विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छायाचित्रपेटिका (क्यामेरा आब्स्कुरा) — या यंत्राच्या सहाय्याने सृष्ट पदार्थांचें चित्र हातानें सहजगत्या काढतां येतें. या यंत्रात एका पेटींत एक लेन्स व त्यासमोर ४५० अंशाचा कोन करून एक आरसा बसविलेला असतो व त्यामुळें लेन्सपुढील वस्तूची प्रतिमा आरशाच्या योगाने एका बाजूस वळवून घेतां येतें. पुष्कळदां असल्या प्रकारचें यंत्र एखाद्या लहानशा राहुटीच्या वरील टोंकांस बसविलेले असतें. या राहुटीच्या कनाती अगदीं अपारदर्शक असतात. या यंत्राच्या योगानें राहुटींत एखाद्या तक्त्यावर किंवा एखाद्या टेबलावर बाहेरील देखाव्याचें उत्तम चित्र पडतें; व तें चित्र आंतील मनुष्यास उत्तम प्रकारें रेखाटून घेतां येते. चितारी ड्राफ्ट्समन आदिकरून लोकांस या यंत्राच्या सहाय्याने उत्तम स्केचेस (रेखात्मक विचार) तयार करितां येतात. फोटोग्राफीची कला वाढल्याकारणानें या यंत्राचा प्रसार आतां फारच कमी झाला आहे.