विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जखमा — त्वचेचा भंग होऊन ती विदीर्ण होते त्यास हें नांव आहे. तथापि ठेंचाळणें, मुरगळणें, व त्यामुळें अंग काळेनिळें होणें या इजांमध्यें त्वग्भंग नसला तरी आंतील मांसल भागास त्यायोगें जखमा झालेल्या असतात. जेथें त्वचा विसविशीत असते तेथें सूज व काळेनिळें विशेष होतें. पण शरीराचे जे भाग कठिण आहेत तेथें हीं लक्षणें प्रमुख नसतात. आंतील मांसल भागांत केशवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होतो हें या काळेनिळेपणाचें कारण व तें पुढें हिरवें पडून नंतर नाहीसे होतें. हा रक्तस्त्रावं बराच असल्यास त्यास रक्तगांठ म्हणतात. ठेंचाळलेल्या भागास उपचारः— त्यावर थंडगार पट्टी ठेवावी. म्हणजे त्वचेखालील रक्तस्त्राव थांबतो. बहुशः सर्व प्रकारच्या लहानमोठ्या ठेंचाळण्यांतील सांखळलेलें रक्त जिरून नाहीसें होतें. पण कधी कधीं मात्र त्यामध्यें पूयवृद्धि होते व मग तें गळवाप्रमाणें फोडावें लागतें. अशा प्रकारच्या जखमांस अव्यक्त जखमा म्हणावें व पहिल्या प्रकारच्या जखमांस व्यक्त जखमा म्हणावें. त्यांचें भेद असे आहेत. (१) शस्त्रव्रण, (२) विदर्णिव्रण, (३) विद्ध किंवा छिद्रितव्रण आणि (४) गुलीप्रक्षेपिणीव्रण. (१) शस्त्रव्रणाच्या बाजू साफ कापलेल्या असून रक्तवाहिन्याहि कापल्या गेलेल्या असतात. (२) ज्या जखमांच्या दोन्ही बाजू साफ कापल्या नसून तुटक्या असतात त्यांनां हें नांव आहे. यंत्रे अगर बिनधारेच्या मोठ्या यंत्रांचा आघात बसून या होतात. (३)विद्धव्रण म्हणजे जखमेच्या रूंदीपेक्षां खोली अधिक असते त्यास म्हणतात व अणकुचीदार शस्त्राच्या योगानें तो केला जातो. त्यापासून रक्तवाहिनी फुटल्यामुळे उदर, छातींतील एखाद्या महत्त्वाच्या इंद्रियास जखम होण्याचा संभव असतो. शिवाय या असल्या जखमांत नकळत दूषित जंतू तेव्हांच शस्त्रमार्गे अगर अन्य तर्हेनें जातात, व ती जखम बिघडते. या खोल जखमा खोलपर्यंत नीट दोन्ही बाजू शिवतां न आल्यामुळें नीट भरून येत नाहीत.
पाश्चात्य उपचारः— शस्त्रव्रण चांगला साफ करून रक्त थांबविणें व आंत कांच, शस्त्राचें टोंक वगैरे बाह्यपदार्थ असतील ते काढून दोन्ही बाजू रेशमी दोर्यानें, क्याटगटनें, किंवा रोप्य तारेनें शिवतात. दूषित जंतू आंत राहिले नसले तर जखमेच्या दोन्ही बाजू मिळून येऊन वांकडा तिकडा वण तेथें न रहातां व्रणविरोपण होतें. (२) विदीर्ण व्रणांत पू होणें, कुजणें, धावरें होणें किंवा धनुर्वात यांपैकी कांहीं होण्याचें भय असतें. या जखमा वाकडे तिकडे वण राहून बर्या होतात. व त्या बर्या होण्यास वरील दोष असतील किंवा नसतील त्या त्या मानानें अधिक किंवा कमी वेळ लागतो. असल्या जखमा स्वच्छ करण्यास कठिण जातात. त्यासाठीं कारबालिक आसीडाच्या धावनाचा उपयोग करावा व वेडेवांकडे फाटलेले, तुटलेले जखमेचे भाग कातरून काढून जखमेंतून निचरा होण्यासारखी तजवीज करावी. अशा जखमांनां एकदम टाक्यांनीं शिंवून टाकणें बरें नव्हें; तर त्यांत आयडोफार्मचा जाळीदार बोळा घट्ट बसवून कांहीं दिवसांनीं जखम लाल व निरोगी दिसूं लागली व जखमेच्या तोंडापर्यंत भरून आलीं म्हणजे येथें दुसरीकडील