प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

जंगल.— या शब्दाची व्याख्या मॅनवुड नामक इंग्रजानें केली आहे (९१५९८) ती, 'राजानें स्वतःच्या आनंदाकरितां संरक्षण करून ठेवलेला आणि ज्यांत रानटी पशू व पक्षी रहातात असा वृक्षाच्छादित प्रदेश' ही साधी व्याख्या पुढें अर्थशास्त्रदृष्ट्या सुधारण्यांत आली, ती येणेंप्रमाणें 'इमारती लांकडांकरितां व इतर जंगली मालाकरितां किंवा हवेवर कांहीं विशिष्ट परिणाम घडवून आणण्याकरितां किंवा नजीकच्या प्रदेशाचा कांही अपायकारक परिणामापासून बचाव करण्याकरितां स्वतंत्र राखून ठेवलेला भूप्रदेश.'

सामान्य माहिती.— पृथ्वीसंबंधी हल्लीं जीं अनुमाने ठरविली आहेत त्यावरून पहातां पृथ्वीवरील बहुतेक निर्जल प्रदेश एके काळीं जंगलानें व्यापलेला होता असें मानावें लागतें. जुन्या वृक्षांची आयुर्मर्यादा संपल्यावर ते नष्ट होऊन त्यांच्या जागीं नवे वृक्ष उद्‍भवले. मानवपूर्वकालांत उद्भिजांवर कांहींच नियंत्रण नसल्यामुळें जमीन व हवापाणी यांची अनुकूलता मिळाली तेथें तेथें जंगलाची वाढ बेसुमारी झाली. नंतर पृथ्वीवर जेव्हां मानवोत्पत्ति झाली तेव्हांपासून जंगलाच्या नाशास सुरूवात होऊन हळहळू बहुतेक देशांतील जंगल बरेचसें नष्ट करण्यांत आले. जंगल नष्ट करण्याचें पहिलें कारण माणसाळलेल्या जनावरांकरितां गवताळ कुरणें तयार करणें हें असावें. दुसरें कारण मानवानें शेतकीच्या धंद्यांत केलेली प्रगति हें होय. यानंतरचें व महत्त्वाचें कारण म्हणजे जळणाकरितां व इमारतीकरितां लांकडांची असणारी आवश्यकता.

या तीन कारणांनीं जंगल बरेंच नष्ट झालें असलें तरी अद्याप भूपृष्ठाचा बराचसा भाग अरण्याच्छादित आहे. बहुतेक जंगलें अनेक जातींच्या झाडांनीं भरलेलीं असतात, पण कांहीं जंगलांत दहापांच किंवा दोन चार जातींची झाडेच आढळतात. ब्रम्हदेशांतील जंगलांत हजारों वृक्षजाती आहेत, तर मध्ययूरोपांत व उत्तर रशियांत चाळीस जाती, सिंधप्रांतांत दहा आणि स्वीडन व नार्वेमध्यें फक्त अर्धा डझन जाती आहेत. पाश्चात्त्य देशांतील कांहीं प्रमुख झाडांच्या जातींचीं नांवें येणेंप्रमाणें :-

१ पाईन        ५ रेडवुड        ९ पोपलर        १३ कॉटनवुड
२ फर            ६ सीडर        १० चेस्टनट        १४ बीच
३ हेमलॉक        ७ ओक        ११ बासवुड        १५ एल्म
४ स्प्रूस        ८ मॅपल        १३ बर्च        १६ अ‍ॅश

देशाला जंगलाची जरूरी आहे कीं नाहीं, आणि असल्यास किती आहे, याबद्दल एक सर्वलागू नियम ठरविणें शक्य नाहीं. एखाद्या विशिष्ट देशाला जंगलाचा उपयोग किती व कसा करून घेतां येईल हा प्रश्न पुढील विशिष्ट गोष्टींवर अवलंबून असतो : (१) देशाचें भौगोलिक स्थान व त्याचा वसाहती वगैरे इतर देशांवर असणारा ताबा; (२) जंगलांत सांपडणार्‍या मालाऐवजीं वापरतां येणार्‍या मालाचें मोल व गुण; (३) जमीनीची किंमत व मजुरीचे दर आणि जंगलखेरीज इतर कार्याला जमीन लावल्यास त्यापासून होणारें उत्पन्न; (४) लोकसंख्येची विपुलता; (४) उद्योगधंद्यात घालण्यास लागणार्‍या भांडवलाचे परिणाम, आणि (६) हवामान व समुद्र जवळ किंवा लांब असणें.

अरण्य विज्ञान (फॉरेस्ट्री) — मराठी भाषेंस 'अरण्यपण्डित' विद्याविहीन बडबड्या इसम असा अपशब्दात्मक अर्थ रूढ झाला आहे. पण वास्तविक पाहतां 'अरण्यविज्ञान' ही एक महत्वाची ज्ञानशाखा बनली असून हिचें शिक्षण देण्याकरितां पाश्चात्य देशांत स्वतंत्र शाळा असतात; आणि या बाबतींत जर्मनीचा नंबर पहिला आहे. फ्रान्स, इटाली, ग्रेटब्रिटन, युनायटेडस्टेटस वगैरे देशांनीं या शास्त्राचें संशोधन व शिक्षण यांकडें चांगलें लक्ष पुरविलें. पाश्चात्त्य देशांतील या विषयांचें शिक्षण आणि सरकारी जंगलाची व्यवस्था यासंबंधी कल्पना पुढील हिंदुस्थानांतील जंगलविषयक माहितीवरून येईल; कारण इंग्रजी अमदानींत हिंदुस्थानांतहि सर्व व्यवस्था पाश्चात्य पद्धतीप्रमाणें करण्यांत आली आहे.

पूर्वइतिहास.— भारतीय राजांच्या उत्पन्नाच्या बाबींत जंगल ही बाब असे. जंगलाचे कांहीं विशिष्ट भाग ज्यांत हत्ती उत्पन्न होत असत किंवा उत्तम गवत होई, असे भाग सरकारी जंगल म्हणून राखून ठेवलेले असत. शासनशास्त्रावरील प्राचीन प्रसिद्ध ग्रंथ जो चाणक्याचा 'कौटिलीय अर्थशास्त्र' यांत करांच्या एकंदर बाबींत जंगलांचा समावेश केला असून (समाहर्त दुर्गं राष्ट्रं खनिं सेतुं बनं व्रजं वणिक्पथं चावेक्षेत । २.५.२४) जंगलखात्यासंबंधीं 'कुप्याध्यक्षः' नांवाच्या स्वतंत्र प्रकरणांत विशेष माहिती आहे. जंगलाचें शिकारीचें जंगल, इमारती लांकडाचें जंगल व हत्तीचें जंगल असे तीन प्रकार सांगितले असून (पशुमृगद्रव्यहस्तिवनपरिग्रहो वनम् । कित्ता) कुप्याध्यक्षानें जंगलांतील लाकूंड व इतर माल आणवावा, व त्यापासून सरकारी कारखान्यामध्यें संसारोपयोगीं किंवा राज्यरक्षणोपयोगी जिन्नस तयार करावे, असें सांगितलें आहे (नहिरन्तश्च कर्मान्ता विभक्तास्सर्वभण्डिकाः । आजीवपुररक्षार्था कार्याः कुप्योपजीविना ॥ २.१६.३५). यांत अलीकडील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट संस्थेमधील कार्यासारखें कार्य सूचित केलें आहे.

मोगल व मराठी रियासतींत प्राचीन परंपरा परिस्थितीप्रमाणें चालू राहिली असावी असें वाटतें. पण त्याबद्दल ऐतिहासिक माहिती प्रसिद्ध झालेली नाहीं.

ब्रिटिश सरकारची व्यवस्था— हिंदुस्थानांतील अरण्यें उत्तर अक्षांस आठपासून पस्तीस अंशांपर्यंत पसरलीं आहेत. तीं येथें समुद्राच्या सपाटीपासून सरासरी बारा हजार फुटांपर्यंत मोठ्या भरभराटींत आढळतात. ह्या सीमेंतील वनस्पतींचें महत्त्व आहे, फार पण तें महत्त्व अक्षांशांतील फरकामुळें कमी जास्त होत नाहीं. एवढेंच नाहीं तर अमुक अक्षांशापासून अमुक अक्षांशापर्यंत अमुक जातींची झाडे व अमुकपासून अमुकपर्यंत अमुक झाडें अशी कांहीं भेदरेषा स्पष्टपणें गोचर होणारी आहे असेंहि नाही. कांही विशेष झाडें दक्षिणहिंदुस्थानांत व कांही विशेष झाडें उत्तरहिंदुस्थानांत आढळतात व कांही झाडें ज्या ठिकाणीं यथायोग्य जागा सांपडेल त्या ठिकाणीं सर्व देशभर अभेद रूपानें आढळतात याप्रमाणें पाहतां जंगलांतील झाडांचे वर्ग भूमध्यरेषेपासून नुसतें अंतर मोजून पाडितां येणें बिलकुल शक्य नाहीं. कारण, या वर्गीकरणांत दुसर्‍या कांही गोष्टींचा विचार करणें अत्यंत आवश्यक आहे. ह्यातील मुख्य म्हणजे पर्जन्यपात ही होय. ह्या पर्जन्यपाताचें नियमन प्रामुख्येंकरून, प्रत्येक स्थळीं आढळणारी भौगोलिक परिस्थिति व प्राकृतिक लक्षणें ही करतात. तेणेंकरून पर्जन्यपाताचे परिणाम व वांटणी यांमध्ये अधिक उणेपणा होतो व त्यामुळें महत्त्वाच्या अरण्यांच्या वाढीच्या गुणधर्मांत व गुणविशेषांत पुष्कळ फरक पडतो.

अरण्यांचे स्वाभाविक वग- ह्या आपल्या भरतखंडांतील अरण्यांच्या प्रदेशाचे समजुतीच्या सोईकरितां चार कटिबंध कल्पिता येतातः- १ अतिवृष्टीचा- ह्यांत पाऊस ७५ इंचांवर पडतो; २ सामान्य वृष्टीचा- ह्यांत पाऊस ५० इंचांवर पडतो;  ३ मध्यम वृष्टीचा- ह्यांत पाऊस ३० इंचांवर पडतो; व ४ अनावृष्टीचा- ह्यांत पाऊस या वरील परिमाणाखालीं पडतो.

ह्या कटिबंधांतील १ सदा हिरवी, २ पानें गळणारीं व ३ कोरडीं अरण्यें यांचा स्थलनिश्चय करणें फारसें कठिण नसतें. पण कांही स्थळीं ह्या पर्जन्यपातापेक्षां त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासून उंची, भरती ओहोटी, व पूर ह्यांचा परिणाम जास्त जाणवतो. अशा ठिकाणी अरण्यांचे आणखी पुढींल तीन प्रकार आढळतातः- १ डोंगरांतील अरण्ये; ह्यांस कोणी डोंगरी अरण्यें असें म्हणतात. १ खाडीकांठची अरण्यें- ह्यांस कोणी खारीं अरण्यें असें म्हणतात. ३ नदीकांठचीं अरण्यें; ह्यास कोणी गोडीं अरण्यें असें म्हणतात. पहिलें सदा हिरेव आदिक तीन प्रकार व डोंगरी आदिक तीन प्रकार मिळून एकंदर सहा प्रकार झाले.

