विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जकात — सरकारच्या उत्पन्नाच्या बाबींपैकीं कर म्हणून जी एक महत्वाची बाब आहे तींतच जकाती हा प्रकार आहे. जुन्या भाषेंत पट्टया ह्या हल्लीच्या जकातींच्या स्वरूपाच्या असत. आधुनिक अर्थशास्त्रदृष्ट्या 'अप्रत्यक्ष करांत' जकातींचा समावेश होतो. जकातींचेहि हल्लीं 'अन्तर्जकात (एक्साईज) व 'बहिर्जकात' (कस्टम्सं) असे दोन प्रकार असतात. 'एक्साईज' म्हणजे केवळ मादक पदार्थांवरील जकात, असा अर्थ नसून देशांत उत्पन्न होऊन देशांतच खपणार्या मालावरील जकात असा अर्थ, आणि 'कस्टम्स' म्हणजे परदेशांतून येणार्या किंवा परदेशांत जाणार्या उर्फ आयात व निर्गत मालावरील जकात असा अर्थ आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांपैकीं कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत बहिर्जकात (निष्क्रम्य व प्रवेश्य) असा जकातीचा स्वतंत्र भेद केलेला आहे (ज्त्रानकोश 'कर' पहा). मुसुलमानी व मराठी अमदानींत या दोन स्वतंत्र प्रकारच्या जकाती कोणत्या असत, त्यांचें सरकारला उत्पन्न किती होत असे, वगैरे माहिती उपलब्ध नाहीं. पुढें ब्रिटिश अमदानीत कर, अन्तर्जकात व बहिर्जकात असे स्पष्ट भेद झाले असून त्यांच्या व्यवस्थेचीं स्वतंत्र खातीं आहेत.
एक्साईज (अन्तर्जकात).— दारू, भांग, तमाखू, अफू, ताडी इत्यादि मादक पदार्थांवरील जकातीची व्यवस्था अबकारी खात्याकडे असते. पण अन्तर्जकातीच तो एक केवळ भाग आहे. अन्तर्गत जकातींची सर्व व्यवस्था 'एक्साईज' खात्याकडे असून नव्या हिंदी सुधारणांच्या कायद्याअन्वयें ही सर्वस्वी प्रांतिक सरकारच्या उत्पन्नाची बाब गणली जाते. मादक पदार्थांवर जकात बसविणें ती त्या पदार्थांचा खप कमी व्हावा पण चोरट्या धंद्यास उत्तेजन मिळूं नये अशा धोरणानें बसवितात. इतर सामान्य अन्तर्गत जकात एक उत्पन्नाची बाब म्हणून बसवितात [ज्त्रानकोश 'अबकारीखातें' पहा].
कस्टम्स [बहिर्जकात].— हिंदुस्थानांत बाहेरून येणार्या आणि हिंदुस्थानांतून बाहेर जाणार्या मालावर जकात वसूल करणारें कस्टम्स डिपार्टमेंट म्हणून स्वतंत्र खातें आहे. या बहिर्जकातीसंबंधानें माहिती इतरत्र दिली आहे (ज्त्रानकोश 'कर' व 'व्यापार' पहा). १९२३ सालीं हिंदुस्थान सरकारचें बहिर्जकातीचें उत्पन्न ३३ कोटी ७७ लक्ष झालें होतें. आणि १९२४ सालीं ४० कोटी ६४ लक्ष झालें आहे. १९२४ सालीं पोलादावर वाढवलेल्या जकातींमुळे १ कोटी ८१॥ लक्ष रूपये जास्त उत्पन्न झालें.
