विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जंघाशूल - जंघेच्या पार्श्व भागांतून मोठा मज्जातंतू जातो, त्यामध्यें तीव्र वेदना उत्पन्न होते त्या शूलाला हें नांव आहे. ही वेदना ढुंगणापासून मांडीच्या मागील भागांतून पोटरीच्या बेचकळीपर्यंत व कधीं तर तेथून पायाच्या तळव्यापर्यंत असते. कारणें आंतड्यांतील मळांच्या गांठीचा दाब अगर गर्भाशयाच्या साध्य अगर असाध्य ग्रंथीचा दाब, संधिवात, हिमज्वर, पादांगुष्टवात, फिरंगोपंदश, अतिश्रम, गारठा व ओल यांपैकी एखाद्या अगर अनेक कारणांमुळें शूल सुरू होतो. रोग्यानें अंथरूणांत पडून पूर्ण विश्रांति घ्यावी व मांडी शेकावी.पोटांत पोट्याशियम आयोडाइड व सोडासॅलिसिलास हें औषध घ्यावे. पादांगुष्टवात रोगांत क्षारयुक्त व रेचक औषधें, वेदना शमविण्यासाठी कोकेन अगर मार्फीया टोंचून घालवा. अगर त्वचा लाल होईल असें एखादें उष्ण तेल चोळावें; विजेची पेटी लावावी. इतर जागीं अर्धशिशि वगैरे शूल उत्पन्न होतात. त्या प्रकारापैकींच हा शूल आहे. अधिक माहितीसाठी मज्जातंतूशूल हा लेख पहावा