अरण्यांचे विशेष गुणधर्मांप्रमाणें वर्ग.— ह्यांचा विस्तार व उपयोग याप्रमाणें पाहतां, यांतील अग्रगण्य वर्ग म्हटला म्हणजे पानें गळणार्‍या वृक्षांच्या अरण्यांचा होय. ही अरण्यें हिमालयाच्या पायथ्यापासून सर्व द्वीपकल्पभर पसरली आहेत व जेथें ब्रह्मदेशांत त्यांच्या वाढीस योग्य जमीन व पाऊस मिळतो, तेथें तीं पूर्वेसहि प्रसार पावलीं आहेत. ह्यांत साल, लोखंडी, साग, चंदन, अबनूस वगैरे इमारतींचीं लाकडें पुरविणारे वृक्ष होतात. या प्रदेशांत खैर फार होतो. ह्यापासून कात उत्पन्न होतो. ह्याशिवाय तेलें व वार्निसें पुरविणारे अनेक वृक्ष होतात. पानें गळणार्‍या वृक्षांच्या खालोखाल महत्वाचे वृक्ष म्हटले म्हणजे 'सदा हिरवे राहणारे' वृक्ष होत. ह्यांस हवा जरा जास्त दमट लागते. ह्यांचीं अरण्यें प्रामुख्येंकरून पश्चिम हिंदुस्थानचा किनारा, ब्रह्मदेश, अंदमान बेटें व हिमालयाच्या प्रदेशाचा खालचा भाग यांत आढळतात. तथापि या अरण्यांतहिं साग, लोखंडी, खैर वगैरे झाडें मधुनमधुन आढळतात. सदां हिरव्या अरण्यांतील मासलेवाईक वृक्षांचीं नांवें सांगावयाची तर त्यांत आंबा व तूण, हे ओळखीचे वृक्ष होत. कोरडी रखरखीत अरण्यें पंजाब व मध्यहिंदुस्थान यांमध्यें आहेत. ह्यांचे उत्पन्न फारसें महत्त्वाचें नसतें. यांत बाभूळ वगैरे अनेक वृक्ष होतात. पण ते अगदी खुरटलेले असतात.

डोंगरी अरण्यें.— हीं उत्तर हिंदुस्थान, ब्रह्मदेश व आसाम यांत आहेत. हीं स्थूल मानानें ३००० फूटांपासून, १२००० फुटांपर्यंत आढळतात. यांतील वृक्षपरंपरा साधारणतः (इंडियन एम्पायर-इं.गॅ. भा. तिसरा पान १०३, प्रमाणें) बुरण लेडोडेड्रॉन, अयस (ओक), सुरू (सायप्रस), देवद्वार (फर), शिसपेन्सिलीच्या लांकडांचीं झाडें (सिडार), स्प्रूस बाड, भूंर्जपत्र (बर्च) व धूपवृक्ष (जुनिपर) अशी आढळते; व चीर (मायनस लाँजिफोलिव) व खाश्या (पा खाश्या)आणखी पुढे पूर्वेस वरच्या सखल प्रदेशीं होतात व मैदानांतील पानें गळणार्‍या वृक्षांच्या अरण्यांत शेवटीं मिसळतात. ह्या डोंगराळ प्रदेशांत जमीन व उष्णतामान यांची परिस्थिति अनुकूल मिळालीं कीं, तेथें यूरोपांतील यू, बॉक्स व अक्रोड व (वॉलनट्) हे सुप्रसिद्ध वृक्ष होतात. व तेथें त्यावर चढणारी आयव्ही लता, परोपजीवी बांडगूळ (मिस्टलटो) व तीन इंच घेराच्या तांबड्या व पिंवळ्या घमघमाट सोडणार्‍या पुष्पांनी भरलेलें गुलाबांचे ताटवे किती आहेत यांची गणनाच करवत नाहीं.

खारीं अरण्यें— हीं ज्या मळईच्या जमिनींत भरतींचे पाणी येतें त्यांत होतात. हीं अरण्यें फार करून ब्रह्मदेशचा किनारा, बंगल्यांतील सुंदरी वृक्षाबद्दल प्रसिद्ध असलेलें सुंदरबन व मद्रास इलाख्यांतील उत्तरेकडील समुद्रकिनार्‍यावरील प्रांत यांत आहेत. कोंकणांतील खाजणांप्रमाणे ह्यांतील झाडांपासून मुबलक सरपण मिळतें. एवढेंच नाहीं तर बंगाल्यांतल्या सुंदरबनांतल्या सुंदरी वृक्षांपासून इमारती लांकडांचा भरपूर पुरवठा होतो. व ह्यांतील अनेक प्रकारच्या वृक्षांपासून 'बोर्निओकच' नांवाचा व्यापारोपयोगीं चामडी रंगविण्याचा रापट पदार्थ पुष्कळ उत्पन्न होतो. ह्या नवीन सांपडलेल्या द्रव्यानें ह्या जंगलाचें महत्व फार वाढलें आहे.

गोडीं अरण्यें.— गोडी अरण्यें पंजाब व ब्रह्मदेशांत आहेत. यांपैकी पंजाबांत पुष्कळ गोंद देणार्‍या बाभळी आहेत व त्यांत मधून मधून उत्तम नकशींचें खोदकाम करण्यालायक काळें लांकूड पुरविणारे शिसव्याचे वृक्ष जागोजाग मिसळलेले आहेत. पण भरपूर पाण्याचा पुरवठा असलेल्या येथील जागेपासून जसजसें दूर जावें तसतसें खुरटीं झाडें, झुडपें व गवतें यांनी युक्त असें रान लागतें. ब्रह्मदेशांत असली अरण्यें नद्यांचे पूर (कांही ॠतूंत महापूर) येणार्‍या चिखलाच्या जमीनींत अतिशय गर्द होतात. ह्या नव्या प्रकारच्या नदीवरील पुराच्या गोड्या पाण्यानें भरणार्‍या अरण्यांचे रूपांतर हळूहळू समुद्रकिनार्‍यावरील भरतीच्या खार्‍या पाण्यानें भरणार्‍या किर्र अरण्यांत होतें. अरण्याची वाढ खालील गोष्टीवर अवलंबून असते. (१) हवा, (२) भूभागाचा खालवर देखावा (आस्पेक्ट) (३) जमीनीची घटना, (४) पाण्याची खोली. संस्कृत ग्रंथातून झाडांच्या महत्त्वाच्या मानानें त्यांचें वर्गीकरण १ अंतःसार, २ बहिःसार, ३ सर्वसार व ४ निःसार असें केले आहे (उदा.- मनुष्यालयचंद्रिका).

अंतःसाराश्चवृक्षाः पनसतरूमुखाः सर्वसाराश्च शाकाः ।
चिंचाद्यास्तालकेरक्रमुकयवफलाद्या बहिःसारवृक्षाः॥
निःसाराः शिग्रुमप्‍तछदशुकतरवः किंशुकाद्याश्च कार्याः।
तेष्वाद्या मव्यभागे बहिरापिच ततः सर्वसारास्तत्तोऽन्ये ॥

पाण्याचा पुरवठा व हवा यांवर होणारा अरण्यांचा परिणामः- अरण्यांचा एखाद्या देशांतील हंवेवर व जमीनीच्या सुपीकतेवर मोठा परिणाम होतो. अरण्यांचें अस्तित्व हें पावसाचें पडणारें पाणी, झिरपून येणारें पाणी, अथवा पुरानें मिळणारें पाणीं यांवर अवलंबून असतें. तीं ह्या आपल्या भारतवर्षांत पुढील कार्ये करतात. तीं पावसाचें पडलेलें पाणी जमीनींत सांचवून ठेवितात; तीं तें पाणी पुढें हळूच सोडून देतात; व तीं आपल्या झाडांच्या पानांनी हवेस ओल पुरवितात उत्तरहिंदुस्थानांत पानें गळणार्‍या झाडांची मोठमोठीं विस्तीर्ण अरण्ये आहेत. त्यांतील झाडांस उन्हाळ्याच्या आरंभी वसंतॠतूंत आपल्या महाराष्ट्रांतील वृक्षांप्रमाणेच नवी पालवी फुटते. त्यामुळें झाडांस जशीं नवीन पानें येतात, तसतसें हवेचे उष्णमान जाणवण्यासारखें उतरत जातें; व जोंपर्यंत हीं पाने जोरांत असतात तोपर्यंत हे प्रदेश इतर प्रदेशांपेक्षां जास्त थंड रहातात. उलटपक्षी ज्या ठिकाणीं अरण्यें तोडलीं गेल्यामुळें तेथील जमीन नागवीउघडी झाली आहे त्या ठिकाणी पर्जन्याच्या पाताचे कुपरिणाम तेथील रहिवाशांस भोवूं लागतात. म्हणून यूरोपासारख्या समशीतोष्ण खंडांत सुद्धां अरण्याची फेरलावणी करण्याचा मोठा खर्च करावा लागत आहे. सारांश, ''अरण्यें ही हवा व जमीन यांचे उष्णमान सर्वत्र सारखें ठेवितात.  तीं हवेचा ओलावा वाढवून तेथील बाष्पीभवन कमी करितात ज्या प्रदेशांत जंगले असतात, त्या प्रदेशांत इतर प्रदेशांपेक्षां पाऊस जास्त पडतो, पण तो मारवाडांत पडत नाहीं, कारण तेथें झाडी बिलकूल नाहीं. जंगलें झर्‍यांस व नद्यांस पाणी अखंड पुरवितात व तीं मोठमोठे पूर येऊं देत नाहीत. तीं जमीनीस घसरा बसूं देत नाहींत, तीं जमीन उघडी पडूं देत नाहींत, तीं जमीनीची कोसळ व नदीथड्यांची ढासळ व बर्फाच्या नद्यांच्या घसरी व वाळूच्या डुंग्याची उडाऊड होऊं देत नाहींत, तीं हवेच्या प्रवाहाची गति कुंठित करून जवळच्या शेतांचे ऊन व थंड पाण्यापासून रक्षण करतात. तीं, गुरें पारधीचीं जनावरें व उपयुक्त सुंदर पक्षी यांस आसरा देतात. ती एखाद्या देशाचें विशेष परिस्थितींत आरोग्य सुधारतात किंवा कायम राखितात. तीं देशांची शोभा वाढवितात; एवढेंच नाहीं तर तीं लोकांमध्यें जणूं सौंदर्याची अभिरूची उत्पन्न करतात. तीं मनुष्यास पानें, फुलें व फळें देतात. तीं जमीनीवर पाचोळ्याची वनस्पतिजात मृतिका तयार करितात, ती जमीन पाळमुळ्यांनी घट्ट बांधून ठेवितात.

