल या अधिकार्‍यानें त्याचा पराभव करून त्यावर खंड बसविला. खंडापुरता पैसा त्याच्याजवळ नसल्यानें, त्यानें जाफराबाद बंदरच हिलोल यास दिलें. पुढें १७४९ त हिलोलनें तेथे किल्ला बांधला. स.१७५९ त कांहीं भानगड हिलोल व जंजिरेकर यांच्यांत उत्पन्न होऊन जंजिरेकरानें जाफराबाद काबीज केलें.

यापुढें २५ वर्षे शिद्दी व मराठे यांच्यांत मैत्री टिकली. पण पुढें शिद्दयानें कुरापत काढिल्यामुळें रामाजीपंत बिवलकर यानें जंजिर्‍यावर चढाई केली व तो बहुतेक घेतला. पण इंग्रजांनीं शिद्यास मदत केल्यानें अखेर जंजिरा पडला नाही. शिद्दयाच्या राज्यांतून इंग्रजांना खाण्यासाठी जिवंत जनावरें (गाई वगैरे?) मिळत; मराठी राज्यांतून मिळत नसत; यासाठी मराठ्यांविरूद्ध इंग्रजानें ही मदत दिली (१७६१). या वेळचा शिद्दी इब्राहिम याचा (१७६२) खून करून त्याचा गुलाम याकूत गादीवर बसला. त्याचें व खरा वारस अबदुल रहीम याचें भांडण लागलें, त्यांत अबदुलानें पुण्यास जाऊन पेंशव्यांचा आसरा घेतला व इंग्रजानें याकूतची बाजू घेतली. परंतु लढाई वगैरे भानगडी न होता दोघात समेट झाला. याकूत हा १७७२ त मेल्यावर अबदूल गादीवर बसला. त्याच्या कारकर्दित विशेष कांही न होतां तो १७८४ त मेला. त्याच्यामागें जोहर हा (जंजिर्‍याचा सेनापती) जबरदस्तीनें गादीवर बसला; तेव्हां अबदुल्लाचा मुलगा करीमखान (बाळुमिय्या) हा पेशव्यांच्या आश्रयास गेला; जोहरनें इंग्रजांकडे मदत मागितली. शेवटीं भांडणतंटे न होता बाळुमिय्यास सुरतेजवळ सालिना पाऊण लाखाची जहागीर मिळाली (१७९१); घरच्या भानगडीमुळें मराठ्यांनीं यावेळी या बाबतीत विशेष लक्ष्य घातलें नसावें. जोहर हा १७८९ त मेल्यावर इब्राहिम (धाकले बाबा) गादीवर आला. त्याला जमरूडखान यानें १७९२ त कैदेंत टाकून १८०४ पर्यंत राज्य केलें. जमरूड मेल्यानंतर (१८०४) इब्राहिम पुन्हां गादीवर बसून त्यानें १८२६ पर्यत राज्य चालविलें. त्याच्या मागें त्याचा पुत्र मुहम्मद हा नबाब झाला. याच्या कारकीर्दीत इंग्रजांची अधिराजसत्ता जंजिर्‍यावर बसून त्यांनीं तेथील टांकसाळ बंद केली (१८३४). मुहम्मदनें १८४८ त राज्यत्याग केला व त्याचा मुलगा इब्राहिम हा नबाब झाला. स.१८५५ त इंग्रजी राज्यांतील एका व्यापार्‍याला पळवून त्याचा खुन झाल्यामुळें व इतर अव्यवस्थेमुळे इंग्रजसरकारनें संस्थानच्या अंतर्गत कारभारांत हात घातला; तोपर्यत संस्थान स्वतंत्र होतें, त्यावर पोलिटिकल एजंटहि नव्हता. श.१८६७ च्या सुमारास नव ब व त्याचे सरदार यांच्यांत अनेक भांडणें उपस्थित झाल्यामुळे इंग्रजांनी तेथें आपला न्यायाधीश नेमून, न्याय निवड्याचे हक्क आपल्या हाती घेतले व नबावाचे इतरहि (मुलकी व फौजदारी) अधिकार मर्यादित केले. नबाब मुंबईस गेला असतां, मागे त्याच्या सरदारांनीं बंड करून त्यांच्या अहमदखान नांवाच्या मुलास गादीवर बसविलें (१८७०). पुढें इंग्रज सरकारनें चौकशी करून सरदारांच्या तक्रारी दूर केल्या व अहमद यास गादीवर दूर केले. स.१८७३ त नबाबाच्या आवडत्या प्रभु लोकांनां सरकारी नौकर्‍या देण्याचें बंद केलें, कारण त्यांनीं नबाबावर अयोग्य वजन खर्च केल्याबद्दलची बोलवा होती. (कुलावा ग्याझे पृ.४५०). स.१८७७ त गणपतीच्या उत्सवांत जंजिर्‍यास दंगेधोपे (वाद्यें वाजविण्याच्या बाबतीत) झाले होते. पुन्हां सरदार व प्रजा यांचे व नबाबाचें भांडण जुंपलें. त्याचा निकाल इंग्रज सरकारनें लावला. प्रजेच्या मुख्य तक्रारी म्हणजे प्रभु अधिकार्‍यांचा अधिकार, इनाम जमिनींतील रान तोडणें, इनामें जप्‍त करणें, इजारदाराचें हक्क काढणें व सरदारांचे मानमतराव दूर करणें या होत्या. त्या दूर करून शिवाय, शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा, सारावसुली वगैरे बाबतीत सुधारणा केल्या. इब्राहिमखान हा १८७९ त वारला. त्याला दोन लेकवळे व एक औरस पुत्र (अहंमदखान) होता. किल्ल्यांतील कांहीं लोकांनी लेकवळ्यापैकीं एकास गादीवर बसविलें; परंतु इंग्रज सरकारनें त्याला काढून अहंमदखान यांसच गादीवर कायम केलें. यांचा जन्म १८६२ त झाला. हे राजकोट येथें १८८१ पर्यंत राजकुमार कॉलेजात होते. त्यानंतर त्यांना राज्याचा अधिकार मिळाला. नबाब सर अहंमदखान हे ता.२ मे १९२२ रोजी वारले. हल्ली त्यांचे चिरंजीव नबाब आहेत. यांचें नांव नबाब मुहम्मदखान आहे. यांचा ज्न्म ७ मार्च १९१४ रोजीं झाला. सध्यां ते अज्ञान असल्यानें त्यांच्या मातोश्री राज्यकारभार पहात असतात (१९२४).