चामडी बसवून लवकर जखम बरी करावी. अशा जखमांतील मांस सडण्यास आरंभ झाला किंवा आंत अस्थिभंग अथवा अस्थीवरील मांसस्थान भ्रष्ट झाले असेल व जखम दूषित झाल्याचीं लक्षणें उघड असलीं तर तो भागच ( हात, पाय, बोट इ.) कापून काढणें जरूर असतें. (३) विद्ध जखमांत आगुंतक कण, पदार्थ वगैरे शिरले असतील ते कारबालीक धावनाच्या पिचकार्यांनी बाहेर आणावेत. क्ष किरणांच्या योगानें सुया वगैरे पदार्थ कोठें अडकून मांसांत बसले असतील ते अगोदर निश्चित करतां आल्यानें बराच त्रास वांचतो. जखमेंत एखादी रक्तवाहिनी फुटली असल्यास ती अगोदर बांधावी, व त्यासाठी जरूर तेवढी जखम आणखी मोठी करावी. हात, पाय, लुला पडल्यास एखादा मज्जातंतु तुटला असेल त्याचीं टोकें जोडून शिवावी. नंतर निचरा होण्यास पुरेशी तजवीज ठेवून जखमेंत आयडोफॉर्मयुक्त जाळीचा बोळा घट्ट बसवावा. (४) बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा— जर त्या मॉसर किंवा ली मेटफर्ड असतील तर त्यांत रक्तस्त्राव फारसा नसतो. जेथें गोळी शिरते तेथें बारिक छिद्र असतें व बाहेर पडते तेथें भेग असते. घाणेरड्या कपड्यांच्या योगानेंच कायती ही जखम बिघडण्याचा संभव असतो, किंवा आंत एखादी रक्तवाहिनी फुटली असल्यास ती अगोदर बांधून घ्यावी लागते. या गोळ्या फक्त माणूस जायबंदी करतात. व त्या प्राणघातक नसतात. थोडे अपवाद वगळले असतां हाडांतूनसुद्धां ही गिरमिटानें सुंदर वाटोळें छिद्र पाडल्याप्रमाणें आरपार निघून जाते पण अस्थिभंग होत नाहीं. एखाद्या वेळीं मात्र हाडांचा चुराडा होतो. उदरांत व आंतड्यांत गोळी शिरली असतां शेजारील आंतडें त्या गोळीनें झालेल्या बारीक छिद्रास चिकटतें व भोंक बुजतें. भयंकर व मोठी छिंद्रें पाडणारी गोळी हेन्री मार्टिनीची. डमडम गोळी शरीरांत रूतून बसून फुटून पसरून मांस अस्थीचा फार नाश करते. कुलपी गोळे फुटून विदीर्ण जखमा करतात. छरे डोळ्यासारख्या ठिकाणीं लागले तर भयंकर इजा करतात. त्वचेला गोळी लागून गेल्यास त्वचा भाजल्यासारखी काळी होते. या गोळ्यांपासून रक्तस्त्राव, मेंदूस धक्का व जखम दूषित होणें ही तीन मुख्य भयें असतात.
आ यु र्वे दी य चि कि त्साः— ज्या जखमेंत तीव्र व्यथा असेल ती ताबडतोब जेष्टमधाचें तूप किंवा बलातेल किंचित् ऊन करून त्यानें शेकावी. त्यावेळीं क्षतांतील ऊष्मा वाढलेला असतो तो कमी करण्याकरतां तुरट, थंड, मधूर, व स्निग्ध असे लेप करावे. लांब लांब असलेल्या जखमा सांधण्याकरतां त्यांवर विशेषेंकरून मध तूप लावावें आणि पित्तनाशक थंड उपचार करावे. ज्या जखमांत क्षोभ झाला असेल त्यावर वमन, विरेचन, उपास, पथ्यभोजन, रक्त काढणें हे उपाय करावे. घृष्ट व विदलित यांवर हेच उपाय विशेषतः करावे. कारण त्यांत रक्तस्त्राव कमी झाल्यामुळें त्या जखमा फार लौकर पुवळतात. बाकीच्या जखमांत बहुधा रक्त अतिशय जातें. रक्तक्षयानें वायु कुपित होऊन अतिशय वेदना करूं लागतो. त्यावर स्नेहपान, परिषेक, शेक, आणि वातनाशक-औषधांनीं सिद्ध केलेला स्नेहबस्ती हे उपाय करावे. याप्रमाणें ही सात दिवसांची जखमेची चिकित्सा सांगितली. सात दिवसांनी त्याचा क्षोम कमी झाला की पूर्वी सांगितलेली व्रणाची चिकित्सा करावी.
ही सामान्य चिकित्सा आहे. विशेषेकरून धृष्टांत (घांसलेल्या जागीं) लगेच ठणका बंद करून वर चूर्णे लावावी. अवकृत्तावर कल्क लावावें. विछिन्न व प्रविलंबित यांवर योग्य रीतीनें शिवून कापसाचीं घडी बसवून दाबून बांधावें. डोळा फुटला असल्यास तो बरा होत नाहीं, न फुटतां लोंबत असल्यास शिरांस इजा न होईल अशा रीतीनें तो जागच्या जागींच बसवून त्यांवर कमळाचें पान ठेवून हातानें दाबावा. नंतर त्यावर शेळीच्या तूपाचे सेंचन, नस्य व तर्पण करावें. हें सर्व प्रकारच्या डोळ्यांतील आघातांवर हितावह आहे. गळा दाबल्यामुळें डोळा खोल गेला असल्यास वांति आणणें, उम्हासे आणणें, शिंका आणणें, श्वास बंद करणें, आणि फुटक्या डोळ्यांवरील उपाय हे करावे. कान तुटून पडला असल्यास तो शिवुन तेल लावावें. वाटी कापली असून त्यांतून वायू जती बाहेर येत असला तर ती जागच्याजागीं सारखीं बसवून जवळजवळ टांकें मारून बांधावी. त्यावर शेळीच्या तुपाचें संचन करावे. रोग्यांस उताणा हालू न देता निजवावा आणि निजल्यानिजल्याच खाऊं घालावें. हातापायांस आडवा व तिरपा घाव लागल्यास तो नीट जेथल्या तेथें बसवून शिवून तेथें जाड व घट्ट वस्त्र वाटोळें गुंडाळून बांधावे. जखम बरोबर जूळत नसल्यास चामड्याचा गोफणाबंध करावा. अंडास आघात लागल्यानें ते लोंबू लागलें असतां पायांवर व डोळ्यांवर पाणी शिंपडून अंड नीट बसवून तुन्नसेवनीं नामक शिवणीनें शिवून कंबरेस पद्य बांधून अंडास गोफणाबंधानें बांधून अडकवून ठेवावें. यांवर स्नेहाचें सेंचन करू नये. कराण स्नेहानें तेथील व्रणांत पू होतो.
हातपाय सफ तुटून पडला असल्यास त्याचें थोटूक (राहिलेला भाग) युक्तीनें तेलाने भाजून त्यास टोपीसारखा बंध बांधावा आणि नंतर व्रणाप्रमाणें उपचार करावे. विद्धावर (कोठ्याशिवाय इतर ठिकाणी टोचलें जाणें) आंतील शल्य काढून व्रणाप्रमाणें चिकित्सा करावी. विदलितावर भंगाप्रमाणें चिकित्सा करावी. डोक्यांत शल्य गेलें असल्यास तें काढून त्या ठिकाणी व्रणांत केसांची वळकटी घालावी. ती न घातल्यास मेंदूचा स्त्राव होऊन त्यामुळें कुपित झालेला वायू रोग्यास मारतो. जसजसा व्रण भरत जाईल तसतसा हळूहळू एक एक केंस काढून टाकावा आणि कदाचित मेंदूचा स्त्राव झाल्यास ती उणीव भरून काढण्याकरितां दुसर्या प्राण्यांचे मेंदु खावे. डोक्याशिवाय इतर ठिकाणीं लागलेलें शल्य काढून काढून त्या ठिकाणीं स्नेहांत बुडविलेली वात घालवी. फार लांब व खोल गेलेलें बारीक तोंडाचे आणि ज्यातून रक्त वाहिलें आहे अशा व्रणांत बारीक तोंडाच्या पिचकारीनें ताजें कढत कढत तिळांचे तेल घालावे.
शल्यानें कोठा फुटून अमाशयांत रक्त जमलें असल्यास वमन आणि पक्वाशयांत रक्त जमल्यास विरेचन व स्नेहरहित उष्ण अशा रेचक औषधांचा बस्ती द्यावा. जव, वरी व कुळीथ यांच्या कढणाबरोबर अन्न खावें. ज्याचा कोठा फूटून फार रक्त गेलें आहे, त्यानें दुसर्या प्राण्यांचें रक्त प्यावें. कोठा फुटण्याचे दोन प्रकार आहेत. एकांत आंतडे ठेंचलें जातें व दुसर्यांत फाटतें. पहिल्यांत वर सांगितलेले मूर्छादि विकर कमी असतात आणि दुसर्यांत ते अतिशय बाधक होतात. पहिल्या विकाराचा रोगी कदाचित दैववशात् जगतो परंतु दुसर्या प्रकारचा रोगी कधींच जगत नाही. ज्याचें मल, मूत्र व वायु हे आपआपल्या नेहेमींच्या मार्गानें जात असतात आणि ज्यास पूर्वोक्त मूर्छादि उपद्रव नसतात त्याचा कोठा फुटला असला तरी तो खात्रीनें जगतो.
आंतडें न फाटतां बाहेर आलें असल्यास तें आंत घालावें, फाटलें असल्यास घालूं नये. परंतु याविषयीं कित्येकांचें असें म्हणणे आहे कीं फाटलेल्या आंतड्यास डोंगळे डसवून त्यांची तोंडें आंत रूतली म्हणजे बाकीचें अंग काढून घेऊन मग तें आंतडें आंत लोटावें. आंतड्यास गवत, रक्त, व धुराळा लागलेला असल्यास तो पाण्यानें धुवून तूप लावून हाताची नखें काढून आंतडें हळू हळू आंत सारावें. आंतडें वाळले असल्यास दुधानें भिजवून पुष्कळसें तूप लावून आंत घालवें किंवा बोट घशांत घालून फिरवावें. अथवा अंगावर पाणी शिंपडावें; म्हणजे त्या योगानें आंतडीं आपोआप आंत जातात व आकुंचित होतात. व्रण लहान असल्यामुळें ती कोठ्यांत शिरत नसल्यास त्यांच्या मानानें पोट फाडून आंत ढकलावीं.
तीं जागच्या जागीं बसलीं म्हणजे मग व्रणास टांके मारावे. आंतडें जेथल्या तेथें न बसल्यास कुपित होऊन मनुष्यास मारतें. व्रण शिवल्यावर पोटासभोंवतीं पट्टा बांधून वर तूप सोडीत रहावें. नंतर मळास नरमपणा येण्याकरितां व वायू खालीं सरण्याकरितां त्यास तापलेल्या कोमट दुधांत दंती फळांचें तेल घालून तें पाजावें. नंतर वर्षभर पूर्वी सांगितलेलें व्रणाचें पथ्य पाळावें. पोटावर आघात होऊन त्यांतून मेदाची वळकटी बाहेर आल्यास तिच्यावर राख किंवा माती अथवा तुरट मुळ्यांचें वस्त्रगाळ चूर्ण टाकून सारखें घट्ट बांधून कुशल वैद्यानें अग्नीनें तापविलेल्या तीक्ष्ण शस्त्रानें मोठ्या शिताफीनें एकदम झटक्यासरसें कापून टाकावें. सावकाश कापीत बसल्यास पोटांत कळा व गुडगुड उत्पन्न होईल, किंवा कदाचित मृत्यूहि येईल. बरोबर कापल्यावर व्रणास मध लावून तो बांधावा. आघात कोठें झाल्याचें कळत नसल्यास किंवा वेडा वाकडा अथवा उंचावरून पडल्यास वातरक्तहारक तर्पण, मर्दन, अभ्यंग वगैरे उपाय करावे. ज्याचें शरीर ठेंचलें आहे किंवा मर्मावर आघात झाला आहे त्यास मांसरसाचें जेवण घालून तेलाच्या पिपांत बसवावें.