प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चोल घराणें व चोल साम्राज्य
-  प्राचीन चोल.-चोल हें नांव फक्त राजघराण्याचेंच नसून एका लोकसमूहाचेंहि आहे. हें नांव फार प्राचीन काळापासूनचें आहे. चोल लोक हे मूळचे कोठले व दख्खनमध्यें केव्हां आले हें नक्की सांगतां येत नाहीं. मात्र दख्खनचा प्राचीन इतिहास जेव्हांपासून सुरू होतो, तेव्हांपासून हे चोललोक व राजे तेथें नांदत होते एवढें खरें. महाभारत व इतर पुराणें यांत यांचा उल्लेख आहे. यांची खात्रीलायक वंशावळ मिळत नाहीं. अशोकाच्या दुसर्‍या व तेराव्या शिलालेखांत यांचा (मित्रत्वाचा) नामनिर्देश आहे. पुढें सिलोनच्या राजांचें व चोलांचें वैर माजल्याचें आढळतें. महावंश म्हणतो ख्रि.पू. पहिल्या शतकांत सहा तामीळ पुरूषांनीं सोली (चोळ) देश बळकाविला होता. (बर्नेलच्या मतें चोल देशास पूर्वी मलयकूट म्हणत). सारांश, ख्रि.श. पहिल्या शतकापासून या चोलांची ऐतिहासिक माहिती मिळूं शकते. या माहितीला थोडा फार आधार तामीळ वाङ्‌मयाचाहि मिळतो. पेरिप्लसमध्यें यांचा उल्लेख असून टॉलेमीहि यांची महिती देतो (१३०). यांच्या प्राचीन पूर्वजांच्या नांवांत, कपोतासाठीं मांस देणारा शिबी, कावेरीनदीचा पिता कवेर, इंद्रमित्र मुशुगुंडन, मनु, पेरून्जोरूच्चोळन (अन्नदान करणारा) वगैरे राजे येतात. महाभारतीय युद्धांत चेर व पांडव यांच्या बरोबरच या चोलांनींहि दोन्ही सैन्यांस (कौरव पांडवांस) रसद पुरविली, म्हणून वरील अन्नदाते असें उपपदं चोलांनां लागलें अशी दंतकथा आहे. ह्यूएनत्संग यांच्या राज्यांत गेला नव्हता. फक्त त्यानें यांची माहिती ऐकिली होती.

करिकालः— या घराण्यांतील पहिला ऐतिहासिक प्रख्यात पुरूष म्हणजे करिकाल चोल होय. याच्या पूर्वीची नांवें संगमादि ग्रंथांतून आढळतात. परंतु त्यांची ऐतिहासिक माहिती फारशी आढळत नाही. करिकालाच्या आजाचें नांव वेरपहरदक्कई पेरूनरकिळळी असून तो कुडक्को नेडुमशेरलादन या चेरराजाच्या समकालिन होता. हे दोघे परस्पर लढत असतां दोघेहि ठार झाले असें म्हणतात. करिकालाचा बाप उरूवप्पहरेर इळयोन (इळंजेतचेन्नी) नांवांचा होता. तो तरूणपणीं वारल्यानंतर करिकाल गादीवर आला. त्यावेळीं चेरांनीं याचें बरेंच राज्य आक्रमण केलें होतें; तेव्हा हा करूर येथे अज्त्रातवासांत राहिला. पुढें एका आगींत सांपडून त्याचे पाय अधू झाल्यानें, त्याला नीलपाद किंवा कृष्णपाद असें म्हणत. लहानपणींच यानें न्यायनिवाडे उत्तम रीतीनें तोडल्याचें आढळतें. नानगुर बेळ कुटुंबातील मुलीशीं यानें लग्न लाविलें. वेण्णिळ (हल्लींचे तंजावर जिल्ह्यांतील कोईलवेण्णी) येथें यानें पाण्ड्य व चेर या दोन्ही राजांचा पराभव करून चेर राजकन्येशी लग्न लाविलें व आपली बहीण चेरराजास दिली व दोन्हीं घराण्यांत दोस्ती केली. सीलोनवर यानें स्वार्‍या केल्या. आपली पहिली राजधानी उरैयूर ही बदलून, कावेरीपट्टनम् नांवाचें शहर स्थापून तेथें नेली. याचें कारण आपल्या राज्याची दक्षिण व पश्चिम सरहद्द मजबूत असावी. व्यापाराची भरभराट होऊन किनाराहि सुरक्षित रहावा म्हणून ही राजधानीची अदलाबदल झाली. तिच्या स्थापनेसाठीं करिकालानें सीलोनमधील बारा हजार लोक वेठीस पकडून आणले होते. पुढें सातव्या शतकांत गैल कुर्रम् ही राजधानी झाली. सिलप्पाधिकारम् वगैरे वगैरे काव्यांतून करिकालानें उत्तर हिंदुस्थानांत स्वार्‍या करून थेट हिमालयावर आपला व्याघ्रध्वज रोविल्याचा उल्लेख आहे (पल्लवांचा ध्वजहि व्याघ्राचाच होता). अवंतीराज व मगधराज आणि वज्र राज (बुंदेलखंड) हे त्याचे मित्र होते. याच्या कारकीर्दीत कावेरीपट्टनम् येथें दर्यावदीं व देशावरील व्यापार फार जोरांत सुरू होता. याच्या कारकीर्दीत कांची नगरी सोन्याची केली असें वर्णन आहे. कावेरी नदीला बंधारे घालून कालवे काढले होते. यावेळीं चोल साम्राज्याची भरभराट झाली असून करिकाल हा सम्राट बनला होता. याच्या वर्णनपर पट्टिनप्पालै नांवाचें एक काव्य झालें; त्याच्या कर्त्यास एक लक्ष सव्वा हजार सुवर्णमुद्रा, करिकालानें बक्षिस दिल्या. हा विद्वान असल्यानें याच्या पदरीं, परनर, कळाथलैयार वगैरे (संगम ग्रंथांत प्रसिद्ध असलेले) कवी होते. यानें बरींच वर्षे राज्य केलें.

नेडुमुडिक्किळ्ळीः— हा करिकालाचा पुत्र किंवा नातु असून त्याच्या मागून राजा झाला. यानें बरीच वर्षे राज्य केलें. करिकाल वारल्यानंतर चेर पांड्यांनीं चोल राज्यावर स्वारी केली; परंतु नेडूनें, त्यांचा कारियारू येथें पराभव केला. या लढाईत कांची येथील सुभेदार नेडूच्या भाऊ, हाहि हजर होता. यावेळीं कांची हें चोल साम्राज्याचें उत्तर प्रांतांतील मुख्य ठिकाण होतें. तोण्डमाणइळनीरयानः- नेडूचा पुत्र, एका नागकन्येपासून त्याला झाला होता. हा पुढे कांचीचा प्रसिद्ध सम्राट झाला. याची प्रशस्ती पेरूंबाणार्रूप्पदाई काव्यांत वर्णिलेली आहे. याच्या वेळीं जलदेवताच्या ओधानें कावेरीपट्टन व उरैयूर राजधान्या (समुद्राच्या वाढीने?) वाहून गेल्या. शेंगुत्तुवन चेर राजानें याच्यावर स्वारी करून याचा पराभव केला व याचें बहुतेक राज्य काबीज केलें. पुढें पाण्ड्य व पल्लव यांचें प्राबल्य वाढल्यानें चोलघराणें हतप्रभ झालें. या तोण्डमाणाची हकीकत आढळत नाहीं.

कोच्चेंगजः— तोण्डमाणाच्या नंतर पल्लव अमदानींतील तीनशें वर्षात चोलांचे फक्त नांव ऐकूं येतें. बाकीची माहिती आढळत नाहीं. या काळांत एका कोच्चेंगण चोलराजानें एका चेरराजाचा पराभव केल्याचा उल्लेख आढळतो. याला शैवपंथी व विष्णुपंथी लोक आपल्या बाजूचा म्हणतात. कारण त्यानें शिव-विष्णूचीं पुष्कळ (एकट्या शिवाचीं सत्तर) देवळें बांधिलीं होतीं. एक पाण्ड्यराणी चोलराजकन्या होती वगैरे या वेळची चोलांची त्रोटक माहिती आहे. पल्लवांप्रमाणेंच चालुक्यांनींहि या सुमारास चोलांनां नामशेष केलें होतें. सिंहली बखरींवरून चोलराजांनी सीलोनवर पुढीलप्रमाणें (या प्राचीनकाळीं) स्वार्‍या केल्या होत्या. पहिली ख्रि.पू. २४७; दुसरी ख्रि.पू. १४०, तिसरी इ.स. ११०, उलट सिंहलीलोकांनींहि त्यांच्यावर स. ११३ त स्वारी केली होती.

