विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चौधरी — पूर्वी गांवांतील बारा बलुत्यांत चौधरी या नांवाचा एक हक्कदार असे. याचें मुख्य काम बाजारभावांत फारसा चढउतार होऊं न देतां रयतेस धान्याचा योग्य दरानें पुरवठा करणें हें होंते. दिल्लीस मुसुलमान पातशाहीत तर सैन्यास अगर सरकारास गल्ला (धान्य) पुरविण्याचें कामहि याजकडेच सोंपवीत असत. ही चाल निजामाच्या राज्यांतहि होती. मराठी राज्यांत मात्र ही पद्धत (सरकारला धान्य पुरविण्याची) प्रचारांत नव्हती असें दिसतें. गांवांत धान्याची गोणी आल्यास तिची नोंद चौधरी करी; व त्याच्या हुकुमाशिवाय ती फुटत नसे. त्याला रोजची धान्याची नोंद सरकारांत समजावून सांगावी लागे. गांवांतील धान्याची निर्गत होई तीहि चौधर्याच्या देखरेखीखाली व परवानगींनें होई. धान्याची आयात कमी झाल्यास व बाजारभाव वाढवावयाचा असल्यास व्यापार्यांनां चौधर्याच्या हुकुमाशिवाय (व चौधर्यास सरकारच्या हुकुमाशिवाय) तो वाढवितां येत नसे. अशा वेळी बाहेर प्रांतांतून धान्य आणून गांवास पुरविण्याची कामगिरीहि त्याला करावी लागे. हा चौधरीपणाचा हक्क सरकारांतून घेणें असल्यास सरकारास नजर (कर) द्यावी लागे. मोठमोठ्या शहरीं मक्त्यानेंहि हा अधिकार मिळत असे. अशा प्रकारचा मक्ता मिळविण्याचा एक अर्ज पुणें दरबारास केलेला उपलब्ध आहे. [इतिहाससंग्रह पु.७, अ ४।५।६ .] चौधरी जातीची माहिती 'चौहाण' या जातींत अंतर्भूत झाली आहे.