विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छिंदवाडा - मध्यप्रांताच्या नरसिंगपूर जिल्हा व तहसील यांतील एक गांव असून येथें ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेंचें ठाणें आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या ३४०४ होती. हें दक्षिणेंत जाणार्या रस्त्यावर असून १८२४ सालीं सर डब्ल्यू स्लीमन यानें प्रवाश्यांच्या सोयीसाठीं वसविलें. येथें १८६७ सालीं म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. तिचे उत्पन्न १९०३-०४ सालीं ४७००० होतें. येथून आसपासच्या प्रदेशांतील माल बाहेरगांवीं रवाना होतो. येथें दर आठवड्यास जनावरांचा बाजार भरतो व दर बाजारी १००० जनावरांची विक्री होते. येथें एक कापसाची गिरणी, दवाखाना व मिडलस्कूल आहे.