मध्यकालीन चोल.— पल्लव व चालुक्य यांचा उत्कर्ष होत होता तरी सुद्धां चोलांनीं आपली सत्ता थोडी फार जिवंत ठेवली होतीच. ह्युएनत्संगाच्या वेळीं या चोलांचे एक लहानसें घराणें टिकून होतें. पल्लवांनां राष्ट्रकूटांनीं पुढें नामशेष केलें व आपले वर्चस्व दक्षिणेंत स्थापिलें. या वेळीं दक्षिणेंत पूर्व चालुक्य, राष्ट्रकूट, पांड्य, गंग, पल्लव, बाण यांचीं राज्यें ठिकठिकाणीं पसरलेलीं होतीं. पुढें गंग-पल्लव-बाण या त्रिकुटानें वरगुण पांड्यराजाचा पराभव केल्यानें त्याचा फायदा घेऊन चोलांनीं आपलें डोकें वर उचलेलें (८५०). वरीलप्रमाणें वरगुण पांड्यराजाचा पराभव झाल्यानंतर तत्कालीन विजयालय चोलराज यानें आपल्या जहागिरीचा विस्तार वाढवून आपल्या चौतीस वर्षांच्या कारकीर्दीत तंजावर, कन्याकुमारी, कांची वगैरे प्रांत हस्तगत करून तंजावरास राजधानी केली. याची कारकीर्द ८४६-८८० पर्यंतची होती; याला परकेसरीवर्मा अशी पदवी होती. आदित्य पहिला हा विजयालयाचा पुत्र, याला राजकेसरीवर्मा ही पदवी होती. यानेंहि पुष्कळ प्रांत हस्तगत केले व अपराजित पल्लव व कोंगूराज यांचा पराभव केला. यानें ८८०-९०७ पर्यंत राज्य केलें व आपली सरहद्द राष्ट्रकूटांच्या सरहद्दींशी भिडविली. परान्तक पहिला हा अदित्याचा मुलगा असून याला परकेसरीवर्मा, वीरनारायण वगैरे पदव्या होत्या. याची कारकीर्द ९०७-९४७ पर्यंत झाली. यानें आपला राज्यविस्तार बराच केला. त्यानें केरळराजकन्येशीं विवाह केला व पाण्ड्यराजाचा, बाणराजाचा, वैडुंबराजाचा पराभव केला (९१०). याच्या कारकीर्दीत सर्वत्र शांतता नांदत असल्यानें, धार्मिक चळवळीस बराच जोर येऊन, काळमुख व पाशुपतादि शैवपंथांनां व वैष्णवपंथांनां राजदरबारी मान्यता मिळाली. परान्तक स्वतः शैव असल्यानें त्यानें चिदंबरंच्या शंकराच्या देवळाची सर्व पटई सोन्यानें मढविली होती असें सांगतात. त्यानें आपल्या वयाच्या सदतिसाव्या वर्षी सीलोनवर स्वारी केली होती. याला पांच पुत्र होते. त्यांपैकी तिघांनी राज्य केलें. राजकेसरीवर्मन ऊर्फ राजादित्य हा परान्तकाचा जेष्ठ पुत्र त्याच्या मागें राजा झाला व त्यानें उत्तरेकडे राष्ट्रकूटांच्या प्रांतावर स्वार्‍या केल्या तेव्हां बुत्तुग या (राष्ट्रकूटाच्या) सेनापतीनें राजादित्यावर चढाई करून तक्कोलम येथें त्याला लढाईत ठार केलें (९५०). याप्रमाणें राजादित्यानें तीन वर्षे राज्य केले (९४०-९५०). पुढें (तिसर्‍या) कृष्ण राष्ट्रकूटानें याच वेळी चोलराजाचे बरेचसे प्रांत व कांचीशहर काबीज करून तंजावरासहि वेढा दिला. गंडरादित्तन हा राजादित्याचा धाकटा भाऊ, त्याच्या मागून राजा झाला; त्यानें कृष्ण राष्ट्रकूटाला परतवून लाविलें. यानें आपल्या नांवाचें एक शहर वसविलें. त्याच्या राणीनें त्याच्या पश्चात् कोनेरीराजपुरम् येथें एका देवळांत त्याचा पुतळा स्थापिला तो अद्यापिहि तेथें आहे. यानें १ वर्ष राज्य केलें. पुढें याचा मुलगा अज्त्रान असल्यानें अरिंजय अथवा अर्जुन मधुरेकोंड, राजकेसरी हा राजा झाला. उत्तमशीली व अरिकुलकेसरिन् हे दोन परांतकाचे पुत्र (अर्जुनाचे भाऊ) होते. अरिकुल हा बापाच्या व अरिंजयाच्या वेळीं सेनापति असे. परान्तक दुसरा ऊर्फ सुंदर परकेसरी हा अरिंजयाचा पुत्र, त्याच्या मागून राजा होता. याच्या वेळीं वीर पांड्यानें उचल केली, परंतु यानें त्याचा चेवूर येथें पराभव केला. याच्या नंतर त्याचा मुलगा आदित्य दुसरा ऊर्फ करिकाल राजकेसरी हा राजा झाला. यानेंहि पल्लव, चेर व पांड्यराजांचा पराभव केला होता. त्याच्या मागें त्याचा चुलत चुलता परकेसरीवर्मन् मधुरांतक उत्तम हा ९६९ त राजा झाला. त्यानें १६ वर्षे राज्य केलें (९८५) व त्याच्या नंतर दुसर्‍या आदित्याचा धाकटा भाऊ पहिला राजराज हा गादीवर आला. या वेळीं चालुक्य व गंग यांची यादवी जुंपल्यामुळें राजराजानें त्याचा फायदा घेऊन आपलें राज्य वाढविलें. हा सर्व चोल राजांमध्यें श्रेष्ठ झाला. यानें प्रथम आपल्या राज्याची अन्तःस्थिति सुधारली व मग मुलुखगिरीस प्रारंभ केला. त्यांत प्रथम चेर आरमारावर स्वारी करून कांडलूरजवळ त्यांचा पराभव केला (९९५); नंतर गंगप्पाडी, नुळंबप्पाडी, तडिगैवळी व वेंगैनाडु हे प्रांत काबीज केले (९९७). पहिले दोन प्रांत गंगांचे असून त्यांवर चालुक्यांचाहि डोळा होता. पुढें चालुक्यांच्या राज्यांत यादवी माजल्यानें, राजराजानें त्यांच्यावर स्वारी करून त्यांनां मांडलिक बनविलें व विमलादित्य चालुक्यराजास कुंदव्वा ही आपली मुलगी दिली. याच सुमारास (९९७) त्यानें पांड्यांचाहि पराभव करून कोल्लम व कलिंग देश जिंकले; ईळम (सीलोन) वर स्वारी करून तेथें आपली सत्ता स्थापिली (१००३). यानंतर तीन चार वर्षात त्यानें साडेसात लाख वसुलाचा रट्टपाडी प्रदेश जिंकून, सत्याश्रय चालुक्याचा पराभव केला (१००७). तंजावर येथील देवळांत राजराजानें आपण आपल्या राण्या व बहीण यांनीं दिलेल्या एकंदर धर्मादाय देणग्यांची यादी शिलालेखरूपानें खोदून ठेविली (१०१०) व तंजावर शहर पुन्हां वसविलें; कारण मध्यंतरी चालुक्यांनीं त्याचा नाश केला होता. आयुष्याच्या शेवटीं त्यानें समुद्रांतीस बारा हजार बेटें जिंकल्याचा उल्लेख आढळतो (१०१२). याप्रमाणें आपलें साम्राज्य वाढवून तो चोलसम्राट बनला. यानें आपली उत्तर सरहद्द कोवरीच्या उगमाजवळील येडतोरेनाड गांवापासून थेट कृष्णेच्या मुखापर्यंत भिडविली. तसेंच याची दर्यावरील सत्ता रामनादपासून विजगापट्टमपर्यंत होती. राजराजाला राजाश्रय, अरूमोळीदेव मुम्मूडीचोळ, जयैमगोंदा वगैरे पदव्या होत्या. याच्या कारकीर्दीत प्रजा सुखी व धनधान्यसंपन्न होती. हा बहुधा १०१३ त वारला असावा. त्याच्या मागून त्याच्याच सारखा पराक्रमी त्याचा पुत्र, गंगई कोंड ऊर्फ मुडिगोंड, निगरिली उत्तम चोल राजेन्द्र हा राजा झाला. यानेंहि अनेक देश जिंकले, लोकोपयोगी कृत्ये केलीं व राज्यविस्तार केला. ह्यानें युवराज असतांनाच बापाबरोबर पुष्कळ मोहिमांत भाग घेतला होता. इडैत्तु रैनाडु, दुर्गम वनवासी, अजिंक्य तटाचें कोळ्ळीप्पाक्कई, मण्णैक्कडगम हीं प्रसिद्ध तटबंदीचीं ठाणीं जिंकून, नंतर ईळम (सीलोन) वर स्वारी केली व तेथील राजाचा पराभव करून त्याचा, त्याच्या राणीचा, सुंदर नांवाच्या त्याच्या पुत्राचा असे तीन रत्‍नखचित मुकुट व राजाचा बहुमोल कंठा खंडणीदाखल घेतला. केरळ प्रांतावर स्वारी करून तेथील राजाचा सर्व खजिना, मुकूट व सूर्यमाला नांवाचा कंठाहि त्यानें यावेळीं घेतला. पुढें अनेक बेटेंहि त्यानें जिंकली (१०१५-२०) मुयंगी येथें जयसिंह चालुक्याचा पराभव करून शांदिमत्तीवु, रट्टपाडी (येथील कुबेराच्या नऊ निधीइतकी संपत्ती त्यानें मिळवीली), विक्रमवीराचें चक्रकोट, मदुरमण्डल, नामनैक्कोणम, पंचप्पळ्ळी, माशुणीदेश, आदिनगर (येथील धीररथाला जिंकून त्याचा सर्व खजिना घेतला), ओड्डविषय, कोसलैनाडु, दंडभुक्ती (येथें धर्मपाल राजा होता) दक्कनलाट, (गोविन्द चन्द्राचा), वंगळदेश, निकोबार बेटें, शंगुक्कोट्टम, (महिपालाचें) व गंगराजाची राजधानी इतके देश व शहरें त्यांनें जिंकलीं (१०२०-२२). हीं नांवें तिरू व लंगाडू ताम्रपटांत येतात. कदाचित् ही यादी अतिशयोक्तीची असेल, तरी पण राजेन्द्र हा फार पराक्रमी होता एवढें खरें. नंतर त्यानें पाण्ड्य देश जिंकून त्यावर चोलपांड्य या आपल्या राजपुत्रास सुभेदार नेमिलें व केरळ देशावर दुसर्‍या राजपुत्रास सुभेदार नेमिलें. याच्या सेनापतीनें गंगातटाकापर्यंत मोहीम केली व ओरिसाच्या राजास आणि बंगालच्या महिपालाला मांडलिक बनविलें. राजेंद्रानें गंगैकोंड शोळापुरम् येथें एक मोठा तलाव बांधला व त्यांत गंगेचें पाणी (तो शुद्ध करण्यासाठी) आणून घातलें. याचें नांव जयस्तंभतडाग होतें. याची एक बाजूची पाळ पंधरा मैल लांब होती. या तलावामुळें त्या प्रांतापैकीं अर्ध्या प्रांतास शेतीसाठीं पाणी पुरविण्यांत येई. यानें आपली मुलगी अम्मंगदेवी ही राजराज चालुक्यास दिली होती. राजशेखर विलास नांवाच्या काव्यांत यानें केलेल्या सर्व मोहिमांचा इतिहास आलेला आहे. त्यानें १०३३ पर्यंत ही मुलुखगिरी केल्यानंतर मग आपलें सारे लक्ष्य प्रजेच्या सुखसोईकडे लाविलें. या कामीं त्यानें बारा वर्षे घालविलीं. त्यानें गंगैकोंडशोळापुरमू येथें राजधानी स्थापून तेथें अनेक देवळें व वर सांगितलेला तलाव बांधला. कंहीं वर्षांपूर्वी या तलावाच्या पाळीचे व देवळांचे दगड काढून, ते सध्याचें कोलेरून येथील धरण बांधण्यास नेले. हल्लीं तो तलाव व देवळें नामशेष झाली आहेत. एकोणीसाव्या शतकांत फेरोनें लिहिलेल्या गॅझेटियरमध्यें त्यांच्या बांधकामाच्या अजस्त्रपणाची व सौंदर्याची फार प्रशंसा केलेली आहे. राजेन्द्रानें आपल्या राजाधिराज नांवाच्या मुलाला स्वतः सर्व राज्यकारभाराचें शिक्षण दिलें होतें. राजेन्द्रानें एकतीस वर्षे राज्य करून प्रजेस सुख दिलें. तो १०४३ त वारला. त्याच्या मागून त्याचा दुसरा पुत्र राजाधिराज उर्फ जयमगोंड हा राजा झाला. याचा वडील भाऊ आळवंदान नांवाचा होता. यानें १०४३ ते १०५२ पर्यंत राज्य केलें. राजाधिराज हा राईसच्या मतें राजेन्द्राचा भाऊ असावा; परंतु तें संशयास्पद आहे. अण्णिगिरी येथील (१०७१) चालुक्यांच्या शिलालेखांत राजाधिराजाची बरीचशी माहिती आली आहे. यानें गंगमंडळाच्या पेरूमानडी राजाचा पराभव करून गंगमंडळ काबीज केलें व तेथील जैनमंदिरें लुटलीं. पुढें कांहीं वर्षानीं गंगांनीं चोलाची अधिसत्ता झुगारली. राजाधिराज हा गादीवर येतांच त्यानें मोहिमांस सुरूवात केली. कारण राजेन्द्र मेल्यावर चोल मांडलिकांनीं बंडें केलीं होतीं, तीं याला मोडावीं लागलीं. तीं मोडून यानें त्यांच्या राज्यावर आपला चुलता व पांच भाऊ यांनां चेर, चालुक्य, गंग, पाण्ड्य, पल्लव, सीलोन वगैरे प्रांतांवर सुभेदार नेमिले. यानें सीलोन जिंकल्यानें त्या राजाची कनोजाधिपति ही पदवी याला मिळाली (सीलोनच्या राजघराण्याचा मूळपुरूष कनोजच्या राजघराण्यांतील होता अशी दंतकथा आहे.) पाण्ड्य राजे त्याच्यावर उठले तेव्हां त्यानें त्यांपैकीं मानाभरण याचा शिरच्छेद केला, वीरकेरळास हत्तीच्या पायीं दिलें व सुंदर यास हद्दपार केलें. यानें त्रावणकोर व चेर येथील राजांचा पराभव करून कांडलूरजवळ आरमारी जय मिळविला व चालुक्यांचा परभव केला. विक्रमादित्य, विजयादित्य व जयसिंह हे चालुक्य राजे मागें हटवून त्यांची कोल्लीप्पाक्कोई ही एक राजधानी जाळली. मग यानें सीलोनच्या विक्रमबाहु, विक्रमपांडु, वीरसालमेघत व श्रीवल्लभमदन या चारी राजांचा पराभव केला व उत्तरहिंदुस्थानाकडे मोर्चा फिरवून तिकडील गणपति, नारायण, मधुसूदन वैगरे राजांनां जिंकले. परंतु पुढें कोप्पम येथें शत्रूशीं लढत असतां हा लढाईंत मारला गेला (१०५२). यानें आपलें राज्य निष्कंटक केलें व थोडासा नवीन प्रांतहि मिळविला. याच्या मागून राजेन्द्र हा त्याचा भाऊ राजा झाला. हा कोप्पमच्या लढाईंत हजर होता. त्या लढाईनें चोल राज्यास मोठाच धक्का बसला होता तो यानें सांवरला व आपलें राज्य स्थिरस्थावर केलें. यानें १६०२ पर्यंत राज्य केलें व सिलोनच्या राजास पकडून सीलोन आपल्या राज्यास जोडलें आणि कोल्हापूर येथें एक जयस्तंभ उभारला. याची मधुरांतकी नांवाची मुलगी चालुक्य राजपुत्र राजेन्द्र चोल उर्फ कुलोत्तुंग यास दिली होती. याच्या नंतर याचा पुत्र राजमाहेन्द्र हा गादीवर बसला. हा अतिशय न्यायी असून यानें श्रीरंगम् येथील देवास वर्षासन नेमून दिलें होतें. यानें राजमहेन्द्री हें शहर स्थापन केलें व मल्ल चालुक्यानें राजमहेन्द्राचा पुष्कळ प्रांत काबीज केला. कारण या वेळीं चोलांच्या राज्यांत बंडाळी झाली होती व राजघराण्यांत सिंहासनावर कोणी बसावें याबद्दल यादवी सुरू झाली होती. चोल राजघराण्यांत या वेळीं बरेचसे राजपुत्र व राजसंबंधीं लोक आपापला हक्क प्रस्थापित करूं पहात होते.

राजमहेन्द्राच्या मागें त्याचा चुलता वीरराजेन्द्र हा राजा झाला. त्यानेंहि बर्‍याच स्वार्‍या करून आपला राज्यविस्तार केला (१०६३-७०). याला चालुक्यांशीं एकंदर पांचदा लढावें लागलें. प्रथम यानें त्यांच्यापासून गंगवाडी प्रांत (सरकार प्रांत) जिंकला. नंतर वेंगीच्या राज्याचा बंदोबस्त करून कृष्णा-तुंगा-संगमावर कुडळसंगम या ठिकाणीं चालुक्यांचा मोठा पराभव केला. यावेळीं चालुक्यांच्या मदतीस चोलांचे सर्व बंडखोर मांडलिक आले होते. या लढाईत वीरराजेन्द्रास अपरिमित लूट मिळाली. या लढाईचें वर्णन एका शिलालेखांत आलें आहे. त्यावरून त्या वेळच्या युद्धाचें सामान्यस्वरूप दिसून येतें. त्या काळीं हत्तीचा युद्धांत फार उपयोग होई. त्यानंतर यानें (उलगै येथें) केरळ, पांड्य, गंग व नोळंब या राजांचा पराभव केला व चालुक्यराजाच्या आव्हानावरून पुन्हां कुडळसंगम येथें जाऊन त्यांनां पळवून लावून तेथें एक जयस्तंभ उभारला. पुढें त्यानें विक्रमादित्य चालुक्यास त्याच्या भावाविरूद्ध गादीवर बसण्यास मदत करून त्याला आपली मुलगी दिली. बेझवाडा येथें वेंगीदेशच्या सैन्याचा पराभव करून तो देश खालसा केला आणि कलिंगदेशावरहि स्वारी केली. त्यानें वेंगीदेश आपला आश्रित व जावई विक्रमादित्य चालुक्य यास दिला आणि स्वतः राजाधिराज राजराज ही पदवी धारण केली. पुढल्या वर्षी यानें कुडळसंगम येथें पुन्हां सोमेश्वर चालुक्याचा पराभव करून करडीक्कल येथें जयस्तंभ उभारला व कांपिली शहर जाळलें (१०६८); आणि ब्रम्हदेशचा दक्षिण भाग (तलैंग नांवाचा) खालसा करून दर्यावर मोठा जय मिळविला (१०६९).  लष्करी कामाप्रमाणें राज्यकारभाराच्या मुलकी कामांतहि तो प्रवीण होता. हा अखेरीस १०७० त मेला. त्याच्या मागून त्याचा पुत्र अधिराजराजेंद्र हा गादीवर आला. तामीळ व्याकरण वीरसोळीयम् नांवाचें (बुद्धमित्रानें केलेलें) वीरराजेंन्द्राच्याच आश्रयानें झालें. याच्या मृत्युनंतर चोल चालुक्य यांच्यांत पुन्हां भांडणें सुरू झाली. अधिराजराजेन्द्र हा बापाच्या मागून गादीवर बसला. यानें एक वर्ष राज्य केलें. याला गादीवर बसविण्यांत याचा मेव्हणा विक्रमादित्य चालुक्य यानें मदत केली होती. पुढें याच्या प्रजेनें बंड करून याला ठार मारलें. एके ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, या अधिराजेन्द्रास राजेन्द्र कुलोत्तुंग ऊर्फ राजीग केशरीवर्मा यानें (बंड उभारून) ठार मारून त्याची गादी उपटली; तेव्हां विक्रमादित्यानें त्याच्यावर स्वारी करून कुलोत्तुंगाला पिटाळून लाविलें. अधिराजेंद्रास पुत्र नव्हाता. कुलोत्तुंगास राजराज शार्ङ्गधर नांवाचा एक भाऊ होता असें म्हणतात. यापुढें कुलोत्तुंग हा राजा झाल्यानें पूर्वचालुक्यांचा वंश चोलवंशांत कायमचा मिसळून गेला.  कुलोत्तुंग हा दोनदा गादीवर बसला; एकदां (१०७० त) पैतृक राज्यावर म्हणजे वेंगीच्या सिंहासनावर; व दुसर्‍यानदां सर्व चोलसाम्राज्याच्या सिंहासनावर (इ.स. १०७४ त) असें भट्टनाथस्वामी म्हणतात; कारण १०७४ त त्यानें कृलोत्तुंग ही पदवी धारण केली; तत्पूर्वी त्याचें साधें नांव राजेन्द्रच होतें. राजेंद्र ऊर्फ कुलोत्तुंग चोल हा चालुक्यवंशी राजराज चालुक्याचा मुलगा असून राजेंद्र चोलाचा जांवई होता. याची आई अम्मंगदेवी ही गंगैकोंड चोल राजा याची कन्या होती. हा लहानपणीं आपल्या आजोळी (सासुरवाडीस) रहात असे. याच्या बापाचे मरणानंतर याच्या चुलत्यानें वेंगीचें राज्य बळकाविलें होतें. हा वेंगीचा राजा व्हावयास पाहिजे होता. परंतु चालुक्य राजवंशांत त्यावेळीं यादवी माजली होती व हा अज्त्रान होता. मोठा झाल्यावर हा तिरूवोर्रीयुर प्रांताचा सुभेदार झाला. याला राजकेसरीवर्मा अशी पदवी होती. हा वर सांगितल्याप्रमाणें गंगैकोंड या चोल राजाचा (मुलीकडून) नातु होता. याचा बाप राजराज १०६१-६२ त मेला होता. यानें युवराज असतांना वैरागरम व चक्रकोट हीं महत्वाचीं ठाणीं काबीज केलीं होतीं. याच्या कारकीर्दीच्या एकूणपन्नास वर्षांपर्यंतचे शिलालेख प्रसिद्ध आहेत. त्यावरून तो १०७० त वेंगीच्या व चोलराजाच्या गादीवर बसल्याचें दिसतें. त्यापूर्वी तो आपल्या आजाबरोबर (गंगईकोंड) बर्‍याच लढायांत हजर असें. चोलसाम्राज्याच्या सिंहासनावर बसण्याची संधी लक्ष्य लावून तो पहात होता व ती अधिराजराजेंद्राच्या वेळीं त्याला लाधली. तत्पूर्वी तो आपल्याला चालुक्य न म्हणवितां चोलच म्हणवून घेई. त्याची आई व आजी कुंदव्वा या चोलवंशीय होत्या. त्याचा ध्वज चोलध्वज (व्याघ्रचिन्हांकित) होता, चालुक्यध्वज (वराह) नव्हता. यानें आपल्या राज्यारोहणाच्या चौथ्या वर्षी कुलोत्तुंग ही पदवी धारण केली व कुतन्लराजाचा व पांड्यराजाचा पराभव केला. याला कावेरी नदीतीरावर राज्याभिषेक झाला होता. त्यानें म्हैसूर प्रांतावर स्वारी करून (१०८१) विक्रमादित्य चालुक्याचा पराभव केला (१०८३) व त्याला तुंगापार घालवून गंगामंडल व सिंगण प्रांत काबीज केले. पाण्ड्यराजाला जिंकून मानार, तिनेवेल्ली, कन्याकुमारी, कुट्टरू, मलबार वगैरे प्रांत काबीज केले (१०८५). व त्या त्या प्रांती आपले अधिकारी नेमिले. याच्या एका तोंडमान चक्रवर्ती नांवाच्या लेकवळ्यानें पल्लवराजाचा पराभव करून तें राज्य खालसा केलें होतें. याप्रमाणें कुलोत्तुंगानें चोलसाम्राज्य वाढविलें. या वेळीं दख्खनमध्यें विक्रमादित्य चालुक्य व कुलोत्तुंग चोल हे दोन बलिष्ठ सम्राट होते. पाण्ड्य व चेर हे चोलांचे मांडलिक होते. मदुरेस कुलोत्तुंगानें आपला भाऊ यास अधिकारी नेमलें होतें. कुलोत्तुंगानें राज्यप्रसार करतांना राज्यांतील व्यवस्थेकडेहि लक्ष्य दिलें. आपल्या सर्व राज्याच्या जमीनीची मोजणी केली (१०८६). या मोजणींतील शेवटचें परिमाण श्रीपाद (कुलोत्तुंगाचें पाऊल) होतें. यानें दोनदां (१०९५, १११२) कलिंगदेश जिंकला. त्यामुळें त्याची कीर्ती जास्त वाढलीं. टेकी ताम्रपटावरून दक्षिण कलिंग चोलसाम्राज्यांत मोडत असल्याचें समजतें. कुलोत्तुंगानें शेवटी गंगवाडी प्रांत होयसळापासून पुन्हां काबीज केला. कारण त्यांनीं त्याच्या सुभेदाराला गंगवाडींतून हुसकून देऊन उलट त्याच्याविरूद्ध चालुक्यांस मदत केली होती (१११६-१७). यावेळीं चोलांची कावेरी नदीवरील एक राजधानीहि होयसलांनीं घेतली. व म्हैसूर प्रांतांतीला चोलांच्या मांडलिकांनीं त्यांच्याविरूद्ध बंड केलें. परंतु तें कुलोत्तुंगानें मोडलें (१११८). सरहद्दीवर त्यानें लष्करी ठाणीं बसवून देशांत शांतता ठेवली. त्यामुळें याच्या अखेरच्या कालांत याच्या भोंवतालचें सर्व राजे याचे मित्र राहिले (फक्त म्हैसूर बाजूस थोडीशी खळबळ चाले). हा शैव असल्यानें प्रसिद्ध रामानुज याला यानें आपल्या राज्यांतून हद्दपार केलें होतें. याला तीन (दिन चिंतामणि, ईळीशैवल्लभी, त्यागवल्ली ऊर्फ लोकमहादेवी मधुरांतकी या) राण्या होत्या. शेवटची पट्टमहिषी होती. हा चोल सम्राटांतील शेवटचा पराक्रमी सम्राट होय. याच्यानंतर चोल साम्राज्यास उतरती कळा लागली याच्यानंतरचे राजे शूर होते खरे पणे त्यांनां आपली सत्ता मोठ्या प्रयासानें राखतां आली. विक्रम हा कुलोत्तुंगाचा चवथा पुत्र. युवराज असतां हा वेंगीचा सुभेदार होता. कुलोत्तुंग १११८ त मेल्यावर हा राजा झाला. यानें एलोर व कलिंगवर स्वारी केली व १७।१८ वर्षे शांतपणें राज्य केलें. जयमगोण्ड कवीनें आपलें कलिंगत्तुप्परणी हें काव्य याला अर्पण केलें. हा वैष्णव असल्यानें रामानुजाचार्य हा परत याच्या राज्यांत येऊन राहिला. याच्यामागून (११३५) याचा पुत्र कुलोत्तुंग दुसरा गादीवर आला. याच्यावर अनेक काव्यें झालीं आहेत. यानें चिदंबरम् येथील देवाची मूर्ति समुद्रांत टाकली. ती पुढें रामानुजानें काढली असें एका लेखांत वर्णन आहे. यानें चौदा वर्षे राज्य केलें. याच्यामागून (११४६). राजराज दुसरा हा त्याचा मुलगा राजा झाला. यानें ११७८ पर्यंत राज्य केल्यावर त्याचा पुत्र राजाधिराज दुसरा गादीवर आला. यानें ११८६ पर्यंत राज्य केलें. याच्या व याच्या मागच्या तीन राजांच्या कारकीर्दीत शांतता असल्यानें वाङ्‌मय बरेच वाढलें. व शेक्कीळार, कंबन, ओट्टक्कुट्टन, पुगळेंदी, वगैरे अनेक वाङ्‌मयभक्त होऊन गेले. याच्या कारकीर्दीत पाण्ड्य राजघराण्यांत यादवी माजली. एका पांड्य राजपुत्राला याची व एकाला सीलोनचा पराक्रमबाहु याची मदत होती. व त्यामुळें पराक्रमबाहु व चोल याच्यांत युद्ध उपस्थित झालें. पराक्रमबाहूनें रामेश्वर लुटून कुलशेखर (चोलमित्र) पांड्याचाहि पराभव केला. परंतु राजाधिराजानें शौर्यानें? पराभव करून मदुरेवर स्वारी केली. वीरपांड्याला (पराक्रमबाहूचा मित्र) त्याच्या सर्व कुटुंबासह ठार करून तेथें एक विजयस्तंभ उभारून व तेथील राज्यावर आपला एक मांडलिक ठेवून तो परतला. याच्यामागून (११८६) त्याचा पुत्र कुलोत्तुंग तिसरा हा गादीवर येऊन त्यानें ११९७ त पांड्यराजाचा पराभव केला व कांचीच्या तेलगु चोलाला नामोहरम केलें. यानें अनेक शिवालयें बांधलीं. यानें अनेक मांडलिक उत्पन्न केले व त्यांनींच पुढें चोलसाम्राज्य खिळखिळें केलें. तसेंच होयसळ, काकतीय यादव वगैरे शेजारचे राजेहि आपले हातपाय पसरूं लागले. त्यामुळें चोल साम्राज्य मोडकळीस आलें. दक्षिणेंतील सर्व राजघराण्यांत अंतःकलह माजला. कुलोत्तुंगाच्या वेळीं जैन भवनन्दी यानें नन्नुल हें तामीळ व्याकरण लिहिलें. कुलोत्तुंगानंतर (१२१६) त्याचा मुलगा राजराज तिसरा त्रिभुवनचक्रवर्ति, राजकेसरीवर्मा हा राजा झाला. यानें १२४८ पर्यंत राज्य केलें. पांड्यराजा याच्यावर चालून आला असतां, नारसिंह होयसळानें याला मदत देऊन पाण्ड्यांचा पराभव केला (१२२३). पुढें काडव पल्लव यानें राजराजास पकडलें असतां पुन्हां नारसिंहानें त्याला सोडविलें; व त्याच्या राज्यांतील बंडाळी मोडिली (१२३२). परंतु पुढें सर्वत्र बंडें उद्‍भवलीं. तेलेगुचोल हा नेलोरहून, सुंदरपाण्ड्य हा दक्षिणेकडून, काडव पल्लव हाहि दक्षिणेकडून चालून आला व त्यांनीं याचें राज्य घेतलें. शेवटीं याच्या नंतर याचा पुत्र तिसरा राजेन्द्र राजा झाला. त्याच्या वेळीं एक तोतया उत्पन्ना होऊन त्यानें दंगल माजविली. अशा वेळी सोमेश्वर होयसळानें राजेन्द्रास मदत केली व थोडीशी शांतता स्थापना केली. परंतु चोलसाम्राज्याचे तुकडे तुकडे व्हावयाचे थांबले नाहींत. अनेक मांडलिक स्वतंत्र बनले. शेवटीं वरंगळच्या काकतीय उर्फ गणपतिराजांनीं यांचें सर्व राज्य जिंकून घेतलें. त्यामुळें पेन्नार नदीच्या उत्तरेकडील सर्व चोल साम्राज्य नामशेष झालें. या तिसर्‍या राजेंद्रानंतर त्याचा पुत्र त्रिभुवन वीरदेव राजा झाला. यानें १३३२ पर्यंत राज्य केलें. हा शेवटचा चोल राजा होय. याच्या शिवाय आणखी पेरूंजिंग (१२४४-६४), विजयगोंड (१२६६) वगैरे नांवें चोलराजांचीं आढळतात. परंतु त्यांची फारशी माहिती सांपडत नाहीं. मुसुलमानांनीं स्वारी करून ज्या चोल राजाला पदच्युत केलें त्याचें नांव मधुरांतक पोरप्पि असून, त्यानें १२८६-१३१० पर्यंत राज्य केलें होतें. पुढें विजयनगरकरांच्या कारकीर्दीत भंगप्पदेव, कांचीचा राजा नारायणराज (१३३७-१३५६) व वीरचंप (१३१४) या तीन चोल राजांचा उल्लेख येतो. मध्यंतरी उडियार घराण्यानें व मदुराच्या नायक घराण्यानेंहि याचें राज्य घेतलें होतें. त्या नंतर मराठ्यांनीं आपलें राज्य स्थापिलें.

