विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जॅक्सन व्हिल्ले शहर — फ्लॉरिडामधील (अमेरिका) ड्यूव्हल विभागांतील हें एक मुख्य ठिकाण. ''सेंट जॉन'' नदीच्या दक्षिण तीरावर संस्थानाच्या ईशान्य दिशेस वसलेलें आहे. याची लोकसंख्या २८४२९ आहे. त्यांपैकीं, १६२३६ नीग्रो व ११६६ परकीय आहेत. शहर ''फ्लारिडा'' संस्थानांत सर्वांत मोठें असून शहराशीं आगगाड्या व बोटींचें दळणवळण आहे. रेल्वेचें हें मुख्य ठिकाण असल्यामुळें शहराला ''फ्लॉरिडाचें प्रवेशद्वार'' असें म्हणण्यांत येतें. येथें बर्याच सुबक व प्रेक्षणीय इमारती आहेत. दिसण्यांत शहर फार मोहक आहे. नीग्रो लोकांकरितां स्थापन केलेलीं दोन विद्यालयें 'फ्लॉरिडा बॅप्टिस्ट अॅकॅडमी' व 'कुकमन्स इन्स्टिट्यूट' प्रसिद्ध आहेत. शहरालगतचें फ्लॉरिडा ऑस्ट्रिच फार्म प्रेक्षणीय आहे. उद्योगधंद्याच्या दृष्टीनें शहर फार महत्वाचे असून येथें कारखाने बरेच चालतात. कारखान्यांचें एकंदर उत्पन्ना (इ.स. १९०५) ५३४०२६४ डॉलर होतें. १९०९ सालीं येथील (मालाची) निर्गत २५०७३७३ डॉलर व आयात ५१३४३९ डॉलर किंमतीची होती. व्यापारी नेआणीचें हें महत्वाचें ठिकाण आहे. १८३३ सालीं येथे कॉर्पोरेशन स्थापन करण्यांत आली. व्यापारामुळें शहर भरभराटीस येत आहे. येथील हवा थंड असल्यामुळें बरेच लोक हिवाळ्यांत येथें मुक्कामास असतात