हिंदुस्थानांतील आयात जकातीचे दर (अदमासें) |
(या दरांत दरवर्षी बजेटाच्यावेळीं थोडा बहुत फरक होतो) |
हिंदुस्थानांतील निगत जकातींचे दर | ||
माल | माप | दर |
कच्चा ताग | ४०० पौंडांची वेल | १८८ ते ४८८ |
तागाचे जिन्नस | २२४० पौंडांचा टन | रू. २० ते ३२ |
तांदूळ | ८२२/७ पौंडाची मण | ८३ |
चहा | १०० पौंड | १८८ |
कातडीं | पौंड | ८१ ते १ रू. |
पाश्चात्य देश.— यूरोपमध्यें 'एक्साइज' चा अर्थ केवळ मादक पदार्थांवरील कर असा नसून सामान्यतः 'देशी मालावरील कर' असा आहे. अर्थात् अशा प्रकारचा कर उद्योगधंदे वाढलेले आहेत, अशा देशांतच असतो. अशा करानें उद्योगधंद्याच्या वाढीस मोठा अडथळा होत असल्यामुळें मोठ्या अडचणीच्या प्रसंगाशिवाय इतर वेळीं तो क्वचितच बसवितात. तरी पण हा कर प्राचीन काळीं रोमन साम्राज्यांत असल्याचें आढळतें. मात्र रोमन सरकारचा हा कर शेंकडा एक इतक्या कमी प्रमाणांत असे. आणि तो फार थोडा काळच होता. म्हणजे ऑगस्टस बादशहानें तो प्रथम सुरू केला आणि इ.स. ३८ मध्यें तो बंद करण्यांत आला. असल्या करास रोमन लोक नाखूष असत. असले कर 'युनैटेड किंगडममध्यें' प्रथम सिव्हिलवॉर (यादवी युद्ध १६४९) नंतरच्या लोकशाही सरकारनें हॉलंडचे उदाहरण पाहून बसविले; व ते निरनिराळ्या प्रकारच्या दारूवर मुख्यतः होते. या कराचें एक निराळें स्वरूप म्हणजे परवान्याबद्दलची फी हें होय. शिकार करणारे, बंदुकी वापरणारे, लिलाववाल्याचा धंदा; फेरीवाले, पेटंट औषधें विकणारे, तंबाखू व तपकीर तयार करणारे वगैरे लोकांनां परवाने (लायसेन्स) देतांना फी म्हणून कर घेण्यांत येत असे. रोमन लोकांप्रमाणें इंग्रजहि असल्या करांनां नाखूष असत, ही गोष्ट इंग्रजी गद्य व पद्य वाङ्मयावरून स्पष्ट दिसते. डॉ. जॉनसननें आपल्या डिक्शनरींत इतर अनेक शब्दांप्रमाणें 'एक्साइज' या शब्दाचीहि तत्कालीन राजकीय परिस्थितीची निदर्शक अशी व्याख्या केली आहे. ती अशीः- 'जिनसांवर बसविलेला तिरस्करणीय असा, आणि ज्यांनां कर द्यावयाचा त्यांच्याच क्षुद्र भाडोत्री हस्तकांनीं ठरविलेला कर.' ब्लॅकस्टोन नामक प्रसिद्ध कायदेशास्त्रपंडितानेंहि असें म्हटलें आहे कीं, 'अगदीं आरंभापासूनच या कराचें नांव इंग्लंडांतील लोकांना द्वेषार्ह वाटत आलें आहे.' तथापि १७।१८ व्या शतकाच्या मानानें हल्लीं या कराच्या पद्धतींत पुष्कळ सुधारणा झाली असून लोक तो संतोषानें देऊं लागले आहेत. नेपोलियनाबरोबरच्या युद्धामुळें ब्रिटीशसरकारला पैशाची टंचाई पडली; त्यावेळीं विटा, मेणबत्त्या, चिटें, कांच, कातडीं, कागद, मीठ, साबण व इतर अनेक जिनसांवर कर बसविण्यांत आला होता. ब्रिटिश दारूवर जकात १६६० मध्यें दर गॅलनास कांहीं थोडे पेन्स इतकी प्रथम बसविली. ती वाढतां वाढतां १८२० मध्यें दर गॅलनास ११ शि. ८॥ पेन्स इतकी झाली. व मिठावरील कर तर तिप्पटचौपट वाढविण्यांत आला होता. अलीकडे असल्या करांपासून होणारें उत्पन्न वाढत गेलें असून मजूरवर्गाच्या भरभराटीची ही उत्तम कसोटी आहे असें मानलें जातें.
'कस्टम्स' म्हणजे परदेशांबरोबरच्या व्यापारावरील जकात असा अर्थ असून तोच अर्थ पाश्चात्त्य देशांतल्याप्रमाणें हिंदुस्थानांतहि रूढ आहे.