चोलसाम्राज्य.- चोल साम्राज्याला चोलमंडलम् म्हणत. चोल हें राष्ट्रवाची नांव, चोल, चोळ, चोड, कोन अशा भेदानें पुराणांत आढळते. बृहत्संहितेंतहि हें देशवाची नांव आलेलें आहे (१४.१३.). हल्लीचें कारोमांडल नाव हें या कोन अथवा चोलमंडल शब्दाचेंच अपभ्रष्ट रूप होय. अशोक, या देशास चोर, चोड म्हणे. टॉलेमी चौरे म्हणे. ह्युएनत्संग चोलिय असें म्हणे. आणि प्लिनी हा सोर असें नांव देई.

राज्यव्यवस्था.— चोलसाम्राज्याची बहुतेक शासनव्यवस्था परांतकचोलानें ठरवून दिली होती व तीच अखेरपर्यंत पाळली जात असे. या राज्याचे पुढीलप्रमाणें विभाग व अधिकारी असत. मण्डपम् (इलाखा), त्याखालीं नाडु (जिल्हा) ऊर (शहर किंवा तालुका). दरेक मण्डपमवर एकेक सुभेदार नेमीत. प्रत्येक खेडे शासनपद्धतीचा एकेक घटकावय समजत; व त्या खेड्याच्या परंपरेप्रमाणें तेथे पंचायत असे. सुभेदारांखेरीज सेनापती व प्रधान असत. त्यांनां महासेनापति, दण्डनायक, संधिविग्रहिन् अशीं नांवें असत. महालानिहाय करवसुलीचे अधिकार असत. ग्रामपंचायत शासनपद्धति ही फार प्राचीन होती. चोलराज्यांत पुढील निरनिराळीं सरकारी खातीं असत. सरोवरमंडळ, उपवनदुरूस्तीमंडळ, सर्वसाधारणदुरूस्तीमंडळ. कुटुंब अज्त्रानपालन शेतकी, ग्रामपरीक्षक, साधुसंन्याशांची तरतूद करणारें; या सर्व खात्यांत विद्वान ब्राम्हण अधिकारी असत. गांवांतील प्रत्येक पेठ निरनिराळ्या लोकांच्या ताब्यांत असे. त्यास ग्रामकोन म्हणत. शेतसारा कायमचा ठरावीक व उत्पन्नाच्या मगदुरावर चढता उतरता अशा दोन स्वरूपांत वसूल करीत. शेती सुधारण्याचें (मॉडेलफार्मसारखे) कामहि त्यावेळीं होतें. पडजमीन अत्यंत स्वस्त भावानें प्रजेस लागवडीस देत.

तत्कालीन चलन माडै (ऊर्फ मधुरांतकन) नाणें होतें. एका माडैचे दोन काशु अथवा भाताचे साडेपांच कलम असत. या कलमाची किंमत कमी जास्त होई. नाणें पाडून देण्यास सरकारांत माडैकुली कर भरावा लागे. धान्य मोजण्याच्या मापास मरक्काळ व द्रव पदार्थ मोजण्याच्या मापास एकनाथ म्हणत. राज्यांत पाटबंधारेखाते व लोकोपयोगी खातें होतें. कुलोत्तुंगानें सर्व जकाती काढून टाकल्या. त्यामुळें तो लोकप्रिय होऊन लोकांनीं त्याला सुंगन्दवीर्त (जकाती माफ करणारा) ही पदवी दिली.

