विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जगाध्री तहसीलः - पंजाब प्रांतांत अंबाला जिल्ह्यांत ही तहसील आहे. येथील लोकसंख्या (१९११) १४०२९५ असून याचें क्षेत्रफळ ४०६ चौ.मैल आहे. ह्या तहशिलींत जंगाघ्री व बूरिया हीं दोन शहरें व ३७५ खेडीं आहेत. येथील जमीनमहसूल सन १९०३-४ सालीं २.९ लाख होता.
शहर. - हें पंजाब प्रांतांत अंबाला जिल्ह्यांत नॉर्थ वेस्टर्न रेल्वेवर रेल्वेपासून ५ मैलावर आहे ह्या शहरची लो.सं. सन १९११ सालीं १२०४५ होती. ह्या शहरचें महत्व बूरियाचे शीख सरदार रायसिंग ह्याच्यामुळें आहे. मूळचें शहर नादिरशहानें उध्वस्त केलें होतें.तें १७८३ सालीं रायसिंग सरदारानें व्यापारी व हुन्नारी लोक आणून पुनः उर्जितावस्थेला आणिलें व तें शहर १८२९ साली ब्रिटिश सरकारला मिळाले. हे शहर लोखंडी व पितळेची भांडी, टांकणखार, शिशाचें प्राणिद ह्यांबद्दल प्रसिद्ध आहे.