सरकारास अरण्यांचा उपयोग.— हिंदुस्थानांतील अरण्यांपासून केवळ पैशाच्या रूपाचा जो फायदा होतो, त्यापेक्षां जास्त कांही फायदा त्यांस त्यांपासून होतो. या आपल्या देशांतील शेती केवळ गुरांच्या जिवावर चालणारी आहे. त्यांचे येथें हजारों कळप आहेत. अवर्षण पडलें म्हणजे त्यांतील गुरें चार्‍याच्या अभावीं मरतात. पण येथें जंगलांचे संरक्षण नीट चांगलें केलें तर तेणेंकरून, दरवर्षी अगणित गुरांच्या कळपाचें पोषण सुकाळांत झालें तर नवल नव्हे; पण तें अशा व्यवस्थेंत दुष्काळांतहि झाल्यावांचून रहात नाहीं. असल्या अरण्यांपासून जवळच्या खेड्यांस घरे बांधण्यास लांकडें, चुलीस सरपण, शेतीस आउते व दुसरीं सुखसोयीची साधनें यांचा पुरवठा होतो. अरण्यांतील झाडांच्या पानांचा शेतकर्‍यांच्या शेतांस खतासारखा उपयोग होतो. लोकसंख्येच्या वाढीमुळें शेतांत खतें घालून जास्त पिकें काढण्याच्या तजविजी कराव्या लागूं लागल्या आहेत. पण त्यांस लागणार्‍या टहाळतोडीस दाट वस्तीच्या पण थोड्या शेतीलायक जमिनीच्या डोंगराळ कोंकणपट्टींत सरकारास कांही विशेष निर्बंध करावे लागल आहेत, ते असेः- बंद जंगलांत टहाळ न तोडतां फक्त खुल्या जंगलांत तोडावा. साग, धावडा, मोह, हिरडा, शिसू, आंबा, खैर, आपटा, टेंभुर्णी, शिवणी, जांब यांचा टहाळ तोंडू नये. दीड पुरूषाहून जास्त उंच असलेल्या झाडांचा मुख्य कोंब राखून बाकीचे दोन तीन टहाळे तोडावे. मोठमोठे वृक्ष सर्व राखून ठेवावेः परंतु त्यांच्या भोवतीची रोपटें छाटून काढावीं. एकच बुंध्यावर एकच झाड असेल त्यांस हात लावूं नये. तोडीकरितां दिलेल्या कृपांतील सहा इंचापेक्षा जाड बुंध्याच्या झाडांचा टहाळ तोडण्यास हरकत नाहीं.

जंगलांच्या योगानें अप्रत्यक्ष रीतीनें पाण्याचा पुरवठा कसा नियमीत होतो व हवा कशी माफक ठेवण्यांत येते याबद्दल विवेचन येऊन गेलेंच आहे. याप्रमाणेंच जंगलापासून शीत, समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांतील लोकांस जीं हितवर्धक फळें प्रत्यक्ष मिळतात तीं सर्व विश्रुत आहेत. स्थानच्या अरण्यांपासून सरकारास कर मिळतो, दुनियेस इमारती लांकडे व दुसरी उत्पन्नें मिळतात व कांही विशेष धंदे रोजगार चालतात. त्यांविषयीं विवेचन पुढें येईल. पण हल्लीं जें कांही कर्तव्य आहे तें हें की, अरण्यांची किती जमीन या वेळच्या सरकारच्या ताब्यांत आहे व या जमिनीपासून सर्व देशांचे हिताहित काय साधण्यासारखें आहे, हें पहातें होय.

सरकारी अरण्यांचें क्षेत्र— ब्रिटिश हिंदुस्थानांत जंगलाचें क्षेत्रफळ १९१९ सालीं २५१४६८ चौरस मैल होतें. यावरून प्रथम दर्शनीं असें कोणाला वाटेल कीं जंगल व दुसरी जमीन यांमध्यें या बाबतींत पुरें प्रमाण राखण्यांत आलें आहे, व जंगलांच्या क्षेत्राची वाटणीं सर्वत्र सारखी असती तर ही गोष्ट खरोखरी संभवली असती. पण प्रांतवार आंकड्यांची कोष्टकें पाहिली तर जंगलाचें जमीनीशीं शेंकडा प्रमाण संयुक्त प्रांतांत ७.०, तर आसामांत ४४.५, ब्रह्मदेशांत ६४.४, तर आंदमानांत ७०.२ आढळतें. तेव्हां असें म्हणता येईल कीं, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त व जंगलाच्या उत्पन्नाची स्थानिक मागणी फार त्या ठिकाणीं हे जंगलचे फायदे तेथील लोकांस अगदीं कमी मिळतात. ही अडचण लोकसंख्येची वाढ व मागील पिढीच्या लोकानीं जंगलाची केलेली नासधुस यांपासून उद्‍भवली आहे. फिरत्या जंगली लोकांच्या गुरांस जंगलांतील उत्पन्नाची गरज लागली तर त्यांनीं ते वाटेल तसें तोडून टाकिलें. त्यांस दळी नांवाची तात्पुरती शेती करणें झाली तर त्यांनीं त्याकरितां जंगले काढून जमीन साफ केली, त्यांनां कायमची शेती करावयाची झाली तेव्हां त्यांनीं तेथील सारें जंगल जाळून फस्त केलें. ही सामान्य वहिवाट भारतप्रसिद्ध खांडववनदहनापासून सर्रास चालू होती यांत नवल नव्हे. पण आजची सुधारलेली स्थिति पाहतां काय रिवाज आढळतो ? ज्या ठिकाणीं सरकार मनाई करीत नाहीं, त्या ठिकाणीं हा आत्मघातकी प्रघात सर्रास चालू आहे. ''जेथें हिदुस्थानच्या पूर्वेस दूरदूरच्या परगण्यांतल्या अरण्यांत वरील दळ्यासारखी ठाणपारूटाची शेती करणार्‍या अनेक जंगली लोकांच्या टोळ्या आहेत, ज्या ठिकाणीं कायमच्या वस्तींतील शेतकर्‍यांस वृक्षराज जो साग त्याशिवाय झाडून सर्व इमारती लांकडाचे वृक्ष कःपदार्थ वाटतात, अशा पूर्वेकडील प्रांतांपासून जेथें पश्चिमेकडील सुधारलेल्या परगण्यातील शेतकरी व व्यापारी इतर ठिकाणीं टाकाऊ ठरलेली लांकडे विकत घेण्यास अत्यंत आतुर आहेत असे पश्चिमेस प्रांत आहेत. ज्या ठिकाणीं लोकवस्ती दर चौ.मै. ६ पासून ६०० पर्यंत आहे अशा राज्यातल्या अतिरेकाच्या (एक्स्ट्रीम्स) ठिकाणीं तेथील मनुष्यवस्तीचा परिणाम येथील जंगलावर काय होत असावा ह्याची केवळ कल्पनाच करणें बरें'' असें हिदुस्थानच्या इंपेरियल ग्याझिटियमध्यें म्हटलें आहे.

अरण्यांची प्रतवारी.— हल्लीच्या (इंग्रज) जंगलाचें वर्गीकरण तीन प्रकारें करण्यांत आलें आहे. (१) बंद (रिझर्वड्), (२) राखीव (प्रोटेक्टेड्) व (३) खुलें (पब्लिक—लोकांचें) ह्यांतील अरण्यें कायम बंद ठेवण्याचा उद्देश इमारती लांकडें सर्पण व दुसरीं उत्पन्नें यांचा पुरवठा अथवा पाण्याच्या पुरवठ्याचें रक्षण किंवा असलींच दुसरी कार्ये उरकावी एवढाच होय. राखीव जंगलें ही एकतर संक्रमणावस्थेंत असतात म्हणजे त्याचीं पुढें बंद जंगले करण्याचा इरादा असतो किंवा ती एकतर कायमचींच राखीव म्हणजे दुसर्‍या वर्गाच्या जंगलांत रहावयाची असतात. बंद जंगलासंबंधी विघातक कांही क्रिया बिलकूल करावयाच्या नसतात. पण यासहि कांही मर्यादा असते. ह्या जंगलस कांही विघातक क्रिया बाधणार नाहीत असें जेव्हां दिसूं लागतें, तेव्हां त्या सक्तीच्या नियमाच्या अमंलबजावणीची तहकुबी होते. पण राखीव जंगलांची स्थिति अशी नसते. त्यांचा उद्देश जागोजागच्या लोकसमूहाच्या हक्काचा परस्परांस सुखकर व हितकर अंमल व्हावा एवढाच असतो. खुलीं जंगलें बिगर वर्गांतील असतात. तीं लोकांकरितांच ठेविलेलीं असतात. त्यात जंगलाच्या कायद्याची अंमलबजावणी अगदीं थोड्या बाबतींत होते. इ.स.१९१९ तील सरकारच्या ताब्यांतल्या २५१४६८ चौरस मैल क्षेत्रफळाच्या जंगलापैकी १०१६३९ चौरस मैल क्षेत्रफळाचें जंगल बंद होतें. ८५५७ चौरस मैल क्षेत्रफळाचें जंगल राखीव होतें. व बाकीचें १४१२७२ चौरस मैल क्षेत्रफळाचें जंगल बिगर वर्गातील अगर खुलें होतें. हें कोणासही सहज ताडता येईल की ज्या ठिकाणी दर मैली लोकवस्ती अगदीं कमी असते त्या ठिकाणी असलें खुलें जंगल फार मोठें असतें. याप्रमाणें वस्तुस्थिति पाहतां, ब्रम्हदेशांत असल्या प्रकारचें जंगल सगळ्या क्षेत्रफळाच्या शेंकडा ८० भाग आहे. व बाकीचें बहुतेक आसामांत आहे. ब्रम्हदेशांतील शोधाचे काम अजून पुरें झालेलें नाहीं; व हजारों चौरस मैलांचें क्षेत्र, बंद जंगलाच्या खात्यास दरवर्षी जमा होत आहे. व ही मोठी सुदैवाचीच गोष्ट आहे कीं, ह्या जंगलाची नासाडी होण्यापूर्वी सरकारनें ह्याच्या रक्षणाचा योगय बंदोबस्त केला आहे. यामुळें येथे काहीं दिवसांनी एक मोठी जंगलाची मालमत्ता तयार होईल. तिची व्यवस्था व किंमत करणें आज कल्पनेबाहेरचें आहे.

ह्या तिन्ही प्रकारच्या जंगलांची व्यवस्था येथील सरकारच्या जंगलखात्याकडे आहे. ह्या खात्याचें जंगलाची व्यवस्था सरकारच्या धोरणाप्रमाणें चालविण्याचें काम आहे. सदर्हु धोरणांत पुढील तीन हेतु धरिलेले आहेत. (१) सगळ्या हिंदुस्थान देशाचें हित साधणें, (२)-जंगलाजवळच्या लोकांचे हित साधणें व (३) जंगलांच्या उत्पन्नाचा जमेल तितकें करून सरकारच्या महसुलांत भर घालणें.

जंगल खात्याची उत्पत्ति, वाढ व व्यवस्था.—  ह्या खात्याची प्रथम स्थापना इ.स.१८०६ त मलबारांत सागाच्या जंगलाच्या संरक्षणार्थ झाली. त्या खात्याचा मुख्य कॅप्टन वॉट्सन हा होता. त्यानें साग हा केवळ एक सरकारच्या सत्तेतील जिन्नस करून त्याचा स्वतंत्र मक्ता (ठेका) चालविला, कारण त्याचा उपयोग लढाऊ गलवतें व इमारती बांधण्यास फार होता. मुंबई इलख्यांत इ.स.१८४७त डॉ.गिबसन हा पहिला कॉन्झर्व्हेटर झाला, व डॉ.क्लेगहॉर्न मद्रास इलाख्यांत पहिल्यानें झाला. त्यांनीं जंगलांच्या संरक्षाणार्थ सरकारपुढें तीन गोष्टी मांडिल्याः- (१) त्यांचें संरक्षण केल्यास डोंगर धुवून जाणार नाहीत, (२) नद्यांत गाळ जमणार नाहीं व (३) पाण्याचा पुरवठा कमी पडणार नाही. त्याचा परिणाम असा झाला कीं, जंगलाचे संरक्षण हें सरकारच्या तिजोरींत प्रत्यक्ष पैसा आणण्याचें साधन होऊन बसलें. इ.स.१८२७त सरकारचें लक्ष पूर्वेकडील टेनासरीमच्या सागाच्या जंगलाकडे वळलें. तेव्हा तेथील बेजबाबदार व अविश्वासी कंत्राटदाराच्या लुटालुटी व नासधुशी यांचा बंदोबस्त करण्यांत आला. इ.स. १८५२ त पेगूमधील जंगलाची खासगी लोकांनीं लूट मांडिली. लार्ड डलहौसीनें कायमचें सरकारी धोरण ठरवून तिचा बंदोबस्त केला. इ.स.१८५६ त डॉ.ब्रांडिस याची नेमणूक पेंगूच्या जंगलावर झाली. हा जर्मन होता. हा इ.स.१८६४त पहिला 'इन्स्पेक्टर जनरल ऑफ् फॉरेस्ट्स ऑफ् इंडिया' झाला. ह्यानें व ह्याच्या पुढील शिष्यांनीं मिळून जंगलखातें निर्माण करून त्याची व्यवस्था लाविली व त्यांनीं या आपल्या देशांतील विस्तीर्ण अरण्याची जागोजागच्या विशेष परिस्थितीस अनुसरून यूरोपांतल्या उत्तम पद्धतीप्रमाणें व्यवस्था सुरू केली. डॉ.ब्रांडिसनें इ.स.१८६९ त विधायक सत्ता चालविण्यास दर वर्षास ९५००० रूपये खर्ची घालण्याचें ठरवुन ५७ अंमलदार नेमिले. हल्लीं जंगल खात्यांतील नोकरीच्या तीन शाखा आहेतः- (१) 'इंपीरियल सर्व्हिस'-या शाखेंत २५७ अधिकारी असून त्यांत इन्स्पेक्टर-जनरल ऑफ फॉरेस्टस, चीफ कांझर्व्हेटर्स, कांझर्व्हेटर्स, डेप्युटी व असिस्टंट कांझर्व्हेटर्स असे हुद्दे आहेत. या शाखेंत भरती खुद्द विलायतेंत (युनैटेड किंगडम) होते. इंग्लिश, वेल्श किंवा आयरिश युनिव्हर्सिटिची नॅचरल सायन्स या शाखेंत आनर्स डिग्री, किंवा स्कॉटिश युनिव्हर्सिटीत 'प्युअर सायन्स' या शाखेंत बी.एस् सी. डिग्री मिळणारांपैकी कांही प्रोबेशनर घेऊन त्यांनां आक्सफोर्ड केंब्रिज किंवा एडिनबरो युनिव्हर्सिटींच्या फॉरेस्ट स्कूलमध्यें शिक्षण देऊन व्यावहारिक शिक्षण देण्याकरितां यूरोपीय देशांत कांही काळ पाठवून नंतर त्यांच्या हिंदुस्थानांत नेमणुकी करतात. (२) दुसरी शाखा प्रॉव्हिंशिअल सर्व्हिस- यांत २६० अधिकारी असून एक्स्ट्रॉ डेप्युटी व एक्स्ट्रॉ असिस्टंट कांझर्व्हेटर्स असे त्यांचे हुद्दे आहेत. या शाखेत भरती हिंदुस्थानांतील डेहराडूनच्या 'फॉरेस्ट रिचर्स इन्स्टिट्यूट' या संस्थेत शिक्षण घेतलेल्यांची होते. शिवाय रेंजर्सच्या हुद्यावरील विशेष लायकीच्या माणसांनांहि यांपैकी कांही जागा मिळतात. (३) तिसरी शाखा 'सबॉर्डिनेट सर्व्हिस', हिच्यामध्यें फॉरेस्ट रेंजर (८४०), डेंप्युटी रेंजर (९००), फॉरेस्टर (२०००) आणि फॉरेस्ट गार्ड (११५००) आहेत. रेंजरांचे शिक्षण डेहराडूनचें फॉरेस्ट कॉलेज, पाईनमानाचें (ब्रह्मदेश) बर्मा फॉरेस्ट स्कूल व कोइंबतूरचें (मद्रास) मद्रास फॉरेस्ट कॉलेज यांत झालेलें असतें. रेंजरच्या खालच्या दर्जाच्या नोकरांचे शिक्षण ठिकठिकाणच्या फॉरेस्ट स्कूल्स व ट्रेनिंग क्लासेसमध्यें झालेलें असतें. इलख्याच्या पोटभागांस अनुक्रमें डिव्हिजन्स, डिस्ट्रिक्टस्, रोंजेस्, बिटस् वगैरे नांवें आहेत. पण प्रत्येक जिल्ह्यांतील रयतेच्या हितहिताच्या गोष्टी, जसें गुरचरणीच्या रानांचें रक्षण, गुरचणीची फी, जंगलांतील हलक्या उत्पन्नाचा पुरवठा यांसंबंधी जिल्ह्यांतील विधायक सत्ताधारी जो कलेक्टर याच्या तंत्रानें त्या सर्वांस वागावें लागतें.

हिंदुस्थानांतील जंगलाचा कायदा — ह्या कायद्याचें मुख्य तत्त्व हें आहे कीं ज्या बिनवहती जमीनीवर लोकांचा हक्क नाहीं, ती सरकारी समजावी. ज्याला जें लागेल तें त्या जमीनींतील जंगलांतून पूर्वापार नेत असत, त्याप्रमाणें तें कोणी बिनपरवाना व फी दिल्याशिवाय इतः पर नेऊं नये. कारण पूर्वीच्या बेबंदशाहींत जंगलांची धुळधाण होत असे. सरकारचे हक्क व लोकांचे हक्क यांची तपशीलवार मर्यादा म्हणून इ.स.१८६५ त पहिला फॉरेस्ट अ‍ॅक्ट पास झाला. इ.स.१८७८ त नवीन कायदा झाला. तो सर्व हिंदुस्थानास इ.स.१८८२ पर्यंत मागे पुढे लावण्यांत आला. ह्या कायद्याचा उपयोग करून सर्व जंगलाच्या पुढील प्रती (पायर्‍या) पाडण्यांत आल्याः- (१) केवळ सरकारच्या मालकीची अरण्यांची जमीन; (२) लोकांचे खासगी हक्क असलेली सरकारच्या मालकीची अरण्याची जमीन, व (२) खासगी व्यक्ती किंवा लोकसमूह यांच्या मालकीची पण कांही ताबा ठेवण्याची जरूरी असलेलीं अरण्यें. त्यांचे वर्ग- (१) बंद, (२) राखीव व (३) खुली अरण्यें, असे करून त्यांच्या मर्यादा ठरविल्या व त्यांत अतिक्रमण होऊन नवीन हक्क उत्पन्न न व्हावे म्हणून 'सेटलमेंट रेकॉर्ड' (ठरावांचें दत्पर) तयार केलें. त्यांत वंशपरंपरागत पूर्वोक्त दळ्यांची शेती करणार्‍या वन्य जातींच्या हक्कांचा विचार करण्यांत आला. लोकांस तीन महिन्यांत अपिलें योग्य कोर्टापुढें करण्यास सवड ठेवण्यांत आली. नंतर बंद जंगलांचें रेकॉर्ड पुरे निकाल झालेलें असें ठरविण्यांत आलें.  असाच कांहीं प्रकार राखीव जंगलांचा करण्यांत आला. याप्रमाणें कांही नियम करून लोकांच्या जंगलांतील उत्पन्नाची नासाडी न करता घरगुती कामास उपयोग करण्याची व व्यापाराच्या देवघेवीस योग्य जिन्नसांवर कर देऊन नेण्याची परवानगी ठेवण्यांत आली. या योजनेनें जंगलाजवळच्या लोकांचा फायदा होऊन सरकारच्या तिजोरीत पुष्कळ महसूल येऊं लागला.

ह द्दी— सव्वा लक्ष रूपये खर्चून जंगलांच्या हद्दीच्या खुणा व त्यांमध्यें पायरस्ते करण्यांत आले. नंतर त्या अरण्यांचे रेखीव व तपशीलवार उत्तम 'टोपोग्राफिकल' नकाशे काढण्यांत आले. त्यांत जंगलाची वाढ व पाण्याच्या पुरवठ्याची खोलीहि दाखविली.           

का र्य क्र म.— प्रांतिक सरकार एक अधिकारी नेमितें. तो कामाची योजना तयार करतो. त्या योजनेंत जंगलांच्या उत्पन्नाचे परिणाम किती आहेत व त्यांतील किती उत्पन्न नेण्यासारखें आहे याचा निर्बंध घालण्यांत आलेला असतो व त्यांत बीं पेरणी, रोप लावणी, दाटण मोडणी, (थिनिंग) व निकामी रान काढणी (निंदणी-क्लीनिंग) व दुसरी कशी काय करावी हें दाखविण्यांत आलेलें असतें. तींत वणवे अथवा गुरें यांपासून जंगलाचें रक्षण कसें करावें याचा तपशील देण्यांत आलेला असतो. व रस्ते, पूल व इमारती कशा व कोठें बांधाव्या हें आलेलें असतें. हा कार्यक्रम २० ते ४० वर्षांचा असतो. बंद अरण्यांपैकीं २२००० चौरस मैल अथवा चौथा हिस्सा जमीनीवर त्याची अंमलबजावणी चालू आहे.

दळणवळण व इमारती -  डोंगर कड्यांत इमारती लांकडें नेण्यास घसरणी व रस्ते करण्यास फार खर्च येतो, पण मैदानांत ट्रामवे किंवा नॅरोगेज रेल्वे बांधाव्या लागतात. त्यांचा खर्च भागण्यास तेथील जंगलाचें उत्पन्न त्यांस भरपूर असावें लागते. आसाम, बंगाल व ब्रह्मदेश यांत तेथील सृष्टिजात मोठ्या नद्यांच्या व उपनद्यांच्या जलमार्गांचा उपयोग करतां येतो. याप्रमाणेंच थंडीवार्‍यापासून रक्षण करण्यास जंगलाच्या नोकरांस योग्य घरें बांधून द्यावीं लागतात.

अरण्याचें संरक्षण, चोर गुन्हेगारांपासून रक्षणः—  जंगलच्या अधिकार्‍यांस लहान लहान गुन्ह्यांची तडजोड करण्याचा अधिकार ठेविलेला आहे. इमारती लांकडें तोडणें व नेणें, गुरें चारणें व जंगल जाळणें हे गुन्हेगारांच्या सदरांत येतात. त्यांतील आगी लावण्याचा गुन्हा फार मोठा आहे; कारण तेणेंकरून जंगलाचें नुकसान फार होतें. पण हे गुन्हेगार शोधून काढणें फार मुष्किलीचें असतें. आगी स्वाभाविक असोत किंवा अस्वाभाविक असोत त्यांपासून जंगलाचें संरक्षण करणें हें फॉरेस्ट ऑफिसरचें (अरण्यरक्षक) मोठे मेहनतीचें व महत्त्वाचें काम आहे. आगींनीं जंगलाचा फायदा होतो, ही समजूत हल्लीं नष्ट झाली आहे. कारण जनतेस संरक्षित व असरंक्षित अरण्यांतील भेद तुलनेनें समजूं लागला आहे. पण ह्यास असंस्कृत लोकांच्या परंपरागत रूढींत अपवाद आल्यावांचून रहात नाहींत. ह्या लोकांच्या जमाती मागला पुढला विचार न करतां स्वतःच्या गुरांकरितां जाळपोळ करून जंगलांत वाव करीत असतां निष्काळजीपणानें जवळच्या जंगलांत आगी पसरून त्यांची राखरांगोळी करतात. वाास्तविक ही गोष्ट थोडीशी जंगल तोडण्याची मेहनत घेऊन त्यांस सहज करतां येते. म्हणून ह्या जंगलांतील अधिकार्‍यांस हे अनर्थ टाळण्यास पुढील उपाय करावे लागतातः- (१) त्यांस अशा लोकांच्या पोटांत शिरून गोडीगुलाबीनें त्यांच्या वाईट संवयी मोडून त्यांच्या जागीं त्यांस नवीन संवयी लावाव्या लागतात. त्यांस त्यांचें विड्या ओढून त्या जळत टाकण्याचेंहि व्यसन हळू हळू समजूत घालून सोडवावें लागतें. त्याबरोबर त्यांचे आपसांतील हेवे दावेहि त्यांस काढून टाकावे लागतात. बंद व राखीव जंगलांत त्यांच्या सरहद्दीवरील गवत वगैरे ज्वालाग्राही पदार्थ काढून टाकून अग्निमर्यादा (फायर लाईन्स) जशा पाहिजेत तशा व त्या जंगलाच्या विस्ताराप्रमाणें मध्यें किंवा अनेक ठिकाणी कराव्या व अशा प्रकारें ती जंगले जंगली जातींस दिलेल्या जंगलाच्या भागापासून अगदीं अलग किंवा तुटक करावीं व त्यांच्या आसपास कोणासहि शेकोटी किंवा चूल पेटवूं देऊ नये.  ह्या कामाकरितां किंवा वार्‍यानें पसरत जाणारी आग जागच्या जागीं टहाळानें दाबून टाकण्याकरितां लागतील तशा गस्तवाल्यांच्या (पेट्रोल्स) टोळ्या ठेवाव्या. (२) ज्या लोकांस जंगलच्या उत्पन्नाचा उपयोग करावा लागतो. त्यांच्या स्वहिताच्या प्रवृत्तीस जागृत करावें, म्हणजे ते तदर्थ एकत्र होऊन दिलसफाईनें एक होऊन अरण्याचें व विशेषेंकरून लोकांच्या अरण्याचें तरी संरक्षण करण्यास धावूं लागतील.

गुरांपासूनरक्षण.— सरकारी जंगलांत गुरचरणीस सवड ठेविलेली आहे. ती इतकी कीं, त्यांत इमारती लांकडाच्या उत्पन्नाहून गुरांचे चारणें जास्त महत्वाचें धरणांत आलें आहे. पण यांत शेतकर्‍यांच्या गुरांपेक्षां गोपाळांच्या गुरांच्या व धनगरांच्या शेळ्यामेंढ्यांच्या चरण्याची पीडा जंगलांस फार होते. त्यांत गाईम्हशींच्या चरण्यापेक्षां शेळ्यामेंढ्यांचे कुरतुडणें फार वाईट असतें. गाईम्हशींच्या चरण्यानें जंगलाच्या वाढीस नुस्ती पीडा होते, पण शेळ्यामेंढ्याच्या कुतुरडण्यानें जंगलाचें समूळ उच्चाटण होतें म्हणजे तें मरतें. म्हणून एकाच जागेंत गुरचरणी व वनसंवर्धन साधणें शक्य नाही; तेव्हां लोकांस गवत हवें किंवा इमारती लांकडें हवींत ह्याचा निर्णय प्रथम करावा व त्याप्रमाणें वागावें, अथवा जंगलाचे तुकडे पाडून ते आलटून ह्या प्रत्येक कामास द्यावे. पण गुरें जंगलांत मोकाट सोडिलीं तर त्यांत गवत नाहींसें होतें, एवढेंच नाहीं तर त्यांच्या जातींची शुद्धताहि रहात नाही, व जंगलहि वाढत नाहीं हें ध्यानांत धरून बंद जंगलें गुरचरणीस फार करून मोकळीं ठेवीत नाहींत.  इ.स. १९०१ त ३५००० चौरस मैल जमीन गुरचरणास बंद होती व ३३००० चौरस मैल जमीन शेळ्यामेढ्यांस बंद होती. फुकट अथवा कमी दरानें दिलेल्या कुरणांतील गवताची किंमत ११,००,००० रूपये होती. दुष्काळाच्या वेळीं चरणीवरील नेहमींचे निर्बंध अनेक वेळां काढून टाकितात.

जंगलाचें स्वाभाविक पुनरूज्जीवन.— हें करण्यास जेथील जंगल लांकडांसाठी तोडलें जातें त्या ठिकाणीं मृगांच्या सुमारास नवीन बियांची लागन करून त्यांचे पाऊस, पशू वगैरेंपासून रक्षण करावें.

जंगलखात्यांतील अधिकार्‍यांनी जेव्हां सदा पानें गाळणार्‍या वृक्षांच्या अरण्यांचा ताबा घेतला, तेव्हां त्यांचा बहुतेक भाग खराब झालेला होता. कारण त्यांतील निकोप व पूर्ण वाढलेलीं झाडे मोलवान इमारतीकरितां काढून नेण्यांत आलीं होतीं. एवढेंच नाहीं, तर त्यांच्या नवीन वाढीवर कुर्‍हाड व विस्तव यांचा प्रताप दाखवून त्यांची भयंकर नासाडी करण्यांत आली होतीं. अशा परिस्थितींत जमीनीचा खराबा न होऊं देतां ह्या जंगलांतील शिल्लक झाडें कशीं काढून टाकावीं हा जंगलखात्यांतील अधिकार्‍यांपुढें मोठा प्रश्न होता. याशिवाय आणखी त्या जमीनीवर निरोगी झाडांची पुन्हां उत्पत्ति कशी होईल हा त्यापुढील प्रश्न होता. ह्यावरून पहिल्या कार्यक्रमांत झाडतोड ही जंगल सुधारण्यास झटपट कां करतात ह्याचें ज्ञान होईल. ह्या क्रियांची तीव्रता व व्यवस्था प्रत्येक जंगलाच्या विशेष परिस्थितीवर अवलंबून असते; पण त्यांत मुख्य रोख योग्य संरक्षणाच्या तजविजीनें जमिनीची उत्पादन शक्ति वाढविणें व निरूपयोगी व इजा झालेली झाडें काढून त्यांच्या ठिकाणीं निरोगी झाडें वाढविणें याकडे असतो. निवडलेल्या झाडांची तोड परिमाणतः क्षेत्रतः अथवा या दोन्ही दिशांनी मर्यादित करून कोणत्याहि जंगलाच्या पिकांचे नियमन करणें सोपें असतें. पण जंगलांतील अगणित झाडांपैकीं अगदीं थोडीं झाडें मौल्यवान असतात व ह्यांपासून पुरें उत्पन्न काढण्यास व कमी महत्वाच्या झाडांचे जणूं बळी देऊन त्यांच्या उत्पादनास उत्तेजन देत असतां, त्यांचे काळजीपूर्वक सतत संगोपन करावें लागतें. ही गोष्ट प्राथमिक उपचार झालेल्या खराब अरण्यांसच लागू आहे एवढेंच नाही; तर प्रतिकूल परिस्थितीच्या परिणामानें फारशा न बिघडलेल्या वाढत्या जंगलासहि लागू आहे.  ह्या ठिकाणीं दाखविलेली अडचण वाढविण्यास आणखी एक कारण होतें. तें हें कीं, ज्या ज्या ठिकाणच्या लोकांस आपले हक्क चालविण्याची सवलत द्यावी व जंगलाचें उत्पन्न फुकट घेऊं देण्याची मुभा द्यावी त्या त्या ठिकाणीं जवळच्या भागांत हलक्या प्रतीच्या इमारतीच्या लांकडांस मागणीं अगदीं बहुतेक बंद होते व म्हणून असलीं झाडें काढून टाकण्याचें काम फायद्याच्या ऐवजीं आंत बट्टयाचें होतें. अत्यंत इष्ट झाडांची संख्या व गुण पाहिजे तितके व पाहिजे तसे असतात तेव्हांहि ही अडचण नसते असें नाही. कारण त्यांत हलक्या जातींच्या व भराभर वाढणार्‍या झाडांची संख्या मोठी असल्यामुळें त्यांची पीडा वरच्या झाडांस फार होते. ती इतकी कीं तीं वनरक्षकास समूळ काढावीं लागतात.  ह्या कारणास्तव आपल्या हिंदुस्थानच्या कांही भागांतील मोलवान सागाच्या अरण्यांचें पुन्हां स्वाभाविक पुनरूज्जीवन करणें फार कठीण झालें आहे. तें इतकें कीं, पुष्कळ वर्षांच्या अभ्यासपूर्वक घेतलेल्या अनुभवाचाहि उपयोग त्या कामास बिलकूल होत नाहीं. खैर व लोखंडी ह्या झाडांच्या उत्पादनासंबंधी पाहतां ह्यापेक्षांहि कमी माहिती वनसवर्धकांस असते. वस्तुतः पाहतां इष्ट जातीचे वृक्ष मिश्र अरण्यभर चोहोंकडे थोड थोडे पसरलेले असतात. तेव्हा पुष्कळ माहिती मिळविण्यांत आली असतांहि ती त्यांच्या वर्धनास अपुरी पडते. अशा परिस्थितींत पुढील नियम साधारणपणें अनुसरतात. झाडांस वाटोळ्या खांचणीचे कमरबंद घालून तीं काढून टाकावीं व खुजट झाडें नाहींशीं करावी. यामुळें उजेड जास्त योऊं लागून महत्वाच्या वृक्षांची रोपें उगवून वाढतात. ही क्रिया करण्यास फार खर्च येतो व सक्त नजर ठेवून हें काम फारशा मोठ्या प्रमाणावर करतां येत नाहीं हें खरें; पण अनेक ठिकाणीं विशेषतः साल वृक्षांच्या अरण्यांत या कामांत फार यश आलें आहे. याचीं कारणें एक तर सागापेक्षां सालाचा विस्तार या देशांत मोठा आहे व सालवृक्षांच्या संगतीला जीं दुसरीं झाडें असतात, त्यापेक्षां सालाचे रक्षण व वृद्धि सहज करितां येते. डोंगरी अरण्यांत त्यांच्या स्वाभाविक पुनरूज्जीवनास असली यातायात बिलकूल करावी लागत नाही. त्यांच्या पानाच्या छताचें योग्य रक्षण व त्यांवर विचारपूर्वक उपचार केले म्हणजे झालें. त्याची वाढ खात्रीनें होते. जंगलांतील झाडांचा सांठा कायम राखण्याकरितां निसर्गाच्या पुनरूज्जीवक शक्तीवर बहुतेक सर्वस्वी अवलंबून रहावें लागतें. पण कांहीं प्रसंग असे असतात कीं, त्यांत निसर्गाची पुनरूज्जीवक शक्ति पुरे काम करूं शकत नाहीं. तेव्हां तीस हातभार लावावा लागतो. याकरितां (१) मनुष्यास बीं पेरण्यासारखीं क्षेत्रें शोधून तयार करावीं लागतात व (२) त्यास त्या इष्ट क्षेत्रांत (ठिक्यांत) बीहि नेऊन टाकावें लागतें. उदाहरणार्थ, आपल्या मुंबई इलाख्यांतील सह्याद्रि आदिक डोंगर व टेकड्या यांच्या नापीक उतरणीवर मुठींनीं बियांची पेरणी करणें, व ब्रह्मदेशांतील फुलें आलेल्या बांबूंची आगीनें सफाई करून त्यांच्या ठिक्यांत साग व खैर यांचे बीं कुदळीने खळगा खणून त्यांत लावणें.

जंगलांचें पुनरूज्जीवन गुल्माच्या पद्धतीनें (कॉपिस) करतां येतें. ज्या ठिकाणीं लहान इमारती लांकडें व सरपण ह्यांची मागणी फार असते व ज्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या वाढीस त्या जागची परिस्थिती प्रतिकूल असते, त्या ठिकाणीं ही पद्धत विशेषेकरून प्रचारांत आहे. असल्या अरण्यांत महत्वाच्या जातीच्या वृक्षांतील फळें धरणारे कांही वृक्षच काय ते राखून ठेवितात. म्हणजे त्याखालीं स्वाभाविक बीजप्ररोह (सीडलिंगस्-रोपे) उत्पन्न होऊन त्याच्या पुनरूज्जीवनास मोठें सहाय्य करतात. ह्या पद्धतीनें जंगलखात्यास अनेक वेळा फार पैसा मिळतो.

संस्कार- पूर्वोक्त (१) कमरबंद व (२) झाडतोड या क्रियांशिवाय जंगलांत आणखी पुढील क्रिया करतातः- (१) वेलतोड, (२) पातळाई किंवा दाटण मोडणी व (३) सफाई. ज्या झाडांची खोडें त्यापेक्षां जास्त महत्वाच्या कोंवळ्या झाडांच्या खोडांच्या वाढीस अडचण करीत असतील त्या झाडांचीं खोडें सफा काढून टाकितात. पण ह्या कामास चांगल्या कुशल लोकांची देखरेख लागते. म्हणून हें काम जंगलांत बेताबातानेंच करून घेण्यांत येतें. उलट पक्षीं वेलतोड व बांडगुळमार करणार्‍या खात्यांतील राखणदार लोकांस यंत्रांप्रमाणें, फारशीं अक्कलहुषारी न खर्चितां हें काम करितां येतें. म्हणुन त्या रोगांच्या नाशार्थ दर वर्षी मोठ्या प्रदेशभर असले उपचार करतात. स्वाभाविक अरण्यांत दाटीची पातळाई व हेकड वनस्पतींची सफाई यांचें काम साधारणतः निराळें म्हणून करीत नाहींत. हें काम इतर क्रियांबरोबर करतात व त्याचा खर्च त्या इतर संस्काराच्या खर्चात घालितात.

कृत्रिम पुनरूज्जीवन.— हिंदुस्थानांतील अरण्यांत कृत्रिम जंगलाची लागवड १,००,००० एकर पसरली आहे. ह्या क्षेत्रांतील अर्धा भाग ब्रम्हदेशांत आहे, तिसरा भाग मद्रास इलाख्यांत आहे, व बाकीच्या भागाचे तुकडे इतर प्रांतांत आहेत. साग, शिसवी, खैर, रबर व देवद्वार हीं झाडें येथें मुख्यत्वेंकरून लावितात. मद्रास इलाख्यांत नीलांबूर येथें अत्यंत प्राचीन सागाची लागवड आहे. ह्या लागवडीस इ.स. १८४२ त सुरुवात झाली. अगदीं आरंभापासून ही लावण्याचा मूळचा झालेला खर्च भरून आला. व ह्यापासून पुढें फार फायदा होण्याचा संभव आहे. ब्रम्हदेशांतील लागवड प्रामुख्येंकरून ढोंग्याचा पद्धतीची (म्हणजे सर्व जंगल जाळून साफ करून लागवड करणें) चालते. हीस महाराष्ट्रांत दळ्याची पद्धती असें म्हणतात. शेतांतील पिकांबरोबर सागाची लागवड करण्याचें कबूल केलें तरच सरकार तेथील लोकांस ढोंग्याच्या पद्धतीचीं उडती शेती करू देतें. ही पद्धति ह्या देशांच्या वहिवाटीस योग्य असल्यामुळें ह्या देशांत ह्या मोलवान सागाचा मोठा सांठा करण्यांत आला आहे. ह्या स्वाभाविक उत्पन्नाच्या पुरवठ्यास रबराच्या लागवडीची भर घालण्यांत आली आहे. गेल्या तीस वर्षांपासून आसाममध्यें रबराची लागवड चालू आहे व तेथील व दुसर्‍या ठिकाणांतील थोड्या प्रमाणावर अनुभव घेऊन सरकारनें रबराची लागवड ब्रह्मदेशांत मोठ्या प्रमाणावर करण्याचा निःश्चय केला आहे. इ.स. १९०१ त ह्या लागवडीवर खर्च १,३०,००० रूपयांचा होता. हिंदुस्थानांत स्वाभाविक जंगलाची लागवड फार मोठी आहे. ह्या लागवडीशीं तुलना केली असतां ही अस्वाभाविक जंगलाची लागवड अल्प आहे. पण ज्या ठिकाणीं बन निर्द्रुमः झालें असेल, त्या ठिकाणीं (१) वनस्पतींची भराभर पुन्हां भरती करण्यास, (२) कांहीं विशेष अरण्याच्या उत्पन्नांत फार जरूरीच्या पदार्थांचा पुरवठा करण्यास, (३) पडित जमीनीचा उपयोग करण्यास अथवा (४) कांहीं महत्वाच्या वृक्षांच्या लागवडींतील क्षेत्र वाढविण्यास ह्या अस्वाभाविक लागवडीच्या क्रिया अनेक वेळां जरूरीच्या व तशाच फायद्याच्याहि असतात.

जंगलाचें उत्पन्न.— हिंदुस्थानांतील जंगलांत पुढील जिन्नस उत्पन्न होतातः— (१) इमारती लांकडें, (२) बांबू, व (३) गवत. इमारती लाकडांतील महत्त्वाचीं लांकडें म्हटलीं म्हणजे साग, देवद्वार, साल, शिसवी, अबनूस, खैर, चंदन, बाभूळ वगैरे. त्यांत दुसरी विशेष कामास उपयोगी अशी हजारों प्रकारचीं लांकडें आहेत. पण तीं जागच्याजागींच खपणारीं आहेत. तीं एकाद्या धंद्यांत उपयोगी पडतील इतकीं उत्पन्न होत नाहींत. अथवा तीं व्यापारांत दृढमूल झालेलीं नाहींत. इ.स. १९०१ त इमारती लाकडें व सरपण २,३२,००० घनफूट उत्पन्न झालें. प्रत्येक प्रांतांत ह्याचें मैली उत्पन्न लोकसंख्येच्या दाटीप्रमाणें व उत्पन्नाच्या जोराप्रमाणें निरनिराळें असते. ८७,००,००० रूपयें किंमतीचा ३५,००,००० घनफूट साग वर्षांत परदेशीं पाठविण्यांत आला. त्या ठिकाणींच चंदन, अबनूस व दुसरी नकशी करण्यासारखीं लाकडें १०,००० रूपयें किंमतीचीं पाठविण्यांत आलीं. येथील जंगलांत १,८५,००,००० बांबू उत्पन्न झाले. ह्यांतील १/३ बांबू ब्रम्हदेशांतून आले व बाकीचे बांबू बंगाल, आसाम व मध्यप्रांत यांतून आले. ह्या वर्षी जंगलाचें किरकोळ उत्पन्न ५० लक्षांचें झालें. ह्यांतील मुख्य बाबी गुरचरणीं, गवत 'कौचुक,' लाख, रंग, कात वेलदोडे, हिरडे व दुसरीं चामडीं कमविण्याचीं द्रव्यें ह्या होत. किरकोळ उत्पन्नापैकीं १,७५,००० रूपयांची लाख परदेशांत गेली. यापैकीं २/३ भाग लाख इंग्रज सरकारच्या राज्याबाहेरील म्हणजे संस्थानांतील होती.

जंगल विषयक औद्योगिक संशोधन.— ब्रिटीश सरकारनें जंगलखाते स्थापल्यानंतरहि पन्नास वर्षे संशोधन कार्य सुरू केलें नव्हतें. १९०६ सालीं डेहराडून येथें 'फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट' सुरू करण्यांत आली असून त्यांत पांच संशोधन शाखा आहेत. त्या सिल्हिकल्चर (तंतुकीटसंवर्धनविद्या), फॉरेस्ट बॉटनी (जंगलविषयक वनस्पततिशास्त्र), फॉरेस्ट एकॉनमिक प्रॉडक्टस् (जंगलांतील उपयोगी पदार्थ), झूलजी (प्राणीशास्त्र) व केमिस्ट्री (रसायनशास्त्र). प्रत्येक शाखेवर एकेक तज्ज्त्र संशोधक नेमला आहे. जंगलांतील माल मुख्य इमारती व जळाऊं लांकूड हा असून बांबू, पानें, फळें, तंतू, गवत, डीक, राळ, साली, प्राणिज व खनिज पदार्थ वगैरे दुय्यम प्रतीचा माल सांपडतो.

जंगल विषयक धंदे.— अरण्यामुळें देशांतील जनतेचें व्यापारी दृष्ट्या किती कल्याण होऊं शकतें व लोकांनां भरपूर काम कसें मिळूं शकतें या प्रश्नांची पुष्कळ जणांस योग्य कल्पना होत नाहीं. जर्मनीमध्यें नुसत्या अरण्यांतील कामावर दहा लाख लोक गुंतून गेले होते आणि प्रतिवर्षी तीन कोट पौंड मिळविणारे तीस लाख लोक अरण्यांत पैदास झालेला कच्चा माल करण्याच्या कामीं लागलें होते. हा कयास पंधरा वर्षांपूर्वी करण्यांत आला होता. जंगलावर अवलंबून असणारी जंगली वस्ती सोडून दिली व हिंदुस्थानांतील या प्रश्नासंबंधी नक्की अंदाजाचे आंकडे जर मिळणें शक्य झालें तर असें आढळून येईल कीं, कच्चा माल करणार्‍या लोकांनां फाजील प्रमाणांत कामधंदा मिळूं शकतो. या कामकर्‍यांत सुतार, नावा बांधणारे, दोर वळणारे, बुट्टया करणारे वगैरे सर्व कसबी मजुरांचा अन्तर्भाव होतो. १९११ च्या खानेसुमारीवरून पाहतां ११९१३६७ लोक ब्रिटिश हिंदुस्थानांत आणि ३९४०९७ देशी संस्थानांत असे कामावर होते. जंगल राखणें, पद्धतशीर काम करणें, कच्चा माल तयार करणें व नवीन मालासंबंधी संशोधन करणें इत्यादि औद्यौगिक गोष्टीमुळें हिंदुस्थानांतील अरण्यावर अवलंबून असलेले उद्योगधंदे भविष्यकाळीं वृध्दिंगत होऊं शकतील अशी आशा करण्यास जागा आहे.

पाईन वृक्ष व राळः— हिमालयाच्या पायथ्यानजीक असलेल्या विस्तृत पाईनवृक्षांचें महत्त्व वायव्येकडील जंगल अधिकार्‍यांनां आतां कळूं लागलें आहे. वृक्षांनां फारशी इजा पोहचूं न देतां राळीचें उत्पन्न करण्याच्या फ्रेंच पद्धतीचा अवलंब करण्यांत येऊं लागला आहे. १९१९ मार्च अखेरपर्यंतचे आकडे पाहतां संयुक्तप्रांत व पंजाब मिळून एकंदर राळींचें पीक १२५६३३ मण (४६१५ टन) इतके झाले व त्याकामीं ४००० मजूर कामावर लागले होते.

कागदः— ब्रिटीश हिंदुस्थान व संस्थानें या दोन ठिकाणीं १९०४ त कागदाच्या आठ गिरण्या होत्या. प्रतिवर्षी २०१०० टन कागदाचा निपज होत असे व मजुरांची दैनिक सरासरी ४२६६ इतकी होती. १९२० त नऊ गिरण्या झाल्या. २९४०० टनांइतकी निपज झाली व ५७५९ मजूर लागले होते. टिटागरच्या गिरणीची कागदाची निपज १७९४३ टन झाली असून सर्वांत तीच गिरणी मोठी आहे. उपरिनिर्दीष्ट नऊ गिरण्यांकडून सध्याची कागदाची मागणी पुरविली जाते. १९१२-१३ सालीं सुमारें १३२५० टन कागदाचा रांधा हिंदुस्थानांत परदेशाहून आला. १९१९-२० सालीं ९४०० टनांचीच फक्त आयात झाली. महायुद्धाच्या वेळीं परदेशाहून सामान मिळण्याची अडचण पडत असे तरी एतद्देशीय गिरण्यांची निपज वाढली. यावरून शांततेच्या काळांत बरीच प्रगति दिसते. कागद करण्याच्या कामीं ज्या कच्या मालाचा उपयोग होतो त्यात सबै, भाबर वगैरे गवतांचा समावेश होतो व हें गवत, बंगाल, छोटा नागपूर, ओरिसा, नेपाळ व संयुक्तप्रांत येथील अरण्यांत पैदा होतें. चिंध्या, अंबाडीं, ताग, जुने कागद व दोर यांचा कागद करण्याच्या कामीं हिंदुस्थानांत उपयोग करितात. मंजुनामक गवताचाहि उपयोग होतो. परंतु त्यापासुन केलेला रांधा बरा नसतो. लांकूड व गवत यांपासूनच सामान्यतः रांधा करण्यांत येतो. हिंदुस्थानांतील अरण्यांत वृक्षांच्या अनेक जाती असल्यानें रांध्याच्या कामाची फार थोडी लांकडें मिळतात. बहुतेक लांकडे इमारतीच्या कामीं उपयोगिलीं जातात. बांबू व गवत यांचा मात्र बराच उपयोग होतो असें आढळून आलें आहे. निरनिराळ्या जातींच्या बांबूचे महत्त्व आतां कळून येऊं लागलें आहे. कित्येक कंपन्यांनीं बांबूंपासून रांधा तयार करण्यास सुरवात केली आहे व ब्रम्हदेश, बंगाल व मुंबई येथील जंगलखात्यानें त्यांनां कौलहि दिले आहेत. गवताचाहि उत्तम रांधा होतो असें अनुभवास आलें आहे.

आगकाडयाः— या बाबतींत हिंदुस्थान परदेशावर अवलंबून आहे. जपान, स्वीडन, नार्वे, ऑस्ट्रिया हंगेरी, बेल्जिअम व जर्मनी इतक्या देशांहून काड्याच्या पेट्या इकडे येतात. वीस वर्षांपूर्वी हा धंदा निघाला व पहिला कारखाना अहमदाबाद येथें 'गुजराथ इस्लाम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड' या नांवानें सुरू झाला. या धंद्यात अद्याप वाढ झाली नाहीं. भांडवल, संघटन, पूर्ण ज्ञान व धंदा चालविण्याची पात्रता इतक्या गुणांची सिद्धता झाल्याशिवाय हा धंदा येथें उर्जितावस्थेत येणार नाहीं. कपाशीचें लाकूड काड्या करण्यास उपयोजितात. इतर कित्येक झाडांचें लांकूडहि काड्या करण्यास योग्य असतें. ( 'आगपेटी' पहा.)

कृमिनाशक व्यवस्थाः— कृत्रिम उपायानें किड्यां पासून लांकडांचें रक्षण करण्याची पद्धत जुनीच आहे. लांकडास रंग लावणें किंवा डांबर फासणें हें रोमन लोकांस माहीत होतें. आधुनिक पद्धतींत कोलटार, क्रेओसॉट नामक तेल, लांकडांस कीड लागूं नये म्हणून लावतात. हिंदुस्थानांत या तेलाचा फारसा उपयोग अद्याप होणी करीत नाहीं.

जंगलाच्या उपयोगाच्या पद्धती.— जंगलापासून फायदा करून घेण्याच्या पद्धती निरनिराळ्या प्रांतांच्या गरजाप्रमाणें निरनिराळ्या अमलांत आणाव्या लागतात. जंगलांतून तेथील उत्पन्न काढून नेण्याच्या पद्धतींचे वर्गीकरण पुढील सदरांत करावें लागतें.- (१) खुद्द सरकारचे अधिकारी, (२) खरेदीदार, (३) हक्कदार. पूर्वी येथें स्वतंत्र खात्याची व्यवस्था नसल्यामुळें जंगलें व्यापार्‍यांस मोकळीं करून देत असत. ते आपल्या कारभारांत त्यांच्या बर्‍याकडेहि लक्ष देत नसत किंवा ते काढून नेलेल्या मालाबद्दल सराकारास योग्य मोबदलाहि मिळूं देत नसत. पंजाब, ब्रम्हदेश, मध्यप्रांत व संयुक्तप्रांत यांतील डोंगरी अरण्यांमध्यें या पद्धतीचे कुपरिणाम अजुन दृष्टीस पडतात. या पद्धतीत कंत्राटदारांनीं (ठेकेवाले) जंगलांतील उत्पन्न विक्रीच्या जागेकडे नेत असतां त्यांच्या बर्‍यावाईट कामावर केवळ देखरेख ठेवणें यापलीकडे सरकारी अधिकारी कांहीं करीत नाहींत. हिंदुस्थानांत पूर्वी जंगलांत लांकडें तोडण्याबद्दल भयमतादिशिल्प ग्रंथांत लिहिलें आहे कीं, राजे, पाटील, सुतार, लांकूडतोडे वगैरे यांस यथाभाग कर व देणग्या देऊन व कुर्‍हाडी दूध, तेल व तूप यांनीं पाजवून घेऊन द्रव्यार्थी मनुष्यानें जंगलांत जावें व इष्ट वनस्पती तोडावी. मुहुर्ताचा खांब सरळ व चौरस करून व पांढर्‍या वस्त्रानें झांकून त्यानें तो गाड्यावर घालावा. नंतर त्यानें तो कारखान्यांत नेऊन वाळुवर ठेवावा व तो वाळेतों त्यानें तो पूर्वेस किंवा उत्तरेस तोंड करून ठेवावे व त्या लांकडाचा उपयोग सहा महिन्यापर्यंत करूं नये. अशाच तर्‍हेचा मजकूर राजवल्लभांत आहे.

हल्लींच्या पद्धती.— हल्ली इमारती लांकडें खरेदीदारांमार्फत काढुन नेण्याच्या कामाचें नियत्रंणहि देशाचाराप्रमाणें अनेक प्रकारें करतात. ब्रम्हदेशांतील 'बाँबें-बर्मा ट्रेडिंग कोर्पोरेशन' सारख्या मोठ्या खरेदीदार मंडळीस फार मोलवान झाडें तोडून नेण्याचा परवाना कांही शर्तीवर देतात. उदाहरणार्थ अशा मंडळीनें ठराविक महसुलाच्या नाक्यांवर राजभाग (कर) देण्याची तजवीज केली पाहिजे, वगैरे. कमी महत्त्वाच्या इमारती लांकडाच्या खरेदीदारांस लांकडें तोडून नेण्यास परवाना (पास अथवा लायसेन्स) देतात. हा परवाना देतांना प्रथमच खरेदीच्या किंमतीचा कांही भाग वसूल करतात. ह्या दोन्हीहि पद्धति जंगलाच्या संरक्षणार्थ उत्तम प्रकारच्या नसोत, पण ह्या व्यापार्‍यांच्या गरजांस व लागणार्‍या देखरेखीस जशा पाहिजेत तशा आहेत. कारण या पद्धतींत फक्त लांकडाच्या उचलसाचलींत जास्त मोलवान लांकूड द्यावयाचें नाहीं एवढी विशेष खबरदारी घ्यावयाची असते. अरण्यांतील किरकोळ उत्पन्न जमा करून नेण्याकरिता खरेदीदारांस असल्याच पद्धतीचे परवाने (पास) देतात; किंवा उत्पादक प्रदेशाचे मक्ते देतात; किंवा नियमित मुदतीने माल गोळा करण्याबद्दल वैयक्तिक परवाने (लायसेन्स) देतात. अनेक वेळां गुर चरणीबद्दल फी मुलकी खात्यांतून (लँड रेव्हिन्यू डिपार्टमेन्ट) व कधीं कधीं जंगल कामदरांमार्फत (फॉरेस्ट ऑफिसर) वसूल करण्यांत येते.

हक्कदारास मोफत माल देण्याची मुभा जी द्यावयाची ती बहुतेक सर्वस्वी जंगलखात्यांतील मागणीवर अवलंबून असते. कांही प्रांतात असल्या हक्कदार लोकांस बंद जंगलांत पुर्‍या हक्काची बजावणी करावी लागत नाहीं. कारण त्यांस आपल्या गरजा भागविण्याची पुरी सोय जवळच्या लोकाच्या जंगलांत पाहिजे तशी आहे. दुसर्‍या कांही जंगलात जेथें त्याच्या उत्पन्नावर पुरा ताणबसला आहे, त्यांत इमारती लांकडांची फाजील वाहतुक न व्हावी म्हणून सक्त पहारा करावा लागतो. ह्या प्रकारामधील नियंत्रणाचे नियम ठरवावे लागतात. एका बाबतींत नोंद, वह्या व परवाने लागत नाहींत, पण दुसर्‍या बाबतींत ते परवाने देण्यावर व त्यांच्या नोंदीवर नजत ठेवावी लागते.

हिंदुस्थानांत जंगलाचे उत्पन्न वसूल करण्याच्या पद्धती प्रत्येक प्रांतांत निरनिराळ्या आहेत. व त्यावरून प्रत्येक प्रांतांतील लोकरूढीप्रमाणें अनेक प्रकारचे नियम करण्यांत आले आहेत.

हल्लीच्या सरकारास जंगलाची किंमत किती आहे याचा अंदाज जंगलापासून होणार्‍या पैशाच्या जमेवरून बराच करतां येईल. (कोष्टक पहा). संरक्षण व सुधारणा झाल्यामुळें सरकारी जंगलाचें उत्पन्न इतकें वाढलें आहे कीं तें पुढील वाढती मागणी भागवून उरण्यासारखें आहे.

जंगलच्या उत्पन्नाच्या मोफत देणग्याः— जंगलापासून हल्लींच्या सरकारास जो एकदंर महसूल होतो, त्याची एकंदर निर्गतींशी तुलना करीत असतां ह्या गोष्टीचें स्मरण ठेविलें पाहिजे कीं सरकारी जंगलांतील इमारती लांकडें व इतर उत्पन्न त्याजवळ रहाणार्‍या लोकांस फुकट अथवा कमी दरानें देण्यांत येतें. इ.स.१९०१ त ह्या देणग्यांची किंमत निदान सरकारी जंगलाच्या एकदंर उत्पन्नाचा शेंकडा १६ भाग होतो व लोकांच्याकडून जंगलांच्या जमीनींतून राजभाग (कर) दिल्यावाचून जीं इमारती लांकडें व दुसरी अगणित उत्पन्नें नेण्यांत आलीं, त्याची परिगणना ह्या हिशोबांत झाली पाहिजे. हें लक्षात ठेविलें पाहिजे की, हल्लीच्या ब्रिटिश सरकारच्या प्रत्यक्ष अमलाबाहेर या आपल्या देशांत पुष्कळ मोठमोठीं जंगलें आहेत. ही मालमत्ता देशी राजांची अथवा खासगी व्यक्तींची आहे. ह्या अरण्याच्या आंकड्यांचीं कोष्टकें मिळणे कठीण आहे. कारण त्या जंगलांची अजून फारकरून पहाणी करण्यांत आली नाही; एवढेंच नव्हें तर त्यांचा कारभारहि निराळा ठेवण्यांत येत नाही. पण त्याचा पुढील वृत्तांत वाचकांस कांही कौतुक उत्पन्ना करण्यासारखा होईल असें वाटतें. ज्या महत्वाच्या देशी संस्थानांत जंगलाच्या व्यवस्थेची थोडीबहुत पुरी तजवीज झाली आहे, त्याचा आपण प्रथम विचार करूं :-

(१) हैद्राबादः- ह्या संस्थानांत सरकारी जंगल सुमारें ५००० चौरस मैलांचे आहे. ह्या जंगलापासून त्या सरकारास २,८०,००० रूपयाचें उत्पन्ना इ.स.१९०० त झालें व त्यांपैकी निम्में उत्पन्न त्याच्या खर्चांत गेलें. ह्या जंगलच्या हद्दी कायम होऊन ठराव झाले कीं, हें उत्पन्न फार वाढणार आहे. हें करण्यास पुष्कळ वाव आहे.

(२) म्हैसूरः- ह्या संस्थानांत बंद जंगल २००० चौरस मैलांचे आहे. त्याचा वसूल इ.स.१९०० त १३१/२ लाखांचा होता व निव्वळ महसूल सुमारें ९ लाखांचा होता. यांतील ३/४ महसूल चंदनाच्या लांकडांचा होता. यांत आगीपासून जंगलाचें रक्षण करण्याची व्यवस्था १५०० चौरस मैलांत आहे.

(३) काश्मीरः— ह्यांत २,१८० चौरस मैल सरकारी कायम जंगल आहे. ह्याचें आगीपासून रक्षण करण्याची सोय आहे. इ.स.१९०१ त ह्याचा महसूल ८,८०,००० रूपये आला व ह्यावर खर्च ५,८०,००० रूपये झाला.

(४) जोधपूरः- ह्यांत इ.स.१९०१ त जंगलाचें क्षेत्र ३४३ चौरस मैलांचें होतें. ह्याचें उत्पन्न सुमारें २०,००० रूपयें झालें व याला खर्चसुद्धां इतकाच लागला.

 सरासरी जंगल व जंगल खात्याचा जमाखर्च १९१८-१९

(५) त्रावणकोरः - ह्यांत बंद जंगल १८०० चौरस मैलांचे आहे. हें बहुतेक आगीपासून रक्षिलेलं आहे. इ.स.१९०१ त ह्याचें उत्पन्न ५१/२ लाखांचे व खर्च सुमारे २ लाखांचा होता. ह्या संस्थानांशिवाय कांही लहान संस्थानांत मोठमोठीं जंगलें आहेत. तीं एकंदर ४२००० चौरस मैल क्षेत्रफळाचीं आहेत, व ब्रिटिशांच्या राज्यांत खासगी व्यक्तींची जंगले ७७,००० चौरस मैल क्षेत्रफळाचीं आहेत. यावरून कोणी असें समजूं नये कीं, ही झाडून सर्व जंगले किर्र दाट झाडीनें भरलेली आहेत. यांतील कांहीत डोंगरांच्या उतरणीवर झुडपांचे जंगल आहे. दुसर्‍या कांही ठिकाणीं जंगलाचें मुख्य उत्पन्न म्हटलें म्हणजे गवत किंवा दुसर्‍या किरकोळ पदार्थांचे आहे. पण त्यांत मोलवान इमारती लांकडांची झाडें असणारेंहि जंगल आहे; व साधारणतः पाहतों सरकार खासगी जंगलाच्या कामांत बिलकूल ढवळाढवळ करीत नसल्यामुळें व त्या जंगलाच्या संरक्षणाकरितां मुद्दाम कायदा केला नसल्यामुळें त्यांची जोपासना मालकांच्या अक्कलहुषारीवर अवलंबून आहे.

जंगलांतील लोकांच्या जाती व त्यांची सामान्य आर्थिक स्थिति.- मागील संक्षिप्‍त वर्णनावरून हिंदुस्थानांत सरकारी जंगलांची उत्पत्ति कशी झाली? व तिची व्यवस्था हल्लीं कशी चालली आहे हे समजलें.पण ह्या बाबतींत पूर्वापार व्यवस्था कशी चालत आली याबद्दल फार थोडें वर्णन दिलें आहे. सरकारी जंगलें उत्पन्न करतांन प्रथम शोध करून जंगलांच्या कामास हात घालीत असतां आपलें काम सुधारणेच्या लाटेपुढे लोटत जाणारें आहे असें जंगलाच्या कामगारांस आढळतें. कारण ही सुधारणा सुस्थित प्रदेशांतील वाढत्या बरकतीनें झालेली असते. पुढील गोष्टींची तरतूद करूं लागलें असतां त्याची गांठ जंगली लोकांशी पडते. सदरहू लोक भित्रे किंवा क्रूर, साधे किंवा कपटी असोत, पण त्यांतील प्रत्येकांत एक विशेष आढळतो. तो हा कीं त्यांच्या मूळच्या रहाणींत रूढी व संवयी यांशी विरोध करणारी कोणतीहि गोष्ट कोणीहि केली कीं, ते त्याचा अत्यंत हेवादावा करूं लागतात. कारण, ही नवीन सुधारणा आली कीं, आपली यापुढें धडगत लागावयाची नाहीं. तिजपुढें आपल्यास एक तर नामशेष झालें पाहिजे किंवा आपल्यास आपल्यापेक्षां जास्त चिवट लोकांच्या संख्येत गडप तरी होऊन गेलें पाहिजे असें त्यांस वाटूं लागते. ह्यांत हिंदुस्थान सरकारचें धोरण ह्या जंगलांतील जातीच्या रहाणींत एकदम जमीन अस्मानाचें अंतर जेणेंकरून पडेल असें कोणतेंहि कृत्य करावयाचें नाहीं, पण सहानुभूतीनें व गोडीनें त्यांचा विश्वास संपादन करावयाचा व याप्रमाणें स्वतःच्या पायांवर उभा राहणारा त्यांचा समाज स्थापन करावयाचा व आजपर्यंत जे त्यांच्यांतील तंटे केवळ 'बळी तो कान पिळी ह्या तत्वांवर मिटत असत, त्यांचा निकाल आपल्या मध्यस्थीच्या न्यायानें होईल तो त्यास कबूल करावयास लावाव याचा अशा तर्‍हेचें आहे. जसें धोरण कृतींत उतरेल, तसे त्या जंगलांच्या संरक्षणाच्या व पुनरूज्जीवनाच्या कामांतील यश किंवा अपयश अनेक वेळां अवलंबून असतें. कांही विशेष अपवाद सोडून दिले तर ह्या जंगलांतील जमातींतले बहुतेक लोक आपल्या अन्नाच्या पुरवठ्यांत भर घालण्यास कांही अशी शेतीवर अवलंबून असतात. मग त्यांची पारध करणें, मासे मारणें, व जंगलांत उत्पन्न होणारे जिन्नस जमा करणें हा केवढाहि महत्वाचा धंदा असो. ह्यांतील बहुतेक लोक फिरते असतात. ते पारधींच्या प्रांण्यांच्या शोधार्थ आपल्याकडील कातकरी, राधरी फासेपारधी वगैरे लोकांप्रमाणें जागोजाग फिरतात व आपल्या तूर्तातूर्तच्या मुक्कामाच्या ठिंकाणी पूर्वी सांगितल्याप्रमाणें दळ्याची उडती शेती करतात. ह्यांच्याजवळ स्वतः केलेली किंवा मिळवलेली उत्तम शस्त्रें असतात, व त्यांच्या अंगावर तांबडें किंवा हिरवें गोंदकाम असतें. हें उघड आहे कीं, ज्या मोठ्या प्रदेशभर हे जंगली लोक भटक्या मारीत रहातात, त्यांचे नियंत्रण केल्याबरोबर त्यांच्या अन्नाच्या पुरवठ्यांत तुटवडा पडतो व असें झालें असतां त्यांच्या हळूहळू कायमची शेती करणार्‍या जमाती खेड्यांत राहूं लागणें संभाव्य असतें. व असल्या खेड्यांतील लोक प्रथम हरएक बाबतींच्या आपल्या गरजा स्वतःच्या स्वतः भागविणारे असले, तरी कालांतराने त्यांच्या स्थायिक वस्तींत त्यांच्या पूर्वीच्या जंगलांतील आयुष्यक्रम व उद्योग यांची जरूरी त्यांस बिलकूल न राहिल्यामुळें आपोआप अंतर्धान पावतात.

(संदर्भ ग्रंथ.- राजवल्लभ (अप्रकाशित); मयमतः बॉम्बे क्रॉनिकल (८-११-२२); ॠग्वेद संहिता; अरण्यसंहिता-सामवेदी; थत्ते-जंगलाची जोपासना ( अप्रकाशित); एन्साल्को-ब्रिटानिका; महाभारत-उपसंहार; कौटिलीय अर्थशास्त्र; सरडी.ब्रँडिसकृत 'इंडियन फॉरेस्ट्री;' ई.सी. कोटस्कृत 'इंडियन फॉरेस्ट झूलजी;' ए. पी. स्टेबिंगकृत 'इंज्यूरियस इन्सेक्टस ऑफ इंडियन फॉरेस्टस्;' डब्ल्यू.आर.फिशरकृत 'मॅन्युअल ऑफ इंडियन फॉरेस्ट, बॉटनी; बेडन-पावेलकृत 'फॉरेस्ट लॉ; 'इंडियन ईयर बुक;' इंपीरियल गॅझि).

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .