विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छत्रे, विष्णु मोरेश्वर (शके १७६३-१८२७)— महाराष्ट्रांतील पहिले सर्कसकार. यांचा जन्म तासगांवच्या पटवर्धनांचे आश्रित अशा वसणीकर छत्र्यांच्या कुळांत झाला. विष्णुपंताचे वडील जमखिंडीकरांच्या पदरी असत. लहानपणीं चरित्रनायक फार उनाड असे. पशुपक्ष्यांशीं खेळण्याचा त्याला विलक्षण नाद असे. घोड्यावर बसण्यांतही तो पटाईत होता. पुढें त्यानें रामदुर्गंकरांकडे चाबुकस्वाराची जागा पत्करली. नंतर यानें गायन शिकण्याकरितां ग्वाल्हेरला जाऊन प्रसिद्ध गवई रहिमतखां यांचे वडील हाद्दुखां यांजवळ राहिला व तेथेंच अश्वविद्याही शिकला. विंचुरकर, जव्हारकर व दक्षिण महाराष्ट्रांतील पटवर्धन संस्थानिक या अश्वहृदयज्त्र विष्णुपंतास जवळ रहाण्याचा फार आग्रह करीत असत, व त्यांनां या सर्व संस्थानिकांनीं चांगला आश्रयहि दिला होता. मुंबईतील विल्सन साहेबाची सर्कस पाहून आपणही अशी सर्कस काढावी असें विष्णुपंतांच्या मनात आलें व ते त्या उद्योगास लागले. इ.स.१८८३त त्यांच्या सर्कशीच्या खेळांनां सुरूवात झाली, त्यांत घोड्यांची कामें फार अप्रतिम होत. पुढें सर्व हिंदुस्थानांत विष्णुपंतांच्या सर्कशीनें नाव मिळेवलें. पण खुद्द त्यांना सुरा व कळावंतिणी यांचे जबर व्यसन जडून आपले धाकटे बंधु काशीनाथपंत यांच्या हवालीं आपली सर्कस त्यानीं करून दिली. काशीनाथपंतानीं हिंदुस्थानाबाहेर सयाम, जावा, चीन, जपान, अमेरिका वगैरे ठिकाणी कंपनी नेऊन महाराष्ट्राचें नांव गाजविलें. विष्णुपंताचे शिष्य देवलबंधु यांनीं स्वतंत्र सर्कस काढून छत्र्यांच्या सर्कशीप्रमाणें लौकिक मिळविला. सर्कस सोडल्यानंतर विष्णुपंताचें राहिलेलें आयुष्य ऐषारामांत गेलें. इंदुरास मधुमेहाच्या विकारानें त्यांस देवाज्त्रा झाली (शके १७२७). [रा.नारायण कृष्ण गद्रे यानीं यांचे चरित्र लिहिलें आहे(१८२८).]