गांव - जंजिरा संस्थानची राजधानी असून मुंबई बेटाच्या दक्षिणेस ४४ मैलांवर आहे. इ.स.१९०१ सालीं येथें १६२० लोकवस्ती होती. स.१८६० त किल्ल्यांत आग लागून बरेंच नुकसान झालें. जुनें दप्‍तर जळून गेलें. जंजिर्‍याचा किल्ला अंडाकृति आहे तो राजपुरी खाडीच्या मुखाशी असून, पूर्वेस व पश्चिमेस एक मैल पलीकडे जमीन आहे. पूर्वेस मुख्य द्वार आहे. पश्चिमेस द्वार वेढ्याच्या वेळीं उपयोगांत आणीत. किल्ल्याच्या भिंती पाण्यापासून ५० फूट उंच सुळक्याप्रमाणें असून त्यांत मार्‍याची व्यवस्था केली आहे. एकोणीस वुरूजांवर व भिंतीवर एकंदर दहा तोफा ठेविल्या आहेत. सर्वात मोठी कलालबांगडी या नांवाची आहे. किल्यांत नवंबर महिन्यांत एक उरूस भरतो. तटाची दुरूस्ती १६९४-१७०७ पर्यत होत होती. आंत सिरूलचा एक पडका वाडा आहे; हल्लींचा राजवाडा साधा आहे. ह्याशिवाय नबाबाचे मानकरी, सरदार व पूर्वीचे कोळी राजाचे वंशज हे सर्व किल्ल्यांतच रहातात. बालेकिल्ला समुद्रापासून २०० फूट उंचीवर आहे. किल्ल्याच्या पश्चिमेस व नैॠत्येस समुद्र, व बाकीच्या बाजूस राजपुरी खाडी आहे. किल्ल्याच्या पश्चिमेस २ मैलांवर नानोलीवर एक दीपगृह असून तें चोरकासा नांवाच्या धोक्याच्या जागेपासून गलबतास दूर ठेवतें. हें दीपगृह समुद्रसपाटीपासून १५० फूट उंच आहे. जाफरावादेसहि एक दीपगृह आहे. जवळील कुड्याच्या डोंगरांतील बौद्ध लेंण्यांवरून हा किनार्‍याचा भाग पूर्वी व्यापाराकरितां प्रसिद्ध असावा असें दिसतें. स्ट्राबो (ख्रि.पू.५४-इ.स.२४) हा सिजेर्दिस या नांवाच्या बंदराचा उल्लेख करतो; तसेच पेरिप्लुसच्या ग्रंथांतील (स.१५५) मिलीझेगुरी व टॉलेमीचें मुसोपल्ली म्हणजेच सांप्रतचें जंजिरा व म्हशेळे होत असें म्हणतात. राजपुरी ही एक महत्त्वाची जागा होती. मुसुलमानी झाल्यानंतर निजामशाहींत चौलाच्या नंतर या दंडाराजपुरीस महत्त्व आलें व त्यावेळीं ही व्यापाराची उतारपेठ होती. परंतु मराठे व सिद्दी यांच्या झगड्यांत या बंदराचें महत्त्व गेलें.  (ग्रँटडफ.पु.१,२,३; इलियट.पु.७; टेलर-सेलिंग डिक्शनरी; स्टॅन्ले-बर्बोसा; जर्व्हिस -कोंकण; वेअरिंग-मराठाज; ब्रिग्ज-फेरिस्ता.पु.२,३; बर्ड-गुजराथ; मराठी रिसायत. पु.१,२,३; क्लयून्स- इटिनेररी; कुलाबा ग्याझेटियर; ह्यामिल्टन-न्यू अकाउन्ट्स् पु.१; जंजिरा र्स्टट रिपोर्ट सन १९२१-२२;)

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .