विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जंगम — ही लिंगायत गुरूची जात आहे. जंगम लिंगाचे (देवळातील स्थावर लिंगाचे नव्हे) उपासक हे जंगम. प्रत्येक लिंगायताला गुरू हा असावाच लागतो. त्यामुळें या जंगमवर्गाला बरेंच महत्त्व आलें आहे. गुरूस्थल (विवाहित) आणि विरक्त (ब्रह्मचारी) असे या जंगमांचे दोन ठोकळ भेद आहेत. गुरूस्थल जंगमांकडे गृहसंस्कारांचें काम असतें. विरक्त जंगम वेदांतादि धार्मिक विषयांचे अध्ययन अध्यापन करतात. दोघेहि मठवासी असतात. जंगमांत पांच संप्रदाय आहेत. (१) एकोरामाध्य (२) पंडिताराध्य, (३) मरूलाराध्य (४) रेवणाराध्य आणि (५) विश्वाराध्य. लिंगाईत लोक असें मानतात की या पांच संप्रदायांचे उत्पादक शिवाच्या पांच मुखांपासून उत्पन्न झाले होते, व यांनीं लिंगाईत पंथाची प्रवृत्ति करण्यांत फार मेहनत घेतली होती. या पांच संप्रदायांचे जंगम एकत्र कधीं जमत नाहींत, परंतु त्यांमध्ये परस्पर हेवा किंवा स्पर्धा नाहीं. गृहस्थाश्रमी लिंगाईत जंगमांस फार पवित्र मानतात, व ते कोणत्या संप्रदायाचे आहेत, याचा विचार न करता सर्वांची पूजा करतात. प्रत्येक संप्रदायांत १३ भेद आहेत. या भेदांस ते बागी म्हणतात. मुख्य पांच संप्रदायांचा तपशील पुढीलप्रमाणें.—
संप्रदाय | उत्पत्ति | मुख्यस्थान | गोत्र | सूत्र | प्रवर |
एकोरामाध्य | द्राक्षरामक्षेत्र | कदार | भंगी | लंबक | वीरशैव |
मरूलाराध्य | श्रीसिधवत | उज्जैन | नंदी | वृष्टिक | ... |
पंडिताराध्य | शुद्रकुंडी | शैलपर्वत | वृषभ | मुक्तगुच्छ | ... |
रेवनाराध्य | कोलुपकिश | कडलीपुर | वीर | पद्विदि | ... |
विश्वाराध्य | विश्वेशलिंग | कल्लिपाक | स्कंद | पंचवर्ण | ... |
विवक्षित संप्रदायांतील एकाच भेदाच्या किंवा बगीच्या जंगमांत परस्पर लग्नें होत नाहींत. निरनिराळ्या प्रांतांत जंगमांचे निरनिराळे प्रकार आहेत. दक्षिण महाराष्ट्रांत विरक्त, पट्टदेवरू, अय्या, चरंती आणि मरी असे पांच प्रकार चे जंगम आढळतात. विरक्त जंगम लंगोटी घालतात. आखूड बाह्यांचा पण सैल व लांब झगा घालतात आणि आपला बहुतेक काळ अध्ययनांत व भक्तिमार्गात घालवितात. पट्टदेवरू जंगम लंगोटीच्या ऐवजीं धोतर नेसतात व विरक्तांपेक्षां कमी वैराग्यशील असतात. अय्या जंगम लग्नें करतात आणि मुख्यत्वेकरून भिक्षेवर निर्वाह करतात. भिक्षेस जातांना पायांत गुडघ्याखालीं जंग नांवाचा घुंगूर बांधितात, हातात वेत्रदंड घेतात व भगवीं वस्त्रें अंगावर घेतात. चरंती जंगम नेहमीं एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणीं फिरतात आणि मठाच्या खर्चाकरिता गृहस्थाश्रमी लिंंगाईतापासून पैसा गोळा करतात. मरी जंगम अविवाहित असतात व ते जंगमाचे शिष्य असून त्यांची सेवा करितात. विरक्त मेल्यावर त्याच्या शिष्यांत जो मोठा विद्वान व योग्य मरी असेल त्यास त्याच्या स्थानीं स्थापितात. वाणी आणि चम या वर्गांतील लिंगाईत जंगम होऊं शकतात; परंतु जेव्हां जंगमास मुलगा किंवा दुसरा कोणी आप्त नसतो तेव्हां मात्र तो या वर्गांतील मुलास दत्तक घेतो. हा मुलगा विधवेच्या पोटचा नसुन, अविवाहित असावा लागतो. अय्याजंगम न्हावी, परिट आणि महार या तीन जातींच्या पैकीं लिंगाईतांशिवाय इतर लिंगाइतांच्या घरीं जेवतात. जेव्हां जंगम मोठे प्रयोजन करतो तेव्हां या तीन वर्गाच्या लोकांशिवाय इतर सर्व लिंगाईत येऊन एकत्र जेवतात. ज्या घरांत किंवा इमारतींत मठदय्या म्हणजे तेथला मुख्य जंगम राहतो, त्यास मठ असें म्हणतात. मठाधिकार्यास कांहीं सरकारांतून उत्पन्न असतें; परंतु त्यास तेथच्या लिंगाइतांपासून मोठी मिळकत असते. लग्नकार्ये झालीं, किंवा दुसरीं कांहीं धर्मकृत्यें झालीं, म्हणजे मठाधिकार्यास देणग्या देतात, आणि व्यापारी लोकहि आपल्या मिळकतीपैकी कांहीं अंश मठाकडे देतात. तसेंच कापड विणणारांपासून कपडे, आणि जमीनदार व शेतकरी यांच्याकडून धान्य मठाधिकार्यास मिळतें.
हे बदामी कपडे घालतात. जंगम गळ्यांत रूद्राक्षाच्या मोठमोठ्या माळा घालतात, व भस्महि पुष्कळ लावतात. गळ्यांत किंवा कंबरेस शिवाचें लिंग बांधतात. हें लिंग सोनें, चांदी, तांबें किंवा पितळेचें केलेलें असतें. जर कोणा स्त्रीपुरूषाचें लिंग हरवलें तर तें गुरूनें पुन्हां गळ्यांत घालीपर्यंत कांहीं सुद्धां खातां किंवा पितां कामा नये. त्या लिंगाची पूजा त्रिकाल बेल व भस्मानें केली पाहिजे. महादेवाशिवाय इतर देवास हे भजत नाहींत. जंगम लोक कडक शाखाहारी आहेत. हे लिंगाइतांखेरीज इतरांच्या हातचें अन्न खात नाहींत. जेवण झालें म्हणजे पान अगदीं स्वच्छ करून पाण्यानें धुवून तेंच पाणी तीर्थ म्हणून पितात. मूल झालें म्हणजे हे दुसर्या जंगमास बोलावून त्याचे पाय एका ताटांत धूतात व तें पादोदक तेथें हजर असलेल्या माणसांच्या अंगाला चोपडतात व घरांच्या भितींवर शिंपडतात. मग त्या जंगमाचे अंगठें एका पेल्यांतील पाण्यांत बुडवून त्यांत त्याच्या गळ्यांतील शिवलिंग बुडवितात. तो जंगम स्वतः तें पाणी पितो व इतरांस तीर्थ म्हणून देतो. या विधीस 'करूणा' म्हणतात. मग नवें शिवलिंग त्या तीर्थात बुडवून तें मुलाच्या गळ्यांत बांधतात व एक दोन मिनिटांनीं काढून तें मुलगा मोठा होऊन गळ्यांत घालण्यास योग्य होईपर्यंत आईजवळ ठेवण्यास देतात. प्रेतांस आसनमांडी घालून शिवलिंग हातांत देऊन पुरतात. शंभर वर्षांपूर्वी जंगम गुरू आपल्या शिष्यांच्या गवीं गेला म्हणजे ज्या घरांत तो जाईल तेथील पुरूष तो असेपर्यंत आपले घर सोडून दुसरीकडे खुषीनें जात व घरांतील बायकांस त्याचा सर्वप्रकारें पाहुणचार व सेवा करण्यास सांगत; व बायका रात्रंदिवस गुरूची सेवा करीत. त्याबद्दल त्या स्त्रियांच्या नवर्यांस कधींच हेवा वाटत नसे. गांवातील टवाळ लोक मात्र नेंहमी म्हणत कीं ज्या घरांतील बायका तरूण व सुंदर असत त्याच घरांत जंगम राहाण्यास जाई असें अबे ड्युब्वा यानें वर्णन केलें आहे असें रसेल व हिरालाल आपल्या ग्रंथांत लिहितात. हें सध्यां अशक्य असून कदांचित काल्पनिक असावें. जंगम हें नांव कोणाहि लिंगायताला लावितात. त्यामुळें जंगमांची संख्या फार मोठी (१९११ त ११३६९२) दिसते. बहुतेक वस्ती मद्रास इलाख्यांतच आहे. [भुं. गॅ.; रसेल व हिरालाल; ट्राइब्स अँड कास्टस इन सी.पी. फर्कुहर-रिलिजिअस लिटरेचर ऑफ इंडिया.]