विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
छत्तिसगड विभाग — मध्यप्रांताच्या पूर्वेकडील एक विभाग असून याचें क्षेत्रफळ २२०३९ चौरस मैल आहे. हा विभाग म्हणजे एक सपाट मैदान असून त्यांतून महानदी वहात जाते व हिचा प्रवाह. या विभागाच्या उत्तर, पश्चिम, व दक्षिण दिशांस टेकड्यांच्या रांगांनीं थोपवून धरिला आहे. या विभागांत द्रुग, रायपूर, व बिलासपूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. लोकसंख्या (१९११) ३३८१६८७ होती. यापैकीं सुमारें शेकडा ९० हिंदु असून ८ वन्य होते. या विभागावर १८५० पर्यंत रतनपूरच्या हैहयवंशी घराण्याचें राज्य होतें. हा विभाग इतर प्रदेशांपांसून अलिप्त असल्यामुळें त्यांतील लोकांच्या रीतीभाती पोषाख व भाषा इतर जवळच्या लोकांपेक्षां भिन्ना आहेत. या लोकांस 'छत्तिसगडी' अशी संज्त्रा आहे. यांची भाषा हिंदी असून तिचे अयोध्येकडील भाषेशीं बरेंच साम्य आहे. या विभागांतील लोक बुद्धिहीन व शेतकींत मागासलेले असून शेजारच्या इतर लोकांपेक्षां रानटी आहेत. या विभागाचा कमिशनर रायपूर येथें रहातो. यांत ७ गांवें व १०१२८ खेडीं आहेत. याच्या मैदानाकडील सरहद्दीच्या पलीकडे १४ संस्थानें आहेत. त्यांवर कमिशनर हा एका वकीलाच्या मार्फत देखरेख करतो.