विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छिंद, लल्लः— देवल येथील स. ९९२ च्या एका शिलालेखावरून (गया प्रांतावर?) या सुमारास लल्ल नांवाचा राजा राज्य करीत होता असें दिसतें. याच्या बापाचें नांव मल्हण व आईचे नांव अणहिला असून ती चुलुकीश्वर कुळांतील होती. याच्या आजाचें नांव वैरवर्मा असून याच्या वंशाला छिंदवंश म्हणत असत. गयायेथील एका शिलालेखांत या छिंदकुलांतील पुष्कळ पुरूषांची नांवें सांपडतात. परंतु त्यांचा व लल्लाचा काय संबंध होता तें स्पष्ट समजत नाहीं. [माबेल डफ]