विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चोवीस परगणा जिल्हा — बंगाल इलाखा. बंगाल प्रांतांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ४८४४ चौरस मैल असून यांतच सुंदरवनचा भाग (२९४१ चौरस मैल क्षेत्रफळाचा) समाविष्ट होतो. कलकत्त्याचे जमीनदारी परगणे २४ म्हणून या जिल्ह्याला २४ परगणा जिल्हा असें म्हणतात. सन १७५७ साली बंगालचा नबाब नाझीम मीर जाफर यानें ईस्ट इंडिया कंपनीला २४ परगणे दिलेले होते. याच्या उत्तरेस नडिया व जेसोर जिल्हे, पूर्वेस खुलना, पश्चिमेस हुगळी नदी आणि दक्षिणेस बंगालचा उपसागर आहे. कलकत्त्याचें क्षेत्रफळ ३२ चौरस मैल असून २४ परगणा जिल्ह्यांत तें मुळींच येत नाही. तरी २४ परगण्याचा व कलकत्त्याचा कलेक्टर एकच असून त्या कामें मात्र दोन्ही करावीं लागतात.
२४ परगण्याचा बराच भाग भागीरथीच्या पाण्याने बनलेला नेॠत्य दिशेकडील कोंपरा होय. यानंतर याचे सुंदरबनच्या हद्दीनें दोन भाग झालेले आहेत. पश्चिमेकडील भाग सागरबेटाच्या टोंकापर्यंत गेलेला असून पूर्वभाग कलकत्त्याच्या रेखांशाची सरहद्द समजली जाते. या सरहद्दीच्या दक्षिणेस सुंदरबन असून यानें २४ परगणा जिल्ह्याचा तीनपंचमांश भाग व्यापलेला आहे. लहानसहान बेटें अतिशय असून भरतीपासून नुकसान होऊ नये म्हणून धरणाचा वगैरे बंदोबस्त चांगला असल्यामुळें तांदुळाचें पीक सर्वोत्कृष्ट येतें. २४ परगणा जिल्ह्यांत हुगळी नदीच्या किनार्यापासून व कलकत्त्यापासून थोडे मैल दूर असलेल्या बजबजपर्यंत वस्ती अतिशय दाट असून फार थोड्या अंतरावर तागाच्या गिरण्या व मोठाले बाजार दृष्टीस पडतात. याचे मागील भाग सपाट नसून तेथील हवा रोगट असते. नंतर जिल्ह्याचा पूर्वभाग लागतो. तो पूर्वबंगालसारखा बहुतेक असल्यामुळे मुसुलमान लोकांची वस्ती तेथें जास्त आहे. हुगळी नदी बरीच विस्तृत आहे व होड्यांमधून मालाची 'ने आण' सारखी चालत असल्यामुळे सबंध हुगळी नदी बाजारमय दिसते. आणि दोन्ही किनार्यांवर गिरण्यांची धुराडीं, विटांचे कारखाने, मधून मधून हिंदु देवालयें व सुंदर सुंदर वाड्या नजरेस पडत असल्यामुळें फार रमणीय वाटतें. २४ परगणा जिल्ह्यांत मुख्य नदी भागीरथी व तिचे फांटे आहेत त्या प्रत्येकांची नांवे ज्या भागंतून ते वाहतात त्या त्या भागांत बदलत जातात. त्यापैकीं मुख्य नद्या हुगळी, विद्याधरी, पियाली व यमुना ह्या होत. या सर्व नद्या खोल असून गलबतें, होड्या, मचवे वगैरे नेहेमी जा ये करीत असतात. विद्याधरी जिल्ह्याच्या नैॠत्येस पोर्ट क्यानिंग जवळून वहात जाते. कलकत्त्याच्या पूर्वेस खार्या पाण्याचें सरोवर ज्याला म्हणतात त विद्याधरीच्या गाळानें भरत चाललें आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग लागवडीखालीं असतो. या ठिकाणीं तांदुळ व दुसरीं फळझाडें विपुल पिकतात. यांपैकी कांही भागांत पूर्वी मनुष्यवस्ती अगदीं नव्हती त्या ठिकाणीं आतां दाट वस्ती झालेली दिसते. नाना प्रकारचें गवत, बोरू व बांबूची वनें व माडाच्या राई कित्येक नजरेस पडतात.
सुंदरबन भागांत हरिण, वाघ, पुष्कळ असून पाण्यांत मोठमोठीं कांसवे आहेत. उत्तरभागीं चित्ते आढळतात. जंगली डुकरें कमी प्रमाणांत आहेत.
उष्णमान सरासरी ७८ अंशांवर असतें. जानेवारी महिन्यांत ६६ अंश उतरून मे महिन्यांत ८६ पर्यंत चढतें. अतिशय उष्णता म्हणजे एप्रिल महिन्यांत ९६ अंशांपर्यंत चढते. पावसाचें मान दरसाल ६२ इंच असतें.
सन १८६४ सालच्या आक्टोबर महिन्यांत भयंकर वादळाच्या योगानें २४ परगण्यांचें दक्षिण भागांत मनस्वी नुकसान झालें. 'डायमंड बंदर' विभागांत ११ फूट उंचीच्या लाटा उसळल्यामुळें १२००० मनुष्यें प्राणांस मुकली. १८९७ च्या जून महिन्यांत भूकंपाच्या धक्क्यामुळें जिल्ह्याच्या बहुतेक भागाच्या विटबंदी इमारतींनां सुद्धा जबर धक्के बसले. १९०० च्या सप्टेंबर महिन्यांत भयंकर पुराच्या योगानें कलकत्त्यापासून डायमंड बंदरपर्यंत असलेल्या तांदळाच्या पिकाचा सर्वस्वी नाश झाला.
इतिहासः— भागीरथी व ब्रह्मपुत्रा यांमधील व पद्मा नदीच्या दक्षिणेस जो प्रदेश आहे त्याला वंग अथवा बंग असें म्हणतात. रघुवंशात असें वर्णन दिलें आहे कीं येथील लोक होड्यांत रहाणारे व तांदूळ पेरणारे आहेत. या प्रदेशाच्या दक्षिणेस २४ परगणा जिल्हा आहे. १० व्या शतकांत या प्रदेशावर सेन घराण्याची सत्ता होती व सन १२०३ मध्यें अफगाण लोकांनी महंमद बखत्यार खिलजी याच्या नेतृत्वाखालीं बंगालवर (२४ परगणा जिल्हा) स्वारी केली होती.
त्यानंतर पुढें १६ व्या शतकांत २४ परगणा सातगांव सरकार (भाग) बनलेला होता. सातगांव हुगळीजवळ सरस्वतींच्या कांठी असून त्यावेळीं व्यापारी घडामोडीचे मुख्य शहर होतें. परंतु पोर्तुगीज लोक १५३० साली आपला माल लहान होडक्यांतूंन पाठवीत असत. कारण मोठीं गलबतें सातगांवपर्यंत जात नसत. म्हणून १६ व्या शतकांत सातगांवचे बहुतेक व्यापारी गोविंदपूर (सांप्रत फोर्ट वुइलियम) येथें आले. पोर्तुगीज लोकांनी सुतानुती (कलकत्त्याचा मध्य-भाग) येथें आपली वखार घातली व इंग्रजांनी हुगळी येथें एक कारखाना सुरू केला. स.१७५७ सालीं प्लासीची लढाई होऊन बंगालच्या नबाबांनी कलकत्त्याच्या दक्षिणेकडचा प्रांत (२४ परगणा जमीनदारी) ईस्ट इंडिया कंपनीला दिला. एक वर्षानंतर लागलीच कंपनीस दिवाणी सनद मिळाल्यामुळे २४ परगण्याची एकदंर वहिवाट कंपनीसरकारकडे आली. पुढे बादशाहानीं कंपनीला फरमान सनद दिल्यावरून जमीनींचे पूर्णपणे मालक कंपनीसरकार बनलें.
कलकत्त्यापासून सुमारे १५ मैलांवर बराकपूर नांवाची छावणीची जागा आहे. त्या ठिकाणीं दोनदां शिपायांचें बंड झालें. १८२४ सालच्या व १८५७ सालच्या या दोन्ही बंडांत बंडवाल्यांनां अपयश आलें. सन १८२४ सालच्या पहिल्या बंडांत मंगळपांडे नांवाचा पुढारी होता. तितुमियन यांचें लहानसें बंड होतें यानंतर २४ परगण्याचा इतिहास फारसा नाहीं. जिल्ह्याच्या सरहद्दी मात्र वारंवार बदलत.
लोकवस्ती - १९२१ सालीं जिल्ह्याची लो.सं.२६२८२०५ होती. एकंदर लोकसंख्येपैकीं पंचमांश कलकत्त्यास व त्याच्या उपांत्य भागांत आहे. कलकत्ता शहराचे काशिपूर, चितपूर, माणिकतोळा गार्डनरीच, दक्षिणखेडी व तोलीगंज इतके विभाग आहेत. सन १८८९ पर्यंत सर्वांची मिळून एक म्यु.कमिटी होती. अलीपूर येथें जिल्ह्याचें ठाणें असे. जिल्ह्यांतील दुसरीं शहरें बारानगर, कामरहाती, भाटपारा, तितेगड, बजबज आणि गारूलिया हीं होत.
शेतकीः— खरें महत्वाचें पींक म्हटले तर तांदूळ व ताग हीं होत. तांदूळ एकंदर क्षेत्रफळाच्या १५१७ चौ.मी.क्षेत्रांत पेरला जातो व ताग १२५ चौ.मै. मध्यें टाकतात. हिंवाळ्यात कडधान्याचें पीक येतें व उंसाची लागवड जिल्ह्याच्या ईशान्येस बर्याच भागांत करतात.
जंगल - सुंदरबन हा दक्षिण भाग बहुतकरून जंगल वेष्टित आहे. अलिकडे राखीव जंगलपैकी ४४८ चौ.मी क्षेत्रफळाची जमीन लागवडीस आणली गेली. व बाकीच्या क्षेत्रांत मात्र जंगल कायम आहे. १९०३-०४ साली जंगलाचें उत्पन्न ५०००० व खर्च १८००० झाला. उत्पन्नांच्या बाबी- बोल, मध, मेण, व चुन्याच्या शिंपा हीं होत.
व्या पा र व द ळ ण व ळ ण - या भागांत महत्त्वाचा असा एकहि धंदा नाहीं. तथापि नातागड येथें नकली कुलुपें, फण्या, स्वस्त जोडे आणि नकशीची कामें करितात. कापूस, सुत, चाकू, भांडी आणि चटया थोड्या प्रमाणावर करितात. जिल्ह्याच्या उत्तरेस कांही साखरेचे कारखाने होते. कांही कातडी कमावण्याचे व साबू करण्याचे कारखाने आहेत.
यांत्रिक धंदे, बरेच आहेत. हुगळी नदीच्या दोन्ही कांठांवर यांत्रिक कारखान्याला सवलती व साधनें पुष्कळ असल्यामुळें जल व लोह मार्गाचें दळणवळण सर्व प्रकारें असल्यामुळें शिवाय कलकत्यासारखें उत्तम बंदर व व्यापाराची भक्कम पेठ जवळच, यामुळें यांत्रिक उद्योगाला ऊत येणें साहाजिकच आहे. १९०३ सालीं २५९ कारखान्यांपैकी ७५ कारखाने २४ परगण्यांत आहेत व १९०४ सालीं ते ७९ नें वाढले. एकंदर कामावर असलेली मजुरांची संख्या १२४००० होती.
तागाचे गठ्ठे बांधणें, गोणपाट तयार करणें, कापसाचें सूत काढून कपडे करणें, कागद करणें, साखर करणें व गलबतें बांधणे, लोखंड ओतणें चामडी कमावणें, दोरखंडे तयार करणें, हाडांचे पीठ करणें, तेल काढणें व विटा तयार करणें वगैरे कारखाने आहेत.
या सर्व कारखान्यांतील काम करणारे मजूर बहुधां उत्तर प्रांतांतील असतात व त्यांची राहण्याची अतिशय गैरसोय असते. अलिकडे गिरण्यांच्या मालकांनी त्यांची स्थिति सुधारण्याकडे लक्ष घातलेलें आहे. २४ परगणा जिल्ह्यांत बाहेरून येणारे जिन्नस म्हणजे राणीगंज व मानभूम जिल्ह्यांतून कोळसा, उत्तर पूर्व बंगालमधून ताग व कलकत्ता व बिहारकडून आळशी हे होत. कच्चा कापूस वर्हाड व मध्यप्रदेश, तांदूळ बाकरगंज, वरहान आणि खुलनाकडून व धान्य बिरभूम व बोग्रा पुरवितें. बदिया व जेसोर कांही हरभरा व कडधान्यें पाठवितात. केरोसीन तेलाचा मोठा खजिना बजबजला आहे. पूर्व बंगाल रेल्वे कलकत्याहून २४ परगण्याच्या उत्तर सरहद्दीवरून बारासत हाव्रा घेऊन जेसोरकडे जाते; दुसरी शाखा कलकत्याहून बजबज, डायमंड बंदर व पोर्ट क्यानींगपर्यंत जाते. २४ परगण्यांत रेल्वेची लांबी १५८ मैल आहे. कलकत्याच्या आणि पूर्वेकडील कालव्यांच्या योगाने पूर्व बंगालचे तांदूळ कलकत्यास येतात. १७७७ सालीं मेजर ढोली यानें कालव्याची पद्धत सुरू केली. त्याने भागीरथीचा पाट काढून बिद्याधरी नदीला किदरपूर येथें मिळविला आहे. याला टोलीनाला असें म्हणतात. पुढें भागीरथी नदीवर कालवे झाले. हे कालवे फार मोठे आहेत.
२४ परगणा जिल्ह्याचे ५ पोटविभाग असून अलीपूर येथें कलेक्टर मॅजिस्ट्रेट, व १ असिस्टंट व जॉइंट मॅजिस्ट्रेट असून ९ नबाब कलेक्टर आहेत. पोलिस मुख्य ठाणें कलकत्यास असून लहान विभागांकरितां पोलिस व्यवस्था कलकत्यापासून होते. अलीपूर व सेल्डा येथें मॅजिस्ट्रेटच्या कचेर्या आहेत. शाळासंस्था (सार्वजनिक व खाजगी मिळून) ची संख्या १९५३ असून तत्प्रीत्यर्थ खर्च ३॥। लक्ष झाला. तो असाः— ५२००० प्रांतिक उत्पन्नांतून, ६०००० जिल्हा-फंडातून, ११००० म्यु.फंडांतून व जवळ जवळ २ लक्ष फी उत्पन्नांतून हा खर्च झाला.