विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छिब्रामऊ तहसील— ही संयुक्तप्रांताच्या फरूकाबाद जिल्ह्यांतील एक तहसील आहे. हिच्यांत छिब्रामऊ व तालग्राम परगण्यांचा समावेश होतो. हिचें क्षेत्रफळ २४० चौ.मैल असून हिच्या उत्तरेस पूर्वकाली नदी व गंगा व दक्षिणेस इसन या नद्या आहेत. हिची लोकसंख्या १९११ सालीं १२६४६० होती. हिच्यांत छिब्रामऊ व तालग्राम हीं दोन गांवें व २४० खेडीं यांचा समावेश होतो. १९०३-४ सालीं जमीनीच्या सार्याचें व इतर उत्पन्न अनुक्रमें १९००० व ३२००० रू. होतें. लोकसंख्येचें प्रमाण दर मैलास ५२८ होतें. या तहसिलीच्या मध्यावरील दक्षिणोत्तर जमीन सपाट व सुपीक असून पश्चिमेकडील वाळवंटी आहे. पूर्वेकडील दलदलीची असून तींत पुष्कळ तळीं साचली आहेत. १९०३-४ सालीं या तहसिलीची १६० चौ.मै. जमीन लागवडीस आणली होती व यापैकी ६४ चौ.मै. जमीनीस कृत्रीमरीतीनें पाणी पुरविलें गेलें. हिच्या कित्येक खेड्यांत भात उत्पन्न होतें.