विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छोटानागपूर, विभाग.— हा बिहार ओरिसा प्रांताचा एक विभाग असून रांची हें याचें मुख्य ठिकाण आहे. यांत हजारीबाग, रांची, पलामौ, मानभूम व सिंगभूम या पाच जिल्ह्यांचा समावेश होत असून १९११ सालीं याची लोकसंख्या ५६५३०२८ होती. हजारीबाग, मानभूम व सिंगभूम या जिल्ह्यांतील संताळ, रांचीमधील मुंडा, रांची, व सभोंवारच्या संस्थानांतील ओरान, सिंगभूमांतील हो, मानभुम व सिंगभूम यांतील व भूमजी संस्थानांतील गोंड या रानटी जाती आढळतात. या विभागाचें क्षेत्रफळ २७१०१ चौ.मै. असून उत्पन्न १९०३-४ सालीं ९६८००० रू. होतें.
या विभागांत तीन पठारें असून अनेक डोंगरांच्या रांगा व त्यांच्यामागून जाणार्या दर्या आहेत. या विभागांत १४ गांवें व २४७५९ खेडीं आहेत. यांत कोळसे व अभ्रक सांपडतात. १९०३ सालीं कोळशाचें व अभ्रकाचें उत्पन्न अनुक्रमें ३३२९००० व ५४७ टन होतें. परसनाथ टेकडीवर जैन देवालयें असून तेथें हजारों यात्रेकरू तीर्थयात्रेस जातात.
संस्थानें.— या संस्थानांत पूर्वी छोटानागपूर विभागांतील ९ संस्थानांचा समावेश होत होता. त्यांची यादी येणेंप्रमाणें :- १ चांगभकार, २ कोरिआ, ३ सुरगुजा, ४ उदेपूर, ५ जाशपूर, ६ गंगपूर, ७ बोनै, ८ खर्सावान, ९ सरैकेला. १९०५ सालीं यांपैकीं पहिली पांच संस्थानें मध्यप्रांतास जोडण्यांत आलीं. व गंगपूर व बोनाई संस्थानें ओरिसा प्रांतास जोडण्यांत आलीं. आतां वरील संस्थानांत फक्त खर्सावान व सरैकेला या दोघांचाच समावेश होतो. यांचें क्षेत्रफळ ६०३ चौ.मै. आहे. हीं दोन्ही संस्थानें मानभूम व सिंगभूम या दोन जिल्ह्यांमध्यें वसलीं असून यांच्या उत्तरेस रांची व मानभूम जिल्हे असून पूर्वेस व पश्चिमेस सिंगभूम जिल्हा आहे व दक्षिणेस ओरिसा प्रांतांतील मयूरभंज व सिंगभूम संस्थानें आहेत.