विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छत्रसाल — बुंदेलखंडचा एक राजा. हे बुंदेले राजे अकबराच्या आधीपासून मुसुलमानंशीं आपल्या स्वातंत्र्यरक्षणासाठीं लढत होतें. अकबराचा समकालीन मधुकर नांवाचा बुंदेलराजा होता. जहांगीर मेल्यानंतर सर्व बुंदेले राजांनीं एकत्र जमून मुसुलमानी सत्तेविरूद्ध युद्ध पुकारलें. त्यांचा नायक चंपतराय नांवाचा महोबाचा राजा होता. त्यानें दिल्लीवाल्याच्या फौजांचा अनेकदां पराजय केला होता. शेवटी शहाजहानानें त्यांच्याशीं मित्रत्वाचा तह करून त्याचें स्वातंत्र्य मान्य केलें. औरंगजेबानें आपल्या तक्तारोहणाच्या प्रयत्नांत चंपतरायाची मदत घेतली होती; परंतु गादीवर आल्यावर त्यानें चंपतचा अपमान केला; तेव्हां चंपतने औरंगजेबच्या विरूद्ध युद्ध उपस्थित केलें. औरंगजेबानें त्याच्यावर स्वतः स्वारी केली व कपटानें एका लढाईत त्याला ठार मारिलें (१६६४). त्याचा पुत्र छत्रसाल याचा जन्म १६५० च्या सुमारास झाला. याचें बहुतेक चरित्र शिवछत्रपतीसारखेंच होतें. बाप वारल्यावर कांहीं दिवसांनीं बुंदेल्यांचें स्वातंत्र्य कायम ठेवण्याचें काम त्यानें उचललें. याच सुमारास दशिणेंत शिवाजींने स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न चालविला होता. छत्रसालानें शिवरायाची ख्याति ऐकून भीमेच्या कांठीं त्याची भेट घेतली. तेव्हां शिवाजींनें त्याला हिंदुराज्य स्थापण्याबद्दल प्रोत्साहन दिलें च एक तरवार बक्षिस दिली. ही हकीकत भूषण कवीनें साग्र वर्णिली आहे. नंतर छत्रसालनें परत बुंदेलखंडांत जाऊन औरंगझेबाशी फटकून वागण्याचा क्रम आरंभला. तेव्हां औरंगझेबानें त्याच्यावर फिदाईखान यास पाठविलें असतां त्यानें पिटाळून लाविलें. याप्रमाणें छत्रसालचा पराक्रम पाहून जे इतर बुंदेले राजे मुसुलमानांस मिळाले होते, तेहि त्यांनां सोडून छत्रसालास मिळाले. त्यांच्यां साह्यानें त्यानें आपलें राज्य वाढविलें. सर्व बुंदेलखंड जिंकला. हिंदुराजेच नव्हत तर (आसपासचे) मुसुलमान सरदारहि त्याचे मांडलिक बनले. औरंगजेबास त्याची धास्ती पडलीं. त्यानें रणदुल्ला, सदरूद्दिन, तुहव्वर व अन्वर या सेनापतींनां छत्रसालावर निरनिराळ्या वेळीं पाठविलें. पण त्या चौघांचाहि छत्रसालानें फडशा पाडला. अन्वरखानानें तर सव्वा लाख रू. दंड भरून आपली सुटका करून घेतलीं. औरंगजेबानें आणखीहि सरदार त्याच्यावर धाडिले. परंतु कोण्याहि मुसुलमान सेनापतीकडून छत्रसाल जिंकला गेला नाहीं; तेव्हां नाइलाजानें औरंगजेबानें त्याच्याशीं मैत्रीचा तह केला. छत्रसालाचा गुरू प्राणनाथ प्रभु नांवाचा होता. त्यानें छत्रसालाचें व औरंगजेबाचें युद्ध चालू असतां, बुंदेले लोकांत मुसुलमानंविरूद्ध आवेश उत्पन्ना केला. बहादुरशहानेंहि छत्रसालाचें स्वातंत्रय कबूल केलें होतें व त्याचीं अनेकवेळीं मदत घेतली होती. छत्रसालानें पन्ना येथें आपली राजधानी केली. पुढें मराठ्यांनीं माळवा काबीज करून दिल्लीला शह देण्याचें काम चालू केलें, तेव्हां छत्रसाल उघडपणें त्यांनां मिळाला (१७२९). बहुतेक रजपुतराजेहि यावेळीं मराठ्यांनां धर्माच्या नांवावर मुसुलमनांविरूद्ध मिळाले होते. त्यामुळें महंमदशहानें छत्रसालावर महंमदखान बंगश याला पाठविलें. महंमदला बादशहानें जी जहागीर दिली होती ती बुंदेलखंडच्या लगतच असल्यानें, त्याला छत्रसालाचा उपसर्ग नेहमीं होई. बादशहानें त्याला छत्रसालावर पाठविल्यानंतर त्यानें आपल्या पीरखान नांवाच्या मुलांस प्रथम पुढें धाडिलें; परंतु छत्रसालानें त्याला ठार मारून त्याच्या फौजेचा पराभव केला. तेव्हां महंमदनें पुन्हां आपला दुसरा मुलगा काईमखान यास पाठविलें. पण छत्रसालानें त्यालाहि पळवून लाविलें. तेव्हां खासा महंमद बंगष बुंदेलखंडांत शिरला. त्याला महंमदशहानें भरपूर मदत केली. छत्रसाल व त्याचीं मुलें यांनीं जोरानें त्याला तोंड दिलें. परंतु बंगषची फौज अतिशय असल्यानें, जैतपूर येथें त्याचा पराभव झाला व वृद्ध छत्रसाला जखमी झाला (१७२९).
यावेळीं थोरले बाजीराव हे माळव्यांत होते; त्यांना छत्रसालानें मोठ्या विनवणींचे पत्र पाठविलें. हें पत्र संबंध उपलब्ध नाहीं, फक्त ''जो गति ग्राहगजेंद्रकी सो गति भई है आज । बाजी जात है बुंदेलकी राखो बाजी लाज ॥'' हा दोहरा प्रसिद्ध आहे. पत्र पावतांच बाजीराव ताबडतोब निघून धामोरा येथे छत्रसालास भेटला (१३ मार्च); नंतर उभयंता बंगषवर जाऊन त्यांनीं त्याचा जैतपूर येथेंच पुरा धुव्वा उडविला (३० मार्च १७२९) या लढाईत तीन हजार घोडे व तेरा हजार हत्ती पाडाव झाले. या मदतीबद्दल छत्रसालानें बाजीरावास झांशी प्रांत (अडीच लाखाचा) दिला. याच सुमारास मस्तानी ही बाजीरावास मिळाली. छत्रसालाच्या एका मुसुलमानी नाटकशाळेची मस्तानी ही मुलगी होती असें म्हणतात. पुढें छत्रसाल १७३३ त मरण पावला. त्याला हिरदेसा व जगतराज असे दोन पुत्र होते. बाजीरावास आपला तिसरा पुत्र मानून त्यानें आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा (३३ लाखांची जहागीर) बाजीरावास बक्षीस दिली; त्यावर गोविंदपंत खरे यांची नेमणूक झाली होती त्याच्या नंतर मस्तानीचे वंशजा (अलिबहादूर) कडे ही जहागीर गेली. आपल्या पश्चातहि पेशव्यांनीं आपल्या वंशजास मदत करावी असा तह छत्रसालानें बाजीरावाशीं केला होता. मराठ्यांनांहि बुंदेलखंडांत आपलें ठाणें देऊन दिल्लीची पातशाही खिळखिळी करण्यास या तहाचा उपयोग झला. खास पेशव्यांच्या मालकीची सर्वांत जुनी जहागीर हीच होय. हिच्यांत काल्पी, हटासागर, झांशी, सिरोंज, कुंज, गडकोटा व हूरदेनगर या परगण्यांचा समावेश होतो. [पॉग्सन-बुंदेला; पारसनीस-बुंदेलखंड; राजवाडे-खंड ३].