कुलोत्तुंगाच्या राशियतींत धार्मिक व वाङ्‌मयिक पुनरूज्जीवन झालें. रामानुजाचार्य याच्याच वेळीं झाला. जयमकोण्ड  हा कुलोत्तुंगाचा राजकवि होता. यानेंच शिलप्पाधिकारम् टीका लिहिली. शेक्कीळार हा शैव ग्रंथकार व आदियार वगैरे कवी व ग्रंथकार याच्या वेळीं झालें. कुलोत्तुंगापूर्वी बरेच आळवार होऊन गेले असें एका (१०८८ च्या) शिलालेखावरून ठरतें. त्यामुळें बाराव्या व तेराव्या शतकानंतर आळवार होऊन गेले, हें काल्डवेलचें मत चुकीचें दिसतें. कुलोत्तुंगानें कुलशेखराळवार याच्या ग्रंथपठणासाठीं उत्पन्न दिल्याचें आढळतें. आळवारांप्रमाणेंच नम्मळवारहि ११ व्या शतकापूर्वीच होऊन गेल्याचें दिसतें (उक्कल शिलालेख). तामीळ वाङ्‌मयाची वृद्धी चोलसाम्राज्यांत बरीच झाली.

ग्रामसभा.— ग्रामपंचायतीस तामीळ भाषेंत कुर्रम म्हणत. हिचे अधिकारी लोकांस जबाबदार असत. पंचायतींच्या महासभाहि असत. उक्कल येथील चौदा शिलालेख या ग्रामपंचायतीच्या कारभाराचे निदर्शक आहेत हे लेख सन ८०० ते ११०० पार्यंतचें आहेत. पंचायतीच्या ताब्यांत कर, बागा, देवळें, तळीं, कालवे, वगैरे कामें असत. त्यांच्या निरनिराळ्या समिती असत. जंगलखातेंहि त्यांच्या ताब्यांत असे. नवीन वसाहत करण्यास त्यांची परवानगी लागे; खंडानें द्यावयाच्या शेतजमिनीहि पंचायत देई; गांवचें पोलीसहि यांच्या अधिकारांत असे; सार्वजनिक फंड हिच्या ताब्यांत असत. बिनवारशी माल किंवा जमीनी यांची खरेदीविक्रीहि हीच करी. सारावसुली अगर माफी किंवा त्यासाठीं जमीन जप्‍त करणें वगैरे अधिकार हिला होते. सारावसुलीची शिल्लक राजधानीस न पाठवितां सभा आपल्याजवळ ठेवी व अडचणींत शेतकर्‍यांनां मदतीदाखल देई. करवसुलीच्या कामीं जबरदस्ती होत नसे. हिची निवडणूक दरसाल होत असे, व सर्व सभासद लोकनियुक्त असत. यांच्यावर सरकारी अधिकार्‍यांची देखरेखीसाठीं नेमणूक होई. मात्र त्यांचें काम हिशेब तपासण्याचें व अंदाजपत्रकाप्रमाणें राज्यांतील वसुलांतून तितकी रक्कम पुरविण्याचें एवढेंच असे. हे अधिकारी दोन असत. प्रथम देवस्थान व इनाम वगैरेंची रक्कम देऊन, बाकीचा गांवचा सर्व वसूल (सरकार देण्याशिवाय) पंचायतीच्या हातींच राही. न्यायनिवाडेहि पंचायत करी. फांशीची शिक्षा क्वचित् अमलांत येई. देवळांत नंदादीप लावणें अगर पंचायतीला अमुक इतक्या गाई पुरविणें या गोष्टी शिक्षा म्हणून देत असत. ज्यूरीचीहि पद्धत त्यावेळीं होती. पंच (ज्यूरर्स) देतील तो निकाल अखेरचा म्हणून सरकारकडून मानला जाई. फक्त सरकारी अधिकार्‍याच्या देखरेखीखालीं खटला चालें एवढेंच. तत्कालीन दळणवळणाचीं अल्प साधनें व अफाट प्रदेशविस्तार लक्षांत घेतां ही पंचायतपद्धति बरीच निर्दोष होती असें वाटतें.

महाजनसभाः— हिच्या तब्यांत अनेक ग्रामसभा असत. यांच्या सभासदांची संख्या कधीं कधीं पांचशेंपर्यंत असे. निरनिराळ्या खात्यांवर देखरेख करणारीं उपमंडळें (कमेट्या) असत. नाणें पाडण्यास जें सोनें आणून देण्यांत येई, त्याच्यावर देखरेख करणें या सभेच्या हातीं असे. सर्व खात्यांवर, पंचप्रधान, नांवाची देखरेख करणारी मंडळी असे.

निवडणूकीचे नियमः— भौगोलिक महत्वाप्रमाणें खेड्याचें समूह केलेले असत; व त्या त्या समूहाचे पुन्हां विभाग पाडीत. मतदारीचा हक्क वयांत आलेल्या सर्वांनां असे. गांवांतील सर्व उमेदवार लोकांचीं नांवें चिट्यांवर लिहून त्या चिट्या बंद करून एका पात्रांत घालून (पत्र मोहोरबंद करून) महाजन सभेकडे पाठविल्या जात. उमेदवार होण्यास खालील गोष्टींची जरूरी असे. (१) कर देण्यायोग्य जमीनीचा १/४ तरी तुकडा ताब्यांत असणें. (२) स्वतःच्या मालकीच्या जाग्यावर स्वतःचें घर बांधणें. (३) वय ३५ च्या वर व ७५ च्या आंत असणें. (४) मन्त्र ब्राम्हणें अवगत असणें व दुसर्‍यास शिकविणें. (५) वेदपारंगत व भाष्य पढिक असणें. (६) व्यवहारदक्ष व जबाबदारीचीं कामें पार पाडण्यास लायक असणें. (७) योग्य मार्गानें धनसंपादन करणें, सदाचारयुक्त असणें (८) निवडणूकीपूर्वी गेल्या तीन वर्षात महाजनसभा अथवा तिच्या पोटमंडळाचा सभासद नसणे; याप्रमाणें पात्रतेचे नियम असत. अपात्रतेचे नियम पुढीलप्रमाणें असत.  (१) पूर्वीच्या महाजनसभेंतील अथवा पोटमंडळाचे खजीनदार असतांना ज्यांनीं तेथील आपल्या कामाचे हिशेब बरोबर सादर केले नाहींत असे लोक; व त्यांचे निकटचे आप्‍तलोक. या आप्‍तमंडळींत, मावसभाऊ, आतेभाऊ, मामेभाऊ, मामा, काका, भाऊ, सासरे दोन्ही प्रकारचे मेव्हणे, भाचा, जांवई, बाप, आणि स्वतःचीं मुलें इतक्यांचा समावेश होत असे. (२) व्यभिचारी, पंचमहापातकी व त्यांचें संसर्गी आणि त्यांचें आप्‍त (आप्तांत वर सांगितलेले सर्व लोक येत, हें नेहमीं ध्यानांत धरलें पाहिजे). (३) हलक्या जातीच्या स्त्रीशी संबंध ठेवलेला अथवा खालच्या जातींशीं संबंध ठेवल्यामुळें वाळींत टाकलेला. (४) साहसी, चोर वगैरे. (५) अभक्ष्यभक्षण करणारा, पापकर्में करणारा, खोटी सही करणारा, पूर्वी गांवगुंडीबद्दल शिक्षा झालेला, व व्यभिचारी, (इतक्या प्रकारच्या लोकांनीं जरी प्रायश्चितें घेतलीं तरी सुद्धां हे (पांचव्या कलमांतील) लोक आमरण अपात्र समजले जात; पहिल्या चार कलमांतील लोकांनां कांहीं प्रायश्चितें घेऊन अपात्रता दूर करतां येई.

ठिकठिकाणच्या मतदारांच्या नांवाच्या पत्रिका महासभेच्या गांवीं आल्यानंतर एका नेमलेल्या दिवशीं, गांवांतील सर्व अबालवृद्ध, निवडणूकीच्या जागीं (देऊळ किंवा चावडी) जमत; तेथें गांवांतील सर्व उपाध्यायहि असत. मग सर्वात वृद्ध ग्रामोपाध्या उभा राही व एक रिकामें भांडें घेऊन तें सर्वांना खालून वरून दाखवी. नंतर एकादा (ज्याला मतदारपत्रिकेबद्दल कांहीच कल्पना नाहीं असा) लहान मुलगा बोलाऊन त्याच्याकडून निरनिराळ्या गांवांपैकीं एका गांवच्या चिठ्यांचा गठ्ठा, मोहोर फोडून, त्या सर्व चिठ्ठया त्या भांड्यांत घालीत, व त्यांची सरमिसळ करीत. नंतर त्यापैकीं एक चिठ्ठी तो मुलगा बाहेर काढून, त्या उभा राहिलेल्या वृद्ध उपाध्यायाच्या हातावर ठेवी. उपाध्याय त्या चिठ्ठीवरील नांव मोठ्यानें वाची व मग बाकीचेहि उपाध्ये तें नांव वाचून पहात व मग तें कायम झालें (म्हणजे त्या नांवचा माणूस निवड होऊन सभासद झाला) असें ठरे. अशा रीतीनें प्रत्येक गांवाला अवश्य असलेले सभासद निवडण्यांत येत. ग्रामसभेंतहि अशीच निवडणूक होई; त्या सभेचे सभासद किती असत, त्यांची संख्या या उक्कल शिलालेखांत आढळत नाहीं; बहुधां ती २०।३० असावी. महाजनसभेची सभासद संख्या ५०० पर्यंत असे; व त्यांत साधारण ५०।६० गांवें असत (म्हणजे महाजनसभेच्या हाताखालील गांवांचा समूह हल्लीच्या एका तालुक्याच्या मर्यादेऐवढा येतो), आणि त्या प्रमाणांत दर गावांस ८।१० सभासदांची सरासरी पडते. याप्रमाणें निवडणूक झाल्यानंतर एक देखरेखमंडळ नेमीत. जे मागील निवडणुकींत उपवनमंडळांत देखरेख करणारे असत, जे वेदशास्त्रसंपन्न असत व वयोवृद्ध असत, अशांनां चालू सालीं या देखरेखमंडळांत नेमीत. बाकी राहिलेल्या सभसदांपैकीं कांहींनां उपवनमंडळ व बाकीच्यांनां तडाग (पाटबंधारे) मंडळांत नेमीत.

ही महाजना सभा ३६० दिवस अधिकारारूढ राही; नंतर ती मोडीत. सभासदानें गुन्हा केल्यास त्याला सभेंतून काढून लावीत. नवी महाजनसभा निवडणें, भरविणें वगैरे कामें न्यायमंडळ करी. सुवर्णावर (नाण्यांच्या) देखरेख करण्यार्‍यांची व पंचप्रधानांची निवडणूक वरील पद्धतीवरच होई. यासाठीं फक्त  बाराच जाग असत व प्रत्येक खेड्यानें फक्त एकच नांव कळविण्याचें असे. सहा सभासद सोनेंपारख मंडळावर व सहा पंचप्रधान या जागेवर नेमीत. ज्या गांवांतील हे बारा लोक निवडून येत, त्या गांवांस त्यापुढील निवडणुकींत वगळींत असत. हिशेबतपासनिसास ग्रामसभेचें अथवा महाजनसभेचें शिफारसपत्र लागे व तो अत्यंत सचोटीचा असा पारखून ठेवीत. कार्यकारीमंडळांतील सर्व अधिकार्‍यांची निवडणूकहि अशीच चिठ्ठया टाकून होई.

या वार्षिक निवडणुकीमुळें ग्रामशासनपद्धतींत सर्व गांवकर्‍यांनां प्रत्यक्ष काम करण्याची संधि मिळे व त्यांच्यांत कार्यक्षमतेची वाढ होई. सर्वसाधारण सभा व न्यायसभेंतील सभासद सर्वांनां आदरणीय असतील असे नेमीत. यांच्या निवडणुकीची मात्र माहिती आढळत नाहीं.

देशविभाग.— चोल साम्राज्यांत ५०।६० गांवांचा एक ग्रामसमूह असे; अशा कांहीं ग्रामसमूहांचा एक नाडु (जिल्हा) असे व अनेक जिल्ह्यांचा एक प्रांत (कोट्टम किंवा वलांडु), व दोन तीन प्रांतांचा एक इलाखा (मंडलम्) असे. चोल साम्राज्याचे असे आठ वलांडु होते. ते (१) अरूमोळीदेव, (२) क्षत्रिय शिखामणी (३) उय्यकोंडाण (४) राजेंद्रसिंह (५) केरळान्तक (६) राजाश्रय (७) पंड्यकुलाशनी (८) नित्तविनोध या मंडलांवर जो अधिकारी असे तो बहुधा राजघराण्यांतील असे; याचें कारण राज्यांत सहसा बंडाळी होऊं नये व झाल्यास तिचा लवकर बीमोड व्हावा. चोल साम्राज्याचीं सहा मंडलें होतीं तीं (१) तोण्डमण्डल (दक्षिण व उत्तर पेन्नार नद्यांमधील दुआब); (२) खास चोलमण्डलें (तंजावर व त्रिचनापल्ली जिल्हे); (३) राजराजमण्डल (मदुरा जिल्हा व त्रावणकोर संस्थान), (४) कोंगु अथवा अधिराजराजमण्डल (सालेम व कोईम्बतूर जिल्हे), (५) गंगैकोंड चोलमण्डल (म्हैसुर व बंगलोर जिल्हे), (६) निखरिली चोलमण्डल (कोलार, उत्तर अर्काट; सालेम व कडाप्पा जिल्हे).

सरकारी खातीं.— राजराज व परांतक यांच्या वेळीं निरनिराळ्या खात्यांचे सेक्रेटरी असत; त्यांस ओळैनायक म्हणत. तत्कालीन सरकारी कागदपत्रें हल्लीं उपलब्ध नाहींत. पण तीं जपून ठेवीत असत व दरबारांतून जाणार्‍या प्रत्येक आज्त्रापत्राची नोंदणी होत असे एवढें मात्र खरें. जमीनमोजणी अत्यंत कसोशीनें होई. चोलसाम्राज्यांतील एकंदर लागवडीच्या जमिनीची नोंदणी (राजराजाच्या वेळीं) एका मोठ्या नोंदपुस्तकांत करून ठेविली होती. या नोंदणीतून चुकून १/५०००० इंचाचा (लागवडीच्या जमिनीचा) तुकडा सुद्धां नोंदावयाचा राहिला नव्हता. मोजणीचें मूलमान श्रीपाद (कुलोत्तुंगाचें पाऊल) असे. वेली (६२/३ एकर) हें मोठें क्षेत्रफळाचें मप असे. सारांश विल्यम धि काँकररच्या डूम्सडेबुकाच्याहि आधीं एक शतक, राजराजानें वरील सुधारणा पूर्ण अंमलांत आणिली होती. वेली मापापूर्वी गज हें माप शेतसारा, नक्त सोन्याच्या नाण्यांत अथवा धान्यांत वसूल करीत.   पूर्वापार चालत आलेला (कायमधारा) व नवीन मोजणीनें जास्ती बसविलेला असे दोन सार्‍याचे प्रकार असत; पैकीं दुसर्‍या प्रकारचा सारा महाजनसभा स्वतःच्या अखत्यारीनें वसूल करी. सारा न दिल्यास जमीन जप्‍त करण्यांत येई व तोहि अधिकार महाजनसभेस असे. विक्रमचोलाच्या कारकीर्दीत एकदां अतिवृष्टीनें पीक वाहून जाऊन रयतेस सारा देण्यास सवड झाली नाही, तेव्हां सरकारनें सर्व शेतें जप्त करून लिलावांत काढिली व बागाईत जमीन दर काश(नाणें)ला ८० कुळी व जिराईत जमीन एका काशूस २१२१/२ कुळी याप्रमाणें विकली.

राजे व त्यांचीं कर्तव्यें— राजा राजधानींत असो अथवा मुलुखगिरीवर असो, दरबारी काम स्वतः पाही. राजधानींत असल्यास, राज हा खलबतखान्यांत बसून फर्मान सोडी व सरकारी चिटणीस तें लिहून काढी. राजाच्या कोणत्याही हुकुमास मुख्य मंत्री व इतर प्रधानमंडळ यांची संमति लागे; नंतर तो योग्य अधिकार्‍या (विद्याधिकारी) मार्फत फर्मानांत नमूद केलेल्या व्यक्तीवर बजाविला जाई. तत्पूर्वी ती व्यक्ति ज्या प्रांतांत राही, त्या प्रांताच्या प्रतिनिधीची व तत्रस्थ महाजन सभेचीही संमति राजाज्त्रेस लागे.  इतका बंदोबस्त व लोकांचे नियंत्रण राजाज्त्रेवर असल्यानें अन्याय क्वचितच होई.

कर.— चोल साम्राज्यांत करांचा बोजा मात्र बराच दिसतो. कर यास कडमाई असें नांव आहे. भातपेरणी, मरवा (दवणा मरवा) उत्पन्ना करणें, फुलबाग, धान्यविक्री विड्याची पानें, केशर, आलें, केळीं, हातमाग, तेलाचे घाणे, सोनार, मासे पकडणें, गुरांची विक्री, तलाव, नदीचे उतार टोलनाकीं, जकात, औषधें, मीठ वगैरेवर कर असत. जमीनमहसूल हाच राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य भाग होय. तो जर भरपूर मिळत नसेल, तर उत्पन्न वाढविण्यासाठीं वरील प्रकारचे बारीक सारीक व सार्वत्रिक कर बसवावे लागतात. राजराजानें फक्त एकंदर उत्पन्नाचा १/६ च भाग कर गोळा करण्याची रीत पाडल्यामुळें तो प्रजेला फार प्रिय झाला होता. वरील करांशिवाय आणखी (आय) कर होते; त्यांस अन्तराय (राज्यांतील कलाकौशल्याचे व उत्पन्नावरचे) व बाह्य (टोलनाकीं व आयात जकात) असें म्हणत.

