विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छिंपा — एक रंगारी जात. छिंबा व छिपी अशीं दुसरीं नांवें आहेत. एकंदर लो.सं. (१९११) २५१६५०. पंजाबांत छिबांची वस्ती सर्वांत जास्त (१२९३३५) आहे. त्यांच्यांत सर्व धर्माचे लोक आहेत. हे लोक चिटें छापतात; व मंजिष्टाचा कपड्यांनां रंग देण्याचेंहि काम करतात. कांहीं कपडे धुणारे परीट आहेत. चिटांवर छाप मारण्याचा धंदा बहुतेक नहींसा होत चालला आहे.
मुंबई इलाख्यांत गुजराथी भागांत सुमारें १५ हजार छिंपा आहेत. दिसण्यांत व पोषाखांत भावसारांत व यांच्यांत फरक नाहीं. पण भावासारांसारखे नुसते शाकाहारी ते नाहींत. हे लोक वैष्णवधर्मी आहेत. यांच्यांत पुनर्विवाहाची चाल आहे. बाकीच्या चालीरीति वाण्यांच्या प्रमाणेंच आहेत. वर्हाड मध्यप्रांतांतहि आठ नऊ हजार छिंपा आहेत. उत्तरेकडील जिल्ह्यांत यांस छिंपा व दक्षिणेकडे रंगारी म्हणतात. ह्या दोन वर्गात रोटीबेटी व्यवहार होत नाहीं. यांचे माळव्यांतून आलेले, गुजराथेंतून आलेले व गोलिवे असे वर्ग आहेत. यांखेरीज संयुक्तप्रांत (३३१८२), राजपुताना (३७९४०), मध्यहिंदुस्थान (१७७४९) व बडोदे संस्थान (६४९९) यांतून छिंपांची वस्ती आहे [से.रि. १९११; रसेल व हिरालाल; मु.गॅ.].