नाणीं, वजनें व मापें.- भात मोजण्याच्या मापास आडवल्लन म्हणत. ते १९२ तोळ्यांचें असे. दुसरें माप कलम नांवाचें असे. एक कलम म्हणजे तीन मण होत. सोन्याच्या नाण्यास कळंजु (१/६ औंस ट्रॉय) म्हणत. अगदी लहान सोन्याचे नाणें काशु (२८ ग्राम्स ट्रॉय) नांवाचे होते. चलन सर्वत्र सोन्याचेंच होतें. नाण्यांत जितक्या किंमतीची धातु असे, तितक्याच किंमतीचे नाणें पाडीत. दागीन्यांची वजनावरून खरेदीविक्री होई. एका काशूस दोन ते चार कलम भात मिळे. चलनांत रोख नाण्यांप्रमाणे धान्याचाही समावेश होई.

व्याजः— सरकारी तिजोरींतील शिल्लक महाजनसभेस उसनवार मिळे व ती सभा तो पैसा शेतकर्‍याला कर्ज म्हणून देई. व्याजाचा दर दरसाल दरशेकडा १२॥ टक्के असे. कर्ज धान्यरूपानें अगर रोख नाण्यांच्या रूपानें मिळे. देवस्थानाकडून घेतलेल्या कर्जाचें व्याज, देवास तूप, तेल, कापूस वगैरे पुरवून वसूल करण्यांत येई.

सैन्य व आरमारः— चोलराज्यांत खडें सैन्य असे; त्यांत धनुर्धारी, पायदळ, घोडदळ व गजदळ असे. त्यांचें आरमारहि होतें. त्याच्या योंगानें त्यांनीं चेरराजाच्या आरमाराचा पराभव केला व ब्रह्मदेश, सीलोन, निकोबार वगैरे प्रदेश स्वार्‍या करून पादाक्रांत केले.

लोकोपयोगी खातें:- चोलांनां इमारती, देवळें, शहरें, कालवे, धरणें बांधण्याचा नाद असे. कारिकालापासून पुढच्या अनेक राजांनी, कावेरीचे पुष्कळ कालवे काढून आपल्या राज्यांत बागायती वाढविली. तंजावरजवळील हल्लीची वडवारू नांवाची नदी, ही पूर्वीच्या वीरराजानें कावेरीपासून काढलेला एक कालवाच होय. त्रिचनापल्ली जिल्ह्यांतील गंगैकोंडशोलापुरम् येथील प्रचंड तलाव हें चोलांचे एक जिंवत स्मारक आहे. हल्ली हा तलाव नादुरस्त आहे. जवळच एक प्रचंड देऊळ (चोलांनींच बांधलेलें) आहे. या देवळांतील शंकराचें लिंग तीस फूट उंचीचें आहे. वेडिअरपालियम् तालुक्यात एक आठ कोसांचें मोठे धरण आहे. असेंच दक्षिण कोलेरूनचेंहि प्रचंड धरण होतें. वरील देऊळ ३७२ फूट रूंद व ५८४ फूट लांब आहे. तंजावरच्या देवळाचें शिखर तर २०० फूट उंचीचें असून तेथील मिनार ८० टन वजनाचा व एकाच दगडाचा आणि पायथ्याशीं २५ फूट औरस चौरस आहे. कावेरीचें धरण बांधल्यानंतर पैशाच्या टंचाईमुळें, करिकालानें मजुरांनां चामड्याचें नाणे मजुरीच्या ऐवजी दिल्यानें त्याच्या राजधानींत मोठे वादळ उत्पन्न होऊन तिची वाताहत झाल्याची एक दंतकथा सांगतात. हिचा सारांश एवढाच कीं, पुढें पुढें सोन्याची टंचाई पडली असावी. देशांत त्या काळीं बांधीव सडका असत. सैन्याच्या हालचाली व व्यापार सतत चालू असल्यानें, रस्ते उत्तम ठेवावे लागत. ते रस्ते चौसष्ट विती रूंद असत. नदीच्या उतारावर ठिकठिकाणीं सरकारी खर्चानें नावा ठेवीत.

पगार व राहणीचें मान.— देवळांतील उत्पन्नांतून, तेथील कामगारांनां पगार मिळे. हिशेबनिसास दरसाल २०० कलम धान्य मिळे. पगार रोख किंवा धान्यरूपानेंहि मिळे. दुय्यम हिशेबनिसास ७५ कलम, देवळांतील ब्रह्मचार्‍याला ६१ कलम व चार काशु, रखवालदारास १०० कलम मिळत. ज्या कुटुंबांतून अधिकारी नेमला गेला असेल त्या कुटुंबाच्या रहाणीच्या मानानें त्याला पगार मिळे. वरील आंकड्यांवरून (हिशेबनीस हा ब्राह्मण असल्यानें) ब्राह्मणकुटुंबास दरमहा १६ रूपयें १० आणे व शूद्राला (रखवालदार शूद्र असल्यानें) दरमहा ८ रूपयें ३ आणे लागत असें दिसतें.

धर्मं— चोलराजे हे वस्तुतः शैव होते; तरी पण त्यांनीं वैष्णवांस अगर जैनांनां फारसा त्रास दिला नाहीं. फक्त कुलोत्तुंगानें रामानुजाचार्यला तो वैष्णव असल्याने श्रीरंगम् येथून हद्दपार केल्याचें एक उदाहरण आढळतें. राजराज व त्याचा पुत्र यांनीं ज्याप्रमाणें शैवदेवस्थानांनां वर्षासनें दिली तशींच वैष्णवदेवस्थानांनांहि दिलीं. वैष्णवदेवळांतून त्यांच्या धार्मिक पाठांचीही (नालायीर प्रबंध) व्यवस्था होई. कोच्चेंगन यानें अनेक देवळें बांधलीं. त्यांत शिवाप्रमाणें विष्णूचींही बरीच होतीं. राजराजानें अप्पर, सुंदरर याप्रमाणेंच कुलेशखर व तिरूमंगल या आळवारांचींही देवळें बांधिली.

 चोल घराण्याची वंशावळ

[चोल राजांची खालील वंशावळ कृष्णस्वामी अय्यंगार यांच्या एन्शन्ट इंडिया या पुस्तकांतून घेतली आहे. ज्यानें राज्य केलें त्याच्या नांवामागें अनुक्रमांक आहे. नांवें वंशावळीतील तक्त्यावरून व काळ पुस्तकांतील मजकुरावरून दिलीं आहेत.]
[खालची वंशावळ, राईस यानें सालेम डिस्ट्रिक्ट म्यानुअल व्हा.१. पृ.३९. वरून दिली आहे.]

१आदित्यवर्मा, राजेंद्र; २वीर नारायण, ३ दसोदित्य, ४ परांतकराय, हरिमाली; ५ दिव्य, देवराज; ६ हरिवरी, त्रिभुवन, वीरदेव.

[पुढील वंशावळ, सेवेल यांच्या दक्षिण हिंदुस्थानांतील घराणीं या पुस्तकांत आढळते. हीं नांवें अगदीच निराळीं दिसतात.]

१ करिकाल, २ चक्रवर्ति, ३ सुदामा, ४ रुचिर व नारायण
[खालची वंशावळ ही वर्जेस यानें दिला असून, ती बृहदीश्वरमहात्म्य या बखरींत आढळते.  बर्जेस हा तिला खरी मानीत नाहीं].

१ कुलोत्तुंग, २ देव, ३ शशिशेखर, ४ शिवलिंग, करिकाल, ६ भीम, ७ राजराजे, ८ वीरमार्तंड, ९ कीर्तिवर्धन, १० जय, ११ कनक, १२ सुंदर, १३ कालकाल, १४ कल्याण, व १५ भद्र

[संदर्भ ग्रंथः—  कलिंगत्तुप्परणी; सिळप्पधिकरम्; पट्टिनप्पालै; महावंश; दिव्यसूरिचरित्र; विक्रमांकदेवचरित्र; अय्यंगार-एन्शन्ट इंडिया; सिवेल लिस्ट ऑफ अ‍ॅन्टिव्किटीज्; फरोह-साऊथ इंडिया ग्याझे.; बुक्यानन-म्हैसूर, कानडा अँड मलबार; बर्नेल-साऊथ इंडियन पॅलिओग्राफी; राईस-म्हैसूर अँड कुर्ग; फ्लीट-कानरीज् डिनॅस्टीज्; स्मिथ-अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया; प्रोग्रेस ऑफ मद्रास प्रेसिन्डेन्सी; एप्रिग्राफिस्ट्स् रिपोर्ट्स्, १८९९, १९००, १९०४ ते १०; साऊथ इंडियन इन्स्क्रिमप्शन्स. पु. २, ३; इंडियन अँटिक्वरी. पु.६, ८, १३, १४, १८, १९, २०, २२, २३, ४१; एपिग्राफिआ इंडिका. पु २, ३, ४, ७, १०; एपिग्रा.कर्नाटिका. पु. ५, ७, ११; बाँबे ग्याझे. पु. १  भा. २; सालेम डिस्ट्रिक्ट ग्याझे.]

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .